स्वान्त सुखाय !

      आजकाल कुठलीही छोटी गोष्ट केली की लगेच ती फेसबुकवर किंवा व्हॉट्सऍपवर टाकण्यात येऊन त्यावर "लाइक्स"चा पाउस पडला की टाकणाऱ्याला धन्य होते.तीच गोष्ट वाढदिवस किंवा कुठल्याही समारंभाची .परवाच कुणीशी आत्महत्या करण्यापूर्वीही फेसबुकवर टाकलेल्या संदेशालाही "लाइक्स " आले होते. म्हणे ! आणि कदाचित ते पाहून त्या व्यक्तीचा आत्महत्या करण्याचा विचार अधिक ठाम झाला असावा ! अश्या जमान्यात केवळ स्वांतसुखाय निर्मितीचा आनंद घेणे ही गोष्ट अगदी विरळाच !
       एमिली डिकिन्सन या कवियित्रीविषयी मला असेच  अचानक वाचायला मिळाले.कविता हा माझ्या फार आवडीचा प्रांत नाही.केशवसुत ,कुसुमाग्रज,सुरेश भट,ग्रेस अश्या जुन्या व त्यामानाने अलिकडील म्हणता येणाऱ्या काही कवींचा व पाठ्यपुस्तकामुळे व मंगेशकर भावंडांमुळे व भावगीत प्रकारामुळे तांबे,पाडगांवकर यांचा परिचय ! पण मुद्दाम काव्यवाचनच करावयाचे या दृष्टीने कवितांचे पुस्तक घेऊन मी बसत नाही.त्यामुळे एमिली डिकिन्सनचा अचानक शोधच लागला अस म्हणावे लागेल.मार्च २०११ मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार स्वीकारताना श्री.महेश एलकुंचवार यांनी केलेल्या भाषणात " एकांत साधनेविषयी मी बोलतोय तेव्हां एमिलीची आठवण होते.या बाईने जन्मभर कविता लिहिल्या आणि एकही कविता प्रसिद्ध केली नाही. (प्रत्यक्षात तिच्या १०-१२ कविता प्रकाशित झाल्या होत्या ) वयाच्या ५२ व्या वर्षी ती गेली तेव्हां तिच्या कविता कुठे कपाटाच्या खनात,गादीखाली,उशीखाली,कपड्यांच्या खिशात-- अशा कुठेतरी सापडल्या.त्यानंतर ती चिटोरी,चिटोरी एकत्र करून छापली गेली.त्यानंतर सगळ्या पिढ्या आज एमिलीच्या कवितांनी भारल्या आहेत " असा उल्लेख आढळल्यामुळे  उत्सुकता निर्माण होऊन अश्या कविता आहेत तरी कश्या म्हणून मी जालावर शोध घेतला. त्यात तिया कविता खरोखरच वाचून वेगळाच आनंद झाला. मनोगतींनी अवश्य पाहाव्या. तिचं जीवनविषयक तत्त्वज्ञान म्हणण्यापेक्षा दृष्टिकोन वेगळाच वाटतो.    
   अमेरिकेत मॅसेच्यूसेट्स प्रांतात डिसेंबर १०, १८३० यादिवशी  जन्मली एमिली एलिझाबेथ डिकिन्सन ! तिचे वडील एडवर्ड हे ऍम्हर्स्ट या त्यांच्या शहरातील एक नावाजलेले वकील. भव्य म्हणता येईल अशा  बंगल्यात त्यांचे कुटुंबरहात होते.एमिलीला विल्यम ऑस्टिन नावाचा मोठा भाऊ व लॅविना नॉरक्रॉस या नावाची धाकटी बहीण पण होती. लहानपणापासून एमिली एक शांत व शिस्तबद्ध वागणुकीची मुलगी म्हणून सर्वांना ज्ञात होती. शिक्षणासाठी उत्तम शाळेत तिला वडिलांनी तिच्या भावंडांबरोबर घातले होते आणि अतिशय हुशार व अभ्यासू असा लौकिकही तिने संपादन केला होता.पण तिची चुलत बहीण व अगदी जिवलग मैत्रिण सोफिया हॉलंड इच्या विषमज्वराच्या आजाराने झालेल्या मृत्यूचा तिच्या बालमनावर इतका तीव्र आघात झाला की त्यातून सावरण्यासाठी तिला बोस्टन या ठिकाणी तिच्या दुसऱ्या परिचित कुटुंबात पाठवण्यात आले व त्यानंतर तिची मानसिक स्थिती सुधारली.तिच्या वयाच्या अठराव्या वर्षी बेंजामिन फ्रॅन्कलिन न्यूटन या तरुण वकिलाशी तिचा परिचय झाला व त्याने विल्यम वर्ड्स्वर्थ च्या काव्याशी तिचा परिचय करून दिला.
