ती सध्या काय करते ?

         आपण किती पुढचा विचार करतो यापेक्षा किती पुढचा विचार करावा हा प्रश्न अधिक मौलिक आहे.आमच्या घराण्यात घर बांधणारा मी पहिलाच पुरुष त्यामुळे औरंगाबादला घर बांधताना माझी आणि माझ्या पत्नीची आणि माझीही कल्पना होती की आम्ही आणि आमची मुले आम्ही नेहमीच एकत्र रहाणार.म्हणून अगदी सगळ्यांना व्यवस्थित पुरेल असे घर आम्ही बांधले शिवाय वाटण्या करायच्या झाल्याच तर प्रत्येकास समान वाटा यावा अशीही काळजी बांधकाम करताना घेतली होती पण या सगळ्या दक्षतेचा काही उपयोग झाला नाही."आकाशी झेप घे रे पाखरा " हे गीत आमच्या मुलांनी अगदी पाळण्यातच ऐकल्यामुळे शक्य झाले तेव्हां त्यांनी घराबाहेर झेप घेतली.धाकटा तर प्रथम मुंबईस आणि दोन वर्षात अमेरिकेसच जाऊन बसला.तर मोठा थोडे दिवस आमच्याजवळ राहिला हेच फार झाले असा विचार करून पुण्यास जाऊन बसला तो परत औरंगाबादला येण्याची शक्यता दिसेना त्यामुळे मी सेवानिवृत्त झाल्यावर औरंगाबादला आम्ही दोघेच राहिलो.शेवटी असे दोघानीच रहाण्या ऐवजी सगळ्यानी रहाण्यासाठी बांधलेल्या घरात आम्हीही न रहाण्याचा निर्णय घेतला.
         हा निर्णय पत्नीच्या दृष्टीने अवघड होता कारण मी कोठेही गेलो तरी तेथीलच बनून रहातो तसे तिचे नाही,शिवाय घर बांधताना तिनेच फार कष्ट उपसलेले,त्याभोवती हौसेने बाग फुलवलेली,शेजार पाजार या सगळ्या गोष्टी सोडणे तिला कसे काय जमेल असे वाटत होते पण नातवाच्या आगमनामुळे या सगळ्या गोष्टी गौण ठरल्या आणि तिलाही घर.बाग.शेजार यापैकी कोणत्याच गोष्टीचा मोह अडवू शकला नाही आणि अशा रीतीने आम्ही पुण्यास स्थलांतरित झालो अगदी चक्क औरंगाबादचे घर विकून टाकून.
           आश्चर्य म्हणजे पुण्यात आमच्या रहाण्याच्या जागेजवळच माझे बरेच बालमित्र रहात होते.त्यांचा शोध हळूहळू लागत गेला,म्हणजे मी फिरायला सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी ओळखीचा चेहरा दिसायचा आणि मग तो शाळेत माझ्या वर्गात असलेला मित्र अथवा मैत्रिण निघायची.अशा मित्रांचा आमचा चांगलाच मोठा जथा झाला आणि मला वाटले या भागात जर इतके गाववाले जमू शकतात तर समस्त पुण्यात खूपच असतील. आमच्या वर्तुळात यावर चर्चा झाली तेव्हां प्रत्येकाला माहीत असलेले किमान दहाजण तरी निघाले मग सर्व एकत्र जमले तर सर्वांना इतक्या वषांनी भेटायला किती आनंद होईल अशी चर्चा चाले.
         नुसती चर्चा करण्यापेक्षा काहीतरी कराव अस वाटून मी सहज एका वृत्तपत्रात एक निवेदन दिले आणि त्यात आमच्या ग्रामबंधुभगिनींचा मेळावा घेण्याचा विचार मांडला व माझ्या दूरध्वनी कमांकावर वा पत्त्यावर संपर्क साधायला सांगितले.आश्चर्य म्हणजे अशा आवाहनाला काय प्रतिसाद मिळेल अशी शंका उपस्थित करणाऱ्या सर्वांनाच अगदी आचंब्यात पाडणारा असा भरभरूब प्रतिसाद मिळाला.केवळ पुण्यातीलच नव्हे तर पुण्याबाहेरीलही लोकांनी यायची तयारी दाखवली. 
