साक्षी पिंपळ

(1)    
      मारुतीचं देऊळ. देवळाच्या दाराशी उजव्या हाताला गोल ऐसपैस पार.
    पाराच्या मध्यात पोक्त पिंपळाचं झाड... मस्त डेरेदार आकाराचं... गावच्या पाटलाप्रमाणं चारी अंगांनं पोसलेलं.
        ढळत्या दिवसाला निरोप देणारी सांज. काहिली निमवणरी हवा. अजून काहीशी गरमच, पण ती गरमी सुसह्य वाटणारी.
    हवेच्या हिंदोळ्यावर सळसळणारी पिंपळपानं.
    मधूनच झाडाचा निरोप घेऊन मातीशी समर्पित करून घेणारी, गरगरत खाली येणारी जून पिवळट होऊ लागलेली पानं.
        आकाशी तरल-तांबूस सांजछटा.
    क्षितिजाखाली गेलेल्या सूर्याच्या किरणांनी चमकणाऱ्या एखाद्या विमानाचं उंचावरून मंद सरकणं.
    कुठे कुठे हवेत घाईघाईनं पंख हलवणारी, चारच्या आकड्यासारखी दिसणारी खग-लगवग.
    नदीच्या संथ प्रवाहावर लालिम तरंग. जणु जन्मजात स्त्रीसुलभ भावनेनं मुखावर हलकासा लालिम लेप लावून निर्हेतुक केलेला शॄंगार.
    स्वतःच्याच त्या रूपावर खुषीनं स्मित करणारी ती सरिता... चंद्राच्या प्रतीक्षेत.
        पारावरती बेताल मनानं चाललेल्या गप्पा.
    आबा. अण्णा, अप्पा, काका, तात्या, भाऊ, दादा, मियां नि अशाच हिरव्या मनाच्या पोक्तांचं बोळकं बोलणं.
    जरा दूरवर आत्या, आजी, अक्का, ताई, मावशी नि अशाच बेरक्या अनुभवी गृहिणी.
    त्यांच्या हलक्या फुलक्या खसखशी लाह्या... किणकिणारी कांकणं. कापसाला पीळ घालणारी बोटं.
    पलीकडं जमलेल्या अरबट-चरबट बोळक्या बोलांचा कानोसा घेण्यात गुंतलेले कान..
        तर, वर पिंपळाच्या फांद्यावरचा कलकलाट वाढत चाललेला.
    बारा तासांच्या भ्रमंतीचा पाढा जो तो पक्षी एक-दुसऱ्याला मुक्त कंठानं सांगत बललेला.
    कुठं आपापल्या जागेवरून चाललेली बाचाबाची...
    ‘एऽऽऽ, ती जागा माझीय्’. एकाची कलकल. ‘अरे हट्, मी आधी आलोय्... तू जा दुसरीकडे’.
    त्या दोघांची ढकलाढकल आणि मग वाढती कलकल.
    कुणी उगाचच एक-दुसऱ्याची खोडी काढत स्वतःची करमणूक करून बागडणारे, फडफडणारे पक्षी...

(2)
         एका फांदीच्या टोकावर बसलेल्या दोन चिमण्या.
    दोघी मैत्रिणी. आजूबाजूच्या कलकलीशी काहीच देणंघेणं नसलेल्या. त्यांचा मजेशीर संवाद चाललेला...
        ‘ए, तो बघ तो चिमणा. कसा टक लावून बघतोय् तुझ्याकडं!’
        ‘अगऽऽ, काय सांगू तुला... दिवसभर नुसता वैताग दिलाय् मला... भवती सारखा पिंगा घालत होता दिवसभर...
    त्याच्या लोचट चिवचिवाटानं कान किटलेयत्... सारखा अंगचटीला येत होता... त्याला टोचून टोचून माझी चोच दुखायला लागलीय्...
    त्याच्या असल्या चाळ्यामुळं दिवसभर चार दाणेसुद्धा टिपता आले नाहीत् गं...चोच तर दुखतेय्, पोटात अन्नाचा कण नाही.
    आत्ता वर येताना देवळाच्या कुंडातलं पाणी कसं तरी प्यायलेय्... नशीब तेव्हढं तरी मेल्यानं पिऊ दिलं... शीः लोचट मेला!‘,  उपवर     चिमणीची सखीकडं लटकी तक्रार.
