दा.मि.ट !

   दा.मि.ट . म्हणजे काय बुवा या उत्सुकतेने  तरी लेख वाचायला सुरवात केलीत ना ? तर मग माझा एक हेतु सफल झाला.हल्ली "मनोगत" वरील प्रतिसादांच्या दुष्काळामुळे आपला लेख कोणी वाचते का नाही याची शंकाच असते. आणि सगळेच काही एमिली डिकिन्सनसारखे "स्वान्तसुखाय" लिहिणारे नसतात. लेख कोणीतरी वाचावा ही इच्छा असणारच ना !
   तर आता लेख वाचायला सुरवात केल्यावर सांगायला हरकत नाही हे एक लघुरूप आहे.पण खरे तर हल्ली व्हॉटस् ऍप किंवा फेसबुकवरच विहार करणाऱ्या वाचकांपैकी सर्वांनीच हे कश्याचं तरी लघुरूप आहे हे नक्कीच ओळखले असणार. त्यातीलही काही लघुरूपे तर अगदी सर्वज्ञात झाली आहेत. लंबेचवडे शब्द लिहिण्यामागील आळसामुळे किंवा आता वेळच फार कमी असल्यामुळे किंवा संदेश लवकर पाठवला जावा या मानसिकतेमुळे असे होणे अपरिहार्य आहे. असो तर दा.मि.ट. हे आहे केवळ पुरुषाला लाभलेल्या दाढी,मिशा आणि टक्कल या तीन अलंकारांचे पहिले अक्षर घेऊन केलेले लघुरूप ! 
       दाढी ,मिशा हे पुरुषाचे अलंकारच नाहीत का ? नाहीतर विराट कोहली ते अगदी अमिताभ बच्चन अश्या नामवंतांनी इतक्या निगुतीने त्यांची काळजी उगीचच का घेतली  असती ?अब्राहम लिंकन ते राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी त्यांना एका छोकरीने दाढी वाढवण्याचा आग्रह केला , त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होऊन अमेरिकन अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होण्याची तिनं ग्वाही दिली होती.आणि खरेच तसे घडले .अर्थात त्यात त्याच्या दाढी मिशांचा वाटा किती यावर वाद होऊ शकेल.मध्ययुगीन काळात दाढी आणि मिश्या हा पुरुषाच्या अभिमानाचा विषय समजण्यात येत असे.छ.शिवाजी महाराज,त्यांचे पिता शहाजी महाराज व पुत्र संभाजी राजे यांची दाढी मिशांशिवाय कल्पनाही आपण करू शकत नाही. पु . ल . देशपांडे यांनीही खेड्याच्या ठिकाणी नाटक बसवताना त्यात श्रीचे काम करणाऱ्या पुरुषपात्राने मिश्या काढण्यास नकार दिल्याचा किस्सा सांगितला आहे त्याचे कारण विचारता त्याने "माझा बा जित्ता आहे असे दिले होते आणि प्रेक्षकानीही त्याचा बा जित्ता आहे याची जाणीव राखून त्याच्या कामाचे कौतुक केले होते .
       आपल्या दाढी मिश्यांच्या लांबीमुळे वा विशिष्ट आकारामुळे गिनेस च्या जागतिक विक्रमात नोंद करणारे बहाद्दरही आहेत.अश्या व्यक्तींच्या दाढी मिश्यांचे अगदी प्रदर्शन घडवून त्यातील उस्तादांचा गौरवही करण्यात येतो. दाढीमिश्यांच्या आकार व प्रकाराची स्पर्धा दर दोन वर्षांनी भरते.तिचा प्रारंभ इटालीमध्ये १९७० मध्ये झाला व त्यानंतर जर्मनी,नॉर्वे,स्वीडन,अमेरिका,ब्रिटन अश्या सर्व देशांमधून एक वर्षा आड या स्पर्धा भरत आल्या आहेत.या वर्षीही ती स्पर्धा १ ते ३ सेप्टेंबर या काळात अमेरिकेतील ऑस्टिन या टेक्सास स्टेटमधील शहरात होणार आहे.
    ज्या आपल्या देशात दाढी मिश्यांना शिवकालात इतका मान होता त्याच भारतात मधल्या काळात त्या गोष्टीकडे दुर्लक्षच झाले म्हणावे लागेल पण  आता पंतप्रधानानीच मनावर घेतल्यावर मग काय विचारता ? निरनिराळ्या क्षेत्रातील नामवंतांनीही ही बाब चांगलीच मनावर घेतलेली दिसतेय. त्यात क्रिकेटपटूंचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.मॅच हरल्यावर मिशा पाडण्याची व जिंकल्यास त्या वर उचलून पिरगाळण्याची सोय त्यात आहे. 
