जून २५ २०१६

चिंता करी जो विश्वाची ... (१०)

चिंता करी जो विश्वाची
श्री रामदास स्वामींनी आरंभलेला ज्ञानयज्ञ, अखंड प्रज्वलीत होत होता. ज्ञानसंपन्न, साधनासंपन्न असलेले समर्थ, समाजातील अनेक लहानसहान  बाबींचा देखिल बारकाईने विचार करीत होते. आपल्या ज्ञानाच्या, अनुभवांच्या आणि शहाणपणाच्या तराजूमध्ये तोलत. होते. योग्य काय आणि अयोग्य काय यांची परिमाणे लोकांना शिकावीत होते . त्यांची तीक्ष्ण बुद्धी,  हितकारी आणि अहितकारी गुणदोषांना पारखत होती. त्यातील हीण काय आहे, आणि शुद्ध कांचन कुठले , हे वेगळे करून सांगत होती. 

त्यांना समाजात असे अनेकजण आढळले, जे ज्ञानी तर होते, अनेक ग्रंथांचे वाचन केलेले, आणि अनेक शास्त्रविद्यांची माहिती असलेले असे व्युत्पन्न पंडितही होते. पण तरीही त्यांना सज्जन अथवा उत्तम गुणांनी युक्तं असे म्हणता आले नसते. समर्थांचे जे सांगणे होते, त्यांनुसार त्यांनी सद्गुरूंकडून उत्तम विद्या ग्रहण केली होती.  तरीही त्यांचे अस्तित्व समाजोपयोगी नव्हतेच, तर  काही लोकांसाठी त्रासदायक होते. 
असे का व्हावे? याचेही उत्तर समर्थ देतात.

म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे ।
अतर्कासी तर्की (जाणतो) असा कोण आहे ॥
जनी मीपणे पाहता पाहवेना ।
तया लक्षीता वेगळे राहवेना ॥ 

अहंकारी लोक इतरांस तुच्छ लेखतात. आपल्या ज्ञानाच्या गर्वामध्ये त्यांना इतरांच्या मानसन्मानाची, भावनांची कदर राहत नाही.स्वत:च्या यश-कीर्तीने ते धुंद झालेले असतात. लोकांनी आपल्यालाच आदर, सन्मान द्यावा, असा त्यांचा हट्टाग्रह असतो आणि त्यांमुळे ते सामाजिक वातावरण दूषित करतात. 

बहू शास्त्र धुंडाळिता वाड (पुष्कळ) आहे ।
जया निश्चयो येक तोही न साहे ॥
मती भांडती शस्त्रबोधे विरोधे ।
गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे ॥ 

असा समाजात कलह निर्माण झालेला असतो. कुणालाही, कुणाचेच म्हणणे मान्य नसते. समस्तांनी आपलेच ऐकले पाहिजे... कारण की माझेच ज्ञान परिपूर्ण, माझीच माहिती अचूक आणि मी सांगीन तोच अर्थ सुयोग्य असा दुराग्रह या ज्ञानी जनांच्या मनात उपजलेला असतो. 
समर्थ असे वागणाऱ्यांची तुलना पढतमूर्खांशी करतात. ज्ञान तर आहे, पण ते कसे ? कुठे ?  आणि केव्हा?  वापरायचे याचे भान सुटलेले असते. अशांसाठी समर्थ लिहितात --

बहुश्रुत आणि वित्पन्न । प्रांजळ बोले ब्रम्हंज्ञान ।
दुराशा आणि अभिमान । धरी, तो येक पढतमूर्ख ॥ 

