जून २०१६

चिंता करी जो विश्वाची ... (८)

चिंता करी जो विश्वाची

समर्थ रामदास स्वामींची श्रीराम भक्ती सर्वज्ञात आहे. भक्तिमार्गाने वाटचाल केल्यास अनेक दुर्गुणांपासून दूर राहणे शक्य होते असे ते सांगत. रक्षणकर्ता श्रीराम ज्याचा पाठीराखा आहे, त्याला दुःख आणि दैन्याचा सामना करावा लागत नाही. सर्व चिंता लयाला जातात असे ते म्हणत. परंतु त्यांना अभिप्रेत असलेली भक्ती म्हणजे फक्त पूजाअर्चा आणि इतर कर्मकांडे इतकीच मर्यादित नव्हती. भगवान श्रीरामाची भक्ती करणे म्हणजे त्यांच्या  सारखेच आदर्श वागणे, बोलणे आणि चालणे असे होते. मुखी रामनाम घेत दुर्वर्तन करणे त्यांना मान्य नव्हते. किंबहुना असे करणाऱ्यास भक्त म्हणणे देखिल योग्य नाही असे ते मानीत. विचार आणि आचारात एकवाक्यता असणे, हेच खरे सद्गुणी माणसाचे लक्षण आहे यावर त्यांचा विश्वास होता. 


सदा बोलण्यासारखे चालताहे । 

अनेकी सदा एक देवासी पाहे ।

सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा ।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ 


सद्गुणांची उपासना करणे म्हणजेच खरी ईश्वरभक्ती असे ते शिकवीत असत. यासाठी प्रथम दुर्गुणांना ओळखून त्यांचा जाणीवपूर्वक त्याग करणे, आणि उत्तमगुण अंगिकारणे अत्यावश्यक आहे. त्रिगुणांचे सविस्तर विवेचन म्हणूनच ते करतात. सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे मनुष्याचे मन आणि जीवन नियंत्रित करतात. त्यातील तमोगुण अथवा तामसगुण हा हीन आणि सर्वथा त्याज्यं आहे. रजोगुणायोगे देखिल अनेक दुःख आणि संकटांचा सामना करणे क्रमप्राप्तं होते. म्हणून रजोगुणांपासून अंतर ठेवून असायला हवे. परंतु सर्वात उत्तम जो सत्त्वगुण, तो सुखदायी असतो. उपकारक असतो . म्हणून त्याची संगती करणे अतिउत्तम. 

सत्त्वगुणांची अनेक लक्षणे समर्थ वर्णन करतात. आणि असा सत्त्वगुण सदा अंगी बाणवावा असा उपदेश ते आपल्या शिष्यवर्ग आणि श्रोतेजनांस देत असत.  


जो अज्ञानाचा सेवट । जो पुण्याचे मूळ पीठ ।

जयाचेनी सापडे वाट । परलोकाची ॥ 


असे सत्त्वगुणाचे वर्णन ते करतात. सत्त्वगुणी मनुष्याचे विचार, आचार हे विवेकी असतात. मनात अपरंपार भक्तिभाव असतो. त्या योगे त्याचे वागणे, बोलणे नम्र आणि सौजन्यशील असते. इतरांस तो दुखवीत नाही, अथवा त्यांची निर्भत्सना करून अपमानित करत नाही. परोपकार आणि दानधर्म त्याचे नित्यनेम असतात. त्याची राहणी साधी आणि सोज्वळ असते. दिनचर्या नियमित असते. तो नेहमी लोकोपयोगी कामे करण्यात आणि करविण्यात अग्रेसर असतो. धर्मकार्ये करण्यात त्याला रुची असते. सत्त्वगुणी मनुष्य कधीच अहंकारी नसतो. कुठलेही काम करण्यास त्याला कधीच कमीपणा वाटत नाही . त्याची देवभक्ती ही खऱ्या सोन्याप्रमाणे अंतर्बाह्यं लखलखीत असते आणि कुठल्याही कसोटीवर खरी ठरते. 


महत्कृत्य सांडून मागे । देवास ये लागवेगे ।

भक्ती निकट आंतरंगे । तो सत्त्वगुण ॥

थोरपण सांडून दुरी । नीच कृत्य आंगीकारी ।

तिष्ठत उभा देवद्वारी । तो सत्त्वगुण ॥ 


सत्त्वगुणी माणूस, ऐहिक सुखाच्या आणि व्यसनांच्या कधीच अधीन राहत नाही. कारण त्याच्यासाठी देवभक्ती ही सर्वश्रेष्ठ असते. इतरांप्रती त्याचे वागणे, बोलणे सहानुभूतीपूर्ण असते . साधु, संत आणि ज्ञानी व्यक्तीच्या सहवासात त्याचे मन रमते. त्यांची यथायोग्य सेवा करण्यात त्याला धन्यता वाटते. 


