फेब्रुवारी २२ २०१७

मूक वसन्त !


    गेल्याच महिन्यात दिल्लीत रहाणारी माझी भाची माझ्याकडे आली होती. घेऊन ! ती परत जाताना प्रथमच आलेल्या तिच्या छोट्या मुलीला विचारले ," काय आवडलं का पुणं?" अपेक्षेप्रमाणे तिने "हो" असे उत्तर दिले आणि काय आवडले हे विचारल्यावर त्या एवढ्याश्या पोरीने अगदी अनपेक्षित उत्तर दिले ,"इथे मला खूप ऑक्सिजन मिळाला,श्वास घ्यायला खूप छान वाटत होते,दिल्लीत तसे नाही" दिल्लीपेक्षा पुण्यातील हवा शुद्ध आहे म्हणून पाठ थोपटून घ्यायची की देशातील वायुप्रदूषण इतक्या उच्च पातळीला पोचले आहे की मिनिटाला दोघांचा बळी जात आहे या लॅन्सेट या नियतकालिकातील प्रदूषण अहवालात उल्लेखलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे याचा विचार करण्याची पाळी आता आली आहे.दिल्ली व पाटणा ही सर्वात जास्त दूषित शहरे भारतात आहेत.चीनमध्ये माझे मित्र त्यांच्या मुलाकडे जाऊन आले  तेथे तर श्वासोच्छ्वास करायला अवघड जाते असे त्यांनी सांगितले त्यामुळे घरातच ए.सी.तून गाळून येत असलेली हवा घेत बसावे लागते.
       "सायलेन्ट स्प्रिंग" या अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाची लेखिका ,रेचेल कार्सन इने आपल्या आयुष्यात दिलेल्या महान लढ्यामुळे निदान अजून काही प्रमाणात तरी शुद्ध हवा आपल्याला उपलब्ध आहे.ती २७ मे १९०९ मध्ये जन्मली. १४ एप्रिल १९६४ मध्ये मरण पावली त्या वेळी अमेरिकेतील अग्रगण्य वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या व्यंगचित्रात तिच्या समाधीपाशी दोन टोळ आपापसात बोलताना दाखवले आहेत त्यातील एक टोळ दुसऱ्याला म्हणतो," देव आपल्या आईवडिलांचं भलं करो,त्यानी आपल्याला जन्म दिला आणि हे सुंदर विश्व पहाण्याची संधी मिळाली"यावर दुसरा टोळ म्हणतो,"---आणि रेचेल कार्सनचेसुद्धा,कारण तिच्यामुळे आपल्याला जगायला मिळालं" दुसऱ्या एका व्यंगचित्रात फुलपाखरं,भुंगे,मधमाश्या असे अनेक छोटे छोटे कीटक तिच्या समाधीवर जंगली फुलं वाहून आपली कृतज्ञता व्यक्त करताना दाखवलेले होते.कारण कदाचित तिच्या प्रयत्नाअभावी ते कीटक आणि ती फुलंही पृथ्वीतलावरून दिसेनाशी झाली असती. 
      रेचेल कार्सनचे निसर्गावर निरतिशय प्रेम होतं.सागरी जीवनाची ती अभ्यासक होती. पण त्याचबरोबर निसर्गाच्या वैज्ञानिक अभ्यासामुळे तिला ज्ञात झालेलं दाहक सत्य समाजाला समजेल अश्या भाषेत ओरडून सांगून जागे करण्याची हाडाच्या कार्यकर्त्याची आणि समाजसेवकाची तळमळही तिच्यापाशी होती.त्याचमुळे सागरी अभ्यासावरील तिची पुस्तकें अतिशय लोकप्रिय झाल्यावरही वैज्ञानिक प्रगतीचा उपयोग अणुबॉम्ब सारखी विध्वंसक निर्मिती करून सर्व जगासच वेठीस धरणाऱ्या मानवी प्रवृत्तीवर भाष्य करताना "वारा,पाऊस आणि ढग यांवर माणसाची सत्ता चालणार नाही ही माझी श्रद्धा आता ढासळू लागली आहे"असे ती म्हणते.