पढतमूर्खांची लक्षणे देखिल समर्थांनी सखोल आणि सविस्तरपणे वर्णन केलेली आहेत. 
जो मनुष्य स्वधर्माची निंदा करतो, सगुण भक्तीस अव्हेरतो, धर्म-संस्कृतीची सर्व बंधने, नियम त्याज्यं मानतो --- तो पढतमूर्ख या पदवीसाठी योग्यं उमेदवार असतो. असा माणूस स्वतःस ज्ञानी समजून इतरांची चेष्टा अथवा निंदा करतो. तो सतत आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करण्यात मग्नं असतो. आपल्याहून अधिक शहाणा कुणीच नाही, असा स्वतःचा ग्रह त्याने करून घेतलेला असतो. सतत इतरांचे उणेदुणे शोधून, ते उच्चं रवाने जनलोकांत सांगण्याचा त्याचा प्रघात असतो. कारण त्या योगे आपले शहाणपण उठून दिसेल असे त्यांस वाटत असते. पण या वृत्तीमुळे अनेकांना तो दुखावतो आणि त्यांचे वैर देखिल पत्करतो. 

आपलेन ज्ञातेपण । सकळांस शब्दं ठेवणे ।
प्राणीमात्रांचे पाहे उणे । तो येक पढतमूर्ख ॥ 

काही जण, त्यांचे  शिष्यत्व  विसरून गुरूची अवज्ञा करू जातात. आपल्या ज्ञानावर त्यांचा अतिविश्वास असतो.  अशा अतिउत्साही आणि अर्धज्ञानी लोकांपायी नस्ती संकटे ओढवतात. अनेकांना नुकसान सोसावे लागते. परंतु त्या कारणाने देखिल हे लोक ओशाळवाणे होत नाहीत. जे वाईट घडले, त्याचेही खापर दूसऱ्यांवर फोडायला ते कचरत नाहीत. 
"उथळ पाण्याला खळखळाट फार" -- ही म्हण अशा लोकांचे अचूक वर्णन करते. जे चकाकते, जे आकर्षक दिसते आहे, त्याची वाखाणणी हे लोक न थकता करतात. एखाद्या विषयाची माहिती घेताना,  त्या विषयाच्या मुळापर्यंत जाण्याचा निग्रह त्यांच्याकडे नसतो. वरवरच्या आणि अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे देखिल, हे लोक आपली पक्की मते बनवतात. त्यांची चूक लक्षात आली, तरी ते आपली मते कधीच बदलत नाहीत. कारण असे करणे म्हणजे त्यांना स्वतःचा अपमान वाटतो. 

रजोगुणी तमोगुणी । कपटी कुटिळ अंतःकर्णी ।
वैभव देखोन वाखाणी । तो येक पढतमूर्ख ॥ 
लक्षणे ऐकोन मानी वीट । मत्सरें करी खटपट ।
नीतिन्याय उद्धट । तो येक पढतमूर्ख ॥ 

असे पढतमूर्ख समाजासाठी घातक असतात.  त्याच्यामुळे सामाजिक सलोखा भंग पावतो, वातावरण दूषित होते. असे लोक मत्सरग्रस्त असतात. इतरांचे कौतुक ऐकणे, करणे त्यांना असह्यं होते. आपणापेक्षा ज्ञानी आणि गुणी जनांचे वाईट व्हावे, या साठी ते कट कारस्थान देखिल करतात. त्यामुळे समाजात वैरभाव जागृत होतो. असे लोक वाचाळ  असतात. आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन ते न कंटाळता करतात, मात्र इतरांचे सांगणे, बोलणे ऐकायचेही टाळतात, दुर्लक्ष करतात. अशा व्यक्ती, सतत इतरांचे दोष जाहीरपणे सांगत असतात.  एखादा गुणी माणूस असेल आणि इतर त्याची स्तुती करत असतील, तरी हे लोक मात्र त्यांचा  एखादातरी दोष, अवगुण सापडतो का, हेच तपासत असतात. त्यामुळे अशा व्यक्ती ज्ञानी असून देखील, समाजासाठी निरुपयोगी ठरतात. 