देहाभिमान गळे । विषई वैराग्य प्रबळे ।

मिथ्या माया ऐसे कळें । तो सत्त्वगुण ॥ 


संसारामध्ये सत्त्वगुणी माणूस गुंतून राहत नाही. हरिकथा, कीर्तन, भजन या मध्ये त्याचे मन रमते. मनातले सर्व भय आणि भ्रम लयाला गेलेले असतात. त्यामुळे एकप्रकारची शांती आणि समाधान सदैव त्याच्या अंतर्यामी वसत असते. आपले जीवन हे सत्कार्यास्तव खर्च व्हावे असे त्यांस वाटते. इतर लोकांच्या सांगण्या, बोलण्याने त्याच्या या निश्चयात फरक पडत नाही. आपला मार्ग  दृढ निश्चयाने आणि काही एक संकल्प मनात ठेवून  आक्रमीत असतो. सत्त्वगुणांच्या अस्तित्वाने त्याच्या या निश्चयास बळ प्राप्तं होते. 


शांती क्षमा आणि दया । निश्चय उपजे जया ।

सत्त्वगुण जाणावा तया । अंतरी आला ॥ 


अशा प्रकारे नियमित आणि आदर्श जीवनपद्धती सत्त्वगुणी माणूस अनुसरतो. वृत्तीने  सात्त्विक आणि दयाळू असतो. इतरांच्या मदतीस  सदैव तत्पर असतो. सुग्रास अन्नं आणि सुखासिनतेची अन्य साधने त्याला आकर्षित करीत नाही. आपल्या आधी  इतरांची चिंता वाहतो. दुसऱ्याचे दुःख दूर करण्यासाठी तो यथाशक्ति प्रयास करतो. असे करणे त्यांस परमकर्तव्य वाटत असते. 


जेणे जिंकीली रसना । तृप्त जयाची वासना ।

जयास नाही कामना । तो सत्त्वगुण ॥ 


अनेक संकटे आली तरी तो अविचल असतो. आपल्या निश्चयापासून ढळत नाही. स्वतःच्या कर्तव्याकडे कधीच पाठ फिरवीत नाही. दुःखाने खचत नाही. भयचिंता त्याला त्याच्या संकल्पापासून दूर करू शकत नाही. आपले विहीत कार्य  निष्काम पद्धतीने, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता करत राहतो. म्हणूनच  लोक अशा व्यक्तीस ' सत्त्वगुणी' असे  संबोधितात. 


देह आपदेने पीडला । क्षुधे तृषेने वोसावला ।

तरी निश्चयो राहिला । तो सत्त्वगुण ॥ 

जयास अहंकार नसे । नैराशता (अनासक्ती) विलसे । 

जयापासीं कृपा वसे । तो सत्त्वगुण ॥ 


त्रिगुण हे मनाचे, बुद्धिमत्तेचे कारक असतात. ज्या गुणाचे प्राबल्यं अधिक, तसे व्यक्तीचे चारित्र्य, आणि वर्तन घडत असते. त्यातील सत्त्वगुण हा अतिउत्तम मानला जातो. सत्त्वगुणी व्यक्ती चारित्र्यसंपन्न असते. सत्त्वगुणी मनुष्याचे वर्तन निर्दोष असते. ज्ञानसंपादन अथवा ज्ञानदान करणे, पूजापाठ आणि इतर धार्मिक कृत्ये करण्यात तो नेहमीच मग्नं असतो. सत्त्वगुणी व्यक्ती नम्रं आणि विनयशील असतात. मृदू आणि मितभाषी असतात. सहसा दुसऱ्यास दुखवणारे अथवा कुणास अपमानित करणारे  कठोर वर्तन अथवा संभाषण, सत्त्वगुणी कधीच करीत नाही. दुसऱ्यांच्या दोषाकडे दुर्लक्ष करण्या एव्हढी क्षमाशीलता त्यांच्याकडे असते. दुसऱ्यांच्या दोषाचे जाहीर उच्चारण तर ते कदापि करीत नाहीत. एखाद्याने काही अधिक-उणे भाषण केल्यास, त्यांस प्रत्युत्तर देत नाहीत. दुर्लक्ष करतात. ज्यायोगे द्वेष, कलह अशा वाईट प्रवृत्तींना थारा मिळत नाही. त्यामुळे सामाजिक वातावरण चांगले राहते. 


