समांतर

आपणही तेच आहोत अन् आयुष्याचा प्रवासही
अंतरे ही तीच आहेत अन् रस्तेही.. 
वाटा वेगळ्या नाही झाल्या आता समांतर झाल्यात एव्हढंच..
मित्र आत्ताही आहोत हातात हात नाहीयेत एव्हढंच..
होईल.. सराव होईल मलाही  तुझ्याशिवाय चालायचा..
आधीही होतोच की एकटा अन् भरकटलेला.. 
तु मैत्रीचा हात देऊन सावरलेस मला.. 
आता भरकटणार नाही... फक्त एकटा असेन एव्हढंच
शिकेन मी ही हळुहळु अबोलपणे दु:ख पचवायला..
पण त्यात फक्त आक्रोश असेल.. व्यक्त होणं नाही
शिकेन मी ही तुझ्याशिवाय आनंद साजरा करायला..
पण त्यात फक्त साजरा करणे असेल.. आनंद नाही
मला किती लवकर पटेल असे समजाऊन सांगतेस तु
किंवा तु जे समजाऊन सांगतेस ते लवकर पटते मला
यावेळीही एकदम पटलं तुझं वेगळं व्हायचं कारण
" बरोबर असणं हे महत्वाचं बरोबर दिसणं नाही "
पण सखी तु चालत रहा मागे वळुन न पाहता
मी ही पुर्ण करेनच माझाही प्रवास न थांबता
तुझ्या सावलीच्या कडेकडेने.. तिला स्पर्श न करता..
अडखळलीस कधी... कधी ठेच लागली..
कधी एकटी पडलीस.. आधाराची गरज वाटली कधी...
विश्वासाने मागे बघ.. मी तिथेच असेन.. अंतर राखुन
तुझ्या सावलीच्या कडेला.. समांतर वाटेवर...