जून १५ २०१६

चिंता करी जो विश्वाची ... (९)

चिंता करी जो विश्वाची
श्री रामदास स्वामींनी जरी संन्यास धर्म स्वीकारला होता, तरी त्यांचे समाजाशी असलेले नाते अभंग होते. एकांतवास त्यांना प्रिय होता तो चिंतन, मनन, आणि लेखन करण्यासाठी. समाज आणि समाजव्यवस्था कशी असायला हवी, या बद्दल त्यांच्या संकल्पना पुरेशा स्पष्टं होत्या. मनुष्याला वैयक्तिक, प्रापंचिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक अशी सर्वकष प्रगती / उन्नती साधता येईल अशी सामाजिक स्थिती निर्माण करायला हवी. असा समाज निर्माण करायला हवा -  ज्यात हिंसा, द्वेष, कलह यांना स्थान नसेल, शांतता आणि सुव्यवस्था असेल, अशी त्यांची धारणा होती. 
समाज हा असंख्य व्यक्तींचा बनलेला असतो.. व्यक्तीगत गुणावगुणांचा थेट परिणाम समाजावर आणि सामाजिक स्थितीवर होत असतो.  त्याकरता,  इष्ट आणि अनिष्टं अशा अनेक गुणांची चर्चा दासबोधामध्ये ते  सविस्तरपणे करतात. आदर्श तत्त्वे आणि मूल्ये समाजात रुजावी, या साठीच तर हा ज्ञानदानाचा उद्योग समर्थांनी आरंभलेला होता. 

सत्त्वगुण, रजोगुण आणि तामसगुण अथवा तमोगुण, या त्रिगुणांची चर्चा करताना समर्थांना जाणवले, की नुसते उत्तमगुण असून उपयोग नाही. त्या जोडीला विद्या म्हणजे ज्ञान देखिल असायला हवे. आणि ही विद्या कशी असावी तर "सुविद्या" असावी. ज्यायोगे जनसामान्यांचा उद्धार होईल अशी असावी. अशा सुविद्येने सुशोभित माणूस आदरास पात्र असतो. अशा ज्ञानसंपन्न व्यक्तीमुळे  सामाजिक भरभराट होते. शांती आणि सुव्यवस्था प्रस्थापित होते. 
 
हरीभक्त विरक्त विज्ञानराशी ।
जेणे मानसी स्थपिले निश्चयासी ॥
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे ।
तया भाषणे नष्ट संदेह मोडे ॥ 
नसे गर्व आंगी सदा वीतरागी ।
क्षमा शांती भोगी दयादक्ष योगी ॥
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा । 
इंही लक्षणी जाणिजे योगिराणा ॥ 

असे सुविद्य आणि सुसंस्कारी मनुष्यांचे वर्णन रामदासस्वामींनी केलेले आहे. ज्ञानसंपादन करणे हे प्रत्येकाचे श्रेष्ठं कर्तव्य आहे, असे समर्थ सांगतात. परंतु  ज्ञान संपादन करीत असताना, गुरू आणि आणि त्यांकरवी प्राप्तं होत असलेली विद्या पारखून घेणे जरूरीचे आहे. अयोग्य गुरुयोगे कुविद्येची प्राप्ती होते. आणि कुविद्येपायी अपरिमित दुःख आणि हानी सोसावी लागते. म्हणून सद्गुरूला शरण जावे. सद्गुरूचे गुण वर्णन तर समर्थांनी या आधी केलेलेच आहे. आता ते सुविद्येची लक्षणे सांगतात. 

ज्याने सुविद्या प्राप्त केलेली आहे, तो नम्र आणि सद्वचनी असतो. इतरांचा सहजपणे उपमर्द करीत नाही. तो शांत आणि सुस्वभावी असतो. त्याच्या अस्तित्वाने इतरजनांस आनंद प्राप्त होतो. कारण सुविद्येचा धनी परोपकारी असतो. ज्ञानाने परिपूर्ण असल्याने अनेक समस्यांचे योग्य असे समाधान तो करू शकतो. लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याची क्षमता त्यामध्ये असते. अज्ञानी लोकांना तो कधी फसवत नाही, तर आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांना योग्य त्या मार्गावर आणतो. 

