'ज्ञ' ज्ञानाचा...

    मी राहतो, त्या घराच्या पूर्वेला आणि पश्चिमेलाही गॅलरी आहे. त्यामुळे उषा आणि संध्या दोघींचीही बदलती रूपे न्याहाळता येतात. दुरून येत असलेल्या प्रियकराला पाहून अंशाअंशाने वाढणारी गुलाबी लाजरी छटा पांघरणारी उषा. उषेचं ते अनुपम रूप पाहून प्रसन्न झालेला सोनेरी दिनकर हिरण्यवर्ण झालेला असतो. आपल्या कर्तव्याची आठवण जागवत तो न थांबता पुढं सरकत जातो, तेव्हा पूर्वेची ही प्रियदर्शनी मलूल होत जाते. तिच्या विरहतापाने सूर्य तपन होत जातो. भागला-थकलेला सूर्य मावळतीच्या टप्प्यावर येत असलेला संध्येला दिसू लागतो, तेव्हा तिचीही गत पूर्वेच्या प्रियदर्शिनीसारखी होते. तिच्या संन्निध जात असताना सूर्य आपलं तपन रूप टाकतो... सुखावतो... पुन्हा हिरण्यवर्ण होतो. संध्येला आपल्या कवेत घेतो, तेव्हा आकाश हळूहळू कृष्णपटल त्या दोघांवर पांघरते. एकाच प्रियदर्शिनीची ही दोन रूपं!
    ... पहाटे जाग आली... उठलो. साय काढून दूध तापवलं. साइड बाय् साइड् चहा केला. तो ढोसला नाही; अर्धा कपच, पण चवीन घेतला. त्यानंतर पूर्वेकडच्या गच्चीत धूम्रयज्ञ चालू झाला. दरम्यान् मनात विचार आला तो देवनागरी वर्णमालेतील ‘ज्ञ‘ या अक्षराचा. हा असला विचार मनात का उद्‍भवला, नाही माहित. पण मग विचारशृंखला तयार होऊ लागली...
    वर्णमालेतील व्यंजनांच्या सातव्या ओळीत पाच नाही तर सहा व्यंजने येतात. त्यात ष हे पहिले तर ज्ञ हे शेवटचे अक्षर. बर्‍याच वेळा हे ज्ञ अक्षर वर्णमालेत सातव्या ओळीनंतर शेवटी स्वतंत्र लिहिले जाते. अमक्यातमक्यातला अ तर अज्ञाताची किंमत काढून देणारा क्ष.
    व्यंजनांचे सातवे पंचक ष, स, ह, ळ आणि क्ष. ही जरा वेगळी वाटणारी वजनदार अक्षरे ज्ञ शी येऊन थांबतात. या अक्षरातून वर्णमालाकारांना काही सुचवायचे आहे कां? विचारांची गुंफण पुढं घेऊन जात होती...
    लक्षात आलं की, ज्ञ हे अक्षर ज्ञानाचे द्योतक आहे. आपल्याला ज्ञान प्राप्त करून देणारी जी इंद्रिये आहेत, त्यांची संख्याही पाचच आहे - जीभ, त्वचा, कान, नाक आणि डोळे. यांद्वारे आपल्याला रस, स्पर्श, शब्द, गंध आणि रूप यांचा बोध होतो. त्यातून मिळणारे ज्ञान आपली बुद्धी साठवत जाते. अध्यात्मशास्त्रात यांना पंचतन्मात्रा म्हणून संबोधतात. (या तन्मात्रांचा संबंध आहे तो, आकाश, वायु, अग्नी, जल आणि पृथ्वी या पाच महाभूतांशी.) तर विचार करता करता लक्षात येत गेले आणि, बुद्धीला जे ज्ञान प्राप्त होते त्याचा आणि ज्ञ-पूर्व पाच व्यंजनांचा संबंध असल्याचे जाणवले.
    ष या अक्षराने षट्‍ म्हणजे सहाचा बोध होतो. जीभेने जी चव घेतली जाते, त्याद्वारे आंबट-तुरट, कडू-खारट, तिखट-खारट या एकमेकाविरुद्ध अशा गुणांच्या चवीचा बोध होतो. याला शास्त्रात जल या महाभूताची तन्मात्रा रस असल्याचे म्हटले आहे. हे षड्‍रस शरीराचे पोषण करतात. आणि, आपल्या शरीराचं योग्य पोषण व्हावं, यासाठी नित्य षड्‍रसयुक्त आहार घ्यावयास हवा, असं आयुर्वेद सांगतो.
