जून २०१७

वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग १

बर्‍याच वर्षांपासून वॉशिंग्टन डिसीला जाऊन तिथल्या चेरी ब्लॉसमचा बहर पाहावा हे मानात होते. त्या निमित्ताने अमेरिकेच्या राजधानीतील इतरही ठिकाणे पाहता येतील हा उद्देश त्यामागे होता. हो नाही करत या वर्षी चेरी ब्लॉसम महोत्सव पाहायला जायचे असे ठरले. म्हणून मग चेरी ब्लॉसमच्या पूर्ण बहराच्या तारखांच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून होतो. त्या तारखा मागे पुढे होत होत शेवटी त्या तारखा पहिला आडाखा जाहीर झाला. मागे पुढे न पाहता मग लगेच विमानाच्या आरक्षणाच्या मागे लागलो. मिनेसोटाहून थेट डिसीजवळच्या विमानतळांचे (ड्युल्स व रिगन)  रीटर्न तिकीट चांगलेच महाग पडत होते. म्हणून मग डिसीला थेट न जाता आधी शेजारच्या बाल्टीमोर येथे थांबायचे ठरले. त्याप्रमाणे मिनेसोटा ते बाल्टीमोर आणि परतीचे रिगन विमानतळ ते मिनेसोटा असे विमानाचे आरक्षण केले.

बाल्टिमोरला रात्री उशीरा पोहोचणार म्हणून विमानतळाजवळचे हॉटेल बुक केले. तसेच डिसी डाउनटाउन पासून सुमारे १० मैलांवर व्हर्जिनीया राज्यातील हॉटेल बुक केले. डिसी मेट्रो एरिया तेथील मेट्रो ट्रेन आणि बसने अतिशय उत्तमरीत्या गुंफला आहे. मेट्रो ट्रेन व बसला एकच पास चालतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार व उपलब्धतेनुसार बस व ट्रेन या दोन्ही गोष्टी वापरू शकता. हा पास तेथील कुठल्याही मेट्रो स्टेशनवर काढता येतो. तसेच हे कार्ड रिचार्ज करण्याची प्रक्रिया ही सोपी व सुटसुटीत आहे. मेट्रोसाठी वीकडेज मध्ये सकाळच्या ९ वाजेपर्यंत खूप गर्दीची वेळ असल्यामुळे त्यावेळी प्रवासाचे दर चढे आहेत. तसेच ९ नंतर हेच दर कमी आहेत.  दुपारी ३ ते संध्याकाळी सात पर्यंत दर पुन्हा चढे आहेत तर त्यानंतर दर कमी होतात. विकेंडला हे दर दिवसभर कमी आहेत. फक्त विकेंडला मेट्रोच्या धावण्याच्या वारंवारतेत किंचित कमी आहे. मेट्रो आणि बसच्या अधिक माहितीसाठी ही वेबसाइट पहा. वीकडेजमध्ये मेट्रो स्टेशनवर गाडी पार्क करण्याचे दर रास्त आहेत तसेच विकेंडला गाडी पार्क करण्याची सुविधा निशुल्क असते. 

डीसी आणि बाल्टिमोर मध्ये कुठे काय पाहायचे याची यादी झाली. एवढी तयारी केली तरी सगळे मनाप्रमाणे झाले तर काय मज्जा. मात्र कुठे तरी माशी शिंकली. आम्ही डीसी ला पोचण्याच्या दोन दिवस आधी पूर्वकडील राजांमध्ये हिमवादळ धडकणार होते. त्याच बरोबर गोठवणारे तापमान परतत होते. यामुळे चेरीच्या कळ्यांचे चांगलेच नुकसान होणार होते. आता चेरी ब्लॉसम पाहायला मिळणार की नाही याविषयी अनिश्चितता निर्माण झाली :-(. आता विमानाच्या तिकिटांच्या तारखा बदलणे परवडणारे नव्हते म्हणून मग आधी ठरलेल्या तारखांनाच जायचे ठरले.

प्रवासाला निघायचा दिवस उजाडला. विमान संध्याकाळचे होते. टाइमझोनमधल्या एक तासाच्या फरकामुळे आम्ही बाल्टीमोरला रात्री अकरा वाजता पोचणार होतो. विमानतळावरील सर्व सोपस्कार आटपून आम्ही विमानात आमच्या जागांवर स्थिरावलो. विमानही वेळेत सुटले. आमच्या लेकीने बराच वेळ विमानात गोंधळ घातला. लँडिंगच्या थोड्या वेळापूर्वी बाल्टिमोर आणि आजूबाजूचा परिसरातले असंख्य दिवे लुकलुकताना दिसले. रात्रीच्या वेळी खाडी व त्याभवतीचा शेकडो दिव्यांनी उजळलेला परिसर नयनरम्य वाटत होता. बाल्टीमोरला हॉटेलवर पोहचायला मध्यरात्र उलटून गेल्यामुळे लगेच गुडुप झालो.

