सप्टेंबर २९ २०१७

पाऊस - परत एकदा..

आधी वाचा -

पाऊस. अहाहा! कित्येक वर्षांनी असा योग आला आहे. लांबच लांब रस्ता, एका तालात चालणारी गाडी, गाडीत मी एकटी, कसलीही काळजी नाही, कोणालाही सोबत देण्याचं बंधन नाही, विचारांमध्ये रमायला पुष्कळ मोकळा वेळ, आणि वर हा पाऊस!

पाऊस! पाण्यानी गच्च भरून गहिऱ्या झालेल्या ढगातून बेफाम कोसळणारा पाऊस! उन्हाचे चटके सोसणाऱ्या जीवाला शांत करणारा पाऊस! तहानलेल्या आसुसलेल्या मनाला चिंब भिजवणारा पाऊस! कित्येक वर्षानंतर असे काहीतरी विचार आलेत डोक्यात. पाऊस बिचारा दर वर्षी निकराने प्रयत्न करतो माझ्यातल्या मला जागवण्याचा. पण संसारानी भरून उतू जाणाऱ्या घरामध्ये त्याची ही साद मी अगदी निर्दयीपणे परतवून लावते. स्वतःमध्ये रमायला असा वेळच मिळत नाही.

खरंच मृण्मयी? वेळ नाही म्हणून तू पावसाला लांब ठेवलंस? आज सगळं खरं बोलायचं स्वतःशी! बोलून टाकायचं. काल पेपर मध्ये आलेला लेख किती छान होता. लेखिका म्हणते की 'एखाद्या शांत क्षणी मनाच्या तळातून वर येणारे विचार कधी दाबू नयेत. अशाने त्यांचं ओझं वाढत जातं. हे विचार जरी आपल्या नैतिक सीमारेषेपलीकडचे असले तरी त्या वेळी त्यांना मुक्तपणे मनभर वावरू द्यावं. त्या भावनांचा स्वीकार करावा. म्हणजे मनाची तगमग कमी होते. ' काल लेख वाचला आणि ठरवलं की एकदा तरी मनाच्या कानाकोपऱ्यातले सगळे विचार निरखून पाहायचे. आणि गम्मत म्हणजे ऑफिस मधून हे प्रवासाचं फर्मान निघालं. टिनाला सांभाळायला आईही तयार झाली. ललितनीही काही मोडता घातला नाही. सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्या. बरं वाटतंय. आधीच प्रवासाने सैलावलेलं मन आणि त्यावर पावसाचा शिडकाव. ह्या पावसानी मला खुप काही दिलं आहे. लहानपणीची कागदाच्या होडीतली सैर, उमलत्या वयातली स्वप्नं आणि ऐन तारुण्यात भेटलेला तो.

उन्मेष. बारा तेरा वर्ष झाली आमच्या पहिल्या भेटीला. अमितच्या reference नी apply केलं होता मी त्याच्या कंपनीत. पावसामुळे Interview साठी मी थोडी उशिरानेच पोचले. केबिन मध्ये गेले आणि तो समोर आला. उन्मेष! ह्या position ला सूट न होणारा निरागस स्वप्नाळू चेहरा, आणि त्या चेहऱ्यावर कोणालाही आपलंसं करणारं हसू. जादूच झाली होती कसलीतरी! तो माझा interview घेत होता आणि जाणारा प्रत्येक क्षण मला त्याच्याकडे ओढत होता. बाहेर धुवांधार पाऊस आणि त्या सरींच्या तालावर टेबलवर ठेका धरणारा त्याचा हात. interview राहिला बाजूला. आम्ही इतर गप्पाच जास्त मारल्या. पण पैशाची नड आणि जास्त package देणारी दुसरी ऑफर ह्या कारणांनी मला त्याच्या कंपनीची ऑफर नाकारावी लागली. एका अर्थानी चांगलंच झालं. थोडं अंतर राहिलं आमच्यात. तरीही आम्ही नियमितपणे भेटत गेलो. प्रत्येक वेळी कॉफी शॉप मध्ये येताना त्याच्या चेहऱ्यावर अधीरता कशी ओसंडून वाहायची. जसं काही इतके दिवस बोलण्याचा उपासच घडला होता त्याला. तो बोलायचा, त्याचा चेहरा बोलायचा, त्याचे डोळे बोलायचे. एकदम एखाद्या बंधनातून मुक्त झाल्यासारखा बोलायचा तो आणि मी त्याच्याकडे बघत बसायचे. वरून त्याचं ऐकत असल्याचा बहाणा करत त्याला डोळ्यात साठवून घेत रहायचे. लहान मुलासारखा उत्साह, देवावरचा भाबडा विश्वास, लोकांमधलं चांगलं शोधण्याची वृत्ती, इतिहासाची आवड, कविता, लेख, प्रचंड वाचन, प्रवासाची ओढ... कितीतरी विचार जुळायचे आमचे. मी बोलायचे तेव्हा तो ही अगदी तन्मय होऊन ऐकायचा. उघडपणे काही न बोलताही आमचं एकमेकांमध्ये गुंतणं आम्हाला समजत गेलं. शब्दांवाचून कळले सारे...

