सप्टेंबर २०१७

काही सांगीतिक किस्से !

       प्रसिद्ध संगीतज्ञ केशवराव भोळे यांनी संगीतविषयक खूप लिखाण केले आहे .त्यांचा एक लेखसंग्रह "अस्ताई"  मला वाचावयास मिळाला  त्यात त्यांनी त्या कालातील गवयांविषयी अतिशय मार्मिक लिखाण केले आहे.त्यातील  संगीतात रस असणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीस आवडलेले काही किस्से मनोगतींनाही आवडतील म्हणून पुढे नमूद केले आहेत.त्यातील बहुतेक ग्वाल्हेर घराण्याविषयीच आहेत.त्यातून गायकांच्या गुणदोषांचे तसेच संस्थानिकांच्या गुणग्राहकतेचेही दर्शन होते.
      अकबर बादशहाच्या काळापासून ग्वाल्हेर शहर संगीताचे माहेरघर होऊन राहिले आहे. तानबहाद्दर बडे महंमदखां , हद्दू हस्सूखां, नथ्थेखां निसार हुसेनखां, रहिमतखां, शंकर पंडित असे प्रभावी गायक पदरी ठेवण्याची प्रथा संस्थान असेतोवर चालत आली होती. आपल्या गायनाचा दर्जा आपल्या मानमरातबाइतका उच्च ठेवण्याबाबतीत हे गायकही तितकेच आग्रही होते. बडे महंमदखां असेच करारी मानी वृत्तीचे होते. त्यांच्या विलक्षण तानबाजीवर खूष होऊन अलिजाबहाद्दुर दौलतराव शिंदे यांनी बाराशे रुपये तनख्यावर दरबारात ठेवले.त्रिंबकराव नावाच्या कारकुनाला यकश्चित गवयाला बाराशे रुपये दिल्याचे पाहून पोटात दुखू लागले. त्याने मग महाराणी  बायजाबाईसाहेबांना ही  वश केले आणि महंमदखांना  पुढच्या महिन्यापासून फक्त तीनशे रु. पगार मिळेल असा हुकूम काढला. महंमदखां यानी हुकुम हातात पडताच नोकरी सोडून जायची तयारी केली व निघण्यापूर्वी महाराजांचे दर्शन घेऊन जायचे म्हणून देवडीपाशी आले त्यांना आत सोडायला बहुधा त्रिंबकरावच्या सल्ल्यावरून कोणी तयार नव्हते तेव्हां देवडीवरच बसून त्यानी तोडी राग गायला सुरवात केली.  हळूहळू देवडीवर  ऐकणाऱ्यांची गर्दी झालीच पण  ते गायन ऐकून माडीवर बसलेल्या महाराजांच्याही  डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या.. बारा वाजण्याची वेळ झाली, बायजाबाई विचारावयास आल्या "जेवणखाण काही करायचे आहे की नाही ? "इतक्यात गाणे थांबले लगेच महाराजांनी खांसाहेबांना वर बोलावून "या वेळी कसे काय आलात ? अहाहा ! असा तोडी राग जन्मात ऐकला नव्हता " असे म्हटल्यावर खांसाहेबांनी तो हुकूम त्यांच्यासमोर ठेवून "आजवर आपले अन्न खाल्ले,त्याबद्दल शुक्रिया पण यापुढे तीनशे रुपयात कुटुंबाचा गुजारा होणार नाही सबब आपल्याला रजा द्यावी , हा शेवटचा मुजरा व शेवटचे गाणे ऐकवावयाला आलो होतो." असे म्हटल्यावर  महाराजांनी हुकूम वाचला व रागाने लाल होऊन त्रिंबकरावाला बोलावले व त्याची खरडपट्टी काढून तिथल्या तेथे तो हुकूम रद्द करायला लावला.
        महंमदखां यांच्या  मानी स्वभावाची आणखी एक गोष्ट !