दुसर्‍या दिवशी विमानतळावरून रेंटल कार घेतली आणि बाल्टीमोरची ओझरती झलक पाहायला निघालो. बाल्टीमोर हार्बर आणि वॉशिंग्टन मॉन्युमेंट पाहायचे ठरवले. आधी वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेने गेलो. हे ठिकाण माऊंट व्हर्नॉन प्लेस या भव्य चौकात उभारलेले आहे. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या सन्मानार्थ हे सर्वात पहिले मॉन्युमेंट बांधले गेले आहे. बाल्टीमोर आणि वॉशिंग्टन डीसीस्थित वॉशिंग्टन मॉन्युमेंटचा आर्किटेक्ट रॉबर्ट मिल्स हा आहे. बाल्टीमोरस्थित वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या बांधकामाला १८१५ साली सुरुवात होवून १८२९ साली पूर्ण झाले. या मॉन्युमेंटच्या बांधणी विषयी काही रंजक माहिती - १८१३ साली आर्किटेक्ट असलेल्या उमेदवारांसाठी खास स्पर्धा आयोजित केली गेली. या स्पर्धेत मॉन्युमेंटचे डिझाइन बनवायचे होते व त्यानुसार होणाऱ्या बांधकामाचा खर्च कमाल १ लक्ष डॉलर्स इतका असेल ही अट होती. स्पर्धेच्या विजेत्यास $५०० बक्षीस मिळणार होते. यात मिल्स विषयी ठरला. मिल्स हा पहिला नेटिव्ह अमेरिकन होता ज्याला आर्किटेक्टचे प्रक्षिक्षण प्राप्त होते. हा स्तंभ सुमारे १७८ फूट उंच आहे व त्यावर जॉर्ज वॉशिंग्टन यांचा पुतळा आहे. आतूनही हा स्तंभ पाहता येतो मात्र आम्ही गेलो त्यावेळी ते प्रवेशासाठी बंद होते. म्हणून मग बाहेरुन भरपूर फोटो काढून बाह्य निरीक्षण करण्यात समाधान मानले.

माउंट व्हॅर्नॉन प्लेस व वॉशिंग्टन मोन्युमेंटचा हा फोटो जालावरुन साभार...या चौकाच्या चारी बाजूंना छोटेखानी बागा आहेत व त्यात काही पुतळे तसेच कारंजी आहेत. आम्ही गेलो तेव्हा हिवाळा असल्याने सर्व कारंजी बंद होती तसेच हिरवळही नव्हती. 


मोन्युमेंटशेजारीच चौकाच्या एका कोपर्‍यात युनायटेड मेथडिस्ट चर्च आहे


एकोणिसाव्या शतकातले एक दानशूर व्यक्ती  जॉर्ज पिबॉडी यांचा पुतळा. शेजारीच पिबॉडी इन्स्टिट्युट आहे.  
या भागात विटांचे बांधकाम असणार्‍या बर्‍याच इमारती आहेत.   

पुढे बाल्टिमोरच्या इनर हार्बरच्या दिशेने निघालो. इथे अनेक आकर्षणे आहेत. जसे की द नॅशनल अ‍ॅक्वॅरियम, मेरीलॅण्ड सायन्स सेंटर, चिल्ड्रन्स म्युझियम, क्रूझ इत्यादी. इथे उपलब्ध असलेले पब्लिक पार्किंगचे पर्याय चांगलेच महाग आहेत. युएस कोस्ट गार्ड कटर टॅनी - दुसर्‍या महायुद्धातील पर्ल हार्बरच्या जपानी हल्ल्याची साक्षीदार असणारी अन अजूनही पाण्यावर असणारी एकमेव नौका. ही नौका ५१ वर्षांच्या सेवेनंतर १९८६ साली निवृत्त झाली.  
अमेरिकेतल्या प्रसिद्ध बार्न्स अ‍ॅन्ड नोबल या पुस्तकांच्या दुकानांच्या साखळीतले एक दुकान.
 अतिशय गार वारे अन वेळेअभावी आम्ही इथे बाहेरच थोडीफार भटकंती केली आणि डीसी जवळच्या व्हर्जिनिया राज्यातील अलेक्झांड्रिया येथील आमच्या हॉटेल कडे प्रयाण  केले.जसजसे डीसी जवळ आले तसे लांबून युएस कॅपिटॉल आणि वॉशिंग्टन मॉन्युमेंट दिसू लागले. असो आम्ही व्हर्जिनिया राज्यात शिरून आमच्या हॉटेलला पोहोचलो. दुसर्‍या दिवशी पासून डी सी भटकंतीला सुरुवात करायची होती. मनात थोडी धाकधूक होती ती म्हणजे इतक्या लांबून येऊन चेरी ब्लॉसम पाहायला मिळतील काय? की आणखीन काही वेगळे अनपेक्षित पाहता येईल. 

माहितीचा स्तोत्र : विकी

Post to Feedमाझी प्रतिक्रिया.
धन्यवाद!

Typing help hide