डिसेंबर २०१७

इतिकर्तव्य

वा! लागले वाटतं दिवे आज. आता हा कंदील अगदी छान शोभून दिसतोय इथे. त्या दिव्याच्या प्रकाशात काय छान चमचम करतोय. आवडला बुवा आपल्याला. ह्या जागेचं अगदी रूपच पालटून टाकलं ह्या कंदिलानं. चिमानं कुठून आणला तोंडात धरून कुणास ठाऊक. पण अगदी ऐन दिवाळीच्या तोंडावर आला हा कंदील इथे.

कशी छान झोपलीये ही बंड्याशेजारी. निमा पण शांत वाटतीये आज. नाही तेव्हा पोटाची केवढी हालचाल होत असते झोपेत. आणि तोंड सदानकदा उघडं. सुमा आणि खंड्या मात्र अजून झोपले नाहीत. सुमीच्या पिल्लांची नावं काय ठेवावी बरं आता? बघू; ठरवू काहीतरी. इतके दिवस चिमा लहान होती सगळ्यात; आता ही पिल्लं आली. चिमा! चिमखडी माझी. अशी पायाशी मस्ती करते की विचारायची सोय नाही. किती ठरवलं होतं की कशात म्हणून अडकून पडायचं नाही अजिबात! पण ह्या चिमानं जीव लावलाय अगदी. वर्ष झालं का एक? असेल. तारीख वार लक्षात ठेवण्याचे दिवस गोदामाईने आपल्या पोटात घेतले. केवढा तो पूर. काय ते पाणी. मी त्या दिवशी गावाबाहेर गेलोच नसतो तर? परत परत विचार करून काय होणार म्हणा. आई, बाबा, विनीता, गब्बू सगळेच नेले माईने. गब्बू आज असती तर ४ वर्षाची झाली असती. शाळेत गेली असती. आता सकाळच्या वेळी शाळेत जाणाऱ्या मुलींमध्येच बघावं लागतं तिला. एवढंसं दप्तर घेऊन, दोन चिंगे झुट्टू बांधून लुटूलुटू चालत जाणाऱ्या त्या बाहुल्या पाहिल्या की अगदी गदगदून येतं. असं वाटतं की एखाद्या बाहुलीला अगदी कडकडून मिठी मारावी. पण माझ्या या अशा अवतारामध्ये लपलेल्या भावना कोण समजून घेणार? कितीदा त्या मुलींकडे बघून नुसता हसलो अन लोकांच्या शिव्या खाल्ल्या. त्यांच्याकडे बघत बसलं की एखादी अगदी गब्बूच वाटून जाते. मनात किती जरी ठरवलं तरी ताबा राहत नाही. जवळ घेऊन माझ्या पोरीचे लाड करावे, तिला खायला द्यावं असं वाटतं. पण नुसतं एक पाऊल त्यांच्याकडे गेलो तरी भितात पोरी. अर्थात त्यांची चूक तरी कशी म्हणावी? केस पिंजारलेत, दाढी वाढली आहे. कपडे अर्धंमुर्ध अंग कसंबसं झाकतात. किती सांभाळतो मी कपडे स्वच्छ करताना. नुसतं हलकं पाण्यातून काढलं तरी कापड विरतंच. तसंही एवढ्याश्या पाण्यात अंघोळ, कपडे सगळंच करणं काय सोपं आहे का? सरकारची कृपा म्हणून जवळ सार्वजनिक शौचालय तरी आहे. पण पाणी म्हणजे अगदी मोजून मापूनच मिळतं इथे. तिकडे गावी गोदामाईचं पाणी नुसतं पाहूनच डोळे तृप्त व्हायचे. बारा महिने दुथडी भरून वाहायची माई. अहाहा. तिच्या मायेचा मनावर असा काही पगडा बसला आहे की तिनी अख्खं आयुष्य वाहून नेलं तरी तिच्यावर राग येत नाही. कशाला काढायच्या त्या आठवणी! जुने दिवस काही राहिले नाहीत. चांगलेही नाहीत आणि वाईटही नाहीत. पूरग्रस्त म्हणून कधी माणुसकी तर कधी धक्के दाखवत इथपर्यंत आणून सोडलं दैवाने. ह्याच पिंपळाखाली. आता असं वाटतंय की हा पिंपळ मला आधार देण्यासाठीच मोठा झाला असावा. मला इथे सोडून देवानं पिंपळाला त्याच्या आयुष्याचं इतिकर्तव्य दाखवलं. पण माझ्या आयुष्याचं काय..

सुमा आणि खंड्या झोपले वाटतं. पिलांच्या अंगावर पोतं टाकूया. आज निद्रादेवी मला का प्रसन्न होईना! विचार थांबतच नाहीयेत.

