मे २०१७

युद्ध नको!

(मित्रहो! सध्या जगभर सर्वत्र दहशतवाद, हिंसाचार, युद्धे बोकाळली आहेत.  अणुयुद्धाचा धोका कधीही नव्हता इतका प्रबळ झाला आहे. प्राचीन ताओ तत्वज्ञान युद्धखोरी व हिंसाचाराचा निषेध करते. तो कसा ते पुढील कवितेत मांडले आहे.  पुणे येथील पद्मगंधा प्रकाशन यांनी नुकत्याच प्रकाशित केलेल्या 'ताओगाथा' या माझ्या पुस्तकातून ही कविता घेतली आहे.)

उत्तम शस्त्रास्त्रे
अशुभाचे दूत
मानवता मृत
त्यांच्या योगे

म्हणूनी सज्जन
टाळीती शस्त्रांना
विनाशी अस्त्रांना
सर्वकाळ

शस्त्रांच्या योगाने
येते अमंगल
युद्ध नि दंगल
सोयरेची 

म्हणूनी आयुध
सज्जना नावडे
तयास वावडे
युद्धाचे त्या

त्याला असे प्रिय
अंमल शांतीचा
युद्ध नि क्रांतीचा
तिटकारा

वापरतो शस्त्रे
खुंटता इलाज
सदा त्याची लाज
त्याच्या मनी

उन्माद जयाचा
नच शिवे त्याला
ज्णू विषप्याला
त्यागितसे

कारण त्या ठावे
उत्सवी जमणे
विजयी रमणे
अमानुष

परी अज्ञ जन
नरमेधासाठी
थोपटती पाठी
स्वतःच्याच

स्वतःच्या आकांक्षा
पूर्ण करण्यास
घेई जोही घास
मानवांचा

मिळेल गा तया
सांगा कैशी शांती
विजयाची भ्रांती
क्षणाचीच

युद्धाच्या कथा त्या
भासतात रम्य
काय त्यात गम्य
मेलेल्याना

युद्ध असते हो
अंत्ययात्रा एक
मानवता देख
गतप्राण

रेशमेय म्हणे
खरे युद्ध आत
मन प्रांगणात
चालतसे !

Post to Feed


Typing help hide