     १८५० पासून म्हणजे एमिलीच्या वयाच्या २० व्या वर्षी तिच्या आईने जे अंथरूण धरले  ते अगदी शेवटपर्यंत व त्या काळात तिला साथ देण्यातच एमिलीने काळ व्यतित केला.त्यानंतर तिने बाह्य जगाशी संबंध अगदी कामापुरताच ठेवला व याच काळात तिने अनेक कविता लिहिल्या.फिलिप्स लॉर्ड या न्यायाधीशाशी तिची झालेली मैत्री आयुष्याच्या उतरणीस लागलेल्या दोन जिवांचा प्रेमयोग म्हणता येईल.त्यानंतरही अनेक लोकांच्या मरणाचे धक्के तिला सहन करावे लागले त्यात १८७४ मध्ये वडील,त्यानंतर आई,त्यानंतर लॉर्डची पत्नी १८८४ मध्ये खुद्द लॉर्ड्स यांचे मृत्यू तिला पहावे लागले त्यामुळे शरीराने खंगलेली एमिली मनानेही खचली व तिचा मृत्यू १५ मे १८८६ मध्ये झाला.
  ती हयात असताना तिच्या १०-१२ च कविता प्रकाशित झाल्या होत्या.पण तिच्या मृत्यूनंतर तिच्या लहान बहिणीने शोध घेतला तेव्हां तिच्या इथे तिथे पसरलेल्या १८०० कविता तिला सापडल्या..त्या कवितांचे मोल तिच्या ध्यानात आले. पण या गोष्टीची वाच्यता झाल्यावर तिच्या भावाची विधवा पत्नीही त्या कवितांवर आपला हक्क सांगू लागली व या कौटुंबिक वादात  एमिलीच्या सर्व कविता प्रसिद्ध होण्यास तिच्या मृत्यूनंतर अर्धशतकाचा तरी कालावधी लोटला मध्यंतरी तिच्या भावाच्या बायकोने आपल्या ताब्यात असलेल्या तिच्या काही कवितांचा पहिला संग्रह तिच्या मृत्यूनंतर ४ वर्षांनी प्रकाशित केला.पण त्यात बरेच फेरफार केले होते तरीही अश्या ११५ कबितांच्या पहिल्याच संग्रहाचे आश्चर्य म्हणजे अभूतपूर्व स्वागत झाले व दोनच वर्षात त्याचे ११ वेळा पुनर्मुद्रण करावे लागले.१८९१ मध्ये तिच्या कवितांचा दुसरा संग्रह बाहेर पडला,त्याच्याही ५ आवृत्या निघाल्या व तिसरा संग्रह १८९६ मध्ये बाहेर पडला."तिचे अगदी शेवटचे चिटोरेही  प्रकाशित झाल्याशिवाय आम्हाला बरे वाटणार नाही"असे एका समीक्षकाने म्हटले होते.१९४५ पर्यंत जवळ जवळ १२ आव्रूत्या तिच्या संग्रहांच्या प्रकाशित झाल्या..
१९५५ मध्ये तिन्ही खंडांचे एकत्रिकरण करून थॉमस ए जॉन्सन याने त्या मूळ स्वरुपात प्रकाशित केल्या. तिच्या मूळ लिखाणात पहिल्या लिपीतली (कॅपिटल) अक्षरे व विरामचिन्हांचा वापर अगदी वेगळ्या प्रकारे केलेला आढळतो उदा:,
I am Nobody ! Who are you ?
Are you --- Nobody --- Too ?
Then there’s a pair of us !
Don’t tell ! They would banish us ---  you know !
How dreary ---  to be -- Somebody !
How public ---  like a Frog
To tell one’s name --- the live long June --
To an admiring Bog !  
प्रसिद्धी तिला मुळीच आवडत नव्हती हेही वरील कवितेवरून समजते आणि त्यामुळेच इतक्या कविता लिहूनही त्या प्रकाशित करण्याचा तिने विचारच केला नाही.
                  केवळ स्वान्तसुखाय लेखन करणारी मराठी साहित्यातील एक लेखिका म्हणजे दुर्गा भागवत .सुरवातीला त्यानी अनेक कविता लिहिल्या पण त्या नंतर त्यानाच आवडल्या नाहीत म्हणून त्यांनी फाडून टाकल्या. त्यांचे नंतरचेही बरेच लिखाण त्यानी फाडून टाकले.त्यामुळे संशोधनपर लिखाणच काय ते उरले.
       याव्यतिरिक्तही स्वान्तसुखाय लेखन करणारे आणखीही काही असतीलही पण त्यांचे लेखन प्रसिद्धच झाले नाही तर कळणार कसे ?  
नाही म्हणायला माझ्या एका मित्राच्या सन्त प्रवृत्तीच्या वडीलांनी अनेक अध्यात्मिक ग्रंथांचे काव्यबद्ध रूआंतर केले आहे, त्यात "योगवासिष्ठ " सारख्या ग्रंथाचा समावेश आहे. ते माझ्या मित्राने त्यांच्या मृत्यूपश्चात  कुटुंबियांसाठी संगणकावर लिखित स्वरूपात आणल्यामुळे मला समजले.