तिची सतार --!

        वाद्यांच्या संग्रहाच्या बाबतीत माननीय आबासाहेब मुजुमदारांशी तुलना करावी इतकी नाहीत तरी बरीच वाद्ये माझ्याकडे जमली असती  फक्त त्यांचा संग्रह करण्याचा दृष्टीकोन मी ठेवला  नाही इतकेच. संग्रहासाठी वाद्ये खरेदी करण्यासारखी घरची आर्थिक परिस्थिती नसतानाही  वडिलांना कीर्तन करण्याची आवड असल्याने घरात तबला,  पेटी झांज व चिपळ्या  एवढी  वाद्ये तरी हमखास असत . वडील स्वतः झांज , चिपळ्या आणि गरज पडल्यास तबला ही वाद्ये वाजवू शकत. त्याना भजन करायला तेवढी पुरत.  गावात इतर कोणत्याही आर्थिक दृष्ट्या संपन्न घरातही तबला व  पेटी ही वाद्ये क्वचितच असत आणि असलीच तरी सुस्थितीत असण्याचा योग नसेच. ती आमच्याकडे मात्र या कीर्तनाच्या व्यासंगामुळे हमखास असत,त्यामुळे बरेच वेळा आमच्याकडली वाद्ये ही मंडळी घेऊन जात आणि हमखास बिघडवून परत करत,त्यामुळे   ही  वाद्ये दुरुस्त  करणारा एकमेव कारागीर ---  घडशी , आणि त्याचे नाव होते टोमदेव उर्फ टोम्या---  तो  आमच्या वाद्यांच्या दुरुस्तीवरच जगत असेल इतक्या वेळा ती दुरुस्त करावी लागत. घरात वाद्ये असल्यामुळे मीही त्यांच्यावर हात फिरवू लागलो होतो.
            एकदा मुंबईला गेल्यावर  माझा संगीत छंद माहीत असल्यामुळे एक माउथऑर्गन वडिलांनी माझ्यासाठी आणला.पिशवीत घालून आणायला सोपा आणि त्यावेळी बराच स्वस्तात मिळाल्यामुळे असेल कदाचित ! त्यापूर्वी मी फ्ल्यूटही वाजवण्याचा प्रयत्न करू लागल्यामुळे जत्रेत मिळणारा पितळी फ्लूट घरी आलेला होताच.  वाजवता येते ते वाद्य या व्याख्येने वाद्य या सदरात बसणारी शिट्टी व पिपाणी ही वाद्ये संगीताची कोणतीही परंपरा नसणाऱ्या घरातही गावाकडील जत्रेत घ्यावी लागतच त्याशिवाय जत्रेची पूर्तता होतच नसे.त्यामानाने फ्ल्यूट किंवा पावा हा प्रकार घेणारी घरे संगीताचा थोडा बहुत कान असणारी असत त्यामुळे आमच्या बऱ्याच मित्रांकडे तो असायचा आणि बहुधा त्यांची धाकटी भावंडे कर्कश आवाज काढण्यासाठी किंवा मारामारी करण्यास त्याचा वापर करीत आणि त्याच्या आया जर फुंकणी सापडत नसेल तर !. या त्याच्या बहुविध उपयोगामुळे व आवाजाची कर्कशता काही अंशी कमी असण्यामुळे शिवाय त्यातूनच एकादे पोरगे खरोखरच काही बरे सूर त्यातून काढण्याची शक्यता असल्यामुळे बऱ्याच घरात घेतला जाणारा हा प्रकार जत्रेतच मिळणाऱ्या शिट्टी किंवा पिपाणीपेक्षा खूपच कमी त्रासदायक असे.
    त्याच काळात शेजारी  माझ्या मित्राचा भाऊ बुलबुलतरंग (बॅंजो) वाजवत असे.तसे ते वाद्य हार्मोनियमपेक्षा सोपे होते।शिवाय वजनाने  हलके  आणि किंमत या सदरात आमच्या आर्थिक मर्यादेत बसणारे , त्यामुळे पुण्यात शिकायला गेल्यावर ते पण मी विकत घेतले. त्यावेळी माझे बरेच मित्र मला वाजवायला सांगत  माझ्या खोलीतील सहकाऱ्याला तो संगीताचा शत्रु नसला तरी दोस्त खासच नसल्यामुळे आणि शिवाय माझ्यापेक्षा अभ्यास करण्याची त्याला अधिक आवड असल्यामुळे माझे बुलबुलतरंग व फ्ल्यूट हे दोन्ही त्रास सहन करावे लागत व त्यापायी त्याचे वाक्ताडन कधी कधी मला !. 
