रात्रीचा गिरनार ट्रेक

हिवाळ्यात जुनागड जवळच्या गिरनार पर्वता वर जायचे ठरले आणि मी लगेच होकार दिला . ठरल्या प्रमाणे ५ जानेवारी २०१८ ला रात्री ९:४५ च्या वेरावल एक्स्प्रेस ने जुनागड ला प्रवासासाठी मी न्यायते सर, शुभदा न्यायाते, सीमा केतकर, खोले सर, प्रसाद सर्वटे, स्वाती फडणीस आणि डी. आर. पाटील सर असे आठ जण जमणार होतो. मी आणि पाटील सर स्टेशन वर दोन तास आधी पोचलो होतो, बहुतेक सर्व जण ओफीस मधून थेट मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्टेशन वर येणार होतो ,आम्ही रेल्वे स्टेशन वर थोडा चहा-नाश्ता घेतला. गाडी अगदी वेळेवर सुटली. ट्रेनने बोरीवली स्टेशन सोडल्यावर आम्ही जेवणाचे डबे सोडले. थोडे खाऊन घेतले तो पर्यंत गाडी पालघर स्टेशन सोडून पुढे गेली होती. प्रसाद त्याच्या बुक केलेल्या बर्थ वर झोपण्या साठी  दुसर्या डब्यात गेला तर , तो उशिरा आला म्हणून त्याची जागा टीसी ने दुसर्याला दिली होती , त्याला आता RAC सीटवर बसून प्रवास करावा लागणार होता . पाटील सरांचे तीकीट confirm न झाल्याने त्यानाही बसून प्रवास करावा लागणार होता. गाडी पूर्णपणे pack असल्याने काही इलाज नव्हता. आम्हाला चांगलाच धडा मिळाला होता.
गाडी पहाटे ५:३० वाजता अहमदाबाद स्टेशनावर पोचली आणि स्टेशन वरील गोंगाटाने मी जागा झालो. मी पाटील सरना झोपायला बोलावले , प्रसादला रात्री झोपायला मिळाले होते. आमच्या सोबतीला एक लहानसा उंदीरही कालपासून डब्यात होता त्याने स्वातीच्या खाऊची पाकिटे कुरतडून रात्रीत चव घेतली होती. सकाळी गाडी १०:०० वा राजकोट ला आली आणि मेहताजी जिलबी-फाफडा घेऊन स्टेशनवर भेटायला आले. गप्पा-गोष्टी मध्ये अर्धा तास निघून गेला आणि आमचे डबे दुसऱ्या गाडीला जोडून वेरावलच्या दिशेने गाडी रवाना झाली. निघताना मेहताजीनी आम्हाला गिरनार बद्दल बरीच माहिती दिली होती. बाहेर हवेत गारवा होता. रेल्वे लाईन जवळच्या तलावात असंख्य स्थालांतरीत पाणपक्षी दिसत होते. गप्पा-गोष्टी करत २:००वा जुनागड स्टेशन आल्यावर आम्ही सामान घेऊन उतरलो. स्टेशन वर दोनच platform आणि बाहेरचे द्वार असलाने इतर प्रवाश्यांच्या मागे-मागे आम्ही पण स्टेशनच्या बाहेर आलो. बाहेरून आम्ही टम-टम रिक्षा करून १५०/- रुपयात जुनागड हून गिरनार पर्वताच्या पायथ्या जवळील तलेठी गावातील प्रेरणा आश्रमात पोहोचलो. आश्रमचा परिसर मोठा आणि  निट-नेटका होता. खोले सरांनी दोन रूम प्रति दिन ५००/- रुपये भाड्याने आधीच बुक केल्या होत्या. आम्ही ४:०० वाजता तयार होऊन गिरनार पर्वता कडे जायला निघालो. सोबत लहान sack मध्ये पाणी, टोपी, टोर्च, खाऊ, आणि काहींनी स्लीपिंग bag घेतल्या होत्या. तलेठी पूर्णपणे धार्मिक यात्रेकरून साठी वसलेल गावं आहे. रस्ता दुतर्फा धार्मिक पूजा विधी आणि पर्यटकां साठी लागणाऱ्या वस्तुंची दुकाने दाटीवाटीने होती. चढाई सुरु करायच्या आधी आम्ही १०/-रु भाड्याने काठ्या घेतल्या. आमचा रात्री वर मुक्काम  करून सकाळी देव दर्शन करून खाली परतायचा बेत होता. सगळ्यांना थोडी भूक लागली होती म्हणून एका टुकार खानावळीत दल-रोटी-सब्जी-चावल खाऊन वरची वाट धरली. 