भाविक सात्त्विक प्रेमळ । शांती क्षमा दयासीळ ।
लीन तत्पर केवळ । अमृतवचनी ॥ 

असे वर्णन सुविद्येने युक्त असलेल्या मनुष्याचे केले आहे. असा मनुष्य स्वतः सन्मार्गी असतो, आणि इतरांना देखिल भरकटु देत नाही. तो स्वतः बरोबरच अन्य लोकांचा देखिल नेहमी विचार करतो. हरएक प्रसंगी योग्य आणि अयोग्य काय असेल हे तो जाणतो आणि इतरांस देखील शिकवितो. म्हणूनच त्याचे असणे सर्वांसाठी आश्वासक असते. 

तत्त्वज्ञ आणि उदासीन । बहुश्रुत आणि सज्जन ।
मंत्री आणि सगुण । नीतीवंत ॥ 
साधु पवित्र पुण्यसीळ । अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ । 
कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ । निर्लोभ अनुतापी ॥ 

अशी लक्षणे सुविद्येने अलंकृत माणसाच्या ठायी असतात. तो कर्मनिष्ठ असून त्याची सर्व कर्मे शुद्ध आणि नैतिक असतात. तो कधीही, कशाचाही अपहार करीत नाही. त्याची वृत्ती निर्लोभी आणि निर्मळ असते. मनामध्ये हेवेदावे धरून तो कृती करीत नाही. त्याचा दृष्टिकोन वस्तुनिष्ठ आणि न्यायी असतो. समतोल बुद्धीने तो विचार करू शकतो. 

आदर सन्मान तार्तम्य जाणे । प्रयोगसमयो प्रसंग जाणे । 
कार्यकारण चिन्ह जाणे । विचक्षण बोलिका ॥ 
सावध साक्षेपी साधक । आगम (वेदशास्त्र)  निगम (वेदांत) शोधक । 
ज्ञानविज्ञान बोधक । निश्चयात्मक ॥ 

सुविद्येचा साधक अशा सर्व गुणांनी युक्त असतो. सुविद्या माणसास सत्यवचनी, एकवचनी होण्यास सहाय्य करते. त्यामुळे असा मनुष्य सर्वजनांच्या विश्वासास प्राप्त असतो. आपल्या ज्ञानाचा, विद्येचा त्यांस गर्व नसतो. ज्ञानी असूनही ज्ञानोपासना करण्यास अनमान करीत नाही. इतरांचे बोलणे/सांगणे लक्षपूर्वक ऐकतो. इतरांस सन्मानपूर्वक वागणूक देतो, कधी कुणांस तुच्छं लेखत नाही. त्यामुळे सर्वांस अशा व्यक्तीबद्दल आपुलकी आणि आदर वाटतो. अशा व्यक्तीस न मागता मानसन्मान मिळत राहतो, ज्याचा त्याला थोडाही हव्यास नसतो. सुविद्येचे वास्तव्य ज्याच्या अंतरी आहे अशा व्यक्तीची सुलक्षणे सहजपणे दिसून येतात. 

संशयछेदक विशाळ वक्ता । सकळ क्लृप्त असोनी श्रोता । 
कथानिरूपणी शब्दार्थ । जाऊंच नेदी ॥
वेवादारहित संवादी । संगरहित निरोपाधी ।
दुराशारहित अक्रोधी । निर्दोष निर्मत्सरी ॥ 

सुविद्य व्यक्ती  निर्मोही, निर्मत्सरी असतो. वादापेक्षा संवादावर त्याचा भर असतो. त्याचा क्रोध त्याच्या स्वतःच्या कह्यात असतो. कठीण प्रसंगी देखिल निराश, हताश न होता, त्या परिस्थितीवर मात करण्याचे मार्ग तो शोधत राहतो. निराशेच्या भरात अविचारी कृत्य तो कधीच करीत नाही. तो नित्य संयमी आणि मधुरवचनी असतो. त्याचे भाषेवर प्रभुत्व असते आणि नेमका शब्दं अचूक जागी योजण्याचे चातुर्य त्याच्याकडे असते.  त्याबबतीत तो काटेकोर देखिल असतो. 
अशा सज्जन, सुविद्य आणि साक्षेपी व्यक्तीमुळे समाज संपन्न होतो. आपल्या ज्ञानाचा उपयोग ते इतरांसही करू देतात. त्यामुळे अनेक कलह आणि संकटे यांची सोडवणूक होऊ शकते. आणि सामान्य मनुष्याचे आयुष्य चिंतारहित आणि समाधानी होते. 
सद्गुणी, सदाचारी, आणि सुविद्य मनुष्य हा विरक्त असतो. निर्लोभी, निर्मोही असतो. भौतिक साधनांच्या लालचीपायी तो आपले उज्वल चारित्र्य कधी डागाळून घेत नाही. त्यांमुळेच दुश्चित, दुर्गुणी व्यक्ती त्यांना आपल्या दुष्कर्मांमध्ये सामील करून घेऊ शकत नाहीत. 

