डिसेंबर २०१७

कृष्णमूर्ती : अकर्त्याचा शोध !

जे.  कृष्णमूर्तींना नक्की काय म्हणायच होतं हे समजलेला कुणी भेटणं दुरापास्त आहे. तरीही वैभव संपन्न आणि बुद्धिमान अशा इथल्या आणि विदेशातल्या उच्चभ्रू लोकात कृष्णमूर्तींचा दबदबा होता हे नक्की.  जेके प्रश्नाला थेट उत्तर देण्याऐवजी, विचारणाऱ्यालाच प्रतिप्रश्न करत जायचे आणि एका क्षणी विचारणारा निरुत्तर होऊन जायचा. मनाचा निरास  करणारी ही पद्धत साधकांना उपयोगी ठरू शकली नाही कारण वैचारिक गुंत्यातून मुक्त होण्याऐवजी साधक नव्या प्रश्नावलीत सापडायचे. वास्तविकात प्रश्नाला थेट उत्तर देणं मनाच्या निस्सरणाला उपयोगी ठरतं.  

जेके कोणत्याही साधनेच्या संपूर्ण विरोधात होते कारण प्रत्येक साधना ही क्रिया आहे आणि सत्य ही स्थिती आहे, ती अकर्ता आहे. हरेक  क्रिया ही शारीरिक आणि मानसिक पातळीवर आहे आणि सत्य ही त्या क्रियेची अचल पार्श्वभूमी आहे. तस्मात, क्रियेतून अकर्त्या स्थितीची प्राप्ती असंभव आहे असा जेकेंचा निखलास दावा होता.  

 आता या उहापोहाच्या पार्श्वभूमीवर जेकेंच्या अध्यात्मिक योगदानाची चर्चा करुया.

जेकेंची दोन विधानं अध्यात्मिक जगतात दिशादर्शक ठरली आहेत.  

१) 'द नोअर बिकम्स द नोन', आणि

२) 'चॉईसलेस अवेअरनेस'

त्यांचं  म्हणणं होतं की जाणणाऱ्याला जाणणं ही अध्यात्माची इतिश्री आहे. हे एका दृष्टीनं बरोबर आहे कारण जाणण्याच्या क्रियेत जाणीवेचा रोख जे जाणलं जातंय त्याच्यावर असतो. जोपर्यंत काही जाणण्याची इच्छा आहे तोपर्यंत जाणीवेचा रोख कायम इतरत्र आहे. ही जाणण्याची इच्छाच जेंव्हा विलीन होईल तेव्हा जाणीव स्वतःलाच जाणेल ( The Knower Becomes the Known) असा जेकेंच्या जगप्रसिद्ध विधानाचा अर्थ आणि सार आहे.  

पण सदर विधान हे अर्ध सत्य आहे कारण जाणणारा आहे तोपर्यंत जे जाणलं जातंय त्याला ठराविक परिप्रेक्ष्य आहे. म्हणजे  जाणणाऱ्याच्या जाणीवेनं जरी स्वतःला जाणलं असेल आणि एखादी व्यक्तीसमोर आली तर तो तिला स्वतःच्या स्मृतीतूनच जाणण्याचा प्रयत्न करेल, उदा. माझी  पत्नी, किंवा माझी आई, अथवा अनोळखी स्त्री. अर्थात, रोजच्या जगण्यात असंच जाणणं आवश्यक आहे पण जाणणाऱ्याची स्मृती एकदा सक्रीय झाली की तो मनाच्या कोलाहालात पुन्हा बंदिवान होणार! थोडक्यात, जाणीव कायम मुक्त राहायची असेल तर  जाणणारा विलीव्हायला हवा.  जोपर्यंत जाणणारा आहे तोपर्यंत जाणण्याला ठराविक परिप्रेक्ष्य आहे. त्यामुळे जाणणं ही केवळ प्रक्रिया होत नाही तोपर्यंत जाणीव स्मृतीशीच निगडीत राहील, ती मुक्त होणार नाही. म्हणजे जेकेंचं पहिलं विधान हे अर्ध सत्य आहे. जाणीव ही प्रक्रिया आहे आणि जाणणारा (The Knower)   कुणीही नाही  अशी स्थिती म्हणजे मुक्ती आहे. याचा अर्थ स्मृती अनावश्यक आहे असा नाही पण ती केवळ संदर्भ म्हणून असायला हवी. स्मृतीतून पुन्हा व्यक्तित्व निर्माण व्ह्यायला नको. जेके हा नेमका मुद्दा हुकले, त्यामुळे त्यांचे साधक केवळ पहिल्या विधानाचा अर्थ शोधण्यात हरवले आहेत.