    तिच्या सखीच्या मनात तशाच जुन्या आठवणी जागलेल्या.
    तिचं विचारण... ‘ काय गं, धुळीचं नहाण केलं कां?’
        ‘केलं ना... करावंच लागलं... दोघंही घामाधूम झालो होतो.’ पहिलीचं उत्तर.
        त्या चिमण्याकडं पाहात सखीचं हंसणं...
    तिच्या मनात पहिलीचं बोलणं घोळणारं... ‘दोघंही घामाघूम झालॉ होतो’... म्हणजे पाणी मुरतंय् खरं!’
    सखीच्या मनानं हेरलेलं...नि त्या चिमण्याकडं पाहत पहिलीला हंसत चिमटा काढण... ‘बघ ना जरा... किती दीनवाणा दिसतोय् बिचारा!.’
        पहिलीचं सखीकडं अर्थपूर्ण पाहणं. ‘चल... तू चावटपणा करू नकोस्... सहानुभूतीच्या नावाखाली त्याची शिफारस करू नकोस् हं...’     पहिलीचं त्या चिमण्याकडं पहात लटकं रागावणं.
    सखी मात्र अनुभवी... तिच्या नजरेत कौतुक पहिलीचं!
        सखीचं मोठ्यांदा हसणं... ‘अगदी असंच... अगदी असंच माझंही झालं होत गं’..
    ’पण तुमची जोडी छानंय्... त्या पडक्या वाड्यातल्या बाभळीवर मी बांधलेलं घरटं रिकामचंय्... तुझ्या येईल उपयोगी!’
        पहिलीचं जबरदस्त लाजणं. त्या चिमण्याच्या मुखावर टवटवी.
    त्या चिमण्यानं मान वळवली नि उद्याची स्वप्नं पहात चोच पंखात खुपसली.
        थोड्याच वेळात पारावरची बोळकी बैठक संपली.
    झाडावरचा कलकलाट थांबला. काकणांची किणकिण थांबली...
    सारं कसं शांत शांत झालं. तेलाच्या दिव्याच्या मंद प्रकाशात चकचकीत शेंदूर माखलेल्या मारुतीच मुख उजळलेलं.
    पण पिवळट अंधार्‍या शांतीच्या पोटातली हुरहुर?... प्रत्येक हुरहुरीचा विषय वेगळा...
    हे असं रोजचंच. याला जीवन ऐसे नाव!

(3)   
    आज पारावरच्या बैठकीला अंतूनाना गैरहजर आहे. त्यांच्या न येण्याबाबत अनेक जण तर्क करतायत्... अंतूनाना पन्नाशीतला... दोन वर्षांपूर्वी पहिलीनं सरणाची वाट अनुसरलेली. आता त्याच्या घरातून शांतीनं काढता पाय घेतलेला. पारावरच्या मंडळीतला तरूण मेंबर... नाटकवेडा... तो आला की त्याला गीतरामायणातली गाणी म्हणण्याचा हमखास आग्रह होणार... तो तितक्याच प्रेमानं गाऊन दाखवणार.
    ‘अंतू कुठं उलथला रे?... त्याच्या तब्येतीविषयी काही कमी जास्त ?‘ इति भाऊ.
    ‘छेः रे, शक्य नाही... सदाबहार देवानंद तो... साधी सर्दी त्याला माहित नाही!’...मिया कहे.
    ‘गेला असेल पुण्याला.... मुलाकडं’ तात्याचा तर्क.
    ‘तो मुलाकडे कधीच जाणार नाही हं...त्या सुनेचं अन् त्याचं किती सूत जमतंय्, माहित आहे नं... तिचा साधा विषय निघाला, तर त्याचा कसा तिळपापड होतो...‘
        ’बरोबरंय्‌ ना रे नाना?’... तात्याचं नानाला कन्फर्मेशन्‌साठी विचारणं.
    नानानं होकारार्थी मान डोलावत काही क्षणांनी अंदाज बांधला...
   ‘अरे हो, कोल्हापूरला गेला असेल बहुतेक... कुणा नवख्या ग्रुपनं संगीत मानापमान बसवलं आहे, सांगत होता खरा... गेला असेल कानांची तहान शमवायला!’
    भाऊनं ते ऐकलं... त्याचा या तर्कटावर विश्वास नाही...
