अरे हृदया आहे अवघड

बिच्चारे मजरूह सुलतानपुरी! "ऐ दिल है मुष्किल... " लिहिताना त्यांना वाटलेही नसेल की साठ वर्षांनी हे  धृवपद नॉस्ट्राडॅमसच्या भाकितासारखे खरे ठरायला घेईल म्हणून!!
करण जोहर (केजो) हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून आवडणे, सहन करणे वा दुर्लक्ष करणे या तीन प्रतिक्रिया प्रकारांत प्रत्येकाच्या मर्जीप्रमाणे कुठेतरी बसवता येतो. खुद्द केजोलाही आपण कुणी मोठे आणि महत्त्वाचे दिग्दर्शक आहोत असे वाटत नसावे (अशी आशा आहे). दिग्दर्शकापेक्षा तो निर्माता म्हणून खूपच बरे चित्रपट देतो (काल, दोस्ताना, वेक अप सिड आदि). असो.
त्यामुळे त्याचा "ऐ दिल है मुष्किल" हा प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला चित्रपट वादंगात सापडला तेव्हा तो येनकेनप्रकारेण चित्रपट गाजवायचा प्रकार असावा असा बऱ्याच जणांना वास आला. नंतर कळले ही हा वास येणाऱ्यांची नाके स्वच्छ शिंकरून, डॉक्टरकडून सायनस साफ करून घेऊन मोकळी केलेली होती. थोडक्यात, आलेला वास योग्यच होता.
सगळ्या घडामोडींची थोडी पार्श्वभूमी पाहू. १८ सप्टेंबर २०१६ला कश्मीरमधल्या उरी येथे सैन्याच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला नि १८ जवान मारले. नेहमीप्रमाणे निषेध वगैरे पार पडले. नेहमीप्रमाणे न झालेली गोष्ट म्हणजे भारताने प्रत्युत्तरादाखल सीमेपार 'सर्जिकल स्ट्राईक्स' करून ते यशस्वी झाल्याचे जाहीरही करून टाकले. नक्की काय झाले आणि/वा याला प्रतिक्रिया काय द्यावी हे न कळल्याने पाकिस्तान अजून तळ्यात मळ्यात बागडणारी मुग्धता पाळून आहे.
केजो या काळात दिवाळीत प्रदर्शित करण्यासाठी 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाच्या तयारीत होता. उरीचा हल्ला झाला तेव्हा चित्रीकरण संपून पोस्ट-प्रॉडक्शन सुरू झाले होते.
आता दुसऱ्या कथानकाकडे वळू. महाराष्ट्रात भाजपशी सत्ता-भागीदारी करणाऱ्या शिवसेनेला अजूनही आपण आता 'धाकटे' आहोत (भाजपच्या १२२ आमदारांपुढे शिवसेनेचे ६३) याची जाण दोन वर्षांनीही नीटशी आलेली दिसत नाही. त्यामुळे भाजपकडून होणाऱ्या 'अन्यायाविरुद्ध' डरकाळ्या/टाहो (तुम्ही शिवसैनिक आहात की त्रयस्थ यावर कुठला शब्द वापरायचा ते ठरवावे) फोडणे हा शिवसेनेचा एककलमी कार्यक्रम झाला आहे.
मुंबई महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीमुळे तर बोचरे बोलणे नि बोचकारणे शिस्तीत पूर्णवेळ उद्योग म्हणून सुरू झाले आहे.
आता एक उपकथानक.
मनसे ऊर्फ महाराष्ट्र नवनिर्माण सेना या भरघोस नावाच्या लघुत्तम पक्षाचे सर्वेसर्वा (कोण रे तो ओसाडगावचे जागीरदार म्हणतोय? नका लक्ष देऊ. दादूचा माणूस असणार नक्कीच) असे राज ठाकरे विचारग्रस्त (खूप खूप दिवसांनी) नि चिंताग्रस्त (रोजच्याप्रमाणेच) झाले होते. काय केले म्हणजे जगाला, आणि मुख्य म्हणजे पक्षकार्यकर्त्यांना, पक्ष अद्याप शिल्लक असल्याची खात्री पटेल याचा विचार आणि चिंता त्यांना सतावत होती.