      मधल्या काळात आमच्या गावाकडून वडिलांच्या स्थावर जंगम इस्टेटीमधून एक चौरंग, काही लाकडी पाट त्याचबरोबर तबल्याची दोन खोडेही आली त्यापैकी एक खोड टोम्याला देऊन त्याबदली वडिलांनी एका खोडावर पूड चढवून घेतले व अश्या प्रकारे घरात आणखी  एका वाद्याची भर पडली. फ्ल्यूट  हे वाद्य वजनास हलके असल्यामुळे व बऱ्यापैकी स्वस्त असल्याने  बऱ्याच वेळी नवीनच फ्ल्यूटची खरेदी केली जायची  व त्यामुळे सगळे फ्ल्यूट राहिले असते तर त्यांची एक माळच करून गळ्यात घालून बॅगपाइपर सारखे मला वाजवत फिरता आले असते. अश्या प्रकारे मी नोकरीस लागेपर्यंत दोन तबले पण डग्गा मात्र एक , एक पेटी , चिपळ्या, झांज, दहा बारा फ्ल्यूट, एक माउथऑर्गन एक बँजो अशी अनेक वाद्ये घरात जमली होती. 
         नोकरी करू लागल्यावर माझ्या वाद्यप्रेमाने (म्हणजे वाद्ये विकत घेण्याया) उअल घेतली.त्यावेळी पंडित रविशंकर यांच्या सतारीची मोहिनी  मनावर पडली होती सतारीला फारशी जागा लागत नाही,घराच्या  कोठल्याही कोपऱ्यात राहू शकते हा सतारीच्या बाबतीत माझ्या दृष्टेने महत्त्वाचा पैलू होता. त्यामुळे औरंगाबादहून पुण्यास गेलो तेव्हां जवळ पैसे नसताना मित्राकडून पैसे घेऊन मी ती विकत घेतली आणि घरात आणखी एका वाद्याची  भर पडली.औरंगाबादला सतार शिकवणारे त्यावेळी कोणी नव्हतेच म्हटले तरी चालेल. त्यामुळे अंदाजाने व सतारीचे पुस्तक घेऊन जमेल तसे वाजवणे चालू होते.
      अश्यामध्ये अचानक मातोश्रीनी फतवा काढला की आता तिला घरातला भार उचलणे  दिवसेंदिवस अवघड होत  आहे,तेव्हां तिच्या मदतीसाठी एक माणूस घरात आणावे। तसे  बाहेरील लोकांनाही माझे एकटे रहाण्याचे सौख्य पहावत नव्हतेच. त्यांच्या  विचारण्याला  जरी फारसे महत्त्व देत नसलो तरी तिच्या सेवानिवृत्तीच्या या प्रस्तावालाही  मी फारसे मनावर घेत नव्हतो पण अचानक आलेल्या एका पत्राने माझ्या निश्चयास सुरुंग लावला. त्यात पत्रलेखकांने आपल्या मुलीसाठी स्थळ म्हणून माझी निवड केल्याची माहिती व.नेहमीप्रमाणे कन्येचे गुणवर्णन होते, तिच्या इतर गोष्टींपेक्षा संगीतात पदवी धारण करून ती सतार वाजवते ही गोष्ट  माझ्या अधिक मनात ठसली। अगदी पु.लं च्या रावसाहेबांना जसे लेडी सितारिष्टचे कौतुक वाटते तशीच परिस्थिति माझी झाली . लग्नानंतर या लेडी सितारिस्टकडून सतारीचे धड़े घेता येतील अशी आशा वाटली तसेच सतारींची जुगलबंदी करता येईल (मला स्वत;ला सतार वाजवता येत असो वा नसों !)  हा विचार मनात आला की काय कुणास ठाऊक!  .लग्नानंतर जुगलबंदी होते पण तो प्रकार करण्यासाठी वाद्याची आवश्यकता नसते याची किंवा सितारिष्ट हे अरिष्टही होऊ शकते याची कल्पना अजून यायची होती..
     परंतु या कलागुणाचा परिणाम झाल्यामुळेच की काय मी या स्थळाला होकार दिला.पण तिला मात्र  तिच्या  आयुष्यातील एक महत्वाची संधी  गमवावी लागली कारण त्या वेळी लग्न की करियर ( खुलता कळी --- तली मानसी) यांच्या संघर्षात मुलींच्या बाबतीत लग्न या संधीलाच प्राधान्य असे.करिअर काय करता येईल लग्नानंतरही. खरे म्हणजे तिला त्यावेळी वानस्थली विद्यापीठात सतार या विषयातच पुढे शिकण्याची संधी प्राप्त झाली होती.पण आता लग्न ही संधी महत्त्वाची ठरली व तिला विद्यापीठा ऐवजी घर सोडून आमच्या घरात प्रवेश करावा लागला.    
