एकशे एकावा पुरुष

      आत्मचरित्रांचा विचार केल्यास स्त्रियांनी बऱ्याच उशीरा आत्मचरित्रे लिहायला सुरवात केली असे दिसते आणि त्याचे कारणही उघडच आहे कारण लिहितावाचता येण्यासाठीच स्त्रियांना बराच काळ वाट पहावी लागली.लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मवॄत्त ’स्मृतिचित्रे’हे त्यानी लिहायला शिकता शिकता लिहिले म्हणता येईल कारण त्यांना लिहिता लिहिता एकादा शब्द अडला तर त्या ठोम्बरे (बालकवि) ला अगर त्यांच्या मुलांना विचारत असा उल्लेख त्यात आहे.रमाबाई रानडे यांचे"माझ्या आयुष्यातील आठवणी" हे त्यांच्या व माधवरावांच्या सहवासातील दिवसांच्या आठवणी असेच आहे.
      सर्व स्त्रियांच्या आत्मवृत्तात आढळणारी एक अगदी साधारण बाब म्हणजे पुरुषी वर्चस्वाची होणारी ओळख,याला अपवाद एकमेव म्हणजे माधवराव रानडे यांचा आणि त्याला कारणीभूत त्यांचा मूळ क्षमाशील स्वभाव व समाजभयामुळे केलेला विवाह.कारण ज्या सुधारणेचे अध्वर्यू ते होते त्यानुसार पुनर्विवाह हा विधवेशीच करायचा या मताचे ते होते (धोंडो केशव कर्वेयांनी याचे उदाहरण समोर ठेवले होते.)पण घरच्या दबावामुळे आपल्या हातून झालेली चूक सुधारण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला हे उघडच आहे पण पुरुषी वर्चस्व गाजवणे हे त्यांच्या वृत्तीतच नव्हते. शिवाय कधी त्यांनी तसे गाजवलेच असेल तर रमाबाईंच्या स्वभावात त्याचा उल्लेख करणे बसत नसावे.
   याउलट इतरांसाठी क्षमाशील असणारे रे. टिळक , पु.ल.देशपांडे किंवा प्रभाकर पाध्ये यांच्यासारखे पुरुषही आपापल्या बायकांवर वर्चस्व गाजवतात असे "स्मृतिचित्रे" "आहे मनोहर तरी" ("सुनीता देशपांडे ) व "बंधअनुबंध"(   कमल पाध्ये) ही आत्मचरित्रे वाचल्यावर वाटते. .पु.ल.च्या बाबतीत त्यांच्याकडे बालकाच्या सहृदयतेनेच सुनीताबाईंनी पाहिले व ते मूल बनूनच राहिले असे "आहे मनोहर तरी"वरून वाटते.(दोन्हीमधील आणखी एक साम्यस्थळ म्हणजे पुरुषांनी करावयाची कामेही (गाडी चालवणे) कमल पाध्ये व सुनीता देशपांडे याच करताना दिसतात.)
   कमल पाध्ये यांच्या बंध अनुबंधाविषयी ते केवळ"प्रभाकर पाध्ये व कमल पाध्ये"यांचे वैवाहिक जीवन नसून एकूणच स्त्रीजीवनाचा आढावा त्यात आहे व आजही ज्या अडचणींना स्त्रीला तोंड द्यावे लागते त्या अनादिकाळापासून म्हणजे द्रौपदी पासूनच्या आहेत हे जाणवते.विशेषत: पुरुषाचा स्त्रीकडे पहावयाचा दृष्टिकोण. त्याचमुळे कुंतीने द्रौपदीची वाटणी करून भावांनधील कलह टाळला असे दुर्गा भागवतांनी म्हटले आहे.
       प्रथम लक्ष जाते ते स्त्रीच्या देहाकडेच. याचा उल्लेख "बंधअनुबंध"मध्ये अनेक वेळा येतो.अगदी लहानपणापासून पुरुषी स्पर्षातील फरक कळण्याची उपजत प्रवृत्तीच स्त्रीमध्ये असते असे त्यांनी लिहिलेल्या लहानपणाच्या अनुभवावरून दिसते.त्यामुळेच मोठेपणी पुरुषांविषयी येणाऱ्या अनुभवांवरून आपलया दाभोळकर नावाच्या परिचित व्यक्तीशी बोलताना कमल पाध्ये त्यांना विचारतात,"मी अनेक पुरुषांना विचारल की एकाद्या स्त्रीला तुम्ही प्रथम पाहता तेव्हां तुमच्या मनात कोणती भावना येते? अगदी खरं प्रामाणिकपणे सांगा हं ! तेव्हां शंभर जणांनी तरी"उपभोग"" असे उत्तर दिले आहे " त्यावर दाभोळकर म्हणाले "यापुढे शंभर लोक म्हणाले असे म्हणू नका एकशे एक म्हणाले असे म्हणा "
"काय अर्थ याचा?स्त्री केवळ मादी?मग कसली नाती आणि कसली गोती?" हे त्यावर कमलताईंचे भाष्य आहे. यात प्रश्न विचारणाऱ्या कमल पाध्ये यांचे तर कौतुक करावेच लागेल पण असे उत्तर देण्याचे धैर्य श्री दाभोळकर यांनी दाखवले हे विशेष.
  हे पुस्तक वाचल्यावर त्यातील पुरुषी मनोवृत्तीचा वेध घेतल्यावर सध्या जगात बलात्काराचे पेव फुटल्यासारखे वाटते तसे नसून जगाच्या आरंभापासून हेच चालू आहे हे समजते.( फक्त आता निरनिराळ्या माध्यमांचा सुकाळ झाल्यामुळे आपल्याला हे कळू लागले आहे एवढेच.(नुकत्याच दोन बलात्काr खटल्यांचा निकाल लागून बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा सध्या तरी झाली आहे)   अर्थात पुस्तकाचा मूळ हेतू फक्त हे सत्य समोर आणणे हा नाही.पण बालपणापासूनच स्त्रीला कोणत्या यातनांचा समना करावा लागतो त्यामुळे हे पुस्तक एकापरीने"स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी"आहे असे म्हणता येईल.(अनुबंध या शब्दाचा अर्थ बेडी हाच आहे.) हे पुस्तक वाचल्यावर प्रत्येक पुरुषालाच आपण तो १०१वा पुरुष आहोत की काय असे वाटू लागण्याची शक्यता आहे.