    ‘ह्यः... काहीतरीच काय सांगतोस्?’... भाऊनं पुढं स्पष्ट केलं...
    ’अरे नाना, तुला माहित नाही? तो प्रयोग गेल्या आठवड्यातच झाला रे...’...
    यावर नानाचं काहीसं खोचक बोलणं, ’तू गेला होतास्‌ तो प्रयोग पहायला?’
    ’नाही रे...माझा मुलगा त्या ग्रुपबरोबर असतो सध्या’...
            ’मुलाचा फोन आला होता, म्हणून मला माहितंय् !’     भाऊची गाडी पुन्हा ध्रुपदावर आली...
        ‘अरे, पण मग हा टोणगा खपला कुठं?’ अंतूला पदवीदान करीत भाऊचं शंका घेणं.
        ‘त्याच्या घरी जावं तरी पंचाईत... एक नंबरचा तिरशिंगराव...’ मियानं रिमार्क मारला.
        ‘हो ना... कधी कसा समोर येईल अंदाजच येत नाही त्याचा... असलं तर सूत नाही तर भूत!.’ इति नाना.
    तेव्हढ्यात अण्णानं रस्त्याकडं पहात शोध लावला...
        ‘अरे, ती पहा... अंतूनानाची बहिण येतीय् बहुतेक...’
    अण्णानं नुकतेच मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घेतलंय... डॉक्टरनं अगदी परफेक्ट लेन्स बसवलीय्. नजर आता स्वच्छ झालीय् अण्णाची!
     अण्णा सांगत असताना सार्‍र्यांच्या नजरा त्या दिशेला वळल्या.
        ‘अप्पा, विचारू कां तिला?’... अण्णा.
        ‘कुठं घोडं अडलंय् त्या अंतूवाचून... काही नको विचारायला.’ भाऊचं वैतागलेलं करवादणं.
         सगळ्यांना माहितंय्‌... अंतूच्या चिडचिडीचं हे एक कारण... योग्य वेळ होती, तेव्हा जुळवून घेता आलं नाही... आता पस्तीशीत आलेली ही सरी. तिला पाहिलं की अंतूच्या कपाळावरच्या अठ्या आणखीन्‌ खोल दिसायच्या. कुमारी सरीच्या विषयावरून कलत्राच्या तीक्ष्ण शब्दशरांचा वर्षाव अंतूला सळो की पळो करून सोडतो, हे आता सार्‍र्यांना माहित झालंय्.
    ‘एक बरं झालं... अंतूच्या कानांना थोडी विश्रांती मिळाली असेल, नाही?’ आपल्या बोलण्यावर तात्या खदखदला.
    हे बोलणं सुरू होतं अन् तेव्हढ्यात आबाचं आगमन झालं.
    आबा... एक वल्ली. गावातली सारी गुपितं पहिल्यांदा याला माहित होतात... कशी ते कोण जाणे, पण ते भाग्य सटवाईनं या आबाच्या कपाळी पन्नास-एक वर्षांपूर्वीच रेखाटून ठेवलंय्! हा आबा गावमित्र व्हायचं तेच एक कारणंय्.
    तर, आबानं वरील संवाद शेवटी-शेवटी ऐकलेला...
    हा आबा गेल्या जन्मी बहुधा घोडा असावा. कधी हा कुठे बसलेला अन्‌ शांतपणे बोलत असलेला दिसायचा नाही. काहीसा मिश्किल.
    ‘ती बघ आता त्या डॉक्टरच्या दवाखान्यात घुसेल... पहा...’ आबानं आत्मविश्वासानं सांगितलं आणि सार्‍यांच्या नजरा पलीकडच्या दवाखान्यापर्यंत जाऊन पोटी उत्कंठा घेऊन स्थिरावल्या. 
    आबानं संधी साधून पलिकडं बसलेल्या भगिनीवृंदावर नजर टाकली. आबाच्या पारावरील आगमनाची त्या फेअर्‌ कट्ट्यानंही दखल घेतली होती. आबा त्या सर्कलमध्येही तितकाच फेमस्‌. गावमित्रच तो... साळुंकेताईनं त्याला हातानं खुणावलं...
