काय भुललासी --- !

     . काणेकरांच्या बऱ्याच  लघुनिबंधात स्वत: ते आणि  बरोबर गणूकाका असे एक पात्र असे.व या दोघांची जुगलबंदी त्या लघुनिबंधात असे. "काळेपणा,गोरेपणा आणि सौंदर्य" या शीर्षकाचा त्यांचा एक लेख आमच्या पाठ्यपुस्तकात होता. या लेखात गणू काका अगदी ठार काळे तर लेखक त्यामानाने उजळ. गणूकाकांच्या  मते काळे लोक स्वच्छ रहाण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. कारण त्यांना (यातून त्यांचा हीनगंडच दिसून येतो ही गोष्ट वेगळी) थोड्याश्या अस्वच्छतेमुळे आपण अधिकच अस्वच्छ दिसू अशी भीती वाटत असते. गोऱ्या लोकांच तसं नसतं,कारण त्यांना वाटत असतं की आपण थोडेफार अस्वच्छ असलोच तर आपल्या गौर वर्णाच्या बळावर निभावून नेऊ. या त्यांच्या मतावर लेखक त्यांना चिडवण्यासाठी आपला अभिप्राय व्यक्त करताना म्हणतात,"पण काका, उलट असे नाही का म्हणता येणार की आपल्या अंगावरील थोडीशी अस्वच्छताही चट्दिशी लोकांच्या दृष्टोत्पत्तीस येईल म्हणून गोरे लोकच अधिक स्वच्छता पाळत असावेत ? " यावर निबंधाचा शेवट करताना काणेकर लिहितात,"माझ्या या बोलण्यावर काकांनी माझ्याकडे अशा दृष्टीने पाहिले की "मूर्ख आहेस तू ! माझे सिद्धान्त तुला काय कळणार ?" हाच त्या दृष्टीचा अर्थ होता.
     यातील विनोदाचा भाग सोडला तरीही तरीही गोऱ्या रंगाचे आकर्षण आपल्याला असते ही गोष्ट निश्चित ! अगदी लग्नाच्या जाहिरातीतही वधूविषय़ीच्या अपेक्षांत "गौर वर्ण " ही एक अट महत्त्वाची असते. तर काळी मुलगी असेल तर तिचे पालक "गहू वर्ण" या सदरात तिला नोंदवून तिच्या गोरेपणाच्या जवळिकेची ग्वाही देण्यात कसूर करत नाहीत.अपेक्षांमध्ये तरी "मुलगी काळी असावी’असे कोणी म्हणत नाही.त्याचमुळे इंदू बिंदूच्या जोडीस गडकऱ्यांनी "रात्रीसुद्धा त्या (त्यांच्या त्याहूनही अधिक काळ्या वर्णामुळे) उठून दिसतील अशी ग्वाही  देऊन जास्तीत जास्त हास्यास्पद केले आहे.
   एकूण काळ्या रंगाविषयीचा हा दुजाभाव फार पूर्वीपासून आपल्या अंतर्यामी रुजला आहे. माझी आईसुद्धा मूल जन्माला आल्यावर ते काळे की गोरे हे त्वचेवर बोट टोचून पहात असे (असे केल्याने वरून काळे दिसले तरी तेवढ्या भागाची त्वचा थोडीफार पांढुरकी तरी दिसते   )व बोटाखालील त्वचा उजळ दिसली की समाधान पावत असे असे तिनेच सांगितलेले आठवते.अर्थात त्या काळी अनेक मुले होत होती त्यामुळे हा प्रयोग तिला अनेक वेळा करावा लागला व कधी आनंद वा कधी दु:ख यांना सामोरे जावे लागले.पण तो प्रश्न त्यावेळी तेवढ्यापुरताच मर्यादित होता.
