एप्रिल १३ २०१७

स्वप्न झाली मोठी

      सुरुवात होते ती 'उच्च शिक्षण' ह्या गोंडस कारणानं. ज्या वयात अभ्यासाचं महत्त्वही कळलेलं नसतं त्या वयात त्या विद्यार्थ्याच्या मनात उच्च शिक्षणाची तीव्र इच्छा पैदा होते. भोळे भाबडे बनून वागणारे पालक आपल्या पाल्याच्या उच्च शिक्षणाच्या उच्च स्वप्नामध्ये आडकाठी करताना मी तरी अजून बघितलेले नाहीत. सोबतीला शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँका आहेतच. हे सर्व पूर्ण जोर लावून त्या विद्यार्थ्याला फिरंगी देशात पाठवूनच थांबतात.

ह्या 'विद्यार्थ्यांपैकी' क्वचित अपवाद वगळता सर्व जण शिक्षण झाल्यावर तिथेच नोकरी शोधतात. म्हणजे दुसरा पर्यायच नसतो. कारण शिक्षण, प्रवास आणि तिथल्या राहणीमानासाठी तीस चाळीस लाख रुपये आधीच गुंतवलेले असतात. त्यांची वसुली लवकरात लवकर करायची असते.
एखाद दोन वर्ष तिकडे काढल्यावर त्याची 'माय'देशात यायची इच्छा पूर्णपणे संपलेली असते. काही जणांना भारतात राहायचंच नसतं, त्यासठी वाट्टेल ते करायची त्यांची तयारी असते. काही जणांच्या 'करिअर'ला  भारतात चांगला 'स्कोप' आणि 'फॅसिलिटी' नसतात त्यामुळे ते बाहेर जायला बघत असतात.

तिकडे मिळालेल्या नोकरीचा आधार घेऊन तिथलं ग्रीन कार्ड मिळतंय का किंवा व्हिसाची मुदत अजून तीन चार वर्षांनी वाढवून मिळतिये का ह्याची खटाटोप चालू होते. त्यात बऱ्याच जणांना यश मिळतं. ज्यांना अपयश येतं त्यांचा केवळ 'नाईलाज' होतो.
आयटी क्षेत्रात तर ज्याला बघावं त्याला ऑनसाईटच जायचं असतं. त्यामागे पैसा कमावणे हे एकमेव कारण असतं ते वेगळं सांगायला नको. जर कामासाठी आणि तज्ञ लोकांसोबत काम करण्यासाठी जायचं असतं तर तिकडे जाऊन नोकरी का बदलली जाते?

ह्याची अजून एक बाजू जी आपण सगळ्यांनीच अगदी जवळून बघितली असणार हे नक्की!
"कुछ लोग अपनोंके लिए सपनें छोड़ देते हे, और कुछ लोग सपनोंके लिए अपने ! "

पोराला शिकवण्यासाठी बाहेर पाठवायला मंगळसूत्रासकट सगळे दागिने विकणारी आई मी बघितली आहे. मुलगा बाहेर सेटल झाला पण आपल्या आईसाठी परत यायचा त्याचा 'सध्या' विचार नाही.
गावाकडची वडिलांची जमीन विकून बाहेर शिक्षण घेतलं आणि तिकडेच ग्रीन कार्ड मिळवून स्थायिक झालेले काहीजणही माझ्या ओळखीतले आहेत.
अंथरुणाला खिळलेली म्हातारी आई आणि तिची 'सर्व' देखभाल बघणारे बाबा इथेच तडफडत आहेत. मुलगा बाहेर व्यवस्थित 'सेटल' आहे. दोन दोन वर्ष भारतात फिरकतही नाही.
बाहेर सेटल होऊन भारतात चार चार घरं घ्यायची. पण त्या भिंतीमध्ये राहायला माणूसच नाही. भारतात असलेले तीर्थरूप त्या जागांचा 'मेंटेनन्स' बघतात.
दोन्ही मुली बाहेर देशात असल्यानं त्यांच्या आठवणींनी कुढणारे आई वडील मी पहिले आहेत.
बाहेर सेटल झालेला नवराच आजकालच्या मुली 'प्रेफर' करतात. असा नवरा मिळाला की इथलं सगळं (जबाबदाऱ्यांसाहित सगळं) सोडून एका पायावर त्याच्यामागे जाणाऱ्या ओळखीतल्या मुलीही आहेत.

परदेशातच अपत्याला जन्म द्यायचा म्हणजे त्याला तिथलं ग्रीन कार्ड मिळूनच जाईल हे आजकालचे विचार. ह्यांहूनही पुढचं म्हणजे 
भविष्यात आपल्या बाळाला बाहेरील देशात गेल्यावर काही अडचण येऊ नये म्हणून आपल्या बाळाचं इंग्रजी नाव ठेवल्याचं उदाहरणही आहे.
आपल्या मुलाकडे बाहेरच्या देशात राहायला गेलेल्या आई वडिलांच्या भावनाही मी अनेक लेखांमधून वाचल्या आहेत. तिकडे त्यांची होणारी तारांबळ आणि त्यांच्या प्रत्येक शब्दात असलेली कळकळ मनाला वेदना देऊन जाते.

"आम्ही तर आई बाबांना म्हणतोच आहोत की तुम्हीच या आमच्या इकडे, पण ते यायला तयार नसतात"...
ज्यांनी वयाची चाळीस पन्नास वर्ष तुम्हाला मोठं करण्यात घालवली, इतके वर्ष झिजून ज्यांनी ह्या मातीत आपले पाय घट्ट रोवले, अनेक माणसं कमावली त्यांनी इतक्या वर्षांचा आपला अमूल्य ठेवा आणि कमावलेलं सगळं सोडून तिकडे यायचं?

सपनें अपनोंसे कब बड़े हो गए पताही नहीं चला !

मला माहीत आहे की ह्याची चांगली उदाहरणे असणार आहेत. पण कळकळीचं गालबोट न लागलेलं एकही उदाहरण मला ज्ञात नाही.
कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला कोणाकडे बोट दाखवायचं नाही. परिस्थिती सर्वज्ञात आहे.
मुलांनी परदेशातील उच्च शिक्षणाची, अधिक पैसे कमावण्याची, आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायची स्वप्न बघूच नये का?
भारतात राहून वीस वीस वर्ष घराचे हफ्ते का फेडत राहायचे? आई वडिलांनी आयुष्यभर केलेली खटपट ह्यासाठी नाही तर मग कशासाठी?
हे सगळे प्रश्न मलाही पडतात. ह्या सगळ्या परिस्थिलाही सुवर्णमध्य आणि योग्य मार्ग असेल अशी माझी खात्री आहे. तो मार्ग सर्वांना कळवा अशीच इच्छा आहे. तुमचे विचार नक्की कळवा.

-भूषण

Post to Feedफार सुंदर विचार
लघुत्वाकांक्षा !
वाईट काही नाही
पाल्याच्या नजरेतून
नॉन-सर्कास्टिक विचार
फारच
पहिल्या दोन मध्येच कार्यक्रम आटपावा हे उत्तम. !!??
प्रश्न फार गंभीर आहे
मुद्दे मांडणी चांगली पण बऱ्याच मुद्द्यांशी असहमत
आश्चर्य !! कोणत्या मुद्द्यांवर सहमत आहात ?
माझ्या सहमती किंवा असहमतीचा प्रश्नच कुठे येतो?
दुर्दैव असे कि अजून तरी अनेक नाहीत
मी कसे ठरवले?
लेख चांगला आहे
एक रेसीपी
गुळाचा गणपती : ले. गडकरी

Typing help hide