आता राज ठाकरे हे राजकारणी कमी नि उद्योगपती-कम-कलावंत जास्ती. हिंदी चित्रपटसृष्टीत खानावळीसकट त्यांचा जितका याराना आहे तितका राजकीय पक्षांत नाही.
तर राज ठाकरेंनी डोके भानावर ठेवून (कितीतरी वर्षांनी) पटकन विचार केला नि 'ऐ दिल है मुष्किल'ला विरोध असल्याची आरोळी ठोकली. हातासरशी त्यांनी 'रईस' आणि येऊ घातलेल्या पाक कलाकारयुक्त सर्व चित्रपटांना विरोध असल्याचेही जाहीर करून टाकले.
आता या कथानकांच्या नि उपकथानकांच्या गल्बल्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अवतरले. जर्मनीत व्यवस्थापनशास्त्रातली पदव्युत्तर पदवी घेतल्यापासूनच त्यांना 'पीटर प्रिन्सिपल'चे भारी आकर्षण. "मॅनेजर्स राईज टू देअर लेव्हल ऑफ इनकॉंपिटन्स" हे वाक्य त्यांच्या अगदी मनावर कोरले गेलेले. आणि त्यांच्या सहकाऱ्यांपैकी पंकजाताई, चंद्रकांतदादा, विनोदभाऊ आदी मंत्री जसे मंत्रीपद ही आपली 'लेव्हल ऑफ इनकॉंपिटन्स' असल्याचे सिद्ध करायला सदैव धडपडत असतात तसे देवेंद्रबुवा 'सीएम' ही आपली 'लेव्हल ऑफ इनकॉंपिटन्स' असल्याचे जगाला पटवून द्यायला आतुर. त्यांची निम्मी भीती पायाखालचे जाजम कुणी ओढेल का, आणि उरलेली निम्मी भीती वरून डोक्यात नारळ पडेल का. पण त्यांच्या हाताखालची नि डोक्यावरची मंडळी आपापल्या व्यवधानांत गर्क असल्याने देवेंद्रभाऊ बराच वेळ हाताशी बाळगून असतात. नाणीजला जाऊन जाऊन कितीसा वेळ जाणार?
तर वेळाचा सदुपयोग (खरे तर उपयोग) करण्यासाठी त्यांनी तत्परतेने आपल्या 'वर्षा' या अधिकृत निवासस्थानी राज ठाकरे नि केजो यांना (आणि मुकेश भटांनाही) शिखर परिषदेसाठी आमंत्रले.
'डिट्टो बाळ ठाकरे' असा रनिग स्टार्ट मिळालेल्या राज ठाकरेंनी २००९च्या विधानसभा निवडणुकीत तीन वर्षांतच तेरा आमदार निवडून आणले. पाच वर्षांत पक्षाचे तीनतेरा झाले नि आमदारांचा आकडा एकावर आला. निवडून आलेल्या त्या एकुलत्या आमदाराला त्यांनी घरी बोलावून धोपटला (@#$@, आता तुझ्या एकट्याकरता मला पक्ष चालवायला लागेल! ) अशी बातमी दोन वर्षांपूर्वी भिरभिरून गेली. तर अशा या राज ठाकरेंना समस्त ठाकरे घराण्यालाच असलेल्या विकाराने पछाडलेले आहे. विचार आणि/वा सातत्य यांची स्वच्छ आणि निर्भेळ ऍलर्जी.
अंदाधुंद रीतीने वाटल्या गेलेल्या टोलकंत्राटांविरुद्ध राज ठाकरेंनी जोरदार मोहीम उघडली. २४ X ७ मनसेचे कार्यकर्ते निरनिराळ्या टोलनाक्यांवर उभे राहिले नि गाड्यांची आवकजावकसंख्या नीट नोंदवून घेतली. सगळी माहिती मिळवून राजसाहेबांनी पुण्यात जोरदार गर्जनायुक्त भाषण केले (तब्बल वीस मिनिटे). त्यात त्यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळांना शिंगावर घेतले. भुजबळांचा (तेव्हा) गळ्यात सतत असलेला मफलर दोन टोके धरून आवळावा नि काम करून टाकावे अशी तीव्र इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
पुढे काय? किमसुद्धा नास्ति. कानठळ्या बसवणारी शांतता. वाचाळ वावदूकपणापेक्षा या शांततेने त्यांचा जनाधार झपाट्याने नाहीसा झाला.