    आबानं लगबगीनं ’आलो... आलो’ चा गजर केला. ’येतो बघून ही साळुंकी काय म्हणतेय् ते’... आबा डुलत डुलत पण जरा त्वरा दाखवत गेला. त्यांचा संवाद काही मिनिटातच उरकला नि आबा तिकडूनच गुल झाला. काहीतरी गुप्त काम त्याला सांगितलं असावं, असा भाऊनं तर्क बांधला.
    ’हा आबा आता चार दिवस तरी इकडं फिरकणार नाही... लिहून घ्या...’ भाऊनं जाहीर केलं.
    पिंपळ शांतावला होता.
    ’चलतो रे...’ भाऊ उठला नि चालायला लागला. त्याच्या जोडीनं नाना नि अप्पा गेले. मग बाकीचेही आपापल्या मार्गाने गेले.
    मारुतीच्या देवळातील आरतीची घंटा वाजायला लागली. काही माउली तिकडं गेल्या. काहींनी उठता उठता जागेवरूनच हात जोडले नि त्याही आपापल्या दिशेने पांगल्या.
   
(४)   
    उगवती बर्‍यापैकी उजळलेली. पिंपळाची पेंग संपलेली. सगळ्या फांद्यांवरची पानं नाचायला लागलेली.
    पारावर गणा पेपरचा गठ्ठा सॉर्टींग करीत बसलेला. कुणी आला तर त्याला हवा तो पेपर देऊन दिलेले पैसे पथारीखाली सरकवीत होता.     देवळातली घंटा अधूनमधून वाजत होती.
    बाजूच्या तालमीत जोर-बैठका मारणार्‍या पोरांचं हुंकारणं सुरू झालं होतं. ’जय बजरंगा... हुप्पा हुय्या’चा गजर मंदसा ऐकू येत होता. जोडीला मधूनच शड्डू ठोकल्याचा खणखणीत आवाजही येत होता.
    चिऊताईच्या मनाचा निश्चय झालेला. तिनं सखीला बरोबर घेतलं आणि पडक्या वाड्यातलं घरटं पाहण्यासाठी प्रस्थान केलं. बाभळीच्या झाडावरचं घरटं शाबूत होतं. ते घरटं पाहताना सौभाग्यकांक्षिणी चिऊताईंच्या अंगावर हर्षाची लहर परत परत उठत होती.
    लांबून चिमणा सारं न्याहाळत होता, हे सखीनं हेरलं होतं. चिऊताईला घेऊन सखी चिऊ पुढच्या कामाला गेल्या, तसा चिमणा त्या घरट्यापाशी गेला. त्यानेही चौकस नजरेनं घरटं न्याहाळलं. एकदा आत जाऊन आला. आतली जुनी, घाण झालेली पिसांची गादी त्यानं बाहेर काढून टाकली. घरटं आतून स्वच्छ केले. तो आता हरखला होता. त्याचं तप फळाला येत होतं. आता कामाला उत्साह येणं स्वाभाविकच होतं.
    सखी नि चिऊताई फिरून आल्या. त्या दोघी मिळून घरटं साफ करणार होत्या. चिऊताईनं आत जाऊन पाहिलं तर घरटं स्वच्छ झालेलं,. तिच्या मनात पाल चुकचुकली. कुणा दुसर्‍या चिमणीनं हे घर बळकावलंय्, असं तिला वाटलं. तिच्या स्वप्नांचा मनोरा हेलकावू लागला. चिंताग्रस्त झालेली चिऊताई बाहेर आली. रडवेल्या चेहर्‍यानं तिनं सखीला तिचा संशय बोलून दाखविला.
    सखीला हसू आलं... ते पाहून चिऊताई काहीशी रागावली.
    ’अगं हंसतेस्‌ काय्‌ऽऽ... आता दुसरं घरटं बांधायला हवं’...चिऊताई वैतागून म्हणाली.
    सखीनं हंसत हंसत तिला पलीकडच्या पारिजातकाच्या झाडावर चोचीत पीस घरून बसलेला चिमणा दाखवला. चिऊताईनं त्याच्याकडं पाहिलं आणि मग तिची स्वाभाविक प्रतिक्रिया... लाजेनं चूर झालेली ती भुर्रकन् उडून गेली... तिच्या पाठोपाठ सखीही उडाली; ह्ळूच चिमण्याकडं ’ऑल क्लियर’ची नजर टाकून!
