ऑक्टोबर १२ २०१६

'हाफ लायन' - एक पूर्णतया वाचनीय पुस्तक

राजकारणात काहीही घडू शकते. कुठल्याही 'ड' दर्जाच्या मालिकेला लाजवणारी अतर्क्य, अविश्वसनीय आणि अद्भुत घटनांची रेलचेल इथे दिसते.

'ऍनॅलिसिस टिल पॅरॅलिसिस' वा 'नो डिसिजन इज द डिसिजन' हे शब्दप्रयोग आठवतात?

इंदिरा गांधींच्या हत्येनंतरच्या निवडणुकीत १९८४ साली भाजपला अख्ख्या देशात मिळून दोन जागा मिळाल्या होत्या हे बऱ्याचदा घोकले जाते. यातली एक जागा होती भाजपच्या प्रभावक्षेत्र गुजरातमधल्या मेहसाणाची. तिथून १९८४ची निवडणूक जिंकलेले ए के पटेल पुढे १९९८ पर्यंत सगळ्या निवडणुका जिंकले. वाजपेयींच्या मंत्रीमंडळात मंत्रीही झाले.

दुसरी जागा दुसऱ्या किनाऱ्यावरच्या आंध्रप्रदेशातून मिळाली. हणमकोंडामधून सी जंगा रेड्डी हे फारसे कुणाला माहीत नसलेले शिक्षक आयुष्यातली एकमेव लोकसभा निवडणूक जिंकले. त्याआधी दोन वेळा आणि त्यानंतर तीन वेळा ती जागा काँग्रेसकडेच होती.

एवढी एकतर्फी निवडणूक स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजतागायत झाली नाही. या निवडणुकीत हरण्याची किमया साधणारा, आणि आपण हरणार याची माहिती आधीच असल्याने महाराष्ट्रातून एका 'सेफ सीट'साठीही निवडणूक लढवणारा हा महाभाग राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात महत्त्वाचे स्थान पटकावून बसला.

१९९१च्या निवडणुकीत या गृहस्थांना राजीव गांधींनी 'निवृत्त' केल्याने त्यांनी निवडणूक लढवली नाही. किंबहुना त्यांनी राजकारण सोडून एका धार्मिक मठाचे मुख्य होण्याची तयारीही केली. पण राजीव गांधींची हत्या झाली आणि हे गृहस्थ थेट केंद्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचले. भारताचे पंतप्रधान झाले.

पामुलपार्ती वेंकट नरसिंह राव यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टीकोन झाला. आणि त्यांचे एकंदर आयुष्य आणि राजकीय जीवन पाहिले तर अगदीच निर्जीव आणि नीरस दृष्टीकोन झाला. आंध्र प्रदेशातल्या एका खेड्यातून आलेल्या या मुलाने शिक्षणावर लक्ष पूर्ण केंद्रित केले. भाषा शिकणे म्हणजे केळी कापण्याहून सोपे असावे अशा रीतीने त्याने भाषा आपल्या भात्यात खोचायला सुरुवात केली. क्रांतीकारी नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या तीन शिष्योत्तमांपैकी हा एक. तीनही शिष्योत्तम तीन राज्यांचे मुख्यमंत्री झाले. शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे नि वीरेंद्र पाटील कर्नाटकचे.
हा माणूस चांगलाच निधडा होता. मुख्यमंत्रीपदाचा १८ महिन्यांत राजीनामा देऊन नंतर सात वर्षे पूर्ण राजकीय विजनवासात काढणे त्याने पसंत केले. दुसरा पर्याय होता शेतकऱ्यांच्या हितासाठी त्याने आक्रमकपणे घेतलेल्या प्रागतिक निर्णयापासून घूमजाव करणे. होय. पीव्ही नरसिंह राव यांनी गरिबांच्या नि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कमाल जमीन धारणा कायदा राबवला. आणि त्या विरुद्ध जमीनदार मंडळींनी 'हाय कमांड'ला साकडे घातल्यावर राजीनामा देऊन सात वर्षे विजनवासात काढली. या सात वर्षांत त्यांनी अमेरिकेला (खाजगी) भेट दिली आणि तंत्रज्ञानाधारित गोष्टी आत्मसात करायला सुरुवात केली. नुसता कंप्यूटरच वापरणाराच नव्हे तर प्रोग्रामिंगही उत्तम करणारा असा हा दुर्मिळ राजकारणी.

जागतिकीकरण, उदारीकरण नि खाजगीकरणाची २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नुकतीच रावांवरची धूळ झटकण्यात आली. पीव्ही नरसिंह रावांनी या त्रयीचे केवळ बीजारोपण केले नाही तर नीट निगुतीने त्याची देखभाल करून आपल्या आजच्या जीवनपद्धतीचा पाया घातला.

