जुलै १४ २०१७

समाधान

    सकाळी ९.३० ची वेळ. सुलेखाची ऍक्टिवा हायवेवरून धावत होती. ऑफिसला वेळेत पोचायची धडपड करत. शनिवार-रविवारची सुटटी झालेली. त्यामुळे सकाळपासून मनाविरुद्ध शरीर सगळी कामे उरकत होते. आणि शेवटी एकदाची ती निघाली होती. रोजच्याप्रमाणे आजही 'मारावी ह्या नोकरीला लाथ' असा विचार तिच्या मनात येऊन गेला होताच. त्यात आज आहनाच्या शाळेची सहल गेली होती आणि ‘आई, आज तू घ्यायला ये’ असा हट्ट तिने धरला होता. आता हे सगळे गणित कसे जमवायचे हा विचार करतच तिने गाडी पार्क केली. कार्ड स्वाइप करून आत शिरतेय तोच आशिष धावत आला आणि म्हणाला, 'अग लवकर अनुपमाला पिंग कर. तिचे ४ कॉल्स येऊन गेले तुझ्यासाठी'.
    आता आज काय वाढून ठेवलय ह्या विचारातच तिने लॉगीन केले आणि अनुपमाला पिंग केले. अनुपमा, सुलेखाची मॅनेजर घरून काम करायची. अनुभवी आणि क्रिटिकल रिसोर्स असल्यामुळे तिला ही सुविधा देण्यात आली होती. अनुपमाचे धडाधड मेसेजेस आले.शुक्रवारी रिलीज केलेले सॉफ्टवेअर क्लाएंट लोकेशनवर चालत नाहिये. आय नीड टू टॉक टू यू. मग लगेच स्काइप कॉल आलाच आणि प्रश्नांचा भडिमार सुरू झाला. अस कस झाल? तुझ्या टीमच टेस्टिंग पूर्ण झाल होत ना? तू रिव्ह्यू केल होतस की नाही? तुमच ना हल्ली कामात लक्षच नसत. मी आता एच आरला सांगून ते फेसबुक, व्हॉटसॅप सगळ बंद करायला सांगणारे. हे आणि अस बरच काही.
    नक्की काय चुकलय हे न शोधता हायपर होऊन बंबार्डिंग करत सुटणे ही अनुपमाची जुनी सवय होती. पण बॉसच कधीच काहीच चुकत नसत, त्यामुळे तिला कोणी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. सुलेखाने कसेबसे तिला शांत केले आणि काय झालय ते पाहून २तासात अपडेट करते असे सांगितले. खरे तर टेस्टिंग चांगले झाले होते. टीमने व्यवस्थित काम केले होते. सुलेखाने रिव्ह्यूपण बारकाईने केला होता. त्यामुळे उलट क्लाएंटकडून चांगला फीडबॅक येईल अशा अपेक्षेत ती होती आणि झाले होते भलतेच.
    आता पुन्हा सगळे टेस्टिंग करायचे म्हणजे इतर कामे मागे पडणार होती. त्यांचीही डेडलाइन जवळ येत होती. अनुपमाला तर २तासांत उत्तर द्यायचे होते. विचार करून तिच्या डोक्याचा पार भुगा झाला होता. त्यात मध्येच आहना सहलीला नीट पोचली असेल ना,टीचरबरोबरच असेल ना, कुठे हरवणार तर नाही ना अशा नको त्या विचारांनी काळजाचे पाणी होत होते. 
    हे सगळं सहन न झाल्याने तिने हर्षदला मेसेज केला. 'आनूची ट्रिप गेलिये. नीट असेल ना ती'. त्याचा नेहेमीप्रमाणे तिला शांतकरणारा रिप्लाय आला. 'डोंट वरी. ती मस्त मजा करत असेल. उगाच काहीतरी विचार करत बसू नको'.