विरक्तीचा गुण हा सहज साध्य नाही. सत्त्वगुणी, सुविद्य व्यक्तींच्या  ठायी या गुणाची उपज होते. एकदा हा गुण अंगी बाणला, की सर्व दुःख आणि चिंतांचे हरण होऊन मनुष्य आनंदी जीवन उपभोगतो. विरक्त गुणांच्या योगे काय फायदे होतात याची माहिती रामदासस्वामी देतात. 

जेणे सत्कीर्ती वाढे । जेणे सार्थकता घडे । 
जेणेकरिता महिमा चढे । विरक्तांसी ॥ 
जेणे सुख उचंबळे । जेणे सद्विद्या वोळे (प्रकटे) ।
जेणे भाग्यश्री प्रबळे । मोक्षेसहित ॥ 

विरक्त गुणा योगे सुख समाधानाची वृद्धी होते. आसक्ती विरहित वृत्तीमुळे आशा-निराशेच्या आवर्तातून सुटका होते. शांत आणि प्रसन्न वृत्तीमुळे बुद्धी सतेज आणि नेहमी कार्यरत राहते. विचारांवर, आचारांवर नैराश्याचे सावट राहत नाही. तणावरहित आणि आनंदी जीवन जगणे शक्य होते. ज्या व्यक्ती ज्ञानी आणि सुविद्य असतात, त्यांच्या ठायी विरक्ती प्रकर्षाने दिसून येते. विरक्ती अंगी बाणली असता -- 

मनोरथ पूर्ण होती । सकळ कामना पुरती । 
मुखी राहे सरस्वती मधुर बोलावया ॥ 

इतके सर्व फायदे दिसत असूनही सामान्य जनांस मोह सोडवत नाही. आसक्तीने त्याची बुद्धी भ्रष्ट होते. अपेक्षा भंगाचे दारूण दुःख सहन करावे लागते. लोभीपणामुळे दुर्वर्तन घडते. समाजात अनाचार माजतो. हिंसा, द्वेष वाढीस लागतात. सुख शांती लयाला जाते. हे सारे होऊ नये या साठी मनुष्याने विरक्त वृत्तीने जीवनयापन करावे असा उपदेश समर्थ करतात. विरक्त व्यक्तींची लक्षणे ते विषद करतात. 

विरक्ते असावें परमदक्ष । विरक्ते असावे अंतरसाक्ष ।
विरक्ते वोढावा कैपक्ष (कैवार) । परमार्थाचा ॥ 
विरक्ते विमळज्ञान बोलावे । विरक्ते वैराग्य स्तवीत जावे ।
विरक्ते निश्चयाचे करावे । समाधान ॥ 

अशा विरक्त व्यक्तींमुळे समाज सन्मार्गी लागतो. देव, धर्म, संस्कृती यांस उजाळा मिळतो, चालना मिळते. भक्तिमार्गाची भरभराट होते. सुविद्यं आणि सज्जन लोकसंख्येत वाढ होते. समाज संस्कारी, सुविचारी, आणि सदाचारी होतो. विरक्त व्यक्ती स्वतः अंतर्बाह्य शुद्ध असतात, आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असतात आणि कार्यकुशल देखिल असतात. आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने अनेक लोकोपयोगी, समाजोपयोगी कार्ये ते नित्यनेमाने करत असतात. त्यामुळे समाजाची देखिल नित्य उन्नती घडते.
विरक्त व्यक्तीचे वर्तन कसे असायला हवे, या विषयी समर्थ सांगतात. 