     दुसऱ्या महायुद्धात व नंतरही चाललेल्या शीतयुद्धात अमेरिकन व रशियन सैनिक जगाच्या निरनिराळ्या भागात असताना डासांमुळे मोठ्या प्रमाणात मलेरियाला बळी पडू लागले व त्यावर उपाय करण्यासाठी केलेल्या संशोधनातून निर्माण झालेले डी.डी.टी. हे महान कीटकनाशक सापडल्यावर स्विस शास्त्रज्ञ म्यूलरला या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिकही प्राप्त झाले  अश्या कीटकनाशकाच्या निर्मितीमागे अमेरिकन भांडवलदार एकदा लागल्यावर त्यातून होणाऱ्या फायद्यासाठी कितीही प्रमाणात त्याची निर्मिती करायला आणि त्यातून भरमसाट नफा उकळायला ते तयारच होते  त्यांच्या पैशावर निवडून येणारे सिनेटर त्यांना उत्पादनासाठी व नंतर त्यांनी केलेले भरमसाट उत्पादन खपवण्यासाठी कोणत्याही हद्दीपर्यंत जात असत.डी.डी.टी.हे कीटकनाशक म्हणून हाती लागल्यावर कोणत्याही प्रमाणात जिथे तिथे त्याचा वापर करण्यात आला.त्याचबरोबर इतर उत्साही संशोधकांनी फायर ऍन्ट या घातक कीटकाच्या निर्मूलनासाठी शोधलेल्या डाय आल्ड्रिन व हेप्टॅक्लॉर या कीटकनाशकांचा अगदी हेलिकॉप्टर वापरून फवारणी करण्यासाठी वापर अमेरिकन शासकीय यंत्रणेकडून करण्यात येऊन मोठ्या प्रमाणात पैशांचा चुराडा करण्यात आला.(आपल्याकडे इतका पैसा नसल्यामुळे अश्या फवारणीतून आपण वाचलो.तरीही पालिका ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना या फवारणीच्या कामास जुंपून जनतेच्या आरोग्याची काळजी शासनास आहे हे दाखवण्यात येतेच)
    या फवारणीस पर्यावरणवाद्यांचा विरोध होता कारण त्यामुळे त्रासदायक कीटकच मरतात असे नाही तर इतर पर्यावरणास उपयोगी (उदा:भुंगे मधमाश्या,फुलपाखरे) असे कीटकही मरतात येवढेच काय मानवी जीवितासही धोका संभवतो असे पर्यावरणवाद्यांचे मत होते.पण हे मत व्यक्त करणाऱ्या त्यानी लिहिलेल्या लेखांकडे व इशाऱ्यांकडे अमेरिकन सरकारने आपल्या उद्योजकांच्या फायद्यसाठी संपूर्ण दुर्लक्ष करून मलेरिया निर्मूलनाच्या मोहिमा आपल्या देशात तर राबवल्याच पण त्याचवेळी स्वतंत्र झालेल्या इतर देशांनाही या मोहिमा राबवण्यास उद्युक्त केले.कारण उघडच होते युद्धानंतर मिलिटरीची कीटकनाशकांची मागणी कमी झाली होती तर कारखानदारांनी त्याची निर्मिती मात्र पाचपटीने वाढवली होती मग हा इतका माल खपणार कोठे ?मग त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे कोण लक्ष देणार? आपल्यासारख्या आधीच उल्हास तशात फाल्गुनमास असणाऱ्या देशांचे तर विचारायलाच नको.अमेरिका देतीय ना मग घ्या पदरात अश्यातला प्रकार. व आपली प्रजा तर काय "मुकी बिचारी कुणीही हाका " डांस निर्मूलन मोहीम सरकार काढतेय ना वा ! वा! किती कळवला आपल्या आरोग्याचा सरकारला असेच नगरसेवक प्रजेच्या मनावर बिंबवणार व वर बघा आम्ही तुमच्यासाठी किती कष्ट करतोय हेही सांगणार.(आयजीच्या जिवावर बायजी उदार ! )
    पण अमेरिकेत खाबू उद्योजक व त्यांना साथ देणारे सिनेटर्स (आपल्याकडे त्यांना नगरसेवक की भक्षक ? म्हणतात) यांच्याशिवाय आणखीही एक जमात असते ती म्हणजे जागृत नागरिक तसेच सद्सद्विवेकी संशोधक व पर्यावरणवादी.(आपल्याकडेही पर्यावरणवादी बांधलेले रस्ते उखडून काढायला लावतातच).त्यांनी अश्या मोहिमांना विरोध करायचा प्रयत्न केला पण  सरकारने त्यांच्याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले इतकेच काय विरोधी मत व्यक्त करणाऱ्या जीवशास्त्रज्ञाची सुद्धा खात्यातून उचलबांगडी केली (या बाबतीत त्यांनी भारताचा आदर्श समोर ठेवला की आपण त्यांचा यावर वाद होऊ शकेल).रेचेलचे लक्ष या समस्येकडे तिच्या ओल्गा हकिन्स या मैत्रिणीमुळे गेले.तिच्या घरामागील तळ्यातील मासे व तिच्या बागेत नेहमी येणारे पक्षी या फवारणीमुळे मरण पावले असे तिने "बोस्टन हेरल्ड"या वृत्तपत्रात पत्र लिहून सरकारच्या या फवारणीविरुद्ध तक्रार केली.आम्हाला डास नकोत पण त्याचबरोबर बागेतले पक्षी व मासे मरू लागले तर ते चालणार नाही असे तिने शासनाला बजावले.
