एप्रिल २९ २०१७

चिंता करी जो विश्वाची ... (२३)

श्री समर्थ रामदास स्वामींनी  गुरू - सद्गुरूंची लक्षणे विस्ताराने वर्णन केली आहेत. गुरूकृपेची महती त्यांनी अनेकपरीने श्रोत्यांस ऐकविली आहे. गुरूकृपा झाल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होणे नाही, हे त्यांनी नेहमीच स्पष्ट सांगितले होते.  मी मोठा, विद्वान, बुद्धिमान असा अहंकार बाळगू नये असे त्यांनी दांभिक लोकांना सुनावले. गुरूकृपेचा वरदहस्त नसेल, तर तुमची विद्वत्ता फोल आहे असे ते सांगत असत. म्हणून अहंकार सोडून, योग्य गुरूचे शिष्यत्व स्वीकारणेच हितकारी आहे असा सल्ला त्यांनी दिला होता.

जनी हित पंडित सांडीत गेले । अहंतागुणे ब्रम्हराक्षस जाले ॥
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे । मना सर्व जाणीव सांडूनी राहे.॥ 

असे त्यांनी लोकांना समजावले. मानवी समाजाची उन्नती, प्रगती आणि समृद्धी ही समाजाच्या जडणघडण आणि नीतिमत्तेवर अवलंबून आहे, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. सजग, सुविद्य आणि सुसंस्कारी समाजाचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे समाजातील व्यक्ती आणि त्यांच्या प्रवृत्ती. ज्या समाजात सतप्रवृत्त आणि बुद्धिमान व्यक्तीचे प्रमाण जास्त असेल, तो समाज नेहमीच सुखी आणि समृद्ध असेल असे त्यांचे सांगणे होते. अशा समाजाची बांधणी आणि विकास व्हावा या करीता ज्ञानाचा प्रसार होणे अती आवश्यक आहे, हे त्यांना उमगले होते. दिवसरात्री त्यांना एकच ध्यास होता --- आपल्याकडे जे ज्ञान आहे ते इतरांस सांगावे. आपल्या अनुभवाच्या, शहाणपणाच्या गोष्टी सामान्य जनांस सांगून, त्यांची वाटचाल सोपी करावी. 

कुठलाही मार्ग निवडताना, लोकांनी जागरूक राहावे, सजग असावे असे त्यांना वाटत असे.  दुसऱ्याच्या सांगण्यावर विसंबून न राहता, स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा, भले काय आणि बुरे कोणते हे जाणावे, सत्य-असत्याची परीक्षा करावी आणि जे हितकारी आहे तेच अचूक आणि नेमकेपणाने निवडावे --- हीच समर्थांची मनापासूनची इच्छा होती. त्यासाठी साधना आणि ज्ञानसंपादनाचा मार्ग स्वीकारावा असा सल्ला त्यांनी त्यांच्या श्रोत्यांना दिला होता. 
ज्ञानमार्गाची ही वाटचाल सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केली तर इच्छित फलप्राप्ती निश्चित होईल असा दिलासा त्यांनी दिला. सद्गुरूचे महत्वं विषद करताना त्यांनी सांगितले, गुरू मार्गदर्शक म्हणून वंदनीय आहे, कारण शिष्य ज्या मार्गावर प्रथम पाऊल ठेवत आहे, तो मार्ग सद्गुरूने आधीच आक्रमिला असतो. त्यातले खाचखळगे, वळणे आणि धोके त्यांनी अनुभवलेली असतात. आणि वाटचाल पूर्ण करून अंतिम ध्येय प्राप्तं केलेले असते. सद्गुरूंच्या या ज्ञानाच, अनुभवाचा -- त्यांच्या शिष्यांना फायदाच होत असतो. 

तिन्ही लोक जेथून निर्माण जाले । तया देवरायासी कोणी न बोले ॥
जगी थोरला देव तो चोरलासे (अप्रकट, अदृश्य असतो) । 
गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ॥ 