श्रोता बहुश्रुतपणे । वक्तयास आणी उणे । 
वाचाळपणाचेनी गुणे । तो येक पढतमूर्ख ॥ 
दोष ठेवी पुढिलांसी । तेंची स्वये आपणांपासी ।
ऐसे कळेना जयासी । तो येक पढतमूर्ख ॥ 

सतत दुसऱ्याला नावे ठेवणे, त्यांचे उणेदुणे शोधणे, आणि इतरांहून 'मी' कसा श्रेष्ठ आहे, हे आपणच सांगत राहणे ... ही पढतमूर्खपणाची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. असे लोक ज्ञानी असतात, विविध विषयांचा अभ्यास त्यांनी केलेला असतो, अनेक विद्यांचे ते जाणकार असतात.. पण त्यांचे हे गुण समाजासाठी, इतरजणासाठी निरूपयोगी असतात. कारण आपल्या गुणांचा उपयोग  ते फक्त स्वहितार्थ करतात.  दुसऱ्याचे ज्ञान आणि गुण त्यांच्यासाठी नीच दर्जाचे असतात. त्यामुळे ते सतत इतरांची अवहेलना करण्यात आणि स्वस्तुती करण्यात धन्यता मानतात. अशा लोकांना प्रपंचाची अनिवार ओढ असते. समर्थ त्यांना भ्रमराची उपमा देतात. ज्याप्रमाणे भ्रमराला कमळफूलाचा मोह सोडवत नाही, आणि रात्री कमलदले मिटल्यावर त्याचा मृत्यू होतो. तद्वत हे ज्ञानी असूनही अज्ञ असलेले, प्रापंचिक मोहपाशात गुरफटलेले असतात. त्यांना स्त्रीसंग प्रिय असतो. स्त्रियासमोर बढाई मारण्यात देखिल त्यांना सुख मिळते. अनेक निंद्य वस्तुंचा संग्रह ते करतात. भोगविलासाची साधने त्यांस प्रिय असतात. स्वतःच्या तनामनाचे लाड, चोचले पुरविण्यात ते सर्वतोपरी मग्नं राहतात. परमेश्वराची स्तुती करण्याऐवजी, वैभवसंपन्न, अधिकारस्थाने भूषविणाऱ्या व्यक्तींची ते स्तुती करतात. त्यामुळे त्यांच्यांपासून आपल्यासाठी काही फायदा व्हावा हा हेतू असतो. समाजात वागताना, बोलताना योग्यं त्या मर्यादांचे  पालन करीत नाहीत. त्यामुळे अनेकवेळा त्यांच्या समवेतच्या व्यक्तीना लज्जीत व्हावे लागते. 

वर्णी स्त्रियांचे आवेव । नाना नाटके हावभाव ।
देवा विसरे जो मानव । तो येक पढतमूर्ख ॥ 

असे लोक चतुर देखिल असतात. आपल्या ज्ञानाने, अज्ञानी लोकांना ते चकीत करतात. मी सर्व काही जाणतो. भविष्य देखील ... असे ते या अभागी लोकांस सांगतात आणि त्यांची फसवणूक करतात. ते कसलीही नीतिमत्ता मानीत नाही. स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यावर त्यांचा विलक्षण विश्वास असतो.  मनात भक्तिभावाचा अभाव असतो. वेदशास्त्र आणि तीर्थक्षेत्र यांबद्दल  अनादर असतो.  वागण्या-बोलण्यात सुसंगती नसते. पवित्र आणि अपवित्राची जाणं नसते. तोंडा समोर स्तुती, आणि पाठ फिरविल्यावर निंदा करणे हा  नित्यक्रम असतो. त्यांत काहीच अनुचित दिसत नाही. सत्य आणि असत्याची  चाड नसते. आपल्याला जे सोयीस्कर, लाभदायी .. तेच  बोलतात, आणि तसेच वागतात. 