विनय सीतापती यांनी नरसिंह रावांचे चरित्र, 'हाफ लायन', अत्यंत परिश्रमपूर्वक सिद्ध केले आहे. सीतापती यांना नरसिंह रावांची 'खाजगी' कागदपत्रे उपलब्ध झाली. राव हे एखाद्या इतिहासकारासारखे काळजीपूर्वक टिपणे करण्यासाठी प्रसिद्ध होते. अशा अस्सल कागदपत्रांची साथ असल्याने सीतापतींना नरसिंह रावांबद्दलची अनेक मिथके दुरुस्त करता आली आहेत. बाबरी मशीद कोसळताना नरसिंह राव झोपले होते हे एक मिथक.

पण केवळ कागदपत्रे गोळा करून त्यांची छाननी करणे हे कष्टाचे काम झाले, बुद्धीचे नव्हे. सीतापती यांनी त्या कागदपत्रांतून दृग्गोचर होणारी कथा ज्या रीतीने मांडली आहे तो म्हणजे कष्ट आणि बुद्धीचा सुरेख संगमच आहे.

नरसिंह रावांकडे 'वस्तुनिष्ठ' दृष्टीकोनातून पाहू गेले तर आपल्याला वैविध्याने आणि वैचित्र्याने भरलेल्या महाभारत या महाकाव्याची आठवण झाल्यावाचून राहत नाही. "ते म्हणजे या राजकीय महाभारतातील कर्ण/अर्जुन/धृतराष्ट्र/भीष्म/... " होते असे बिनडोक सुलभीकरण करण्यापेक्षा थोडे विचार करून मांडणी केली तर त्यांचे आयुष्य किती विविध आणि पराकोटीच्या चढ उतारांनी भरलेले होते ते उमटते.

'मास बेस' नसलेला माणूस इंदिरा गांधींच्या कृपेने मुख्यमंत्री झाला. मग त्यांची खप्पामर्जी झाल्यावर सात वर्षे विजनवासात काढली, तीही वयाची पन्नाशी नुकतीच उलटलेली असताना. परत त्यांची मर्जी संपादून केंद्रीय गृहमंत्रीपदी बैठक. मग 'मास बेस' नसल्याचे सिद्ध करण्यासाठी १९८४ ची निवडणूक हणमकोंडातून हरले. पण 'मास बेस' नसला तरी राजकीय अँटेना अत्यंत संवेदनशील असल्याचे सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रातल्या रामटेक या 'सेफ सीट'वरूनही निवडणूक लढवली नि जिंकून राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे पद पटकावले. राजीव गांधी सत्तेवरून पाय उतार झाल्यावर परत ग्रह फिरले आणि १९९१च्या निवडणुकीचे तिकीटही पदरात पडले नाही. राजीव गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या विधवा पत्नीचे पाठबळ मिळवून पक्षातल्या दिग्गज प्रतिस्पर्ध्यांचा पत्ता कट करून पंतप्रधानपद गाठले. आणि शेवटी सोनिया गांधींशी वाकडेपणा घेतला.

शेवटचा भाग घाणेरडा नि शोकांत आहे. नरसिंह रावांना आयुष्याच्या अखेरीस काँग्रेस पक्षाने पूर्णपणे वाळीत टाकले होते. त्यांच्या मृतदेहाला काँग्रेस मुख्यालयात नेण्याची परवानगी नाकारण्यात आली. मुख्यालयाच्या दारावर काही काळ तिष्ठत राहून मग अंत्ययात्रा पुढे सरकली. त्यांच्या कुटुंबियांना अंत्यविधी दिल्लीत न करता हैदराबादला करण्यासाठी 'समजावण्यात' आले. कारण असे, की दिल्लीत अंत्यविधी केल्यास तर न जाणो, रावांचे कुटुंबिय आणि पाठीराखे त्यांचे स्मारकही दिल्लीत करण्याचा हट्ट धरतील. तो हट्ट यशस्वी झाला तर!

हे पुस्तक या आणि अशा सगळ्या गोष्टींची अत्यंत वाचनीय मांडणी करते. वाचनीय आणि संग्रहणीय.
'हाफ लायनः हाऊ पी व्ही नरसिंह राव ट्रान्सफॉर्मड इंडिया'
विनय सीतापती
प्रकाशकः पेंग्वीन रँडम हाऊस इंडिया
किंमत ६९९ रु

Post to Feedधन्यवाद
परिचय आवडला.

Typing help hide