     लग्नानंतर पहिली गोष्ट जर काय लक्षात आली असेल ती आमच्या छोट्या घरात दोन सतारी ठेवणे ही गोष्ट एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याइतकीच अवघड आहे. तबला, पेटी व इतर वाद्याप्रमाणे ते वाद्य कपाटात ठेवण्याइतके मोठे कपाट घरात नव्हते आणि तसे कपाट घेतले तर ते ठेवण्याइतके घर मोठे नव्हते. अर्थात पहिली संक्रांत माझ्याच सतारीवर आली. कारण माझे वादनकौशल्य असे काही खास नव्हते की आपलेच वाद्य पाहिजे अशी परिस्थिती असावी.शिवाय त्याविषयी मी फारच समजुतदार व दिलदार असल्याने माझी सतार लगेचच कोणाला तरी देऊन टाकण्यास मी तयार झालो,कारण नाही म्हटले तरी लेडी सितारिष्टच्या सतारीची व त्या सतार वादनाची तारीफ अनेकदा ऐकल्यामुळे तिच्या सतारीला बाहेरचा रस्ता दाखवणे शक्यच नव्हते. मी मात्र सतारीतूनच काय पण सतारवादनातूनही मुक्तता घेण्याची
लगेचच तयारी दाखवली त्यामुळे आमची सतारीची जुगलबंदी होण्याची शक्यता मी रद्दबातल केली ही गोष्ट मी पारच विसरून गेलो.लेडी सितारिष्टच्या आगमनातील नव्या नवलाईचा परिणामही असावा.
     लेडी सितारिष्टला  सतार काढायचा उत्साह असला तरी आमच्या मातु:श्रींनी खरोखरच निवृत्ती जाहीर केली व संसाराची धुरा तिच्या खांद्यावर टाकल्यामुळे सतारीसाठी तिचा खांदा मोकळा होणे अवघड होत होते. आईने कामात लक्ष घालून सुनेला सतार वाजवत बस म्हणायचा तो जमाना नव्ह्ता. आणि आपल्या सासूला  काम करायला लावून सतार वाजवत बसण्याची मानसिकता येण्याइतकी सून निर्ढावलेली नव्हती, तिचा तो पिंडही नव्हता. अर्थात सतारीवरील गवसणी काढून तिच्या तारा जरा सुरात मिळवेपर्यंत एकाद्या कामाची आठवण होऊन सतार पुन्हा गवसणीत घातली की त्या दिवसाच्या रियाज संपायचा.
     लग्नानंतर थोड्याच दिवसात सुदैवाने पत्नीच्या माहेरची एक मैत्रिण औरंगाबादला बदलून आली आणि योगायोगाने तिलाही सतार वादनात रस होता कधीकाळी ती पं.रविशंकरांच्या क्लासमध्ये गेलेली होती,अर्थात तो एक संस्कार तिच्यावर झाला होता इतकेच आणि त्यामुळे सतार वादनातील काही तथ्ये व पथ्ये तिला माहीत होती.सुदैवाने ती मात्र बड्या घरात असल्यामुळे नोकर चाकर तिच्या दिमतीस होते आणि त्यामुळे सतार गवसणीतून काढून पुढे काही वेळ वाजवण्यासही तिला वेळ मिळत असे.माझ्या पत्नीचा सतारीचा व्यासंग तिला माहीत होता. "एकसे दो भले" हे संगीतात तर नेहमीच खरे असते आणि त्यामुळे तिने माझ्या पत्नीस आपल्या घरी येऊन सतारीचा रियाज करण्याचा आग्रह केला.इतकेच काय पण आपली गाडी पण ती तिच्यासाठी पाठवू लागली.
      काही काळ सुनेला घरातून पाठवायला आईलाही फार जड वाटले नाही.त्यामुळे तिच्या सतारीस पुनरुज्जीवन मिळाले. दोघी मैत्रिणी एकत्र बसून खरोखरच सतार याच एकमेव उद्योगात वेळ घालवू लागल्या आणि माझ्या पत्नीचा सतारीचा अभ्यास थोडाफार शक्य होऊ लागला.तरी सतारीवर बोटे फिरवण्यासाठी बोटांची निगा राखणे आवश्यक म्हणजे बोटांना साबण किंवा कपडे किंवा भांड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरीपासून जपणे आवश्यक असले तरी ते फारच थोड्या अंशी शक्य होते कारण "तुझा संसार आता तूच बघ बाई "म्हणून आईने संसारातून पूर्ण अंग काढून घेतले होते आणि माझा संसार हा फक्त दोघाचा नव्हता तर माझी धाक्टी भावंडे शिकत असणारी,आई व आम्ही दोघे असा सहासात जणांचा कबिला होता व या सर्वांची धुरा सांभाळण्याचे काम लेडी सितारिष्टकडे होते. त्यामुळे बोटांची काळजी घेणे हा विचारही करणे निषिद्ध नसले तरी अशक्य कोटीतलाच होता.त्यामुळे चरे पडलेल्या बोटांनी सतार वाजवणे ही शिक्षाच होती म्हटले तरी चालेल.त्यावेळी बुद्धदेवदासगुप्ता किंवा अब्दुल हलीम जाफखॉं हातातून रक्त येईपर्यंत रियाज करीत असत याचा दाखला देणे शक्य असले तरी अगोदरच  बोटांची राख करून टाकणाऱ्या पावडरी वापरून  त्याच बोटांनी सतार वाजवणे बुद्धदेव अगर अब्दुल करीमखान साहेबांना तरी जमले असते का हा प्रश्नच होता. अर्थात इतक्या अनुकूल परिस्थितीत लेडी सितारिष्टला सितार गवसणीत गुंडाळून ठेवणेच शक्य होते.