        एक दिवस असाच माझा फोन खणखणला आणि पलीकडून एक जाडाभरडा आवाज आला,"अण्णा,मी वाल्या बोलतोय "पण माझ्या डोक्यात प्रकाश न पडल्यामुळे, "वाल्मिक इंगळे मी सुहासचा क्लासमेट.तुम्ही फार चांगला उपक्रम सुरू केलाय मी पण येणार आहे." येवढा संवाद होऊन फोन बंद झाला आणि मी हा वाल्या कोण याचा विचार करत बसलो.आणि एक दिवस चक्क वाल्याच माझ्यासमोर उभा राहिला आवाजासारखाच खडबडीत व्यक्तिमत्वाचा.आणि मग त्याला कधीतरी माझ्या धाकट्या भावाबरोबर पाहिलेले आठवले. माझा भाऊ माझ्यापेक्षा वयाने चांगला सात वर्षांनी लहान असल्याने त्याच्याकडे आणि त्याच्या वर्गमित्रांकडे आम्ही चिल्लेपिल्ले म्हणूनच पहात होतो शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वाला काही आकार येण्यापूर्वीच मी पुण्यास महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेल्यामुळे तर मी त्याना पारच विसरून गेलो होतो. 
         वाल्याचे नाव वाल्मिक होते पण लहानपणापासून त्याची वाल्या ही ओळखच आम्ही गाववाल्यानी लक्षात ठेवली.वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे कुणी फारसे मनावर घेतले नव्हते त्यामुळे मित्रमंडळीत अजून तो वाल्या म्हणूनच ओळखला जाई.वाल्यालाही वाल्मिकीप्रमाणेच काव्याचे चांगले अंग होते आणि आमच्या गाववाल्यांच्या स्नेहसंमेलनातही त्याने आपल्या काब्यगायनाने सगळ्याना अगदी खूष केले.
       वाल्या असा माझ्या ध्यानात राहिला आणि मधून मधून भेटतच राहिला. मधून मधून त्याचा फोनही येई आणि हटकून सुहास कसा आहे अशी चौकशी होई.तरीही तो कधी घरी आला नव्हता.अर्थात मी जरी सेवानिवृत्त झालो असलो तरी बाकी मंडळी अजून आपले व्यवसाय, धंदे संभाळत असल्यामुळे त्यानी भेटायला यावं अशी इच्छा असली तरी त्यांना ते शक्य न झाल्याचे मला दु:ख नव्हते.त्यामुळे त्यादिवशी त्याचा फोन घरी येतो असा ऐकून आश्चर्यच वाटले व आनंदही झाला.
"अण्णा," मला सुहास अण्णा म्हणत असल्याने त्याचे दोस्तही त्याच नावाने बोलवायचे."मुलाच लग्न काढलय आल पाहिजे"असा त्याचा आग्रहाचा फोन आला आणि पाठोपाठ तोही आला बरोबर आपल्या चिरंजीवास घेऊन.इतक्या आग्रहाने बोलावल्यावर त्या लग्नास न जाणे शक्यच नव्हते.
      लग्न होते बऱ्याच दूर असलेल्या हॉलमध्ये अर्थात माझ्या दृष्टीने गैरसोयीचा असला तरी त्याच्या दृष्टीने सोयिस्कर होता.हॉल गैरसोयीचा आहे या कारणासाठी न जाणे योग्य दिसले नसते.माझ्या बायकोने मात्र इतक्या दूर येणार नाही अशी पहिल्यापासूनच माघार घेतली आणि त्यासाठी तिला आग्रह करणे योग्य नव्हते.शिवाय बऱ्याच बालमित्रांची गाठ पडण्याचे आमिष मला खुणावत होते.जवळचे आणखी दोन मित्र येणार होतेच.मुलाची कार असली तरी चालवायला कोणाला येत होती ? त्यामुळे अर्थातच रिक्षानेच आम्ही गेलो.