    आहनाचं हे शाळेचं पहिलं वर्ष. त्यामुळे ट्रीपही पहिलीच. म्हणून सुलेखाला काळजी वाटत होती. पण हर्षदशी बोललं की तिला बरंवाटायचं. तसं आत्ताही वाटलं. तेवढ्यात स्काईप वाजलं आणि ती भानावर आली. अनुपमाला दिलेल्या २ तासांतली १५ मिनिटं निघूनगेली होती. मग तिने आशिषला बरोबर घेतलं आणि टेस्टिंग पुन्हा सुरू केलं. आशिष टीममध्ये सर्वात अनुभवी होता.
    सर्व पाहत बसणं शक्य नव्हतं त्यामुळे महत्त्वाच्या फंक्शनॅलिटीज पहायला घेतल्या. कुठेच काही इश्यू नव्हता. मग अजून थोडंखोलात जाऊन तपासलं. पण सगळं जागच्या जागी होतं. तोपर्यंत दीड तास होत आला होता. तेवढ्यात आशिष म्हणाला, 'आपण जीइनिशिअल सेटिंग्जची फाइल पाठवली होती, ती सेटिंग्ज केली असतील ना त्यांनी? कारण ती केली नाहीत तर सॉफ्ट्वेअर हवे तसेचालणार नाही. " पण सुलेखाला तसं वाटलं नाही. हे सॉफ्ट्वेअर ते बरेच महिने वापरतायत. आत्ता दिलं ते फक्त त्याचं अपडेटेड व्हर्जनहोतं. त्यामुळे ही सेटिंग्ज काही त्यांच्यासाठी नवीन नाहीत. पण बाकी काहीच मिळत नाहिये आणि शंकेला जागा नको म्हणून तिने हीसुद्धा शक्यता पडताळून पहायचं ठरवलं.
    तिने अनुपमाला ईमेलमधून आशिषची शंका बोलून दाखवली. अनुपमाने बाकी काही न करता फक्त ते ईमेल क्लाएंटला फॉर्वर्ड केलं.मॅनेजरला दुसरं काम तरी काय असतं म्हणा. तोपर्यंत १२.३० झाले होते. म्हणजे क्लाएंटकडे रात्रीचे १२/१२.३०. आता ह्या वेळी तिथेकुणी जागं असेल का? ह्या विचारात सुलेखा होती. नसेल तर त्यांचं उत्तर मिळायला रात्रीपर्यंत वाट पाहावी लागणार होती. मनातून तिला थोडं बरंही वाटलं. बॉल आता त्यांच्या कोर्टात आहे. त्यामुळे जरा वेळ तरी निवांतपणा मिळेल. तेवढ्यात आरती 'लंचला चल'म्हणून बोलवायला आलीच. आरती सुलेखाची खास मैत्रिण. दोघी एकाच दिवशी जॉइन झाल्या होत्या. वेगवेगळ्या प्रोजेक्टसमध्ये कामकरत असल्या तरी लंच टाईम त्यांचा हक्काचा होता.
    लंच करून आल्यावर लॉगीन करून आता आजचे काम हाती घ्यावे ह्या विचारात सुलेखा होती. आल्यापासूनचा सगळा वेळ क्लाएंटइश्यूमध्येच गेला होता. तेवढ्यात कानात आनूचा आवाज घुमला. 'आई, आज तू मला घ्यायला ये. व्हॅन काका नकोत.' ट्रीप ४ वाजता येणार होती. इथून ३.३०ला तरी निघायला हवे होते. आल्यापासून जे काही चालले होते त्यानंतर अनुपमाला 'मला लवकर जायचे आहे'हे सांगण्याची हिंमत होत नव्हती. सुलेखा ६ जणांची टीम हँडल करत असली तरी तिलाही अनुपमाला अगदी विचारावे नाही तरी सांगावे लागायचेच. काय करावे ह्या विचारात असतानाच इनबॉक्समध्ये अनुपमाचे ईमेल येऊन धडकले. 'आता काय नवीन' असा विचार करतचतिने ते उघडले. FYI... आणि खाली क्लाएंटचे फॉरवर्डेड ईमेल होते. 
    "आमचा टेस्टिंग करणारा नेहेमीचा इंजिनिअर रजेवर असल्यामुळे दुसऱ्या प्रोजेक्टच्या इंजिनिअरने टेस्टिंग केले. त्याला अशी काहीसेटिंग्ज करायची असतात ह्याची कल्पना नव्हती. ती केल्यावर सॉफ्टवेअर उत्तम चालत आहे. सॉरी फॉर द इंकविनिअन्स कॉज्ड अँडथँक्स फॉर द क्विक रिस्पॉन्स. " अशा आशयाचे ते ईमेल होते. ते क्लाएंट असल्याने त्यांनी अजून काही लिहिणे अपेक्षितच नव्हते.त्यांनी सॉरी लिहिले हेच जास्त होते.