     पाठॉपाठ तिला एक ओझे काही दिवस पोटात व त्यानंतर कडेवर वागवण्यास मी उद्युक्त केल्यामुळे सतारीवरील गवसणी फक्त कोणी संगीतात रस घेणारी व्यक्ती घरी आली आणि कोपऱ्यात ठेवलेली सतार पाहून ही कोण वाजवते असे विचारल्यावर "माझी पत्नी " असे सांगावे लागे आणि त्यांचा फारच आग्रह झाल्यावर गवसणीतून सतार बाहेर निघे.तिच्या बोटाला शक्य असेल तितका वेळ वाजविताना बोटातून रक्त व त्यामुळे डोळ्यातून पाणी निघेपर्यंत वाजवल्यावर सतारीची गवसणीत रवानगी व्हायची.
      मुले मोठी होत गेल्यावर घरातल्या जबाबदाऱ्या वाढतच चालल्या.मोठे घर बांधल्यावर सतार ठेवायला जागा सापडल्यामुळे ती इतकी व्यवस्थित ठेवली जाऊ लागली की ती दृष्टीसमोर असल्यामुळे ती काढून वाजवण्याचा मोह होण्याची शक्यताही दुरावली.तोपर्यंत तिच्या माहेराहून आणखी एक सतार आमच्या सासऱ्यांनी मुलीला वाजवायला बरी पडेल म्हणून की काय पाठवून दिली पण या दोन सतारींची जुगलबंदी कपाटातच काय ती होऊ लागली. मुले मोठी झाल्यामुळे जबाबदाऱ्यांचे ओझे थोडे कमी झाल्यावर औरंगाबादमधीलच एका प्रसिद्ध गायकाची कन्या सतार वाजवत असे तिच्याकडे रियाजासाठी जाण्यासाठी पत्नी वेळ काढू लागली पण त्यातही नशीब कसे आडवे येते ते पहायला मिळाले.कारण त्या मुलीलाच काही वैद्यकीय कारणामुळे सतार वाजवणे अशक्य होऊ लागले. आणि आधीच उल्हास तशात फाल्गुनमास असाच प्रकार होऊन सतार गवसणीतच राहू लागली.
     माझ्या एका मित्राच्या मुलीला सतार वाजवावी अशी उर्मी एकदा आली आणि तिने "काकू पण सतार वाजवतात ना,मग तुमच्याकडे सतार असेल ना ?" अशी चौकशी केली त्यावर काकूने अतिशय आनंदाने एक सतार घेऊनच जा असे तिला सांगितले व आपली सतार  तिला देऊन टाकली आता घरात तिच्या माहेरची सतारच राहिली.आणि ती वाजवण्यासाठी नाही तरी माहेरची आठवण म्हणून तिने ती ठेवली.पण पुण्यास स्थलांतर करताना छोट्या घरात  अडगळ होईल म्हणून औरंगाबादलाच भावाच्या घरात ती सतार ठेऊन आम्ही पुण्यास आलो.आता ती सतार डोळ्यासमोरही राहिली नाही त्यामुळे वाजवण्याचा मोह होण्याचा प्रश्नच उरला नाही.
    भावाकडेही जुनी तांब्या पितळेची भांडी किंवा जुना ग्रामोफोन या जुनेपणामुळे मौल्यवान झालेल्या वस्तूंप्रमाणे ती सतार आता दिवाणखान्याची शोभा वाढवू लागली आहे.मध्ये भावाकडे गेल्यावर सतारीचा विषय निघाल्यावर "आता देऊन टाका कोणालातरी" असे अगदी निरिच्छपणे पत्नीने सांगितल्यावर कोणीतरी म्हणाले, "तशीच कशाला ? जर चांगला रंग वगैरे देऊन विकायला ठेवली तर ऍन्टिक पीस म्हणून चांगली किंमत येईल."