(५)
    गावातलं ते पडकं घर    एका शेणवीचं होतं. मालक नव्वदी पार केलेला विधुर होता. तो एकटाच त्या वाड्यात रहात असे. त्यानं इहलोकीचा मुक्काम संपवला आणि मग बरेच दिवस ते घर वारसांच्या वादात उपेक्षित राहिलं. त्या वाड्याची वाट लागली. त्या शेणवीची दोन पोरं होती.. एक दूर कर्नाटकी शहरात तर दुसरा परदेशात रहात होता. इकडं बेवारस घराची दारं-खिडक्यासुद्धा लोकांनी काढून नेली. फुलझाडं मेली नि बाभळीचं झाड फोफावलं. त्याच झाडावर आता चिऊताईचा संसार फुलणार होता! तयारी जोरात सुरू होती....
    शेणवीचा परदेशातला पोरगा एक दिवस गावात आला. तो त्या पडक्या वाड्याजवळ सुन्नपणे उभा होता. आबा त्याचवेळी नेमका तिकडून चालला होता. त्याने त्या पोराला हटकलं. आबाच्या चलाख नजरेनं जो निर्णय घ्यायचा, तो घेतला. त्याला घेऊन तो कोपर्‍यावरच्या टपरीवर गेला. दोन पेशलची ऑर्डर दिली आणि त्यानं मुद्द्‌याला हात घातला. अगोदर आबानं त्या यंग शेणवीला फैलावर घेतला. भावकीच्या वादात ’ना तुला ना मला, घाल कुत्र्याला’ म्हणतात, तसं फुललेल्या घराची माती केल्याबद्दल दोन्ही पोरांना त्यानं हासडलं. चहा पिता पिता त्याला रांगड्या बोलांनी समजावलं नि तडजोडीनं वाद संपवण्यास सांगितलं. घराची वाटणी करून घ्या... पंचायतीत मी मान्य करावयास लावतो’ असं आबानं पक्कं आश्वासन दिलं. यंग शेणवीला आता त्या दगडा-मातीत काहीच कर्तव्य नव्हतं. आबानं सुचवलं, तसं करण्यास तो तयार झाला. आबानं त्याच्या वाटणीचा अर्धा भाग विकत घ्यायची तयारी दाखविली आणि दुसर्‍या यंग शेणवीचा पत्ता घेतला. त्यालाही समजावण्याचं वचन देऊन आबानं कच्चा कागद लगेच करून, सही ठोकून व्यवहार ठरविलाही.
    आबानं दिलेला चेक घेऊन थोरला यंग शेणवी आल्या मार्गानं निघून गेला. आबानं तत्परतेनं वाड्याला आतून तार ठोकूनही घेतली. तो घेणार होता त्याच भागात ते बाभळीचं झाड होतं.
    आबा वेळ काढून कर्नाटकी शहरात धाकट्या शेणवीच्या घरी पोहोचला. पुन्हा एकदा त्यानं तोच अंक केला. त्या शेणवीनं दिलेला उपमा-चहा घेतला आणि त्या शेणवीचं मन चाचपलं. त्याचं मन त्या घरात गुंतलं होतं. ’आमच्या आईवडिलांची ती आठवण आहे, मी रिटायर झालो की, तेथे येऊन राहणार आहे’ असे तो ठामपणे सांगत होता. आबानं सारं ऐकलं, त्याला समजावलं. त्याचीही सही त्या कागदावर घेतली आणि व्यवहार पक्का करून तो परतला. शेणवीला पुन्हा घर बांधण्यासाठी सारी मदत करण्याचं तोंड भरून आश्वासन त्यानं दिलं. हंसतमुखान त्या शेणवीनं आबाला निरोप दिला.
    काही दिवसातच पुढची हालचाल सुरू झाली. पंचायतीत जाऊन दक्षिणा देत आबानं शेणवीच्या घराची वाटणी आणि झाला व्यवहार नोंदवून घेतला.
    धाकट्या शेणवीला जवळचा मुहूर्त धरून नवं घर बांधायला सुरुवात करायची होती. ’रजा घेऊन परत येतो’ असं सांगून तो परतला.