त्यांच्याच वेळी ग्वाल्हेर दरबारात लखनौच्या नत्थन पीरबक्ष नावाच्या गायकाचे दोन नातू हद्दू - हस्सूखां नावाचे दोन तरुण गायक  होते. नत्थन पीरबक्ष व महंमदखां या दोघांच्या घराण्यात लखनौपासून वैर होते. महंमदखां यांच्या तानबाजीवर दौलतराव महाराज अतिशय खूष होते. तशी तान तयार करण्यास्त्यांनी हद्दूऱ्हस्सूखां यांना सांगितले. महंमदखां यांच्याशी वैर असल्याने त्यांच्याकडून शिकणे शक्य नव्हते तेव्हां हद्दू ऱ्हस्सूखां यांनी त्यांचे गाणे कानावर पडावे अशी विनंती केली व महाराजांनी महंमदखां गात असताना या दोघांना पलंगाखाली लपवून त्यांचे गाणे ऐकवण्याची युक्ती केली. मग सहा महिन्यांनी महाराजांनी मोठा जलसा करवून त्यात हद्दूऱ्हस्सूखां यांना महंमदखां यांचे गाणे ऐकवण्याचा हुकूम केला. त्यांनी अगदी हुबेहूब महंमदखां यांचे गाणे ऐकवल्यावर महंमदखां यांचा रागाचा पारा चढला व "माझ्याशी याबाबतीत दगा झाला आहे आता मी याठिकाणी नोकरी करणार नाही "असे म्हणून बाराशे रुपये पगार देणाऱ्या नोकरीवर लाथ मारून ते रेवा संस्थानात गेले व पुन्हा ग्वाल्हेरचे तोंड त्यांनी पाहिले नाही.
       दौलतराव यांच्यानंतर आलेले  जयाजीराव महाराज हेही गायनाचे अत्यंत शौकीन ! वरील गायकांकडून  महाराज स्वत: त्यांचे शागीर्द होऊन शिकत असत.  हद्दूखांनी अति मेहनतीने आपला आवाज तयार केला होता व म्हातारपणीही त्यांची रोज सहा तासांची मेहनत चालू असे." एवढी कसरत आता तुम्ही कशाला करता ?"असे कोणी विचारले तेव्हां ते म्हणाले,"मी म्हातारा झालो असे कोणी म्हणाले तरी चालेल पण माझे गाणे म्हातारे झाले असे कोणी म्हणू नये."इतके जोरकस ते गात असत.लखनौ येथे असताना एक दिवस मेहनत करत असताना यांच्या जबड्याच्या तानेचा गडगडाट ऐकून तळमजल्यावर बांधलेला घोडा ठाणबंद तोडून पळून गेला अशी आख्यायिका आहे.  मियां हद्दूखांचे संगीतप्रेम इतके विलक्षण होते की,संगीताच्या रियाजामध्ये कसलीही अडचण येऊ नये म्हणून पुष्कळ वर्षे त्यांनी लग्न केलेच नाही.
         बडे गुलाम अल्लींचे चुलते व वडीलही असेच रियाज करण्याचे महत्व जाणत होते.योग्य काळी त्यांची लग्ने ठरली व रिवाजाप्रमाणे मेजवानीसाठी लागणारे सर्व साहित्य मुख्यत: तूप,रवा,बदाम,पिस्ते .खारीक,बेदाणे इ.त्यांच्या घरी आणून ठेवलेले.रात्री हे दोघे भाऊ त्या सामानाकडे पहात बसलेले असताना एक भाऊ दुसऱ्याला म्हणतो "सामान तो खूब इकट्टा हुआ है"
"हां मेहनत करनेके लिये यह छ: महिनेतक जाएगा"
"फिर क्या इरादा है ?"
"अरे भाई शादी तो कभी भी हो सकती है --- लेकिन यह सामान देखकर और छ: महिने मेहनत करनेको जी चाहता है---"
आणि दुसऱ्या दिवशी लग्न लांबणीवर टाकल्याचा निश्चय या दोघा भावांनी जमातीला कळवला व दुप्पट जोराने रियाज सुरू केला.
       रियाजाविषयीच प्रख्यात सारंगीवाले म.कादरबक्ष आपल्या वडिलांची गोष्ट सांगत.कादरबक्षांची मातु:श्री एके दिवशी सकाळीच वारली तेव्हां ते कळवायला ते शिष्याच्या घरी तालीम चालू असताना गेले आणि रडत रडत वडिलांना ती बातमी सांगितली.तेव्हां "अबे बेवकूब,रोता क्या है ? जाओ भाई बिरादरीको बुलाओ,सब तय्यारी करो,फिर मुझे बुलाने आओ"असे त्यांना खडसावून काही विशेष झालेच नाही असे समजून त्यानी तालीम पुढे चालू ठेवली. मुसलमान गायकांविषयी केशवराव भोळे यांनी व्यक्त केलेले मत असे आहे की ते सर्वस्वाचे अर्पण करून रियाज करतात. "खूब खाना और दिनरात रियाज करना "हाच त्यांचा मंत्र ! वरील दोन किस्से याची साक्ष देतात.
