डॉ. निरुपमा भावे यांचे अभिनंदन

डॉ.निरुपमा भावे यांचे अभिनंदन

पुण्यातील एक महिला, डॉ.निरुपमा भावे व त्यांचा सायकल ग्रुप १९ डिसेंबरला पुण्याहून सायकलवर बसून निघाला आणि तो ३ जानेवारीला कन्याकुमारीला पोहोचला!  डॉ.भावे ह्या गणित विषयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका आहेत. ३ जानेवारीला त्यांना ७० वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या सायकल ग्रुपने त्यांचा हा सत्तरावा वाढदिवस कन्याकुमारीला साजरा केला. डॉ.निरुपमा भावे व त्यांच्या ग्रुपचे ह्या विक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन!!

मनोगताच्या २०१२ च्या दिवाळी अंकात निरुपमा भावे यांची मुलाखत निरुपमा भावे : संवाद   या ठिकाणी  प्रकाशित झालेली आहे. त्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या इतर पैलूंविषयीदेखील माहिती मिळेल.

माझा आणि डॉ. निरुपमा यांचा परिचय महाविद्यालयीन जीवनापासून आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना ह्या परिचयाचे रुपांतर मैत्रीमध्ये झाले. सत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या ह्या मैत्रिणीबद्दल लिहिलेल्या काही ओळी:

सत्तर वर्षे पुरी जाहली खरे न हे वाटे
सायकलसखीवर स्वार हो‌ऊनी दक्षिणतट गाठे

सायकलसफरी किती जाहल्या नाही त्या गणती
वर्णन त्यांचे ऐकुनिया जन अचंबीत होती

गिर्यारोहण, पदयात्रांचे नसे तिला वावडे
दोर बांधुनी चढलि-उतरली आहे अवघड कडे

बुध्दिमान ही सखी आमुची आहे ती गणिती
संगीत आणि पाककलेतहि प्रवीण आहे ती

सामाजिक बांधिलकीचीही असे तिला जाण
वेळ काढुनी त्यासाठी ती  दे‌ई योगदान

आरोग्य नि दीर्घायू लाभो चढण्या ’नवशिखरे’
शुभचिंतन मी करते सखये ह्या कवनाद्वारे
-------------------------------------------------------