     त्याच वेळी सरकार जिप्सि मॉथ या आणखी एका कीटकनिर्मूलनाची मोहीम (पुन्हा विमानातून फवारणी) हाती घेणार होते.तसा हा कीटक नागरी वस्तीत नसतोच पण अमेरिकेतही "आले सरकारच्या मना तेथे कोणाचे चालेना" कारण ही मोहीम डाय आल्ड्रिन व हेप्टॅक्लॉर या कीटकनाशकांच्या उत्पादक कंपन्यांच्या फायद्यासाठीच राबवण्यात येत होती.  या मोहिमेविरुद्ध जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ रॉबर्ट कुशमन मर्फी व काही जबाबदार नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती पण न्यायालयानेही सरकारलाच साथ दिली "पुरेश्या पुराव्याअभावी" या फवारणीस मनाई देण्याचे नाकारले व  या फवारणीमुळे पर्यावरणास धोका आहे असे गुळमुळीत मत शास्त्रज्ञ जरी व्यक्त करत असले तरी त्यांचे मत मान्य करायचेच नाही असे जणु उत्पादकांच्याच कच्छपी लागलेल्या सरकारने ठरवले होते उलट असे व्यक्त करणाऱ्यांनाच  धमक्या देण्यास सुरवात केली.
    अश्या परिस्थितीत युद्धोत्तर कालात प्रचंड प्रमाणात रसायन निर्मिती करून निसर्गचक्रात जी ढवळाढवळ अमेरिकेतील तथाकथित पुढारलेल्या सरकारने चालवली होती व आपला माल खपवण्यासाठी इतर देशांनाही त्याच प्रकारच्या मोहास बळी पाडण्याचा त्या सरकारचा प्रयत्न चालू होता याविरुद्ध आपणच लेखणी उचलली पाहिजे असा विचार करून या सर्व मोहिमांचा किती भयानक परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होत आहे व त्यात सर्व जीवसृष्टी व अखेर स्वत: मानवाचीही आहुति पडण्याची कशी शक्यता आहे ही गोष्ट जाहीर करण्याचा विडाच जणु रेचेलने उचलला पण त्यासाठी  तिने लिहिलेले लेख छापण्यालाही "रीडर्स डायजेस्ट""लेडीज होम जर्नल""विमेन्स होम कंपॅनियन "व "गुड हौसकीपिंग" या मासिकांनी असमर्थता व्यक्त केली.त्यातील एकाच मासिकाने "तिने व्यक्त केलेल्या मतांना पुरेसा पुरावा नाही" हे कारण दिले तर इतरांनी तेही दिले नाही. शेवटी तिने परिणामाची पर्वा न करता या विषयावर पुस्तकच लिहायचे ठरवले व हॉटन मिफ्लिन या प्रकाशिकेने ते प्रसिद्ध करण्याची तयारी दाखवली.
    या पुस्तकासाठी देशी परदेशी संशोधकांकडून पुरावे गोळा करताना प्रत्यक्षात तिला वाटत होते त्याहूनही या कीटकनाशकांचा परिणाम भयानक आहे, दु:ख, दारिद्र्य,पीडा आणि उपासमार यापासून मानवास मुक्ती देणारा विज्ञान हा मार्ग असला तरी त्याची विध्वंसक बाजूही त्याहूनही अधिक शक्तिशाली आणि भयानक आहे.या विध्वंसाच्या तडाक्यातून हवा, पाणी,सूर्यप्रकाश,समुद्र या पर्यावरणाचा एकही घटक सुटलेला नाही आणि दिवसेदिवस कीटकनाशके,अणु उत्सर्ग अश्या मानवी कृती त्याचे स्वरूप अधिक अधिक विषारी बनवत आहेत ही गोष्ट तिच्या लक्षात आली.