     आपल्या घराण्याच्या गायकीविषयी काही गायक किती हट्टी होते (कट्यार काळजात घुसली"चे सूत्र) त्याविषयी हद्दूखां यांची आठवण अशी आहे.त्यांच्या वेळी ग्वाल्हेर दरबारात इनायतखां म्हणून दुसरे एक गवई नोकर होते.त्यांच्या अंगचे गुण पाहून व संगीत ऐकून हद्दूखांनी त्याना आपले जावई करून घेतले.इनायतखांही आनंदाने जावई झाले--- हेतु हा की,दरबारात अन्नदात्यांनी मानलेली हद्दूखांची गायकी आपणास मिळावी.पण हद्दूखांच्या लक्षात ही गोष्ट येताच "मुलगी दिली म्हणून गायकी देणार नाही" असे त्यानी स्पष्टपणे सांगितले.शेवटी दरबारातील वैद्यराज मोठे प्रेमळ व संगीतप्रेमी असल्यामुळे व त्यांचा इनायतखान यांच्यावर लोभ असल्यामुळे त्यानी हद्दूखांशी संधान बांधले व ते हद्दूखांकडून तालीम घेऊ लागले व नंतर इनायतखांनी वैद्यबुवांना सतार शिकवायची व हद्दूखांची गायकी वैद्यबुवांनी इमायतखांना शिकवायचे असे ठरून इनायतखान यांनी ग्वाल्हेर घराण्याची गायकी संपादन केली.
   निस्सार हुसेनखां हे ग्वाल्हेर घराण्याची गायकी कायम ठेवणारे गायक व रामकृष्ण वझेबुवांचे उस्ताद.ते महाराष्ट्रात येऊन राहिले होते.त्यांची स्मरणशक्ती तीव्र असंख्य चिजा सहज पाठ झाल्या.त्यांची राहणी ब्राह्मणी पद्धतीची होती.गळ्यात जानवे घालीत व श्रावणी सोमवारचा उपास करत.लहानपणी शास्त्री पंडितांकडून शिक्षण,भागवतातील श्लोक व मोरोपंतांच्या आर्या पाठ.त्यामुळे त्यांची वाणी शुद्ध व सुसंस्कृत  झाली त्यामुळे त्यांची जात ओळखून येत नसे."मला मागील जन्मी गायन शिकण्याची इच्छा झाली म्हणून मी मुसलमान झालो व विद्या शिकलो आता ती इच्छा पूर्ण झाली तेव्हां पुढील जन्म ब्राह्मणाचे पोटी घेणार असे म्हणून गळ्यातले यज्ञोपवित दाखवीत.
      वर उल्लेखलेल्या हद्दू - हस्सूखांपैकी हस्सूखां अशा करारीने गायचे की त्यानी आपल्या कलेचा दर्जा राखण्याकरिता स्वत:च्या प्राणांचीही पर्वा केली नाही.एकदा एका महफिलीत सूडबुद्धीने दरबारी गायक बडॅ महंमदखानी ( या महंमदखां यांची गायकी त्यांचे गाणे चोरून ऐकून हद्दूखांनी कंठस्थ केली होती त्याचा हा राग.) त्यांची खूप तारीफकरून ज्या मिया मल्हाराच्या चिजेत ’कडक बिजलीची तान आहे ती चिज म्हणण्याची फरमाइश केली.अस्ताई अंतरा चांगला घोळून तानबाजीस सुरवात केल्यावर कडक बिजलीची तान घेऊन महंमदखान यांचेकडे हस्सूखांनी पाहिले.तेव्हां महंमदखान म्हणाले,"बेटा ठीक है,और एक दफे लेना"तेव्हां हस्सूखांने मोठ्या जोराने ती पुन्हा घेतली.पण काय त्याबरोबर डाव्या अंगाची फासळी चढली व रक्ताची उलटी झाली.त्यांचे आजोबा नथन पीरबक्षानी शेल्याने ती फासळी बांधून म्हटले,"बेटा आज तरी मरावयाचेच,उद्या तरी मरावयाचेच ! मग तान घेऊनच मर ! तसा मरू नकोस.तुझे नाव तरी होईल" नातवाने (हस्सूखांने) महंमदखांचे कपट ओळखून,चिडून सही सही तशी तान घेतली!श्रोतृमंडळींनी वाहवा केली पण काय हस्सूखां खाली पडले आणि तत्काळ गतप्राण झाले.कलेच्या इभ्रतीसाठी प्राण देणाऱ्या कलावंताचे दुसरे नाव जगातील कलेच्या इतिहासात सापडेल काय ? 
        

Post to Feedअस्ताई नव्हे, स्थायी
अस्ताईच !
दुरुस्ती
हे तुम्ही पण करू शकता
अस्ताई शब्दाबद्दल
अपभ्रंश
बरोबर वाटणे आणि असणे

Typing help hide