    ते वाचून सुलेखाचे डोळे पाण्याने भरले. असे झाले की तिला स्वतःचाच राग यायचा. एवढ्याशा गोष्टीसाठी रडू काय येतंय... पणतिने तिच्या कामात कसूर ठेवली नव्हती ह्याची पावतीच होती ती.
    तेवढ्यात अनुपमाचा मेसेज. आज काय काय कामे प्लॅन केली होती ती सुरू करा. तो इश्यू आता रिझॉल्व झालाय. गुड जॉब!..... एवढ्या सगळ्या झकाझकीनंतर अनुपमाचे हे दोन शब्द म्हणजे मे मधल्या रणरणत्या उन्हात पावसाचे २ थेंब अंगावर पडावे तसंचसुलेखाला वाटलं. संधी साधून तिने 'आज मला लवकर जायचं आहे' हे सांगून टाकलं. टीमला कामं देऊन मी जाईन आणि बाकी काहीराहिलं असेल तर घरून थोडा वेळ लॉगीन करेन हेही सांगायला ती विसरली नाही. इकडे आशिषलाही तिने 'तुझी शंका खरी ठरलीआणि आता सगळं ओके आहे. वेल डन. ' असा मेसेज टाकला. तोपर्यंत अनपेक्षितरीत्या लगेचंच अनुपमाचा 'ओके. नो प्रॉब्लेम. ' असा रिप्लाय आला. कदाचित इश्यू सॉल्व झाल्याने तिचाही मूड चांगला झाला असावा. 
    सुलेखाला आनूचा हसरा चेहेरा समोर दिसायला लागला. तिने भराभर सगळ्यांना कामे नेमून दिली. तिचीही कामे उरकायला सुरुवात केली. ३ वाजता टीमला 'मी लवकर निघत आहे. काही लागले तर फोन करा' असे ईमेल केले. ३.३०च्या जरा आधीच निघाली. ऍक्टिवाला किक मारून ५ मिनिटे आधीच शाळेत पोचली. गाडी पार्क करत असतानाच आनूची बस गेटमधून आत शिरली.एकेकाला हात धरून टीचर खाली उतरवत होत्या. सुलेखा समोरच उभी होती. टीचरला धरून आनूने एक उडी मारली आणि तिची भिरभिरती नजर आईला शोधू लागली. आपण आईला सांगितलंय म्हटल्यावर आई येणारच हा विश्वास तिच्या डोळ्यात दिसत होता.तेवढ्यात सुलेखा तिच्या नजरेस पडली आणि धावत येऊन आनू तिच्या मिठीत शिरली.
    गाडीवरून घरी येईपर्यंत अखंड आनूची बडबड सुरू होती. ट्रीपमध्ये काय काय झालं, काय मजा केली, खाऊ काय होता असं बरंच काही. सुलेखालाही ऐकताना खूप छान वाटत होतं. 
    आनूचा चेहेरा आनंदाने खुलला होता आणि सुलेखाचा चेहेरा समाधानाने. ऑफिस आणि तिचं पिल्लू.. दोघांच्या अपेक्षा पूर्ण केल्याचं समाधान तिच्या चेहेऱ्यावर झळकत होतं....
  
                                                                                                                                                                                  

                                                                                                                                                                                                (समाप्त)
    
 

Post to Feedछान वाटलं वाचून
मॅनेजर

Typing help hide