पाऊस - टेक २

आज काय पाऊस लागलाय. कशी काय कामं होणार आता. वाळवणाचं काम आजही झालं नाही. घरात धूळच एवढी येते. स्वच्छता करता करताच सगळा वेळ निघून जातो. स्वयंपाक काय करावा आज? ह्यांना काय आवडेल आज खायला? कांदा भजी तर पाहिजेतच. आणि बिर्याणी? चालेल. चहा देते आधी. केव्हाच मागितलाय. टेरेस मध्ये जाऊन झोक्यात बसतील आता. पाऊस आहे ना बाहेर! बरं झालं दुपारीच झोका स्वच्छ केला ते.
अगदीच तंद्री लागली आहे आज. ह्यांची तंद्री म्हणजे ना, आजूबाजूचं अगदीच भान राहत नाही ह्यांना. काहीच लक्षात येत नाही. मागल्या आठवड्यात पाऊस आला होता तेव्हा झोक्यात बसल्यावर पाठ कशी धरून आली होती. उशी खराब झाली होती दुसरं काय. कालच नवीन आणून ठेवली म्हणून बरं झालं. आज काही पाठ दुखायची नाही. चहा प्यायला वाटतं. चेहरा तर सांगतोय की चहा आवडलाय.
 
पावसात ते एवढं काय शोधतात काही कळतच नाही. पावसात असे हरवले की त्यांच्याकडे बघतच राहावंसं वाटतं. पण पावसात तिचा चेहरा तर शोधत नसतील ना? नकोत बाई ते विचार परत. ह्यांच्याकडे बघत बसले तर हे असले विचार जाणारच नाहीत. त्यापेक्षा मी आपली कामात असलेलीच बरी. कशी आहे ती नक्की? ह्यांना काय आवडत असेल तिच्यामध्ये? एकदम धिटाईनं बोलते ती सगळ्यांशी. एवढी धिटाई कुठून आली तिच्यात कोण जाणे? बायकांनी कधी पुरुषांबरोबर असं नजरेला नजर देऊन बोलू नये असं आई म्हणते. पण पुरुषांना तेच आवडतं वाटतं. निदान ह्यांना तरी तेच आवडतं असं दिसतंय. मला कधी जमणार असं? नाही बाई जमणार आपल्याला. आई म्हणायची नवऱ्याला चांगलं अन्न बनवून द्यावं आणि त्याच्या समोर आपली पायरी ओळखून राहावं. तोंड वर करून बोलू नये. चांगल्या बाईचं हेच लक्षण असतं. आईच काय, आजी पण हेच तर सांगायची. पण आता त्यामुळे माझ्यात तिच्यासारखी धिटाई उरलीच नाही. हे समोर आले की माझी मान आपली खालीच जाते. तोंडातून शब्दच फुटत नाही. किती काय बोलावसं वाटतं पण मेली जीभच वळत नाही. तिच्या आईनी नसेल का तिला असं सांगितलं?
कशाला विचार करायचा? पण आज अगदी विचार हटत नाहीयेत मनातून. अगं आई. बोटंच चिरलं. पाण्यात धरते जरा. आईनंच सांगितलं होतं. पाण्यात बोट धरलं की रक्त थांबेल. हे कसं अगदी बरोबर सांगितलं तिनी. तिला सगळं कळतं. धिटाई करणं बरोबरच नाही. त्या दिवशी असंच बोट चिरलं माझं आणि हे धावत आले. माझं बोट हातात घेऊन किती मायेनी औषध लावलं त्याला. त्या एकेका फुंकरीनी अंगावर काटेच येत होते. इश्श! किती लाज वाटली होती मला. नवीनच लग्न झालं नव्हतं का आमचं तेव्हा? मला मात्र काहीच सुचेना. माझा हात पटकन काढून घेतला त्यांच्या हातातून. आणि कामाला लागले. त्यापुढेही थोडा वेळ थांबले होते ते तिथे. मला अगदीच चोरट्यासारखं झालं होतं. मग मीच निघून गेले कपड्यांच्या घड्या घालायलाच बहाणा करून. पण जाताना हळूच पाहिलं तर त्यांचा चेहरा केवढा पडला होता. कसं धस्स झालं तसा चेहरा बघून. काय चुकलं होतं माझं कुणास ठाऊक? पण असं दिवसाढवळ्या हातात हात घेणं म्हणजे काय. चांगलं नाही काही ते. खूप वर्ष हॉस्टेल मध्ये मित्रांबरोबर राहिले ना हे म्हणून असे बिघडले! बिघडले? नाही. थोडंसं चुकीचं वागले! असं हात हातात घेणं म्हणजे बिघडणं का? मला तर खूप आवडलं होतं त्यांचं तसं वागणं. पण त्यांना तसं सांगायला मी काही धजावले नाही! मनातून अगदी आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण चेहऱ्यावर काही हसू सुद्धा दाखवलं नाही मी. उगीच अजून प्रोत्साहन नको द्यायला त्यांना म्हणून. आई म्हणायची आपणच नीट वागावं. नवऱ्याचं वागणं चुकलं तर आपण नीट वागून दाखवावं. मी नेहमीच असं करते. तसंही माझ्या तोंडून शब्द कुठे बाहेर पडतो पटकन? आईची शिकवण पथ्थ्यावरच पडली आहे माझ्या. पण तिचं बरोबरच असेल. ह्यांनाही कळेल केव्हा तरी. पण त्या आधीच मला सोडून तिच्याकडे गेले तर?
गेले तर? त्यांना तिच्याबरोबर जास्त बरं वाटत असेल तर? त्यांचा आनंद नको का पाहायला? जेव्हा तिच्याबरोबर कॉफी प्यायला जातात तेव्हा कसे फ्रेश दिसतात परत आल्यावर. त्यांचा असा हसरा चेहरा मला फार आवडतो. तिच्याशी नुसतं बोलूनच कसे बदलतात हे एवढे? अशी काय जादू आहे तिच्या बोलण्यात? ह्यांना बोलायला खूपा आवडतं. काय काय विषय बोलत असतात. पण मला ह्या कशातच गती नाही. वेगवेगळे देश, तिथली प्रसिद्ध ठिकाणं, वेगवेगळे पिक्चर, त्यांच्या गोष्टी, त्यातल्या एखाद्या पात्राचं वागणं.. करायचंय काय एवढा विचार करून? किती तरी कविता येतात ह्यांना. मला मात्र एकही नाही. कवितेतले अवघड शब्द अगदी कळत नाहीत. मग ह्यांच्या समाधानासाठी 'हो, हो' म्हणावं लागतं. पण माझी चोरी पकडली जातेच. आणि मग परत तोच चेहरा दिसतो मला. हिरमोड झालेला. पूर्वी त्यांनी मला त्यांच्या लहानपणाविषयीच्या किती गोष्टी सांगितल्या. मला खूप आवडल्या. पण माझं मत कशाला विचारायचं त्यावर? मी काही एवढी हुशार आहे का दुसयांचं वागणं चूक की बरोबर ते सांगायला? आणि माझ्याकडे सांगायला आहे तरी काय! आई, बाबा, आजी आणि मी. चारचौघांसारखं गेलं माझं बालपण. सांगण्यासारखं वेगळं असं काही नाहीचे त्यात. ह्यांच्या इतक्या छान गोष्टींसमोर माझी काय कथा?
 
