खाली कर

सआदत हसन मंटोंच्या "खोल दो" कथेचा अनुवाद


अमृतसरहून स्पेशल ट्रेन दुपारी दोन वाजता निघाली आणि आठ तासांनी मुगलपुर्‌याला पोहोचली. वाटेत त्यातील काही माणसे मारली गेली. अनेक जखमी झाली. काही जण बेपत्ता झाले.

 सकाळी दहाला  निर्वासितांच्या छावणीच्या थंड जमिनीवर सिराजुद्दीनला जाग आली. चहुकडे माणसांचा महापूर पाहून त्याची विचार करण्याची शक्तीच गोठून गेली होती. भरून आलेल्या आभाळाकडे तो बराच वेळ टक लावून पाहत राहिला. छावणीचा गदारोळ त्याच्या कानांपर्यंत पोहोचत नव्हता. त्याला काही ऐकू येत नव्हते. तो गाढ झोपेत आहे असेच पाहणार्‍याला वाटले असते, पण प्रत्यक्षात त्याचे भान हरपले होते. नजर शून्यात लागली होती.

दाटून आलेल्या आकाशाकडे विमनस्कपणे पाहणार्‍या सिराजुद्दीनच्या डोळ्यांत अचानक सूर्यकिरणे शिरली व तो भानावर आला. त्याच्या मनपटलावर अनेक चित्रे तरळून गेली—लुटालूट, जाळपोळ, पळापळ, स्टेशन, गोळीबार, रात्र, आणि सकीना…तो धडपडत उठला आणि वेड्यासारखा सभोतीच्या जनसागरात तिला शोधू लागला.

"सकीना-सकीना" हाका मारत तीन तास त्याने छावणी पिंजून काढली, पण त्याला त्याची तरूण, एकुलती एक मुलगी काही सापडली नाही. छावणीत सर्वत्र गोंधळ माजला होता. कोणी आपल्या मुलाला शोधत होता, कोणी आईला, कोणी बायकोला, तर कोणी मुलीला. सिराजुद्दीन थकून-भागून एका बाजूला जाऊन बसला व सकीनाची ताटातूट कशी व कुठे झाली ते आठवण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु विचार करता करता राहून राहून त्याच्या डोळ्यांपुढे तिच्या आईचे कोथळा बाहेर आलेले प्रेत येऊन त्याला सुन्न करत होते.

सकीनाच्या आईचा मृत्यू झाला होता. सिराजुद्दीनच्या डोळ्यांसमोर तिने प्राण सोडले होते. मरताना म्हणाली होती, "मला सोडा, सकीनाला घेऊन लवकर इथून पळून जा." पण सकीना कुठे होती?

सकीना त्याच्याबरोबर होती. दोघे अनवाणी पळत होते. तिची ओढणी खाली पडली. ती उचलण्यासाठी तो थांबू लागताच सकीना ओरडली, "बाबा, ती राहू द्या!" तरीही त्याने ओढणी उचललीच. हा विचार मनात येताच त्याने आपल्या कोटाच्या फुगलेल्या खिशाकडे पाहिले. त्यात हात घालून एक कापड बाहेर काढले. सकीनाची तीच ओढणी. पण सकीना कुठे होती?

सिराजुद्दीनने खूप आठवून पाहिले, पण व्यर्थ. सकीनाला तो स्टेशनपर्यंत घेऊन आला होता का? ती त्याच्याबरोबर गाडीत चढली होती का? वाटेत गाडी थांबवून दंगलखोर जमाव आत घुसला तेव्हा तो बेशुद्ध झाला होता का? त्यांनीच सकीनाला पळवून नेले होते का?

सिराजुद्दीनच्या डोक्यात थैमान घालणार्‍या एकाही प्रश्नाचे उत्तर त्याच्यापाशी नव्हते. त्याला सहानुभूतीची गरज होती. पण अवती भवती असणार्‍या सार्‍याच माणसांना ती गरज होती. त्याला रडावेसे वाटत होते, पण डोळे कोरडेठाक झाले होते.

सहा दिवसांनी चित्त जरा थार्‍यावर आल्यावर सिराजुद्दीन मदतीसाठी काही लोकांना भेटला. आठ तरुणांचा तो एक गट होता. त्यांच्याकडे लाठ्या आणि बंदुका होत्या. सिराजुद्दीनने त्यांना तोंडभर आशीर्वाद देऊन मग सकीनाचे वर्णन केले. "गोरी आहे, खूप सुंदर आहे…माझ्यावर नाही, तिच्या आईवर गेली आहे. साधारण सतरा वर्षांची आहे. टपोरे डोळे, काळेभोर केस, उजव्या गालावर मोठा तीळ...माझी एकुलती एक पोरगी आहे, हो. तिला शोधून आणा. देव तुमचं भलं करेल."