   
(६)
    अंतूची बहीण ज्या डॉक्टरकडं वरचेवर जात असे तो होता मूळ मद्राशी. रंग बर्‍यापैकी काळा. रुंद हाडांचा भरला देह होता नाक काहीसं फताडं पण डोळे पाणीदार . डोक्यावर दशमीचा चंद्र असलेला भालचंद्र होता तो. जिथं केस नव्हते, तो कपाळापासूनचा मागील भाग चोपडलेल्या तेलामुळं चमकायचा. कपाळावर भुवयांच्या मध्ये कुंकवाचा टिळा अन्‌ त्यामध्ये चंदनाचा ठळक ठिपका उठून दिसायचा. पांढरी शुभ्र पँट नि तसाच शर्ट. पँटला जाड काळा पट्टा. हाताला गुण होता, त्यामुळं पेशंटची वर्दळ असायची.
    गावात तो आल्यापासून एका छोट्या घरात त्यानं आपला दवाखाना थाटला होता. काही वर्षातच स्वतःच दुमजली घर त्यानं उभं केलं. खाली दवाखाना आणि वर तो राहात असे. त्याच्या घरात अन्य कुणा व्यक्तीला गावकर्‍यांनी कधीच पाहिलं नाही. त्यामुळे पारावरच्या बोळक्यांसकट फेअर्-कट्ट्यावरही हा मद्राशी चर्चेचा विषय होता. त्यात अंतूच्या बहिणीचं त्याच्याकडं असं जाणंऱ्येणं... तिला काही आजार असावा, अशी काही लक्षणं तर दिसायची नाहीत, त्यामुळं चर्चेला उधाण यायचं.
    गेला आठवडाभर मद्राशाचा दवाखाना बंदच दिसत होता. तो गावी गेल्याचं आबाला समजलेलं.
    पारावर अंतूनानाही येत नव्हता. त्याची ती सोकॉल्ड बायकोही म्हणे तिच्या बहिणीकडे गेली होती.
    आबाचं मन बेचैन.

(७)   
    आठवड्याभरात धाकटा शेणवी आला नि आबाला भेटला. आबानं त्याची सोय केली. पंचायतीतून बांधकामाची परवानगी घेऊन दुसर्‍या दिवशी गावच्या जोश्याकडनं नारळ वाढवून घेतला. गावच्या गवंड्याला सांगून आबानं घराची आखणी करून दिली. बांधकाम सुरूही झालं.
    आबानं ’तेरी शादीमे मेरी सुंता’ म्हटल्याप्रमाणं त्यानं घेतलेल्या अर्ध्या भागातही चाळीसारख्या खोल्या बांधायचं ठरवलं होतं.
    मजूरांची वर्दळ सुरू झाली, तशी सखी चिऊताई धास्तावली. सौभाग्यकांक्षिणी चिऊताईचा तर चेहरा पार काळवंडून गेला होता. तिला त्या घरट्यात जाता येत नव्हतं. मजूरांनी ते बाभळीचं झाड तोडायला सुरुवात केली तशी सखी चिऊताई आणि तिच्या मैत्रिणींनी धिटाई दाखवत त्या झाडावर जाऊन चिवचिवाट सुरू केला. चलाख आबाचं तिकडं लक्ष गेलं. कर्कश्श चिवचिवाट करताना झाडावरच्या त्या घरट्याभंवती त्या चिमण्या फिरत होत्या. त्यानं हेरलं. त्यानं ते झाड तोडणं आणि बांधकामही थांबवलं. शेणवीच्या हद्दीतलं बांधकाम मात्र चालू राहिलं.
    महिन्याभरात बांधलेलं ते घर पाहून शेणवी सुखावला. आबाचे तोंड भरून आभार मानत त्याने ’दिवाळीत घरभरणी करतो’ सांगत आनंदाने परतीचा मार्ग धरला,

(८)
    वसंतातल्या सरत्या दिनी सौभाग्यकांक्षिणी चिऊताई आणि चिमणा यांचं बहुप्रतीक्षित मीलन झालं. झाडावरचं घरटं जड झालं. चिऊताई आत बसून राही. चिमणा तिला भरवत असे.
    दिवाळीच्या अगोदर त्या घरट्यातून दोन लहानग्या चिमण्यांना चिऊताईनं चोचीनं बाहेर ढकललं. त्यांचं मोकळं फिरणं सुरू झालं तसं चिऊताई-चिमण्यांच्या संगे ती दोन पिलेही पिंपळावर बसून चिवचिवाट करू लागली. पिंपळ सुखावला.
    पारावरच्या बोळक्यांनी अंतूनानाच्या बायकोला आलेली पाहिली. तिच्या मागोमाग अंतूही येत होता.