        बऱ्याच दूरच्या त्या हॉलमध्ये  आम्ही अगदी वेळेवर पोचलो.मात्र तेथे पोचल्यावर मुहूर्त हा फक्त कार्य आजच होणार आहे हे सिद्ध करण्यापुरताच केवळ देण्यात आला आहे हे मला समजले.अशा कार्याची मला संवय नव्हती अशातला भाग नव्हता.अगदी माझ्या मुलाच्या अमेरिकेत गेलेल्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाला आम्ही गेलो तेव्हां मुहूर्ताची वेळ टळून गेली तरी मंडपात मुलाचा पत्ता नव्हता आणि कारण विचारले असता जो बॅंड मुलीच्या वडिलांनी बोलावला होता तो नवऱ्या मुलाला पसंत नव्हता त्यामुळे तो लग्नमंडपात यायला तयार नव्हता असे कळले.बराच वेळ वाट पाहून शेवटी कंटाळून आम्ही घरी परतलो.शेवटी ते लग्न संध्याकाळी केव्हांतरी लागले असे कळले.त्यामानाने वाल्याचा मुलगा व त्याची वाग्दत्त वधू तसेच सगळे नातेवाईक हजर होते,मात्र बौद्ध भिक्षूंच्या मंगल आशीर्वादात लग्न लागायचे असल्याने व ते आशीर्वाद बरेच दीर्घ असल्याने लग्नास उशीर होत होता.
           आम्ही सगळे गाववाले एकत्र बसून गप्पा मारत होतो शिवाय सगळेच एकएकटे असल्यामुळे गप्पांवर सेन्सार करायलाही कोणी नव्हते.तेवढ्यात सतिश तेथे आला आणि गप्पांना रंग चढला.,"अरे गोट्या,मंदी मला भेटली होती आणि तुझी आठवण काढत होती." मी एकदम चमकलो मला गोट्या म्हटले म्हणून नाही तर मंदीच नाव जवळ जवळ चाळीस पन्नास वर्षानी प्रथमच कानावर पडत होत म्हणून.आमच गाव जरी लहान असल तरी भानगडफेमही होत.बरीच छोटीमोठी प्रकरण गावात चालत पण प्रकरणात गुंतलेल्यांना मात्र आपण अगदी गुपचुप भेटत आहोत अस वाटायच आणि प्रत्यक्षात ती बातमी गावात केव्हांच पसरर्लेली असायची.   
        त्यामुळे मंदी आणि मी भेटतो याला मी जबाबदार नसलो तरी याबाबतीत मी काय सांगतो यावर कोणी विश्वास ठेवील असे मला वाटत नव्हते. त्यावेळी मी एकनाथबुवांकडे तबला शिकायला जात होतो.बुवांची एक मुलगी होती जवळ जवळ माझ्याच वयाची तीच मंदी.जर मला कधी बुवांकडे जायला उशीर झाला तर ते तिला मला बोलावण्यासाठी पाठवायचे.त्या वयात आमच्या घरात किंवा बुवांच्या घरात या गोष्टीचे कुणाला काही विशेष वाटायचे नाही पण मला मात्र ती बोलवायला आली की उगीचच लाज वाटायची.तसे ती आली की काहीतरी वेगळे आणि छानही वाटायचे ही गोष्ट वेगळी. आणि तीही पण होती मोठी ठसकेबाज ! तिच्या बरोबर मी निघालो की उगीचच अंगाला अंग घासायची, लाडे लाडे बोलायची.मी शक्य तो न बोलण्याचा प्रयत्न करायचो तर ती मुद्दामच काहीतरी प्रश्न विचारायची.मी कसाबसा तिच्याबरोबर शक्य तो कमीतकमी बोलण्याचा प्रयत्न करत तिच्यापासून शक्यतो दूर रहाण्याचा प्रयत्न करत बुवांकडे पोचायचो पण आमच्या या वरातीचा सुगावा आमच्या टवाळ मित्रांना बरोबर लागायचा आणि नंतर माझी गाठ पडली की,"काय गोट्या काय म्हणतेय मंदी ?मजा आहे बुवा तुझी !" अशा त्यांच्या टवाळीला मला तोंड द्यावे लागे.