    अलीकडे मात्र माध्यमाच्या विपुलतेमुळे व त्यातील जाहिरातींच्या सुकाळामुळे हा गोरे ( उजळ ?)पणाचा प्रश्न अधिक तीव्रतेने ऐरणीवर आला आहे.शिवाय नको त्या गोष्टीत नाक खुपसणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांमुळे त्या प्रश्नाला नको तेवढे बटबटीत स्वरूप आले आहे.सध्या सगळ्या त्वचा उजळ करणाऱ्या पावडरी व लेप यांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर "अभय देऒल" या सेलिब्रिटीनेच धार धरली आहे व अश्या जाहिराती करून त्यांनी काळे गोरे वादास उत्तेजन देऊ नये असे आवाहन त्याने केले आहे.जाहिरातीमुळे मनोवृत्ती कितपत बदलते हा प्रश्न जरी वेगळा असला तरी जाहिरात करणाऱ्या किंवा करणारीची मनोवृत्ती तशी नसावी ही अपेक्षा चुकीची नाही.
       या वर्णभेदाचा फटका अमेरिकेतील कृष्णवर्णियांनाही बसतो. तेव्हां त्यांचा धि:क्कार करण्यात आपण आघाडीवर असतो. अमेरिकेतील कृष्णवर्णियांवरील हल्ल्यास वंशभेदाचा व गुलामगिरीचा आणखी एक पदर आहे.पण आता अलीकडे भारतीय़ांवरही हल्ले होतात त्याचे कारण वर्ण हे बसले तरी या वर्णामुळे अमेरिकन व बाहेरचे हा भेद चटकन लक्षात येतो. व त्यामुळे  हल्ले करण्यासाठी त्यांना लक्ष्य करणे सोपे जाते. या गोष्टीस वर्ण या गोष्टीबरोबरच आणखीही एक बाजू  लक्षात घेण्यासारखी आहे .चिनी किंवा जपानी हेही रंगामुळे नाही तरी त्यांच्या रूपामुळे चटकन उठून दिसले तरी त्यांच्यावर हल्ले होत नाहीत कारण ते ज्या देशाचे नागरिक आहेत ते देश अमेरिकेला पुरून उरणारे आहेत अर्थातच येथे "बळी तो कानपिळी" हा नियमच लागू होतो,
     उक्ती व कृती मधील दुतोंडी वृत्तीबद्दल भारतीयांचा हात कोणी धरू शकेल की नाही शंका आहे. आपले सगळे देव श्रीराम, श्रीकृष्ण, विठोबा श्यामवर्णीय असे आम्ही अभिमानाने सांगतो.श्यामल म्हणजे काळेच ! विठोबाला तर काळ्या म्हणूनही हाक मारण्यात संतांनी धन्यता मानली आहे.आणि प्रत्यक्षात मात्र व्यक्तीचा रंग  काळा असेल तर तिचा तिटकारा करण्यातही आपणही पुढेच असतो असे दिसून आले आहे. अमेरिकेत कृष्णवर्णीय तसेच अलीकडे भारतीयांवरही (अर्थात वेगळ्या कारणामुळे) हल्ले होतात यासाठी  त्यांना नावे ठेवत आपणही कृष्णवर्णीयांवर (ते नायजेरियन आहेत म्हणून) हल्ले करून आपल्या मनातीलही संकुचित वृत्तीच उघड करतो.आणि   आपले नेतेही"आम्ही असा भेदभाव करत नाही म्हणूनच दक्षिण भारतीयांना सामावून घेतले आहे" असा अगदी मनातली संकुचित वृत्ती दाखवणारा अभिप्राय व्यक्त करून एकूणच आपले कल्पना दारिद्र्य दाखवतात. आता आषाढी वारीत ज्ञानोबा तुकारामाचा गजर करताना  आपण मात्र  तुकोबांच्या "काय भुललासी वरलीया रंगा " या उक्तीच्या बरोबर उलट प्रत्यक्ष  व्यवहारात वागतो .हा उक्ती आणि कृतीमधील दुटप्पीपणा दूर व्हायला हवा.