जानेवारी २०१७

मुक्ताफळे

        ज्या नावाचा अर्थ काय असेल अशा घोटाळ्यात पाडणाऱ्या किंवा उच्चारायला कठिण नावांचा जमाना आहे सध्या ! त्यामुळे मारुती हे नाव आजकाल कुणी ठेवत असेल असे वाटत नाही. ! आमच्या लहानपणी अश्याच नावांचा सुकाळ होता आणि देव म्हणून मारुती बराच लोकप्रियही होता म्हणजे त्याकाळी प्रत्येक गावात मारुतीचे एक मंदीर असायचेच आणि काही काम नसले तर चला मारुतीला जाऊन येऊ म्हणून गावातील कोणीही व्यक्ती (त्यात आम्हीही आलोच) त्या मंदिरात जात असू.  तरीही मारुती या नावाची माणसं त्यावेळीही कमीच होती त्यामुळे त्या नावाच्या मुलाचीच शाळेत गाठ पडली ती अचानकच आणि काही काळापुरतीच ,तरीही तो चांगलाच लक्षात राहिला त्याला कारण त्याची काही मुक्ताफळे !!
      हा मारुती माझ्या वर्गमित्राचा चुलतभाऊ होता आणि तो अधेमधेच आमच्या गावात शिकायला आला. त्यावेळी असे काका मामा वगैरे व्यक्तींकडे शिकायला रहाणारी बरीच मुले असत. खरं तर तो माझ्या मित्राचा चुलतभाऊ आणि काही दिवसच कसा काय माझ्या मित्राच्या घरी म्हणजे त्याच्या काकाकडे शिकायला  राहिला काही कळले नाही.  . मारुती  आमच्या पुढे एक यत्ता होता. हा मारुती काही काळच आमच्या गावात राहिला आणि नंतर एकदम गुप्त झाला.
      माझा वर्गमित्र माझ्या बरोबर मॅट्रिक म्हणजे त्यावेळची अकरावी पास झाल्यावर एअर फोर्समध्ये भरती झाला आणि तोही माझ्या दृष्टीने गुप्तच झाला ते पार आम्ही दोघेही सेवानिवृत्त झाल्यावर म्हणजे डोक्यावरचे केस पार विरळ होऊन आम्ही एकमेकास ओळखण्याच्या पलीकडे गेल्यावर व मी पुण्यास येण्यापूर्वी काही दिवस भेटला आणि योगायोगाने आम्ही अगदी जवळ राहू लागल्यामुळे पुन्हा संघटण वाढले आणि नंतर पुन्हा एकदा मारुतीची पण गाठ त्याच्याकडेच पडली.मारुती तसा अगदी लहानपणापासूनच भलताच प्रौढ.त्याचे मानसिक वय आमच्यापेक्षा बरेच जास्त होते त्यामुळे तो आम्हाला अगदी लहान मुले समजूनच बोलायचा.तर आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना बरोबरीचे समजून बोलायचा ..
    त्या वेळी हायस्कूलमधील आमचे एक मास्तर (त्यावेळी या शब्दालाच बराच मान होता) मारुतीच्या वर्गमित्राचे म्हणजे प्रभाकरचे वडील होते.आणि त्यांचे घर अगदी बरोबर माझ्या वर्गमित्राच्या घरासमोरच होते आणि त्यामुळे ती दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या घरातील प्रत्येक माणसास ओळखत होती. त्यामुळे मारुती प्रभाकरच्या आईला त्यांच्या घरगुती नावाने म्हणजे बबूताई म्हणूनच संबोधत असे अर्थात तो केवळ त्याचाच हक्क असावा.दुर्दैवाने या मास्तरांना घशाचा कर्करोग झाला.त्यावेळी कर्करोग म्हणजे जवळ जवळ त्या व्यक्तीचा शेवटच अशी समजूत होती.