     मंदीला मात्र जणु या गोष्टींची कल्पनाच नव्हती.ती अगदी बिनधास्तपणे माझ्याबरोबर यायची इतकेच काय पण बुवांच्या घरी असेपर्यत माझ्या तबलाशिक्षणाकडे तिच लक्ष असायच.मी शाळेत जाताना तिच्याच घरावरून जात असल्यामुळे ती जणु पाळतीवर असल्याप्रमाणे मी तिच्या घरावरून जातानाच घराबाहेर पडायची आणि मग माझ्याबरोबर गप्पा मारतच शाळेत यायची.शेवटी तिची ब्याद टाळण्यासाठी मी माझा शाळेत जायचा रस्ताच बदलला.तरीही एक दिवस ती समोरूनच आली आणि तिला टाळणे मला जमले नाही,
"काय रे गोट्या,,माझ्याशी अगदी बोलायचे नाही का ?"
"कुठ काय तसं काही नाही " मी उगीचच वेड पांघरल्याचा आव आणून म्हणालो.
"तुम्ही काय बुवा हुषार लोक आमच्याशी कश्याला बोलताय " म्हणून ती निघून गेली     मलाही जरा आपण तिला उगीचच तोडतोय असं वाटू लागलं.
     पण जसे आम्ही मोठे होत गेलो तसा मात्र यात एकदमच फरक पडला म्हणजे आता मंदीचे बरोबर येणे मला आवडू लागले. म्हणजे पूर्वीही आवडत नव्हते असेच काही म्हणता येणार नाही पण मी वर वर तरी तसे दाखवत होतो,आता मात्र तिने बोलावे असे वाटू लागले होते आणि आता ती मात्र पूर्वीसारखी मला बोलवायला येईनाशी झाली,उलट आता ती मला टाळतेच आहे असे वाटू लागले. कधी कधी ती समोरून जात असली तरी माझ्याशी न बोलता सटकू लागली.शेवटी एक दिवस मीच तिला हटकले आणि म्हटले,’आताशा माझ्याशी बोलत नाहीस मंदे,"
 "ते तुला नाही कळायच नंदू." मला गोट्या या नावाने हाक मारणेही तिने बंद केले आता.आणि अचानक बाबांची बदली झाली. जायच्या दिवशी ती आमच्याकडे आली आणि जाताना माझ्याकडे वळून म्हणाली,"आठवण ठेवशील नारे नंदू माझी ?" त्यावेळी चक्क तिच्या डोळ्यात पाणी तरळल्यासारखे वातले. तीच तिची शेवटची भेट .
   त्यानंतर मंदीचा उल्लेख आत्ता किती वर्षांनी निघाला आणि एकदम मनातल्या त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्या हुळहुळत्या जखमेला अचानक हात लागून चमक निघावी तसे झाले,
"मग काय म्हणत होती ?"उत्सुकतेने मी विचारले.
"तू इथंच आहेस म्हटल्यावर तुझा फोन नं.काय आहे विचारत होती."
"मग दिलास की नाहीस ?" 
"नाही बुवा,तिला द्यायचा की नाही ,तुला विचारावे म्हटले "  
"अरे त्यात काय विचारण्यासारखे होते ?," मला उगीचच निराश झाल्यासारखे वाटले.
"ती डेक्कन जिमखान्यावर जनसेवा च्या वरच्या मजल्यावर रहाते" सतीशने मला माहिती पुरवली."जा जाऊन भेट ."
