असाही एक रिक्षावाला ---???

   रिक्षावाल्यांच्या विविध अनुभवांना सामोरे जाणाऱ्याना दिलासा देणारा एक अनुभव !
सुवेब्दु राय हे टायटन उद्योगात काम करतात.त्यांना आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात,
"एका रविवारी पत्नी आणि लहान मुलाबरोबर मला अंधेरीहून बान्द्र्याला जायचे होते. समोरून जाणाऱ्या रिक्षाला मी हात केला.हा काहीतरी वेगळाच अनुभव देणाराप्रवास असेल अशी मला मुळीच कल्पना नव्हती. रिक्षात बसताच मी समोर पाहिले तर तेथे एक छोटा टी.व्ही.बसवलेला होता आणि त्यावर दूरदर्शन वाहिनी चालू होती.मी आणि माझ्या पत्नीने आश्चर्य आणि अविश्वासाने एकमेकाकडे पाहिले.समोरच एक प्रथमोपचार पेटी होती आणि त्यात डेट्टॉल. कापूस आणि काही किरकोळ औषधे होती.  आपण एका वेगळ्याच वाहनात बसलो आहे याची मला जाणीव झाली.मी आण्खी उत्सुकतेने पहायला सुरवात केली तर आणखीही काही मला चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी पहायला मिळाल्या.त्या होत्या रेडिओ,आग नियंत्रक,छोटे वॉलक्लॉक,दिनदर्शिका आणि इस्लाम,ख्रिश्चन,बुद्ध हिंदू आणि शीख धर्मांची चिन्हे व  चित्रे.मुंबईस २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या कामटे,साळस्कर,करकरे आणि उन्निकृष्णन्‍ यांची छायाचित्रेही त्यात होती.केवळ माझी रिक्षाच नव्हे तर चालकही विशेष व्यक्ती आहे याची मला खात्री पटली.मी त्याच्याबरोबर गप्पा मारायला सुरवात केली.आणि त्या गप्पामधून मला समजले की तो गेली ८-९ वर्षे रिक्षा चालवतो.त्याची प्लास्टिक कंपनी बंद पडल्यामुळे नोकरी गमवावी  लागल्यामुळे त्याला रिक्षा चालवणे भाग पडले.त्याला दोन शाळेत जाणारी मुले आहेत.आणि सकाळी ८ पासून रात्री १० पर्यंत तो रिक्षा चालवतो. अगदी आजारी पडला तरच या दिनक्रमात खंड पडतो.,"साब घरमें बैठे टी.व्ही.देखकर क्या फायदा ?दो पैसे ज्यादा मिले तो आगेके लिये अच्छा होगा नही क्या?" खरा मुंबईकर मला भेटला असे वाटले.अविरत काम, प्रवास आणि आयुष्यात काहीतरी करून प्रगति करण्याची तीव्र इच्छा !
     मी उत्सुकतेने  याशिवाय आणखी काही करतो का हे विचारले.आणि त्याचे उत्तर ऐकून आणखीनच आश्चर्यचकित व्हायला झाले.त्याला खरे तर ज्यादा वेळ फारसा मिळतच नाही तरीही  आठवड्यातून एकदा अन्धेरीतील वृद्ध महिला आश्रमास तो भेट देतो आणि तेथे टूथब्रश.पेस्ट,केसाला लावायचे तेल अशा दैनंदिन वापराच्या वस्तू भेट देतो.त्याच्या रिक्षामध्ये त्याने लिहिलेला फलक मला दाखवला त्यावर अपंगांना रिक्षाभाड्यात २५% सवलत व अंधाना ५० रुपयांपर्यंत मोफत प्रवास असे लिहिलेले होते.
   मी व माझी पत्नी आगदी आश्चर्यचकित झालो.हा खरोखरच एक आदर्श होता. ४५ मिनिटांच्या प्रवासानंतर खाली उतरताना प्रवासभाड्यावर एकाद्या अंध व्यक्तीस तो लिफ्ट देऊ शकेल एवढी टिप देण्याइतकेच मर्यादित औदार्य आम्ही त्या हीरोला दाखवू शकलो.शक्य आहे एकाद्यावेळी तुम्हालाही हा रिक्षावाला भेटेल त्याचे नाव आहे संदीप बच्चे आणि त्याच्या रिक्षाचा क्रमांक आहे MH02-z-8508 "
 टीप : हा मला आलेल्या विपत्राचा अनुवाद.आहे.
 कै.व.पु.काळे यांनाही असाच एक टॅक्सीचालक भेटला असा त्यांच्या एका पुस्तकात उल्लेख आहे. 
जवळजवळ ३०-३२ वर्षापूर्वी मी गोव्यात गेलॉ होतो तेव्हां तेथील अनेक रिक्षा अश्याच पद्धतीने सुसज्ज असल्याचे आढळले होते.विशेष म्हणजे त्या रिक्षा दोन्ही बाजूने बंद असत त्यामुळे लहान मूल किंवा वृद्ध व्यक्ती धक्क्याने बाहेर पडून अपघातग्रस्त होण्याची शक्यता टाळली जात असे. आजचे काही माहीत नाही.