ऑगस्ट १७ २०१६

चिंता करी जो विश्वाची ... (१२)

चिंता करी जो विश्वाची
श्री समर्थ रामदास स्वामी  श्रीरामाचे परम भक्त होते. संन्यासाश्रम पत्करून, भिक्षांदेही करीत ते आपले जीवन व्यतीत करीत होते. माया आणि मोहपाश त्यांना बद्ध करू शकत  नव्हते. परंतु असे असले तरी समाजाप्रती असलेल्या कर्तव्याचे त्यांना कधी विस्मरण नव्हते. समर्थ त्यांच्या   शिष्यांना आणि श्रोत्यांना,  सदैव  श्रीराम भक्तीची महती सांगत असत. संसाराच्या  व्याप-तापांपासून मुक्ती मिळविण्यासाठी भगवान श्रीरामास शरण जाणे हाच एकमेव योग्य मार्ग आहे, असे ते सांगत असत.  परंतु श्रीराम भक्ती, म्हणजे फक्त पुजाअर्चना , भजन, किर्तन असा अर्थ त्यांना अभिप्रेत नव्हता. श्रीरामांची आदर्श जीवनपद्धती अनुसरणे, त्यांची शाश्वत  जीवन मूल्ये आत्मसात करणे म्हणजे खरी रामभक्ती,  असे ते शिकवित असत. 

सर्व दुःखाचे मूळ मनुष्यजन्म हेच आहे, आणि त्यातही संसारी मनुष्यास अनेक संकटे आणि दुःखाचा सामना करणे क्रमप्राप्त होते. त्यातून तरून जाण्यासाठी ईश्वराप्रती श्रद्धा आणि निष्ठा असणे जरूरीचे असते. परंतु सांसारिक सुख , आणि भोगविलासात सामान्यजन गुंतून जातात. त्यांची विवेकबुद्धी आणि वर्तणुकीचे तारतम्य नष्टं होते. आला दिवस सुखोपभोगात घालविण्यात सर्व निमग्नं होतात. भविष्याची चिंता त्यांच्या मनास, बुद्धीस स्पर्शत नाही. भूतकाळ पूर्णतः विस्मरणात गेलेला असतो. परंतु अशी स्थिती सदैव राहू शकत नाही. जीवनाचे चक्र  अव्याहत फिरत असते. सुखा पाठोपाठ दुःख आणि समृद्धी नंतर दैन्य देत असते. पूर्वजांचे उदाहरण डोळ्यांसमोर असून मनुष्यास या अटळ सृष्टी नियमाचा विसर पडतो. त्यांमुळे सुखानंतर प्राप्तं झालेले दुःख सोसत नाही. दैन्यावस्थेत, समृद्धी कालातील सुखासीन जीवन आठवून मन खंतावते. 

मनुष्य देह हा नश्वर आहे, इथे कुणासही अमरत्व प्राप्त नाही. सृष्टीतील प्रत्येक सजीवास अंत आहे. इतकेच काय,  सर्व सजीव, निर्जीव प्राणिमात्र आणि घटक यांचा भार वाहणारी सृष्टी देखील काही काळानंतर नष्ट होईल, हे ज्ञान सर्वश्रुत आहे. तरीही मनुष्य संसारात असा आणि इतका गुंततो, की त्याचा शेवट दिसायला लागल्यावर असह्य यातना होतात.  परंतु  अटळ नियती काही  चुकत नाही. 

समर्थ अशा त्रस्त आणि हतबल सांसारिकाना उपदेश करतात. हा जन्म आपणास लाभला हे सौभाग्य, असे मानून जिवित कर्तव्ये करावीत. सारासार विचार आणि विवेकबुद्धी जागृत ठेवल्यास दुःख आणि यातना सुसह्य होतात.   आयुष्य व्यतीत करताना तारतम्यं बाळगावे. कसलाही अतिरेक हा नेहमीच संकटांच्या आणि अंततः दुःखांच्या दिशेने आपणास नेईल हे ध्यानात ठेवावे. "अती सर्वथा वर्ज्यते ... " हे सूत्र अंगिकारणे इष्टं . 

आपले म्हणणे स्पष्टं करण्यासाठी, समर्थ एका सामान्य मनुष्याचा जीवन काळ वर्णन करतात. 
संसार सुखामध्ये आकंठ बुडालेला माणूस, आपली पारमार्थिक कर्तव्ये दुर्लक्षितो. त्याच्या आशा, आकांक्षांना अंत नसतो. संयमाने, प्रमाणित जीवन व्यतीत करण्याचा गुरोपदेश तो पूर्णतः विसरतो.  अशातऱ्हेने इष्ट  त्या सर्वांचा त्याग  करून, अनिष्ट मार्गी वाटचाल करू लागतो.  परिणामी दुःखाचा शिरकाव त्याच्या आयुष्यात सहजतेने होतो. तारतम्य आणि विवेकबुद्धी लोप पावते.  तो आनंद आणि उपभोगात पूर्ण निमग्न होतो. 
 
संन्यासी जीवन जगणाऱ्या समर्थांना असलेली सामान्य जनांच्या अडीअडचणींची सुयोग्य जाणीव चकीत करणारी आहे. कुठेतरी दूर डोंगरावर, कुठल्यातरी गुहेमध्ये राहूनही त्यांच्या मनात सामान्याबद्दल,   सामान्यांच्या दुःखाबद्दल काळजी आहे. संसारत्याग केला तरी समाज आणि जनसामान्यांना त्यांनी स्वतःपासून विभक्त केले नाही. त्यांच्या सुखदुःखाची चिंता, समर्थ अखंडपणे करीतच होते. 
सामान्य मनुष्य संसारचक्रात गुंतून  इतका कष्टी का होत असावा,  याची कारणमीमांसा ते करतात..