विरक्ते असावे धीर । विरक्ते असावे उदार । 
विरक्ते असावे तत्पर । निरुपणविषई ॥
विरक्ते सावध असावे । विरक्ते शुद्ध मागे जावे । 
विरक्ते झिजोन उरवावे । सदकीर्तीसी ॥ 

विरक्त मनुष्य जगमित्र असावा. परंतु त्याने आपले समानधर्मी मित्र देखिल शोधावेत. एकमेकांचे सहाय्य घेऊन अनेक अवघड कार्ये सुघड, संपन्न करावीत. विरक्त व्यक्तीने, जेथे जाईल तेथे आनंद वाटत जावा. सौदर्यदृष्टीने आपण भेट देत असलेल्या स्थानांचे पुनर्योजन करावे. त्यायोगे फक्त माणसेच नाही तर त्यांची वास्तव्याची स्थाने देखिल समृद्ध आणि आनंददायी होतील. परंतु असे असले तरी विरक्त व्यक्तीने एकस्थानी जास्त काळासाठी राहू नये. त्याचा सर्वत्र संचार असायला हवा. त्यामुळे त्याच्या ज्ञानाचा, कुशलतेचा अनेकांना फायदा होईल. विरक्त व्यक्तीने सदासर्वदा सावध असावे असे समर्थ सांगतात. संकटांची चाहूल घेऊन वेळीच त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी असा सावधपणा उपयोगी ठरतो. लोकांंचे , समाजाचे सर्वप्रकारच्या व्याधींपासून, संकटापासून रक्षण करणे हे विरक्त माणसाचे प्रथम कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या आड वैयक्तिक स्वार्थ, लोभ, मत्सर, द्वेष येऊ नयेत म्हणून विरक्ती अंगिकारणे अत्यंत गरजेचे आहे. असे केल्यानेच हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेणे शक्य होईल, असे समर्थांचे सांगणे आहे. 

विरक्ते समय जाणावा । विरक्ते प्रसंग वोळखावा ।
विरक्त चतुर असावा । सर्वप्रकारे ॥ 

विरक्त माणसाने ज्ञानमार्गी असावे. होमहवन, पूजापाठ, मंत्रपठण, तंत्रविद्या या सर्वांचे ज्ञान आत्मसात करावे. कुणाच्याही संदेहाचे समाधान, विरक्ताकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांचे अडलेले कार्य सिद्धीस जाण्यास मदत होते, आणि विरक्त व्यक्तीविषयीचा आदरभाव वाढीस लागतो. 

दृढ निश्चय धरावा । संसार सुखाचा करावा । 
विश्वजन उद्धरावा । संसर्गमात्रे ॥ 

असा उपदेश समर्थ करतात. समाजाने उत्तमगुण अंगिकारावे आणि आपले हित करून घ्यावे, या साठी समर्थांची वाणी, लेखणी अखंडपणे कार्यरत होती. योग्य-अयोग्य, शुद्ध-अशुद्ध , नैतिक-अनैतिक या सर्वांच्या संकल्पना लोकांच्यासमोर ते मांडत होते. त्यातून बोध घेऊन लोकांनी आपले जीवन आणि प्रपंच यशस्वी करावा, सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करावी अशीच त्यांची अपेक्षा होती. अशा सद्गुणी व्यक्तींचा वावर ज्या समाजात आहे, त्याची प्रत निरंतर उत्तमच राहील असा त्यांचा दृढ विश्वास होता. आपला उपदेश ऐकून काहीजण बोध घेतील, परंतु काही लोक तसेच कोरडे राहतील याची पूर्णं कल्पना समर्थांना आहे. अशा व्यक्तीमुळे चांगल्या व्यक्तींच्या कार्यात अडथळे येऊन क्रोध, द्वेषाचा संचार देखिल होऊ शकतो याची जाणीव त्यांना आहे. म्हणून ते आपल्या श्रोत्यांना, साधकांना सावध करतात. अशा दुश्चित माणसांमुळे हतोत्साहित होऊन आपल्या कार्यात खंड पडू देऊ नका असे ते सांगतात. अशा दुष्ट प्रवृत्तीना दूर ठेवून आपली वाटचाल अथक करीत राहणे हेच सुविद्य आणि विरक्त माणसाचे लक्षण  आहे. 

विरक्ते निंदक वंदावे । विरक्ते साधक बोधावे ।
विरक्ते बद्ध चेववावे -। मुमुक्षनिरूपणे ॥
विरक्ते उत्तमगुण घ्यावे । विरक्ते अवगुण त्यागावे । 
नाना अपाय भंगावे । विवेकबळे ॥ 

(क्रमशः) 

Post to Feed
Typing help hide