कशाला आठवण काढायची त्याची. त्रासच होतो त्यामुळे.. त्याचा निर्णय सांगताना त्याने केला का माझा विचार? तेव्हा मला अगदी अभिमान वाटला होता त्याचा निर्णय ऐकून. आता मात्र त्याच गोष्टीचा त्रास होतोय. पहिल्यांदा जेव्हा त्याने रुपालीचा उल्लेख केला तेव्हा मी तर हललेच. मी जरा त्याच्यावर हक्क दाखवायला सुरुवात केली होती. हाच बदल बघून बहुदा मुद्दामच त्यानी तिचा उल्लेख केला माझ्यासमोर. तिचा साधेपणा, तिचा समर्पणाचा स्वभाव, तिचं देखणं रूप ह्याचा का उल्लेख केला त्यानी तेव्हा? मन सुन्न झालं होतं अगदी हे ऐकून. पण तेव्हापर्यंत आमचं नातं अगदी निरपेक्ष होतं. उघडपणे हक्काच्या कुठल्याच नात्याची कबुली कोणीच दिली नव्हती. तशी गरजच वाटली नव्हती कधी. तो माझ्यात गुंतला होता हे मला दिसत होतं. पण मग रुपालीसारखी सर्वगुणसंपन्न बायको असताना माझ्यासारख्या सामान्य दिसणाऱ्या मुलीबरोबर का गुंतला हे नाही उमगलं. त्या दिवसानंतर मी कितीतरी वेळा ठरवलं की हे सगळं थांबवायचं. पण व्यर्थ! मग एक दिवस आईबाबांनी घरी लग्नाचा विषय काढला आणि मी त्याला सांगितलं. त्याच्यावर दुसऱ्या कुणाचा हक्क आहे हे समजल्यावर मी जशी सैरभैर झाले होते तसा त्या दिवशी तो झाला. मग कधी भेटलो आम्ही? बऱ्याच दिवसांनंतर. माझ्या बऱ्याच विनवण्यांनंतर भेटला तो. चेहरा ओढलेला, फिके डोळे, खोल गेलेला आवाज.. जणू काही आजारातूनच उठला होता. तो रुपालीला सोडू शकत नव्हता, हेच त्यानी मला सांगितलं. एखाद्या गोष्टीचं त्या क्षणी कौतुक वाटावं आणि नंतर त्रास व्हावा असं का होतं? शेवटच्या भेटीत आम्ही काही बोललो नाही. एकमेकांशी सगळं काही बोलून टाकण्याच्या सवयीनं - की गरजेनं - आमचा घात केलं होता ना! स्पर्शापार असलेलं ते नातं नुसतं संवादानेच तर बहरलं होतं..

लग्नानंतर कित्येक वेळा त्याची आठवण आली. दुर्लक्ष करायचा किती निकराने प्रयत्न करायचे मी. पण कधी कधी अगदी निरुपाय  व्हायचा. मग त्याच्याबद्दल माहिती काढायचा प्रयत्न. अमितकडून. आमच्या त्या भेटीनंतर काही महिने तो खूप आजारी होता. रुपालीनी त्याची खूप काळजी घेतली म्हणे त्या काळात. मग काही दिवसातच त्यांनी दोन मुलं दत्तक घेतली नाही का, एक मुलगा आणि एक मुलगी. पाच सहा वर्षांपूर्वी अमित म्हणला होता की तो सध्या खूप आनंदात दिसतो. दोन्ही मुलांना त्याचा खूप लळा आहे. 'रुपाली वाहिनी' सुद्धा खूप बदलल्या आहेत म्हणे. जळफळाट झाला माझा त्या दिवशी. जो अजून होतो आहे. ही तगमग काही केल्या कमी होत नाहीये. का असं? तो मला सोडून रुपालीशी एकनिष्ठ राहिला म्हणून? का तो त्याचं आयुष्य सावरण्यात यशस्वी ठरला म्हणून? त्याला मोडलेला, हरलेला बघायचं होतं का मला? हे कसलं प्रेम माझं? मग त्याच्या आजारपणाचं ऐकून का कासावीस झाले होते मी? रुपालीनी त्याला सावरलं हे ऐकून मला तेव्हा खूप बरं वाटलं होतं. त्याला असं हरलेलं बघायचं नव्हतं मला कधीच.

