प्रिय सुपरहीरोस

प्रिय सूपरहीरोस,
                   सर्वप्रथम तुझ्या शत्रूचे आभार मानायला पाहिजे. कारण त्यांनी तुला पकडलं म्हणून तुला माझी आठवण झाली.  तू माझी मदत मागितलीस म्हणजे नक्कीच माझी प्रसिद्धी तुझ्या कानांवर गेलेली असणार.
               पण आधी काही गोष्टींची तुला आठवण करून द्यावीशी वाटते. तुला आठवत असेल ती रात्र जेव्हा तू मला तुझ्या शत्रूंच्या हातांतून वाचवलंस.आपण माझ्या अपार्टमेंटच्या छतावर उभे होतो. आजूबाजूला आणि आपल्या दोघांच्याही मनांमधे मुसळधार पाऊस सुरू होता. माझे दोन्ही हात हातांत घेऊन तू म्हणालास, " सॉरी डियर पण यापुढे मी तुला भेटू शकणार नाही.हे खूप रिस्की आहे, मी नेहमीच तुला वाचवायला नाही येऊ शकत." एवढ्या पावसातही माझ्या डोळ्यातून बाहेर पडलेला अश्रू तू टिपलास, " तू माझी कमजोरी बनू नयेस असं मला वाटतं.शिवाय मी जगाला वाचवत असताना तुझ्या विचारांमुळे मी विचलित होऊ शकतो.म्हणून यापुढे आपण…" तुझा आवाज घशातच अडकला आणि तू मला घट्ट मिठी मारली. नंतर एकदाही वळून न बघता तू निघून गेलास.  कसं सांगू तुला त्या शब्दांनी माझी काय स्थिती झाली ते. मी तुला विचलित करते! मी तुझी कमजोरी आहे!! त्यानंतर कित्येक दिवस मी रडत होते. माझी वेडी आशा होती की तुला तुझी चूक कळेल. पण तू परत आलाच नाहीस.
                      उत्तर द्यायला तू इथे नाहीस पण तरीसुद्धा विचारते…जर तुझे शत्रू मला तुझ्याविरुद्ध वापरू शकतात तर तुझ्या वडिलांना,भावाला, जिवलग मित्रांना नाही वापरू शकत? ते जाऊदे, जर तुझ्या शत्रूने रस्त्यावरून जाणाऱ्या कुणालाही पकडलं तर तू त्याला वाचवणार नाहीस? एवढ्या मोठ्या शहरातलं कुणीच तुझी कमजोरी नाही, फक्त मीच कशी??
                         आज तुझ्या शत्रूने तुला पकडलं म्हणून तुला माझी आठवण झाली. तेसुद्धा माझ्याबद्दल तुला कळालं म्हणून.पण एक सामान्य मुलगी म्हणून तू माझ्यावर प्रेम करू शकला नाहीस हे मी कसं विसरू रे? सॉरी मी तुला मदत करू शकत नाही कारण तुला मदत केल्यामुळे मी माझ्या कामापासून विचलित होऊ शकते. आणि तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, तू नसलास तरी या शहराला काहीच फरक पडणार नाही. जर यदाकदाचित तू तुझ्या शक्तींचा वापर करून सुटलास तरी परत येऊ नकोस कारण हे आता माझं शहर आहे.
                                                                                                                                      एकेकाळची तुझी,
*        *       *
तिने कागदाच्या शेवटी तिची सही खरडली आणि एक हळुवार फुंकर मारली. पांढऱ्या कागदाचा तो तुकडा तिच्या फ्लॅटच्या दरवाज्यातून अलगदपणे उडत गेला.
                 कागद दूरवर निघून गेल्यावर ती उठली आणि दमदार पावले टाकत बाहेर आली. सगळं शहर शांतपणे झोपल्यासारखं वाटंत होतं.तिने डोळे मिटले आणि मन एकाग्र केलं. दूरवर शहरातल्या एका बदनाम वस्तीत एक मुलगी मदतीसाठी हाका मारत होती.
                    तिने डोळे उघडले आणि स्वतःला त्या २७ व्या मजल्यावरून बिनधास्तपणे झोकून दिलं.