आता  चॉईसलेस अवेअरनेस म्हणजे काय ते पाहू.  चॉईसलेस अवेअरनेसचा अर्थ निवड न करण्याचं स्वातंत्र्य असा आहे. त्याचा शब्दार्थ जरी निवडरहित सजगता असा असला तरी तो सिद्धाची नेमकी स्थिती वर्णन करत नाही. आपण आयुअष्यभर न कळतपणे मनाचं अनुसरण करत असतो. म्हणजे जरी आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि करतो असं वाटत असलं तरी आधी मनंच काय करायचं ते ठरवतं आणि देह त्यानुसार आचरण करतो. ऑफिसला जाईन किंवा जाणार नाही असा पर्याय आपल्याला नसतो. मनाला धुडकावून आपण निष्कारण घरी थांबलो तर मन असा काही अपराधभाव निर्माण करतं की त्या दहशतीमुळे झकत ऑफिसला जाण्यावाचून पर्याय उरत नाही.   पण आपलं मनाशी इतकं तादात्म्य झालेलं आहे की मनाच्या निर्णयाला आपण स्वतःचा निर्णय मानतो.   त्यामुळे ती स्थिर स्थिती जी कायम अकर्ता आहे, जे आपलं वास्तविक स्वरुप आहे, त्याप्रत आपण येऊ शकत नाही किंवा त्यात स्थिर होऊ शकत नाही.

पण मुळात निवड न करण्याच्या स्थितीत येण्यासाठी स्वतःला  निवड करण्याचं स्वातंत्र्य हवं कारण असं स्वातंत्र्य असेल तरच  निवड न करण्याचा पर्याय निवडला जाऊ शकतो. म्हणजे जर मला वाटेल ते  मी करू शकत असेन तरच  उपलब्ध पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडता, ती घटना अस्तित्वाला हवी तशी घडवू देण्याची संधी मी देऊ शकतो आणि स्वतः अकर्ता स्थितीत स्थिर राहू शकतो. अशा स्थितीत घटना किंवा तीच्या परिणामाची मला क्षिती राहात नाही. घटनेचा माझ्या स्थिर स्थितीवर कोणताही परिणाम होत नाही.  

थोडक्यात,  भोजन या रोजच्या आणि साध्याश्या वाटणाऱ्या गोष्टीत,  निवड करण्याच्या विकल्प उपलब्ध व्ह्यायला व्यक्तीची चित्तदशा कशी असायला हवी ते पाहा. सर्व प्रथम व्यक्तीनं वेळ या धारणेपासून संपूर्णपणे मुक्त व्हायला हवं, कारण अमूक वेळ झाली आता भोजन करायला हवं किंवा वेळ टळून गेली आता भोजन करायला नको, ही मानसिक गुलामी आहे. भूक लागल्यावर जेवण (मग वेळ काहीही असो) ही अस्तित्वागत घटना घडू देण्याची योग्य रीत आहे. किंबहुना माणूस वगळता इतर सर्व सजीव भूकेच्या जाणीवेनंच भोजन करतात. त्यामुळे कडाडून भूक लागल्यावर, सदर भूक जी अंतर्सूचना देईल तो आहार निर्धोकपणे करण्याचं स्वातंत्र्य असलेली व्यक्तीच निवड न करण्याच्या पर्यायाला उपलब्ध होईल. मग त्या अंतर्सूचनेवर कोणताही मानसिक उहापोह न करता, (उदा. कॅलरीज, शुगर, कोलॅस्टरॉल, इत्यादी), उपलब्ध भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेण्याचं स्वातंत्र्य शरीराला दिलं तर ती घटना अस्तित्वागत होते आणि व्यक्ती निवड न करण्याच्या स्थितीशी समरुप होते. थोडक्यात, भोजनाची प्रक्रिया शारिरिक आणि मानसिक स्तरावर चालू राहाते आणि व्यक्ती स्वतः मात्र अभुक्त राहाते. किंवा ती स्थिर स्थिती की जिला कोणत्याही भोजनाची काहीही गरज नाही त्या स्थितीशी संलग्न होते. अशा अकर्ता स्थितीत कायम स्थिर झालेल्या व्यक्तिला सिद्ध म्हटलं आहे.  

कृष्णमूर्ती अशा अकर्ता स्थितीत येण्यासाठी लागणाऱ्या चित्तदशेची कोणतीही चर्चा न करता सरळ त्या स्थितीचं वर्णन करतात (चॉईसलेस अवेअरनेस). त्यामुळे साधक नुसता अवेअरनेस (सजगता) साधत राहातात, निवड न करण्याचा पर्याय त्यांना उपलब्धच होत नाही. तस्मात, जेकेंची कितीही पुस्तकं वाचली आणि प्रवचनं ऐकली तरी साधक अकर्त्या स्थितीप्रत येऊ शकत नाही.


Post to Feedयोग्य निरीक्षण
धन्यवाद !
विधान
हे एकदम बरोबर आहे !
हे एकदम बरोबर आहे !
भारी
आपलं स्वरुप म्हणजे नुसतं असणं आहे

Typing help hide