      दाढी मिश्यांच्या बाबतीत भारत अजून विकसनशील देशांतच जमा होत असला तरी अगदी कोवळ्या वयात ( वयाच्या २४ व्या वर्षी )अधिक लांबीच्या दाढी मिश्या असणारी युवती मात्र तिच्या हरनाम कौर या नावावरून  जरी ती अमेरिकेत बर्कशायर येथे रहात असली तरी भारतीय वंशाची असावी असे वाटते आणि ही बाब भारतातील दाढी मिश्यांवाल्यांनी मिशा ताठ कराव्या अशीच नाही का? अर्थात त्या युवतीच्या दाढी मिश्यांची लांबी तिच्यासारख्याच दाढी मिश्या असणाऱ्या जगातील स्त्रियांच्या तुलनेमधील आहे. हो ! जगात अश्या स्त्रिया आहेत की ज्यांना दाढी आणि मिश्याही आहेत.आणि २१ व्या शतकात त्यांची संख्या वाढत्या प्रमाणात आहे. स्त्रियांना दाढी मिश्या आल्या तरी त्यामुळे लाज वाटून त्या शक्यतो दिसू नये या दृष्टीने त्यांनी त्यांची विल्हेवाट लावणे हे अपरिहार्य होते पण काही स्त्रियांना ते शक्य न झाल्याने त्यांना त्या वाढू देणेच इष्ट वाटलेले दिसते आणि सुदैवाने त्या दाढी मिश्यांसह  स्वीकारणारे पुरुषही काहींना लाभले हेही कौतुकास्पद ! ओरेगॉनमधील ४३ वर्षाच्या रोझ गेल या स्त्रीने २५ व्या वर्षापर्यंत दाढी करून आपला चेहरा गुळगुळीत ठेवून आपला हा कमीपणा झाकण्याचा प्रयत्न केला.अनावश्यक केसांच्या या वाढीमुळे तिचा आत्मविश्वास कमी झाला,समाजात वावरणे अवघड झाले पण तिची त्वचा अतिशय नाजुक होऊन त्यावर कुठलाही धातूचा स्पर्श करणे कठीण झाल्यावर तिला नाइलाजाने दाढी मिश्या वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला व तिने त्या मिरवायला सुरवात केल्यावर तिचा आत्मविश्वास वाढला.तिच्या आईने तिला याबाबतीत खूपच पाठिंबा दिला. 
    पण टक्कल या खरे तर व्यंगास केवळ पुरुषाचा अलंकार म्हणणे कितपत योग्य आहे असा सवाल कोणीही करेल. टक्कल हे फक्त पुरुषांनाच पडते आणि स्त्रियांना नाही का असाही प्रश्न काही पुरुष विचारतील.पण टक्कल स्त्रियांना फार कमी पडते ही गोष्ट खरी. जन्मत: डोक्यावर मुळीच केस नसलेल्या बालिका असू शकतात पण पुढे त्यांना (डोक्यावर)भरघोस केस उगवतात.
     पुरुषाचे टक्कल बहुधा शिरोभागाशी सुरू होऊन हळू हळू ते पसरत पूर्ण मस्तकाचा ताबा घेते.बहुधा टक्कल पडायला लागण्याची वर्दी आपण ज्याच्याकडे आपला केशभार हलका करण्यासाठी आपले मस्तक देतो तो कारागीरच देतो. आपले डोके प्रेमाने कुरवाळताना एकदम चमकल्यासारखे दाखवून आणि खरे तर आपल्यालाच चमकायला लावून  तो "साहेब वरचे केस कमी व्हायला लागलेत."असा हलक्या आवाजात इशारा देतो तेव्हां लगेचच त्याच्यावर विश्वास ठेवणे आपल्याला जड जात असते कारण नुकतेच आपण आपल्या दाट केसावर कंगवा फिरवलेले आपल्याला आठवत असते. पण मग तो  आरसाच डोक्यामागे फिरवून अल्प स्वरूपात दिसणाऱ्या गोलघुमटाचे दर्शन आपल्याला घडवतो तेव्हां या अलंकाराचे उच्चाटण करण्याच्या पद्धतींचा आपण विचार करू लागतो. पूर्वी दररोजच्या पेपरमध्ये कधीच लक्ष दिल्या न जाणाऱ्या केशवर्धक व टक्कलनाशक औषधांच्या किंवा उपायांच्या जाहिराती आपले लक्ष वेधून घेऊ लागतात, त्यात पूर्वी म्हणजे गोलघुमटदर्शक मस्तक व नंतर म्हणजे अगदी भरघोस केसाने व्यापलेले असे दोन फोटो हटकून असतात ते एकाच व्यक्तीचे असतात पण ते फक्त पूर्वी व आत्ता या शब्दांची फिरवाफिरव करून छापलेले असतात ही गोष्ट ध्यानात आली तरी ती मनावर घेण्याची आपली इच्छा नसते आणि एका अनावश्यक आणि परिणामी व्यर्थ ठरणाऱ्या खर्चाची टाच आपल्या खिशाला बसते आणि खिशाला लागलेल्या गळतीमुळेच की काय डोक्यावरील केसांची गळती आणखीच वाढते आणि प्रत्येक वेळी आपल्या केश कर्तन कारागिराचे काम आपण अधिकाधिक हलके करत आहोत याची जाणीव त्याच्याकडूनच आपल्याला मिळत रहाते.