मग तरीही मनाला शांतता का नाही मिळत? मला अजून माझ्या आयुष्याशी जुळवून घेता येत नाहीये म्हणून? ललित त्याच्यासारखा का नाहीये? त्याला कशातच इंटरेस्ट नाहीये. मेकॅनिकल डोक्याचा आहे तो, अरसिक. गप्पा मारणं त्याला आवडत नाही. रोजचा पेपर सोडला तर इतर वाचनाची गोडी नाही. मनातले विचार नीट सांगता येत नाहीत. मनातल्या भाव भावना नीटपणे शब्दात मांडता येत नाहीत. तशी त्याला गरजही वाटत नाही. हे मला माहितीये की या जगात मी त्याची सगळ्यात जवळची व्यक्ती आहे. पण हे सगळं त्याला कधीच व्यक्त करता येत नाही. आणि मग माझी चडफड होते. कोणाशीतरी ह्या अशा विषयांवर संवाद साधण्याची भूक अजूनच वाढत जाते. पण जवळ कोणीच नसतं. मग तो आठवतो, त्या भेटी आठवतात.. पण असं भूतकाळात रमणं म्हणजे ललितशी प्रतारणा वाटते. आणि मग अपराधीपणाची भावना मला खोल खोल दरीत घेऊन जाते. आयुष्यानं खेळ केलाय माझ्याशी. मनाच्या कोऱ्या पाटीवर उन्मेषनी दाखवलेली जोडीदाराची स्वप्नं अशी काही कोरली गेली की त्यापुढे ललितचं अव्यक्त अदृश्य प्रेम फारच फिकं पडलं.

उन्मेषही माझ्याकडे अशाच संवादाच्या गरजेनीच ओढला गेला होता का? म्हणजे रुपालीही ललितसारखीच... म्हणजे तोही त्यावेळी माझ्यासारख्याच परिस्थितीतून जात होता. पण आता तो सावरलाय. नुसता सावरला नाही तर आनंदात आहे. मला खात्री आहे की  माझ्याबरोबरच्या भेटी विसरणं त्यालाही शक्य नाही. पण मग तो मला आठवून आनंदात कसा राहू शकतो? मी नाहीये त्याच्या आयुष्यात आता. जसा तो नाहीये माझ्या आयुष्यात. पण त्या भेटी आठवल्या की मन अगदी ताजतवानं होतं. परत एकदा ललिताच्या प्रेमात पडते मी. आणि त्याच्याकडून उन्मेष सारख्या अपेक्षा करायला लागते. पण तो तसा नाहीये ना. मग उन्मेष सरस वाटतो आणि मी अपराधीपणामध्ये बुडते. म्हणेज मी ललितला आहे तसं स्वीकारलेलं नाहीये. आणि उन्मेषचं 'माझ्या आयुष्यात असणं' संपलं आहे हे ही मी स्वीकारलेलं नाहीये. हं! तो आता माझा नाहीये, पण त्या भेटी, त्या आठवणी तर माझ्या आहेत ना. त्यांना आठवणं म्हणजे ललितशी प्रतारणा नाही. त्या आठवून ललितला कमी लेखणं, त्याच्याशी फटकून वागणं म्हणजे प्रतारणा आहे. हं. ते दिवस, ती कॉफी, त्या गप्पा, तो काळ हे सगळं मला मिळालं हे काय कमी आहे? मनावर आलेलं मळभ दूर करायला ह्या आठवणी पुरेशा नाहीत का? हे कायम असंच असावं हा हट्ट जर मी सोडला तर हीच पुंजी माझी शक्ती बनू शकते. मनाच्या कोपऱ्यात बंद पेटीत ठेवायच्या ह्या आठवणी. कधी पाऊस येऊन उघडेल ही पेटी, कधी बाहेरच्या जगापासून लांब राहावंसं वाटलं तर आपणच उघडायची. मग त्या आठवणींचा दरवळ मन भरून टाकेल. तो ही असाच विचार करून आनंदी आयुष्य जगत असेल का?

काय सुंदर दिसतंय बाहेर सगळं. हिरवाईने सगळा डोंगर झाकून टाकला आहे. आणि हा रिमझिम पाऊस!

किती मोठा गुंता सुटल्यासारखं वाटतंय आता. पाऊस नेहमीच मला काहीतरी देऊन जातो..

Post to Feed
Typing help hide