       १९६२ मध्ये प्रकाशित झालेल्या "Silent Spring"(मूक वसन्त) या तिच्या अतिशय शास्त्रशुद्ध व काटेकोर पण तितक्याच ओघवत्या भाषेत लिहिलेल्या  पुस्तकाचे वाचकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले इतकेच नव्हे तर आपल्या मतदारसंघातील आपापल्या लोकप्रतिनिधींना धारेवर धरले (आपल्याकडे हे फारच कमी प्रमाणात घडते).तिला त्यामुळे साहित्यिक व वैज्ञानिक लेखनाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले अगदी नोबेल पारितोषिकासाठीही तिवे नाव सुचवण्यात आले.त्याचबरोबर कीटकनाशक उत्पादकांच्या जहरी हल्ल्यासही तिला तोंड द्यावे लागले.त्यावेळी ती स्वत: कॅन्सरग्रस्त होती ही बाब आणखी लक्षात घेण्यासारखी.अर्थात त्या जहरी प्रचाराने ती मुळीच कचरून गेली.नाही तिच्या लिखाणामुळे आलेल्या दबावामुळे त्यावेळी राष्ट्राध्यक्ष असणाऱ्या केनेडींना या मोहिमांबद्दल विचार करण्यास भाग पडले आणि त्यांना कीटकनाशकांच्या संहारकतेच्या परीक्षणासाठी स्वतंत्र समिती नेमावी लागली आणि त्या समितीचेही निष्कर्ष तिच्या पुस्तकातील निष्कर्षाशी मिळते जुळते असल्यामुळे कीटकनाशक मोहिमा रद्द कराव्या लागल्या.
        कीटकांचा नाश करण्यासच तिचा विरोध आहे आणि त्यामुळे सर्व जग कीटकांच्या हल्ल्यास कसे बळी पडणार आहे असे चित्र तिने लिहिलेल्या पुस्तकाचाच आधार घेऊन उत्पादकांनी रंगवण्यास सुरवात केली पण त्यांचा दावा चुकीचा असून कीटकांचा नाश करणे तिला मान्यच आहे पण तोही पर्यावरणास हानी न वेगळ्या पोचवणाऱ्या उपायांनी करणे कसे शक्य आहे हेही तिने दाखवून दिले.
        आज थोडीफार तरी शुद्ध हवा मिळू शकते याचे संपूर्ण श्रेय रेचेल कार्सनकडे जाते. त्याचबरोबर प्रत्येकाने व प्रत्येक लोकप्रतिनिधीने ते पुस्तक वाचावयास हवे आणि आपल्या परिसराचे पर्यावरण रक्षण कसे करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे.आजही पुणे आणि इतरही सर्व शहरात सर्रास रस्त्यावर कचरा जाळण्यात येतो.शौचालयांचा फक्त आग्रहच धरण्यात येतो प्रत्यक्षात स्त्रियांसाठीच काय पुरुषांसाठीसुद्धा स्वच्छतागृह गल्लीबोळात तर राहोच पण मोठमोठ्या रस्त्यावरही नसते.घरातले दूषित पाणी बिनदिक्कत रस्त्यावर सोडण्यात येते आणि रासायनिक व इतर कारखान्यांचे दूषित पाणी व गाळ नद्यांमध्ये सोडून गंगा नदीसारखी पवित्र नदी सांडपाण्याची नदी होते या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.    
          रेचेलने "सायलेन्ट स्प्रिंग" या पुस्तकापूर्वी "Under the Sea wind" "The Sea around us""The Edge of the sea" ही तिच्या आवडीच्या सागरी संशोधनावर आधारित आणि "Sense of Wonder" हे लहान मुलांसाठी अशी चार पुस्तके लिहिली व तीही तितकीच गाजली.        
   (लक्ष्मण लोंढे यांच्या "आणि वसंत पुन्हा बहरला" या पुस्तकावरून)

Post to Feed
Typing help hide