किती हुशार आहेत हे. खूप लवकर आम्ही छोट्या घरातून एवढ्या मोठ्या घरात आलो राहायला. ह्यांच्याच हुशारीमुळे. बोलायला लागले की वाटतं नुसतं बघत बसावं. आणि किती हा चांगुलपणा. माझ्या आई बाबांचं किती करतात. अगदी आपल्या आई बाबांसारखं वागवतात ते घरी आले की. मला सुध्दा काय काय घेऊन देतात. निम्म्या गोष्टी तर मला वापरताच येत नाहीत. पण किती प्रेमानी आणतात. आणि... आणि दहा वर्षात मूल नाही झालं पण मला कधी एका शब्दांनी बोलले नाहीत ते. किती हा मनाचा मोठेपणा... मी खूप सुंदर वाटते त्यांना. पण ती तर देवाची करामत. आई सुंदर म्हणून मी सुंदर. पण मी काही खूप खुश ठेवू शकत नाहीये त्यांना असं वाटतंय. काय चुकतंय काही कळत नाही. आई म्हणते आपण आपल्या मनाशी प्रामाणिक राहून आपलं काम करत जावं. मी तसंच वागते.
 
जाऊ दे. फार विचार नको करायला. बाहेर पाऊस पडला की असं काहीबाही येतं मनात. पावसाचीच चूक आहे सगळी. मी आपली स्वयंपाकघरातच बरी. कामात लक्ष लागलं की असले विचार काही येत नाहीत. एकदा बाहेर बघून येते. अरेच्चा! चहा संपलाय केव्हाच. पण कळलं सुद्धा नाही ह्यांना. पण चेहरा असा का कोमेजलाय?  पाऊस तर आवडतो ह्यांना. मग आज हे असं का? अजून एक चहा देऊ का करून? देतेच.
 
चहा देतीये तर असे का बघतायत माझ्याकडे? किती छान खोल डोळे आहेत ह्यांचे! विचारी! पण चेहरा मात्र किती थकलाय! कशाला एवढा विचार करतात कुणास ठाऊक? आज एकदम छान बिर्याणी करते. भरपूर तूप घालून. सगळा थकवा पळून जाईल. आणि मग मला तो हसरा चेहरा दिसेल..