मला लोक वेडा केव्हापासून म्हणायला लागले बरं? बहुदा अजय इथून निघून गेल्यावर लगेचच. अजयनं केवढं केलं माझं. ह्या झाडापाशी येऊन पडलो तो शारीरिक आणि मानसिक व्याधी घेऊनच. चार पाच दिवस तरी उपाशी असेन. आणि वर पुराने मनावर केलेल्या जखमा. अजयनं मात्र अगदी प्रेमानं सांभाळलं मला. खाणं पिणं, औषध पाणी, कपडे, चादर, सगळं सगळं पुरवलं. हे प्लास्टिक पण त्यानंच तर लावलं होतं. तात्पुरता आडोसा म्हणून. पण तो गेला आणि मी अगदी उघड्यावर पडलो. सोशल वर्कर तो. माझ्यासाठी किती थांबणार. माझी सोय लावली आणि गेला पुढच्या कामाला. तो गेला तशी लोकांनी पाठच फिरवली. त्यांना तरी का चूक म्हणावं. पुराने मनावर केलेला आघात माझ्याकडून काय काय करवून घेत होता. कित्येकदा रडत बसायचो मी असाच इथेच. तासन तास. आता लोकांच्या नजरेतून माझं हे रूप पाहिलं तर माझं मलाच हसू येतं. अस्वच्छ कपडे, रापलेलं अंग, विस्तारलेले केस, अस्ताव्यस्त दाढी, ढगाला टेकलेली नजर आणि डोळ्यातून अवचितच ओघळणारे अश्रू. कोणाशीच बोलावंस वाटायचं नाही अगदी. लोकांचा आनंद खुपायचा डोळ्यात. कुठे एकत्र कुटुंब मजेत जाताना पाहिलं की रडू यायचं. लहान मुलींकडे पाहून गब्बूच्या आठवणींनी तर कित्येकदा सैरावैरा धावत रडलो होतो मी. वेडा नाहीतर काय म्हणणार मला!

अरेच्चा! चिमू कशी काय उठली अशी ह्या वेळी. ये बाळा इथे झोप. चिमा म्हणजे अवतार पांडुरंग आहे नुसता. काळा काळा रंग आणि त्यावर कपाळावरची पांढरी खूण. कोणाकडून घेऊन आली हे असलं रूप कोण जाणे. माणसांनी नाकारलं तेव्हा हीच आली माझ्या जवळ. कसं मुटकुळं करून झोपलीये. पोती सुमीच्या पिलांना दिली गं चिमे. तुला पांघरायला काही नाही बघ आता शिल्लक.

काय मजा आहे, माणसामध्ये प्रेम सुद्धा कसं इतर भावनांप्रमाणेच साठून येतं. आणि मग ते कोणावर तरी निछावर करण्याची गरज तयार होते. मग ते प्रेम स्वीकारायला माणूसच पाहिजे असं नाही. ह्या सगळ्या जीवांनी मला हे एवढं मोठं तत्त्वज्ञान किती सोपं करून शिकवलं. चिमा काय आली, तिच्या पाठोपाठ इतर सगळ्यांनीही माझ्याकडेच मोर्चा वळवला. माझ्या ह्या अशा मिश्र कुटुंबात एकेकाची भर पडत गेली. विनीता, तुझ्या "'आपण एक कुत्रा पाळूया का सोबत म्हणून" ह्या हट्टाला आधी कधी बधलो नाही आणि आता बघ! चौदा जिवांच्या सोबतीत आयुष्य जगतोय मी. बरं, ओझं कोणाचंही नाही हो माझ्यावर. प्रत्येक जण आपापल्या पोटाची व्यवस्था पाहतो. मी कचरा गोळा करून पोट भरतो आणि हे सगळे कचरा खोदून. दुपारच्या वामकुक्षीच्या आणि रात्रीच्या विश्रांतीला मात्र सगळे जमतात. कधी कोणी पाय चाटून जातात, तर कधी अंगाशी मस्ती करतात. पण हे सगळे स्पर्श इतके सुखावह वाटतात ना की काय सांगू. लोकांना साहजिकच हे सगळं विचित्र वाटतं. पण लोकांचे विचित्र कटाक्ष आता माझं मनोरंजनच जास्त करतात. लोक आता मला घाबरत नाहीत पण आपल्यात सामीलही होऊ देत नाहीत. एकटेपणा वाटतोच, तुमच्या आठवणींनी कधीकधी अगदी जगणं नकोसं होतं. पण मग एखाद्या पुलावरून उडी मारायला जाताना चिमा आणि इतरांचा विचार येतो. आणि मी परत येतो. हे सगळे जीव माझ्या अवतीभोवती अगदी निर्धास्तपणे वावरतात. सुमीनं तिच्या पिलांना ह्याच पिंपळाखाली जन्म दिला आणि इथेच माझ्यासमोर माझ्यावर पूर्ण भरवसा ठेवून ती तिच्या पिलांना मोठं करतीये. मी गेलो तर लोक हा पिंपळ साफ करतील. मग कुठे जातील हे सगळे?

माणसाचं मन पण काय हुशार असतं. आहे त्या परिस्थितीतही त्याला त्याच्या असण्याचं महत्त्व पटवून देतं. आता हे मनाचे खेळ आहेत की देवानं दर्शविलेलं माझं इतिकर्तव्य? कोणास ठाऊक?  

Post to Feed
Typing help hide