असा हा गुरूचा महिमा, आणि अशी ही गुरूची महती. परंतु सद्गुरूला सुद्धा संपूर्णता येण्यासाठी सत्शिष्याची जोड आवश्यक असते, अन्यथा दिलेले सर्व ज्ञान व्यर्थ जाणे संभवते.  शुद्ध बीज रूजण्यासाठी, फुलण्यासाठी आणि फळण्यासाठी कसदार माती, योग्यप्रमाणात सूर्यप्रकाश, पाणी आणि पोषक द्रव्ये या सर्वांची काळजी माळी घेतो, तेव्हा त्यांस रसाळ, गोमटी फळे मिळतात. सद्गुरू त्यांच्या शिष्यांना असेच, सर्वार्थाने घडवीत असतात. 
परंतु गुरू ज्याप्रमाणे गुणी, ज्ञानी असणे आवश्यक असते, तसेच शिष्याच्याही अंगी काही गुण असणे अनिवार्य असते. अन्यथा रोगट बीज ज्याप्रमाणे, सर्व प्रकारची काळजी घेऊनही, किडकी, कमी प्रतीचीच फळे देते, त्याप्रमाणे गुरूने कितीही समरसून विद्या शिकविली तरी, शिष्य जर ती विद्या  ग्रहण करण्यास अपात्र असेल,  तर - त्याचा उपयोग शून्यच. म्हणजे पालथ्या घड्यावर कितीही पाणी ओतले तरी तो घडा काही भरत नाही, रिकामा तो रिकामाच राहतो... तसेच. 

तैसा सच्छिष्य ते सत्पात्र । परंतु गुरू सांगे मंत्र तंत्र  (निरर्थक ज्ञान )।
तेथे अरत्र (इहलोकीचे) ना परत्र (परलोकीचे) । काहीच नाही ॥ 
अथवा गुरू पूर्णं कृपा करी । परी शिष्य अनाधिकारी (अयोग्य) ।
भाग्यपुरूषाचा भिकारी । पुत्र जैसा ॥ 
तैसे येकाविण येक । होत असे निरार्थक ।
परलोकीचे सार्थक । ते दुऱ्हावे ॥ 
म्हणौनी सद्गुरू आणि सत्छिष्य । तेथे न लगती सायास । 
त्यां उभयतांचा हव्यास । पुरे एकसरा ॥ 

अशा प्रकारे सद्गुरू आणि सत्शिष्याची जोड झाली, की  ज्ञानोपासनेचा मार्ग सोपा होतो. ज्याप्रमाणे बीज पेरल्यावर, उत्तम पीक आले. परंतु त्याची योग्य निगराणी केली नाही, राखणं केली नाही, योग्य समयी कापणी केली नाही,  तर ते वाया जाते. त्याचप्रमाणे ज्ञानार्जन केल्यानंतर, त्याची अखंड साधना- उपासना केली नाही, चिंतन - मनन केले नाही, संवाद आणि शंका निरसन केले नाही तर मिळालेले सर्व ज्ञान व्यर्थ जाते. त्याचा कल्याणासाठी, उन्नतीसाठी कसलाच उपयोग होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानार्जन करणारा हा सत्शिष्य असणे  देखिल जरूरीचे आहे.  सत्शिष्याला ज्ञानोपासनेचे नेमके मर्म उमगले असते. गुरूची विद्या सत्कारणी कशी लावावी याचे भान आलेले असते. मिळालेल्या प्रत्येक ज्ञानकणाची तो जोपासना करतो, त्याचे संवर्धन करतो.  ज्याप्रमाणे शहाणा मनुष्य एक वेळचे जेवण मिळाल्यावर स्वस्थ न राहता, पुढच्या वेळीच्या जेवणासाठी साधन, सामग्री साठवून ठेवतो. तसेच सत्शिष्याची ज्ञानोपासना कधीच थांबत नाही, संपत नाही. ती अखंड आणि अविरत चालूच राहते . 
सत्शिष्यासाठी काही नियम दासबोधामध्ये सांगितले आहे. सर्वप्रथम त्याचे अंतःकरण निर्मळ असायला हवे. कपट, कटुता याचे वास्तव्य त्याच्या अंतरात नसावे. सत्कर्म, सद्वासना, सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म या नियमांचे त्याने सदोदित पालन करायला हवे. त्याप्रमाणे त्याचा जीवनक्रम नियमित असायला हवा. सत्संग आणि नित्यनेम कधी चुकवू नये. देवभक्ती आणि गुरूभक्ती अनन्यभावाने करावी. गुरू आज्ञेचे नेहमी पालन करावे. ज्ञानोपासनेच्या कालावधीत सुखभोग, ऐश्वर्य आणि विलासापासून दूर राहावे. ज्ञान संपादन करीत असताना शिष्य साक्षेपी असायला हवा. तो निष्ठावंत आणि निश्चयी असावा. गुरू सांनिद्ध्यात तो सदैव दक्ष असायला हवा. सद्गुरूच्या सेवेस सदैव तत्पर असावा. शिष्याला अहंकाराचा स्पर्श नसावा, लोभ आणि अविवेक यापासून तो दूर असावा. अशा सर्व उत्तमगुणांनी युक्तं असलेला शिष्य लाभला असता, गुरूसही ज्ञानदानाचे समाधान लाभते. 

