जानेवारी १७ २०१७

दोन अधिक दोन - एक अस्वस्थ वर्तमान

"दोन अधिक दोन किती"? हा प्रश्न एखादी गोष्ट किती सोपी असावी त्याची न्यूनतम पातळी दाखवण्यासाठी वापरला जातो. जसा इंग्रजीत "इटस नॉट रॉकेट सायन्स" हा वाक्प्रचार वापरून 'रॉकेट सायन्स' ही समजण्याची कठिणतम पातळी असल्याचे दाखवतात तसे.
हा आठेक मिनिटांचा लघुचित्रपट तुम्हांला विचार करायला लावतो. आणि विचार करायला लावतो. आणि विचार करायला लावतो.
चित्रपट आजचा नाही. २०११ सालचा आहे. पर्शियन भाषेत केलेला आहे, पण सबटायटल्स आहेत (ती नसती तरी फार बिघडले नसते).
वर्गात बसलेली मुले. शिक्षक वर्गात येतात. भिंतीवरल्या एका छोट्या लाऊडस्पीकरमधून मुख्याध्यापक काही घोषणा करतात. आणि घुसळण सुरू होते. याहून जास्त माहिती इथे उलगडणे हा मठ्ठ क्रूरपणाचा कळस होईल.
डोक्यात अगदी दोन डोळ्यांच्या मध्यभागी ठाणकन येऊन आदळणारी गोष्ट म्हणजे हा चित्रपट कुणा एका व्यक्ती वा संस्कृतीकडे बोटे रोखत नाही. पण त्याच वेळेस सगळ्या जगातली अशा प्रकारची विचारप्रवृती हळूहळू, ठामपणे आणि निर्दयपणे समोर मांडतो. काही रूपके वापरली आहेत. पण ती सूचन करण्यापुरती. भडक नि बटबटीत चिन्हे वापरून माजवलेला प्रचाराचा कंठाळी कलकलाट इथे अजिबात नाही. किंबहुना, कुठल्याही समूहाकडे थेट बोट दाखवले जाईल अशा प्रकारचे रंग, आकार वा भाषा वापरण्याचे दिग्दर्शकाने साफ टाळले आहे.
हेच या चित्रपटाचे यश. कुठल्याही भूगोलाच्या, इतिहासाच्या, भाषेच्या, राजकीय विचाराच्या वा संस्कृतीच्या बेडीत न जखडता तुमच्या जाणीवांना मुक्त आणि श्रीमंत करणारा अनुभव हा चित्रपट देतो. हा पाहून कुणाला कुठल्या वर्तमानाची आठवण झालीच तर ती स्वतःच्या जबाबदारीवर निभावावी!

Post to Feedआवडला
बापरे!
चित्रपट

Typing help hide