(आताही कर्करोग म्हटले की तो होणाऱ्या व्यक्तीच्या पोटात गोळा उठून आपल्या अंतीम क्षणाचीच वाट ती व्यक्ती पाहू लागते. )ही बातमी मारुतीला समजल्यावर त्याला काय वाटले कोणास माहित ? हा एकदम उठून त्यांच्या घरी गेला आणि एकदम प्रभाकरच्या आईलाच भेटला आणि म्हणाला,"कायहो बबूताई ,अप्पांना (म्ह.प्रभाकरच्या वडिलांना ) कॅन्सर झाला म्हणे.मला हे कळले आणि लगेच धावतच तुमच्याकडे आलो.आता कसे होणार हो तुमचे ? कॅन्सर म्हणजे अगदी भयानकच आजार म्हणजे अगदी माण्साचा शेवटच म्हणायचा आणि आता कसे हो होणार तुमचे ?" बिचाऱ्या बबूताई अगोदरच नवऱ्याच्या काळजीने त्रस्त झालेल्या आणि त्यात मारुतीचे असे सांत्वनाचे बोल ऐकून अगदी त्यांच्या डोळ्यातून पाणीच काढायचे राहिले .बरं त्याला बोलणार तरी काय.नंतर त्या माझ्या मित्राच्या आईची गाठ पडल्यावर त्याना रहावेना आणि हलक्या स्वरात त्या त्याना म्हणाल्या"काय हो तुमचा मारुती ,प्रभाकरच्या वडलांचे त्याला कळल्यावर मला येऊन असे बोलला."
   माझ्या मित्राच्या आईला त्यांचे नाव आनंदी असले तरी हे ऐकून वाईटच वाटले आणि मारुती घरी आल्यावर न राहवून त्या म्हणाल्या,"काय हे मारुती, अगोदरच प्रभाकरच्या आईला काळजी लागलेली आणि तू त्यांच्याकडे जाऊन त्याना असे बोललास म्हणे.अरे असं कधी जखमेवर मीठ चोळणं बरं नाही इतकंही समजत नाही का?"यावर मारुती खजील वगैरे झालाच नाही.आपण मित्राच्या आईचे सांत्वन करायला गेलो आणि आपली काकू आपल्यालाच वर असं बोलते म्हणजे काय.उसळून तो बोलला."काकू इतिहासात आनंदीबाईने धचा मा करून आपल्या पुतण्याला मारले.आता तुझंही नाव आनंदीबाईच आहे आणि मीही तुझा पुतण्याच आहे तेव्हां आता असं कर तो धोंडा पडला आहे ना उचल तो आणि घाल माझ्या टाळक्यात म्हणजे माझ्या कृत्याचे मला प्रायश्चित्त मिळेल आणि तुझं समाधान होईल. "यावर त्या काकूला आपल्याच टाळक्यात तो धोंडा घालून घ्यावं असं वाटल्यावाचून राहवलं नाही.            
        असा हा मारुती अनेक वर्षानंतर मला भेटला. आश्चर्य म्हणजे बालपणापासूनच प्रौढत्व धारण करणारा मारुती आता तर खरोखरच प्रौढ झाला होता त्यामुळे त्याच्या तोंडून काय मुक्ताफळे बाहेर पडतात याची मी वाट पहात असतानाच 
"अरे तू आहेस वाटत ?"
मी त्याच्या समोर उभा असताना त्याने मला असे काय विचारावे या आश्चर्याने मी त्याच्याकडे बघत असतानाच  "अरे कोणी तरी मला म्हणाले की तू गेलास (म्हणजे मेलास) म्हणे " असं म्हणून तो जपून ठेवलेला  आनंदीबाईचा धोंडाच जणु त्याने माझ्या टाळक्यात घातला. हे ऐकून मला फारसा आनंद झाला अश्यातला भाग नाही तरीही मी हसत हसत " नाही, आता तुझ्यासमोर उभा आहे म्हणजे जिवंतच आहे फार तर हात लावून बघ " म्हणून मी जिवंत असल्याचा पुरावा सादर करण्याचा प्रयत्न  केला पण त्याचबरोबर मारुती या जन्मात तरी बदलणार नाही याची खूणगाठ मनाशी  बांधली.  
 

Post to Feedशुभ बोल नाऱ्या..
हो
'मारुती' प्रकारतल्या..
बोलण्याचा पोच
अर्धवट
मुक्ताफळे
कावळा बसायला आणि फांदी मोडायला ...

Typing help hide