शिष्य कसा नसावा याची चर्चा देखिल समर्थ दासबोधामध्ये करतात. मूर्ख, चंचल, अशक्त, आळशी, संशयी, लोभी, दुष्ट, मत्सरी, अहंकारी आणि दुराचारी,  अशी गुणलक्षणे असणारा तो चांगला शिष्य होऊ शकत नाही. त्यांस पूर्णज्ञान देखिल कधीच प्राप्तं होत नाही. 

वाचाळ शाब्दिक बडबडे । वरपाडे जाले । 
ऐसे शिष्य परमनष्ट । कनिष्ठांमध्ये कनिष्ठ ॥
हीन अविवेकी आणि दृष्ट । खळ खोटे दुर्जन ।
ऐसे जे पापरूप । दिर्घादोषी वज्रलेप ।
तयांस प्राश्चित्त, अनुताप । उद्भवता आहे ॥ 

अशाप्रकारे अवगुणांनी युक्तं असलेल्या शिष्याला दिलेली विद्या वाया जाते.   दान करताना देखिल ते सत्कारणी लागते आहे की नाही हे बघायला पाहिजे. दान हे नेहमी सत्पात्री असावे, अन्यथा त्या दानाचे पुण्य लाभत नाही. म्हणून विद्यादान करीत असताना शिष्याचे गुणावगुण पारखून घेणे अत्यंत गरजेचे आहे. शिष्या ठायी असलेले अवगुण जाणून,  त्यांस ज्ञानदान न करणे श्रेयस्कर असे समर्थ सांगतात. 

आशा ममता तृष्णा कल्पना । कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना । 
अल्पबुद्धी विषयकामना । हृदयी वसे ॥ 
ईषणा असूया तिरस्कारे । निंदेस प्रवर्ते आदरे ।
देहाभिमाने हुंबरे । जाणपणे ॥
क्षुधा तृष्णा आवरेना । निद्रा सहसा धरेना । 
कुटुंबचिंता वोसरेना । भ्रांती पडली ॥
शाब्दिक बोले उदंड वाचा । लेश नाही वैराग्याचा । 
अनुताप धारिष्ट साधनांचा । मार्ग न धरी ॥ 

असे गुण असलेल्या व्यक्ती शिष्यपदास अयोग्य आहेत. त्यांना  दिलेले ज्ञान व्यर्थ तर आहेच, परंतु त्याचा दुरुपयोग होण्याची देखिल शक्यता असते. म्हणून कुणासही शिष्य म्हणून पत्करण्या आधी गुरुने त्याची कठोर परीक्षा करणे आवश्यक आहे. दिलेले ज्ञान जर सत्पात्री असेल तर त्याचा उपयोग संपूर्ण समाजास होऊ शकतो. कारण सत्शिष्य हा सात्त्विक आणि परदुःख जाणणारा असतो. इतरांच्या दुःखाने तो दुखावला जातो. इतरांच्या चिंता कमी व्हाव्यात या साठी तो आपल्या ज्ञानाचा उपयोग करतो. सुखोपभोग घेताना तो संयमी असतो. संसाराच्या मायाजाळात गुरफटून घेऊन, तो ईश्वराचे विस्मरण स्वतः स कदापिही होऊ देत नाही. सुख-दुःख, दैन्य-समृद्धी, स्वार्थ-परमार्थ यांचा समतोल त्याने साधलेला असतो. अशा सत्शिष्याला सद्गुरू लाभला असता समसमा संयोग घडून येतो. 
याकरिता, सद्गुरू चे गुण पारखणे शिष्यास गरजेचे आहे. आणि सत्शिष्याचे कठोर परीक्षण करणे गुरूस अत्यावश्यक. 

अविद्यागुणे मानवा ऊमजेना । भ्रमे चूकले हीत तें आकळेना ॥
परीक्षेविणें बांधिले दृढ नाणे । परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ॥
म्हणे दास सायास त्याचे करावे । जनी जाणता पाय त्याचे धरावे ॥
गुरू अंजनेवीण तें आकळेना । जुने ठेवणे मीपणें तें कळेना ॥ 

(क्रमशः)

संदर्भ :   (१) श्री ग्रंथराज दासबोध 
            (२)   श्री मनाचे श्लोक 

Post to Feed
Typing help hide