    स - समीर किंवा वारा. तो दिसत नाही. त्याचे अस्तित्व जाणवते ते त्याच्या वाहत राहिल्यामुळे.. वारा वाहतो, त्याचे आपल्याला जे ज्ञान होते ते स्पर्शाद्वारे. शास्त्र सांगते की, वारा किंवा वायू या महाभूताची तन्मात्रा स्पर्श आहे.
    ह म्हटले की हवा शब्द डोळ्यांसमोर आला. ही आकाशाची पोकळी भरून काढते.  तिला आकाशाचा आधार आहे. ढगांचा गडगडाट असो वा वार्‍याचा सूंकार; तो आपल्या कानांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ही हवाच करते. म्हणून आकाशाची तन्मात्रा शब्द (ध्वनी) असल्याचे अध्यात्मशास्त्रात सांगितले आहे. .
    पुढचे अक्षर आहे ळ. या ळ-ला संस्कृत भाषेने दिलेले स्थान मराठीने स्वीकारले. हिन्दी भाषा देवनागरी वापरते, पण तिने ळ (आणि ण)स्वीकारला नाही. अन्य भाषांतून या ळ-ला स्थान का नाही, हे पाहणे हा विषय वेगळा. ते असो. पण ‘ळ कमळाचा‘ हे आपले बाळबोध शिक्षण. हे कमळ सुगंधाचे प्रतिक. नुकतेच भागवतातील ‘गजेन्द्रमोक्ष‘ आख्यानात वाचलेला संदर्भ आठवला. क्षीरसागरातील त्रिकूट या पर्वताच्या परिसरात नद्या-सरोवरे निर्मल पाण्याने समृद्ध होत्या. त्यांच्या तीरावर मोत्यांसारखी चमचमणारी वाळू पसरलेली होती. त्या निर्मल जलाने देवांगना स्नान करीत. ते जल अमृतासारखे मधुर होते, इतकेच नव्हे, तर विविध कमलकेसरांनी ते जल सुगंधित झालेले होते. गजेन्द्र त्याच्या कळपासह या सुगंधाने आकर्षित झाला आणि त्या सरोवरात जलक्रीडेसाठी धावला! तर, ळ हे अक्षर गंधाचे द्योतक आहे. जरा पहा, ळ मधील दोन गोल आणि वरची रेष मिळून नाकाचे चित्र डोळ्यांसमोर येते ना? म्हणून ळ हे अक्षर गंधज्ञानाचे साधन असल्याचे कळले. अध्यात्मशास्त्रानुसार गंध ही पृथ्वी या महाभूताची तन्मात्रा आहे.
    आता क्ष हे व्यंजन कोणती तन्मात्रा दाखविते? याचा विचार करताना अक्ष हा शब्द आठवला. अक्ष म्हणजे डोळा. दृष्टीच्या योगे तो आपल्याला ज्ञान करून देतो. अक्ष या शब्दातील अ हा नकारात्मक घ्यायचा नाही, तर ‘अकार तो ब्रह्मा‘ असं जे माउली सांगतात, त्या अंगानं घ्यायचा. त्यापासून वर्णमाला फुलत गेली आहे. ते सृजनाचं प्रतिक आहे. तसंच, सूर्याचं मानवी देहातील अधिष्ठान आहे, ते चक्षु अर्थात् डोळा. या चक्षुतील ‘च’ हे अक्षर ‘आणिक्’ या अर्थाने विस्तार दाखविणारे आहे. दृष्टी ज्ञानाचा विस्तार करीत जाते. अवकाशाचा वेध घेण्याचं सामर्थ्य या चक्षुमध्ये आहे. म्हणून डोळा हा सर्व ज्ञानेन्द्रियांमध्ये श्रेष्ठ आहे. याला दुसरेही एक कारण असल्याचे सांगता येईल. ‘चक्षुर्वैसत्त्यम्‘ असं आपण म्हणतो. जे डोळ्यानं पाहिलं ते सत्य, बाकी गौण!... हा विचार मनात आला आणि...
    समोरच्या टेकडीवरून सोनेरी सूर्यबिंब सोनेरी प्रकाश उधळत वर आले... ज्ञ -  ज्ञान या व्यंजनाने विचारांची सांगता झाली आणि लेखणी हातात घेतली...

‘ज्ञ ज्ञानाचा‘
दि. २४.१.२०१६