पारव्याचे दोषगुण । दृष्टीस देखे आपण ।

समुद्राऐसी साठवण । तो सत्त्वगुण ॥

नीच उत्तर साहणे । प्रत्योत्तर न देणे ।

आला क्रोध सावरणे । तो सत्त्वगुण ॥ 


अशा प्रकारे सत्त्वगुणी व्यक्ती सामाजिक संतुलन आणि सलोखा अखंड राखण्यास सहाय्यक ठरतात. सत्त्वगुणी मनुष्य  इतरांआगळा सहजच ओळखता येतो. तो आपल्या वर्तनाने कुणाचा उपमर्द होऊ देत नाही. बोलणे विवेकी, संयमी आणि मृदू असून तो मितभाषी असतो. इतरांस वृथा उपदेश देण्याचा वाचाळपणा कधीच करीत नाही. आपले नित्यनेम आणि दिनचर्या या बाबतीत अत्यंत काटेकोर असतो. देव, धर्म, अध्यात्मं, परोपकार आणि दानधर्म यामध्ये त्याला अत्याधिक रस असतो. व्यसने आणि इतर ऐहिक भोगविलासात त्याचे मन रमत नाही. इतरांचे दोष तो सहजतेने दृष्टीआड करतो. कुणी संकटामध्ये आहे हे कळताच, सत्वर मदतीस जातो. त्यासाठी प्रसंगी आपली महत्त्वाची कार्ये आणि कर्तव्ये देखिल मागे ठेवतो. संत सहवासात त्यास सुख मिळते. साधू, बैरागी, पंडित, आणि विद्वान यांची सेवा-शुश्रुषा करून तो कृतार्थ होतो. आपल्याजवळील जे जे उत्तम आहे, ते इतरांस देण्यात सदैव सज्ज असतो. अशा सत्त्वगुणी व्यक्ती आदर आणि लोकसन्मानास पात्र ठरतात. लोक त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतात . त्यांचे अनुसरणं करू जातात. त्यांच्या शब्दांना देखील समाजात अधिक मूल्य असते. 


संतकृपा हो जयास । तेणे उद्धरीला वंश ।

तो ईश्वराचा अंश । सत्त्वगुणे ॥

सन्मार्ग दाखवी जना । जो लावी हरिभजना ।

ज्ञान सिकवी अज्ञाना । तो सत्त्वगुण ॥ 

 

काही लोक इतरांस मारे उपदेश करतात. परंतु त्यांचे स्वतःचे वागणे मात्र त्याच्या विपरीत असते. म्हणजे  "लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण " अशी स्थिती. परंतु सत्त्वगुणी व्यक्ती असे वर्तन कधीच करीत नाही.  सत्त्वगुणी व्यक्ती, स्वतःच्या कृतीतूनच इतरांवर चांगले संस्कार  करत असते. त्यासाठी त्यांना  वृथा शब्दभांडार रिते करण्याची जरूर लागत नाही. शुद्ध आणि पवित्र जे आहे, त्याच ठिकाणी सत्त्वगुणी मनुष्य रमतो. इतरांसाठी त्याच्या ऱ्हुदयात नेहमीच सहानुभूतीचा ओलावा असतो. दुसऱ्याचे दुःख दूर करणे त्यास आपले परमकर्तव्य वाटत असते. आणि त्या बदल्यात कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा तो करीत नाही. 


परपीडेचे वाहे दुःख । परसंतोषाचे सुख । 

वैराग्य देखोन हरिख (हर्ष) । मानी, तो सत्त्वगुण ॥ 

परभूषणे भूषण । परदूषणे दूषण । 

परदुःखे सिणे जाण । तो सत्त्वगुण ॥ 


असा सत्त्वगुणी व्यक्ती सात्त्वीक, शुद्ध, आणि पवित्र असतो. त्याचे अस्तित्व समाजासाठी हीतकारक असते. समाजातील दुष्टं प्रवृत्तींना, स्वतःच्या सत्त्वगुणांनी तो पराजित करतो. समाजाचे धार्मिक आणि सांस्कृतिक उन्नयन घडवून आणण्यास कारणीभूत ठरतो. म्हणूनच त्याचे आचार विचार, आदर्श आणि अनुकरणीय असतात. प्रत्येकाने आपले वागणे बोलणे त्यानूसार केले असता,  सत्त्वगुण त्याच्या ठायी उपजतील आणि उच्च प्रतीच्या नीतीवान समाजाची निर्मिती होईल,  असे समर्थांचे सांगणे आहे. 


सदा देवकाजी झिजे देह ज्याचा ।

सदा रामनामे वदे नित्य वाचा । 

स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा ।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ 


(क्रमशः) 


Post to Feedलेखमाला
धन्यवाद !
आता पाहावे
आभारी आहे .

Typing help hide