     कधी कधी टकलाची सुरवातच समोरून झाल्यावर बरेचजण मागे वाढणारे केसच अधिक वाढवून त्यांचे आवरण या केशविहीन मस्तकावर चढवून आपल्या टकलाचे गुपित काही काळ उघड होऊ देत नाहीत पण जसजसे त्याचा विस्तार वाढू लागतो तसतशी ही त्यांची क्लुप्ती लागू होण्याची शक्यता मावळते. काही पुरुष मात्र आपल्या टक्कलाला अलंकारासारखे मिरवतात.अगदी भरघोस केस असूनही डोक्याचा तुळतुळीत गोटा करण्याची पद्धत टिळक, आगरकर काळात होतीच की.आणि सध्याही काही नट सिनेमासृष्टीत आपल्या टक्कल या वैशिष्ट्यामुळेच अधिक मागणी असलेले आहेतच ना
   टक्कल हे अलंकार आहे या माझ्या समजुतीला केवळ माझे टक्कलशोभित शिरकमल हेच कारण असावे असे समजणाऱ्या वाचकांना माझा एक अनुभव सांगितल्यास माझ्यावर हा आरोप होणार नाही.माझ्या एका मित्राच्या मुलाचे नुकतेच लग्न बरेच लांबले.खरे तर त्याला कारण त्याचे शिक्षणासाठी अमेरिकागमन हे होते.पण त्याच्या आई वडिलांना मात्र आपल्या मुलाला टक्कल आहे म्हणूनच चांगली बायको मिळत नाही असे वाटत होते त्यामुळे त्या मुलापेक्षाही तेच त्याचे टक्कल नाहीसे व्हावे म्हणून अधिक प्रयत्नशील होते.त्याच काळात केशारोपण हा उपाय त्यांच्या निदर्शनास आला व त्या उपायाने आपल्या मुलाच्या डोक्यावर भरघोस केस उगवलेले पहावे असा त्यांचा मनोदय झाला. परदेशी असणारा त्यांचा मुलगा भारतात आल्यावर त्याला मुली दाखवणे या कार्यक्रमाबरोबरच केशारोपणाचा प्रयोग त्याच्या (डोक्या)वर करण्याचेही नियोजन त्यांनी केले होते. त्यांनी पाहून ठेवलेल्या मुलीच्या स्थळांना त्याने भेटी दिल्या आणि योगायोगाने त्यातील त्याला एक पसंत पडली आणि तिलाही तो !
        लग्न ठरले पण आईवडिलांनी अगोदरच ठरवल्याप्रमाणे लग्नापूर्वी त्याचे केशारोपण करायचे ठरवलेले  पूर्वनियोजनाप्रमाणे त्यानी पार पाडले.केशारोपण नाही म्हटले तरी बरेच त्रासदायक होते.(एक प्रकारची शस्त्रक्रियाच ती, शिवाय त्यासाठी मुलीकडून हुंडा मागणेही योग्य नसते.) लग्न पार पडले आणि नववधू व त्यांचा मुलगा एकमेकांस प्रथम एकांतात भेटले तेव्हां तिने पहिला प्रश्न टाकला " हे काय तू केस कशाला लावून घेतलेस? " यापुढील तिचे उद्गार ऐकल्यावर मात्र त्याला "हेचि फळ काय मम तपाला" असे वाटले कारण ती म्हणाली, "मी त्यापूर्वी तुला पाहिले तसाच तू चांगला दिसत होतास." थोडक्यात टक्कलही कधी कधी आणि काही काही जणांना शोभून दिसू शकते म्हणजे त्याला अलंकारच म्हणायला नको का ? दामिट (डॅम इट ) म्हणून लेख वाचणे तुम्ही बंद करण्यापूर्वी संपवणेच इष्ट ठरेल.