वित्पन आणि वीतरागी । ब्रम्हज्ञानी माहायोगी ।
भविष्य सांगो लागे जगी । तो येक पढतमूर्ख ॥ 
मागे येक पुढे येक । ऐसा जयाचा दंडक ।
बोले येक करी येक । तो येक पढतमूर्ख ॥ 

असे ज्ञानायोगे गर्विष्ठ झालेले लोक, सोंगे रचण्यात देखिल प्रवीण असतात. अनेक प्रकारे विद्याभ्यास करून देखिल  आपले अवगुण दूर करत नाहीत. आपला मार्ग चुकला, अनुचित कर्म हातून घडले, हे जाणून देखिल स्वतःमध्ये सुधारणा करण्यास नाकबूल असतात. इतकेच काय,  अतिरेकी अहंकार त्यांना त्याची चूक मान्यं करू देत नाही. आणि  हट्टाने चुकीचा मार्गावरच चालत राहतात. पढतमूर्ख, दुसऱ्यांस सल्ले देतो, पण स्वीकारतं नाही. कारण तो स्वतःस सर्वज्ञानी मानतो. ज्ञानसंपन्न जनांस टाळून, अज्ञ जनांपुढे आपले ज्ञान प्रकट करण्यात धन्यता मानतो. आपल्या ज्ञानाचा उपयोग  फक्त संपत्ती मिळविण्यासाठीच करतो. वैभवशाली आणि  प्रभावशाली व्यक्तीच्या कृपाछत्राखाली राहण्यासाठी तो सद्गुरुच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करतो, काहीवेळा उपमर्द देखिल करतो. इतरांस शिकविण्याची त्याला हौस असते, पण हे ज्ञानदान स्वतःचा अहं कुरवाळण्याकरता फक्त असते. त्यात परमार्थाचा लवलेश देखिल नसतो.  आपण जे शिकविले, तसेच वर्तन देखिल केले पाहिजे, असेही त्यांस वाटत नसते. 

वर्तल्याविण सिकवी । ब्रम्हज्ञान लावणी लावी । 
पराधेन गोसावी । तो येक पढतमूर्ख ॥ 

अशा प्रकारे, पढतमूर्खांची अनेक लक्षणे समर्थ वर्णन करतात. यापूर्वी सुविद्ये बद्दलचे विवेचन करताना त्यांनी सांगितले आहेच, की ज्ञान हे लोकोपयोगी असावे, आणि त्याचा उपयोग चांगल्या कामासाठीच व्हायला हवा. तसेच ज्ञान हे पूर्णज्ञान असावे. अनेक विषयांची माहिती आहे, पण ती अर्धीमुर्धी. तर अशी माहिती निरुपयोगी असते. तिचा उपयोग केवळ भोळ्याभाबड्या अज्ञ जनांना दिपविण्यासाठी केवळ होऊ शकतो. ज्याच्या पाशी सखोल आणि परीपूर्ण असे ज्ञान आहे, तो कधीच उथळपणा, चंचलपणा करीत नाही. असा ज्ञानी गंभीर आणि नम्र असतो. म्हणून समर्थ उपदेश करतात, अल्पज्ञानी, पढतमूर्खांपासून सावध असावे. कारण अशा व्यक्ती बुद्धिमान तर असतात, परंतु त्याची बुद्धी वाकड्या मार्गाने जाते. ते अनेकांची हानी करू शकतात. 

शेवटी समर्थ सांगतात,  त्यांनी  अनेक अवगुणांचे वर्णन केले आहे , अवगुणी माणसांचे दोष दाखविले, ते कुणाला अवमानित करण्यासाठी नाही. हेतू हा आहे, की श्रोत्यांनी या दोषापासून दूर राहून स्वतः पूर्णज्ञानी व्हावे, तसेच अशा दुर्गुणी व्यक्तींपासून दूर राहून स्वत:चे आणि समाजाचे रक्षण करावे. ते म्हणतात, त्यांना जेव्हढे अवगुण जाणवले, ते त्यांनी वर्णिले.  या अधिक कुणांस माहिती असेल, तर त्याची भर घालावी, आणि अपूर्णास पूर्णता द्यावी. 

त्यागवया अवगुण । बोलिले पढतमूर्खाचे लक्षण ।
विचक्षणे नीउन (कमी अधीक असेल ते ) पूर्ण । क्षमा केली पाहिजे ॥ 

(क्रमशः) 
Post to Feed
Typing help hide