    आज अंतूनाना पारावरच्या बैठकीला हजर झालेला. त्याची तपासणी-उलटतपासणी-फेरतपासणी चालू झाली. पण अंतू गप्प. काहीतरी थारूर-मातूर उत्तरं देत होता. भाऊच्या आग्रहावरून त्यानं ’पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा’ गायलं.
    आबा आला नि त्यानं ब्रेकिंग न्यूज दिली...     ’उद्या सकाळी मद्राशाचा दवाखाना उघडणार रे!’
    ’त्यात काय विशेष?’ इति भाऊ.
    ’भाऊऽऽ ही तर अर्धी बातमी झाली... आत्ता फक्त काडी लावलीय्‌...उद्या सकाळी बॉम्ब फुटेल...भेटूच’... गडगडाटी हसत आबा निघून गेला.
    बातमी हा हा म्हणता दोन्ही कट्ट्यांवर पसरली. सकाळी कट्टा फुल्ल.
    आठ वाजले. देवळात आरती सुरू झाली. जोरात घंटानाद होऊ लागला.
    आरती संपली... ’कायेन वाचा मनसेन्द्रियै वा...’ म्हणून पुजार्‍यानं..’यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च.’.. म्हणत यजमानाला प्रदक्षिणा घालावयास सांगितली.
    काही मिनिटातच रेशमी पीतांबर नेसलेला, खांद्यावर रेशमी पंचा घेतलेला मद्राशी डॉक्टर आणि त्याच्या डाव्या अंगानं खाळी मान घालून चाललेली भरघोस मद्राशी वेणी, हिरवीगार उंची रेशमी साडी परिधान केलेली अन्‌ अंगभर भारी शेला घेतलेली त्याची बायको गावकर्‍यांना दिसली.  शुभ्र.पांढर्‍या नि रक्तवर्णी रंगाच्या फुलांचे, तुळस आदी हिरव्या पानांसह घसघशीत गुंफलेले हार दोघांच्याही गळ्य़ात रुळत होते,
    मंदिरातून निघून दोघांनीही दवाखान्यात प्रवेश केला.

(९)
    आबानं आता विचारलं... ’बोला... अरे, ही डॉक्टरीण कोणंय्? ओळखलंऽऽऽ?’
    फुल मेकओव्हर केलेली ती कोण? सगळे विचार करीत असताना आबानं बॉम्ब फोडला...
    ’नाही ओळखलं ना... ही अंतूनानाची बायको रे..’
    सारे अवाक्... या प्रसंगाला अंतूनाना साक्षीला नव्हता. मात्र...
    बोळक्या कट्ट्याला दुसर्‍या दिवशी कळलं... आबा अंतूच्या बहिणीसह गायब झालाय्‌‍...
    अंतू आता रोज नियमित कट्ट्यावर येतो... मस्त गप्पा मारतो... मधूनच नाट्यगीत गातो... प्रसन्न चित्तानं....
    त्याला माहितंय्‌ आबा परत येणारंय्‌... त्याचा मेव्हणा म्हणून...
    अंतूच्या मनात बायकोविषयी आणि आता बहिणीविषयी तीच भावना पुनर्जीवित झालीय्‌, जी त्याच्या मनात लग्नापूर्वी होती... प्रेम     आणि प्रेम. त्या दोघीही आता सुखी झाल्यात्‌!
(१०)
    पिंपळावर नुकत्याच उगवलेल्या सूर्याचे किरण पडले होते... सळसळणार्‍या पानांवरून सोनेरी लहरी चमकत होत्या.
    अंतूच्या खुशीचं रहस्य बोळक्या कट्ट्याला तेव्हा कळलं, जेव्हा एक दिवस अंतू नि ती साळुंकी मारुतीच्या देवळात जोडीनं दर्शनाला आले!
    पिंपळावरचा कलकलाट आणि फेअर्‌ कट्ट्यासह बोळक्या कट्ट्यावरचा गलबला श्रवणीय होत होता...होणारच ना, अंतूची बोळक्या कट्ट्यावर तर साळुंकीची फेअर्‌ कट्ट्यावरची हजेरी त्याला कारण होती... जोडीला अंतूचं मनमोकळं गायन नि आबाच्या उभ्या गप्पा फोडणीला... मग काय!!!
***