लेकुरे उदंड जाली । तो ते लक्ष्मी निघोन गेली ।
बापडी भिकेसी लागली । काही खाया मिळेना ॥ 

अतिरेकाचा असा दुष्परिणाम समर्थ सांगतात. आपली सांपत्तिक स्थिती, आपल्या गरजा यांचा ताळमेळ न राखता खायची तोंडे वाढली, आणि त्यामुळे दारिद्र्य आले. आधीची संपन्नता जाऊन दैन्य आले. परिस्थिती बदलल्यावर, समाजात असलेल्या पत, प्रतिष्ठेवरही परिणाम झाला. आधी जेथे सन्मानाची वागणूक मिळे, तेथे अपमान सोसणे प्राप्तं झाले. आणि याचे कारण म्हणजे तारतम्याचा अभाव. 

मायेबापे होती संपन्न । त्यांचे उदंड होते धन । 
तेणेकरिता प्रतिष्ठा मान । जनी जाला होता. ॥ 

परंतु ही प्रतिष्ठा त्यांस राखता आली नाही, याचे कारण अतिरेक. अनिर्बंध वर्तन व्यवहार आणि अविचारी जीवन शैली या कारणामुळे, हाती असलेले सारे धन खर्ची पडले. कमाईची साधने तुटपुंजी असल्याने, जितके खर्चले तितके परत काही मिळाले नाहीत. त्यामुळे साठवणुकीतील द्रव्य हळूहळू संपुष्टात आले.  

भरम आहे लोकाचारी । पहिली नांदणूक नाही घरी ।
दिवसेंदिवस अभ्यांतरी । दारिद्र्य आले ॥ 

सधनता लोप पावली. घरातील लक्ष्मीने काढता पाय घेतला. या घरी काही मिळेल असे राहिले नाही हे लक्षात आल्यावर आप्तेष्ट, स्नेही, सोयरे, शेजारी साऱ्यांची वर्तणूक बदलली. इतकेच काय, धनसंचयाच्या आभावाने घरातील लोकांची वागणूकही बदलली. घराची शांती हरवून गेली. त्या मागे सुख आणि समाधान ही नाहीसे झाले. सतत उद्याची चिंता करणे नशिबी आले. या वेळेपावेतो घर-गृहस्थीचा विस्तार झालेला असल्याने, अधिक काही कमावणे क्रमप्राप्त झाले. मग घरदार सोडून दूरदेशी, जेथे कामाचा अधिक परतावा मिळेल अशा ठिकाणी जाणे भाग पडले. अशा तऱ्हेने घराची एकी भंगली. माणसे चहूकडे विखुरली. नातेसंबंधात दुरावा निर्माण झाला. आणि हे सर्व झाले केवळ अदूरदर्शीपणे केलेल्या अविचारी आणि  अतिरेकी वर्तणुकीमूळे.  

ऐसा हा देह आपुला । असतांच पराधेन केला ।
ईश्वरी कानकोंडा जाला । कुटुंबकाबाडी ॥
या येका कामासाठी । जन्म गेला अटाटी ।
वय वेचल्या शेवटी । येकलेचि जावे ॥ 

संसारात रममाण होताना ईश्वराचे विस्मरण झाले. भौतिक सुखे मिळविण्यासाठी देवधर्म केले नाही, इष्ट, नैमित्तिक कर्तव्यांची पूर्ती केली नाही. आणि ज्या साठी हे केले, ते संसारसुखही दुरावले. घरातील एकोपा, आपुलकी संपून गेली आणि उरला फक्त कोरडा, रोकडा व्यवहार. ज्या लेकरांसाठी सारा जन्म कष्ट करण्यात व्यतीत केला, त्यांना स्वार्थापुढे माता-पित्यांची माया, ममता क्षुल्लक भासू लागली. मन व्यथित झाले. पश्चातापदग्ध झाले. परंतु आता आयुष्य हातातून निसटलेले होते. मग केवळ विलाप करणे तेव्हढे शिल्लक राहिले. 

जन्मवरी स्वार्थ केला । तितुकाहि वेर्थ गेला । 
कैसा विषमकाळ आला । अंतकाळी ॥  
सुखाकारणे झुरला । सेखी दुःखे कष्टी जाला ।
पुढे मागुता धोका आला । येमयातनेचा ॥

म्हणून समर्थ उपदेश करतात की निर्मोही राहून, अलिप्तपणे  संसार करावा . ईश्वराप्रती कृतज्ञतेचा भाव नेहमी जागृत असावा. आज असलेले वैभव उद्या असेलच असे नाही, या वास्तवाचा डोळसपणे स्वीकार करावा. संसार, माया , ममता यात पूर्णतः गुंतून घेऊ नये. सृष्टी क्षणभंगुर आहे आणि त्यातील सारे चराचर हे क्षणैक आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. त्या योगे एखादी व्यक्ती अथवा वस्तू दुरावली /  हिरावली गेल्यास, ते दुःख सहन करण्याची आंतरिक शक्ती प्राप्त होते. तटस्थ वृत्तीने जीवन व्यतीत केल्यास अती शोक, अती चिंता, अती भय या सर्वांपासून मुक्ती मिळते. आयुष्याचा सुखांत होतो. 

जन्म अवघा दुःखमूळ । लागती दुःखाचे इंगळ ।
म्हणोनिया तत्काळ । स्वहित करावे ॥ 
असो ऐसे वृद्धपण । सकळांस आहे दारूण ।
म्हणोनिया शरण । भगवंतास जावे ॥ 

(क्रमशः ) Post to Feed
Typing help hide