तर, परत आपल्या कथानकांच्या मिसळीकडे येऊ. राज ठाकरे अवतरले, खळ्ळ-खटॅकची धमकी दिली, शिखर परिषदेत सहभागी झाले नि एक तोडगा मान्य केला (कोण रे तो तोडग्याला 'तोडपाणी' म्हणतोय? तोडायला पाहिजे धरून). एवढा प्रगल्भ विचारांनी आणि प्रखर देशभक्तीने ओथंबणारा तोडगा कुणी स्वप्नातली पाहिला नसेल. तोडग्यातील प्रायश्चित्ते येणेप्रमाणेः
(१) सैनिक कल्याण निधीला पाच कोटी रुपये देणगी म्हणून द्यावेत.
(२) चित्रपटाआधी एक पाटी दाखवावी ज्यात उरीमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहावी.
(३) इतउप्पर कुठल्याही पाक कलाकाराला चित्रपटात घेऊ नये.
चित्रपटनिर्मात्यांच्या संघटनेचे प्रमुख मुकेश भट आणि केजो या दोघांनी हा तोडगा संपूर्ण स्वीकारला.
मा. मुख्यमंत्र्यांनी या शिखर परिषदेचे तर्कशुद्ध आणि केवळ लाजवाब असे समर्थन केले. ते म्हणाले, "हुरियात नि नक्षलवाद्यांशी बोलता, मग मनसेनेच काय वाकडे केले आहे? ". वाहवा!!
मुख्यमंत्री नि मनसे दोघांसाठी हा खुषीचा मामला ठरला आहे. मुख्यमंत्री 'आपण मनसेशी पाट लावण्याचा विचार करू शकतो' हा संदेश शिवसेनेला दिला म्हणून खूश. मनसेला आपण कसे का होईना, माध्यमांत झळकलो म्हणून खुषी.
हा उद्योग (कोण रे तो 'उचापत' म्हणणारा) करून 'देशभक्त' व्होटबँक मनसेने बरीचशी बळकावली म्हणून शिवसेना घाबरलेली आहेच. त्यात मनसे-भाजप युती मुंबई महापालिकेसाठी झालीच तर काय या भयाकारी कल्पनेने वाघांचे पेंग्वीन होऊ घातले आहेत.
थोडक्यात, सुलतानपुरी साहेब, क्या बराबर बोल्या तुम! "ऐ दिल है (खरेच खूप) मुष्किल... "
आणि हे कमी म्हणून की काय, 'प्रागतिक कलावंत/विचारवंत' आपली वैचारिक दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी जिवापाड धडपडत आहेत. पाकिस्तानातील एका अशा 'प्रागतिक' कलावंतांने "सामान्य माणसे चांगली, सैन्य नि राजकारणी वाईट" या मंत्राचा जप या रविवारच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये केला. असा जप केल्याखेरीज प्रागतिकपणा सिद्ध कसा होणार?
अशा मंडळींसाठी एक सवाल. चला, तुमचा मंत्र अगदी अगदी मान्य करू. मग पाकिस्तानातले राजकारणी नि सैनिक येतात तरी कुठून? की एका पाकिस्तानात 'सामान्य माणसांचे' एक नि 'सैनिक-राजकारणी लोकांचे' एक अशी दोन राष्ट्रे आहेत?
अशा द्विराष्ट्रवादी सिद्धांताला सलाम ठोकायलाच हवा!
टीपः 'ऐ दिल है मुष्किल' असेच शीर्षक देणार होतो. पण म्हटले 'शीर्षकांसकट सगळे लिखाण मराठीत असावे' हा नियम आडवा येऊन तसेही त्याचे 'अरे हृदया आहे अवघड' होणारच. त्यापेक्षा मीच होऊन शेपटी तोडून घेतली.