"तिला भेटण्यात मला काय इंटरेस्ट ?" 
"कदाचित तिला असेल" सतीश मला डिवचत म्हणाला.
       मंदीचा विषय का कोण जाणे उगाचच मनात घोळत राहीला.एकादे दिवशी खरच तिची गाठ घ्यायला जावे का असं वाटू लागलं.आता ते बालसुलभ औत्सुक्य राहिले नव्हते,पण तिला एकदा भेटावे असे मात्र राहून राहून वाटू लागले. सतीशकडून तिचा फोन नंबर घ्यायला हवा होता असे वाटू लागले.त्यादिवशी डेक्कनवर काहीतरी काम असल्याने मी एकटाच गेलो होतो आणि जनसेवासमोर गेल्यावर वाटले जावे का मंदीला भेटायला.काय वाटेल तिला अचानक भेटल्यावर ?
     अजुन जरी पुण्यात फोन केल्याशिवाय न जाण्याची संस्कृति मूळ धरू लागली नसली तरी पूर्वकल्पना दिल्याशिवाय असे जाणे योग्य दिसणार नाही असे वाटले तरी गेलोच तर काय होईल ?फार फार तर गाठ पडणार नाही,आणि असेल घरात तर निश्चितच भेटेल,म्हणून जिन्याच्या पायऱ्या चढायला लागलो.ज्या अर्थी सतिशला ती माझा फोन नंबर विचारत होती त्या अर्थी मला भेटावं असं तिला निश्चितच वाटत असणार.
     शेवटची पायरी चढून दारावरील बेल दाबली.दार तिनंच उघडावं अशी इच्छा होती आणि दार उघडताच,"काय ओळखलंस का ?" म्हणून मी तिला आश्चर्याचा धक्का देईन आणि "अय्या नंदू तू ?" असा उद्गार ती आपल्या हसऱ्या चेहऱ्यावरील उघड्या ओठांवर हात ठेवीत काढेल असे मनोरथ मी घोळवीत असतानाच एका दंतविहीन,कपाळावर चष्मा सरकवलेल्या वृद्ध स्त्रीने "कोण आहे ?" असे थरथरत्या स्वरात विचारले.ही मंदीच का मी मनातल्या मनात विचारले.मला बोलवावयास येणाऱ्या,लाडे लाडे बोलणाऱ्या त्या मंदीचा तेथे मागमूसही नव्हता, आपली काहीतरी चूक झाली असावी असे मला वाटून गेले.सतिशला माझा फोन नंबर विचारणारी मंदी हीच का ? मनातली निराशा लपवून मी म्हणालो " माफ करा ,मंदाकिनी श्रोत्री हव्या होत्या मला,पण माझी काही तरी चूक झाली असावी. " 
 " आपली चूक नाही झाली ,पण आपण कोण?" त्या स्त्रीने विचारले,"मी नंदू --- नंदू कान्हेरे "
" असं का मग याना, मीच मंदाकिनी " म्हणून तिने दार उघडून आत घेतले.
"म्हणजे एकनाथबुवांची--"
"मंदीच मी "आपल्या बोळके झालेल्या तोंडाने हास्य करत ती म्हणाली.
मग थोडावेळ गप्पा झाल्या,तिच्या सुनेनं चहाही केला पण आपण मंदीलाच भेटलो असे मात्र मला वाटले नाही.थोड्या वेळाने बाहेर पडत असताना माझे लक्ष बाजूला गेले आणि एक टक्कल पडलेला वृद्ध गृहस्थ माझ्याकडे बघून हसताना दिसला. आणि तो हुबेहूब माझ्यासारखाच दिसत होता.मी विचारात पडलो जरा विचार केल्यावर माझ्या लक्षात आले की त्या भिंतीवर मोठा आरसा टांगलेला होता आणि माझेच प्रतिबिंब माझ्याकडे पाहून हसत होते.