त्या तरूण स्वयंसेवकांनी भावूक होऊन म्हातार्‍या सिराजुद्दीनला आश्वासन दिले की त्याची मुलगी जिवंत असली तर थोड्याच दिवसात त्याच्या सोबत असेल.

आठही तरुणांनी प्रयत्न केले. जीव मुठीत घेऊन अमृतसरला गेले. अनेक पुरुषांना व लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. पण दहा दिवस झाले तरी सकीना काही त्यांना सापडली नाही.

एके दिवशी ह्याच कामासाठी ते लॉरीने अमृतसरला जात असताना त्यांना छहरराजवळ रस्त्यावर एक मुलगी दिसली. लॉरीच्या आवाजाने दचकून ती पळून जाऊ लागली. स्वयंसेवकांनी लॉरी थांबवली व तिचा पाठलाग केला. एका शेतात त्यांनी तिला पकडले. ती खूप सुंदर होती. उजव्या गालावर मोठा तीळ होता. एक मुलगा तिला म्हणाला, "घाबरू नकोस. तुझं नाव सकीना आहे का?"

मुलगी आणखी गोरीमोरी झाली. तिने काहीच उत्तर दिले नाही. पण सर्व मुलांनी दिलासा दिल्यावर तिची भीती कमी झाली, आणि आपण सिराजुद्दीनची मुलगी सकीना असल्याचे तिने मान्य केले.

त्या आठ तरूण स्वयंसेवकांनी सकीनाला धीर दिला. तिला खायला दिले, दूध पाजले, आणि लॉरीत बसवले. ओढणी नसल्यामुळे संकोचून ती सतत हातांनी छाती झाकण्याचा प्रयत्न करत होती. ते पाहून एकाने आपला कोट काढून तिला दिला.

बरेच दिवस झाले तरी सिराजुद्दीनला सकीनाची काहीही खबरबात मिळाली नाही. त्यामुळे तो दिवस-दिवस वेगवेगळ्या छावण्या आणि कचेर्‍यांच्या चकरा मारत असे, पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. ती जिवंत असल्यास तिला शोधून आणण्याचा वायदा करून गेलेल्या स्वयंसेवकांना ती सापडो अशी तो रात्र-रात्र प्रार्थना करत असे.

एक दिवशी ते तरूण स्वयंसेवक त्याला छावणीत दिसले. लॉरीत बसले होते ते. सिराजुद्दीन धावत त्यांच्या जवळ गेला. लॉरी सुटता सुटता त्याने विचारले, "पोरा, माझ्या सकीनाचा काही पत्ता लागला का रे?"

सगळे एकमुखाने म्हणाले, "लागेल, लागेल". लॉरी निघून गेली. सिराजुद्दीनने पुन्हा त्यांच्या यशासाठी प्रार्थना केली. त्याला जरा बरे वाटले.

संध्याकाळी छावणीत सिराजुद्दीन जिथे बसला होता त्या भागात जरासा गलबला झाला. चार माणसे काहीतरी उचलून नेत होती. चौकशी केल्यावर त्याला कळले की रेल्वे लाईनजवळ एक मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली होती. ते लोक तिला उचलून नेत होते. सिराजुद्दीन त्यांच्या मागे जाऊ लागला. मुलीला इस्पितळात पोहोचवून ती माणसे निघून गेली.

थोडा वेळ तो इस्पितळाबाहेरील खांबाला टेकून उभा राहिला. मग हळूहळू आत गेला. खोलीत कोणी नव्हते. स्ट्रेचवर एक प्रेत पडले होते. मंद पाउलांनी सिराजुद्दीन त्याच्या जवळ जाऊ लागला. अचानक खोलीतला दिवा लागला. त्या प्रकाशात सिराजुद्दीनने प्रेताचा रंग उडालेला चेहरा पाहिला, आणि तो किंचाळला—सकीना!

दिवा लावणार्‍या डॉक्टरने सिराजुद्दीनला विचारले, "काय झालं?"

"मी...मी...हिचा बाप आहे." सिराजुद्दीनच्या तोंडून एवढेच शब्द फुटले.

डॉक्टरने स्ट्रेचरवरील प्रेताची नाडी तपासली आणि सिराजुद्दीनला म्हणाला, "खिडकीची झडप खाली कर."

सकीनाच्या कलेवरात हालचाल झाली. निर्जीव हातांनी तिने नाडीची गाठ सोडली आणि सलवार खाली केली. म्हातारा सिराजुद्दीन आनंदाने ओरडला, "माझी मुलगी जिवंत आहे-जिवंत आहे." डॉक्टरला आपादमस्तक घाम फुटला.