डोंगरावर एकूण ९९९९ पायर्या चढायच्या होत्या. त्यात ८५०० पायऱ्या चढून ७५० पायर्या खाली उतरून परत ७५० पायर्या चढून गुरु शिखर गाठायचे होते. पायऱ्या पूर्णपणे दगडात बांधलेल्या असल्याने वाट शोधायचा त्रास नव्हता. पण पायऱ्या चालून –चालून थोड्या गुळगुळीत झाल्या होत्या, पायऱ्या सोबत बांधलेले कठडयांचे काठही गुळगुळीत झाले होते. वाटेच्या दुतर्फा खाऊची  दुकाने होती ,त्यांचे मालक आम्हाला आग्रहाने बोलावत होते. काही तर डोलीत बसून जाण्यासाठी दरात सूट देत होते. डोलीचा दर ३०००/- पासून सुरु होत होता.  संध्याकाळ होणार होती सकाळी पर्वतावर गेलेले भाविक थकून-भागून खालीपरतत होते , हवेत छान गारवा होता. झाडांवर अनेक पक्षी दिसत होते.काळ्या तोंडाच्या लंगुर माकडांच्या मर्कट लीला पाहत आमचा प्रवास सुखात चालला होता.प्रवासाची सुरवात छान झाली होती. तेव्हढयात एकाने सांगितले कि उद्या सकाळी ५ ते १० वाजता गिरनार डोंगर चढायची स्पर्धा असल्याने रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. आम्ही आमच्या कार्यक्रमात बदल करून रात्रीतच खाली उतरण्यावर विचार करू लागलो. हळूऱ्हळू रात्र पडू लागली. आज पंचमी असल्याने चंद्रोदय रात्री ११:०० वाजता होणार होता. आता चढणीच्या पायऱ्या सुरु झाल्या होत्या. आम्ही हेड टार्च लावले आणि नेहमीच्या चालीने चढू लागलो. रस्त्यावरची दुकाने बंद होऊ लागली होती आणि वाटेवर फक्त आम्हीच उरलो होतो. सूर्यास्ताला सर्वानीच खुप फोटो काढले. आम्ही डोंगराच्या पाशिमेकडून चढत असल्याने, डोंगरावरून जुनागड चा देखावा प्रेक्षणीय होता. हळूऱ्हळू पश्चिमेकडे सूर्य महाराजांनी विश्रांती घेतली आणि आसमंत अंधारात बुडाले. पूर्ण अंधार झाल्यावर आकाशातील ताऱ्यांप्रमाणे जमिनीवरही असंख्य तारे उगवल्या सारखे वाटत होते. वाटेवर पुरेसे हेलोजनचे दिवे असल्याने खूप हायसे वाटत होते. डोंगराच्या उभ्या कातळाला वळसा देत आम्ही पायऱ्या चढून ८:३० वाजता नेमीनाथ जैन मंदिराच्या प्रवेश द्वारापाशी पोहोचलो आणि एक टप्पा पार झाल्यामुळे खूप हायसे वाटले.हा परिसर प्रशस्त आणि असंख्या जैन मंदिरांनी गजबजलेला होता.तिथल्या मंदिरात आम्ही पाणी प्यायलो आणि खोले सरांनी त्यांचा पाय मुरगळल्याचे सांगितले. आम्ही तिथल्या फोरेस्ट वायरलेस स्टेशन मध्ये मदती साठी गेलो. तिथे उद्याच्या स्पर्धेची तयारी म्हणून डॉक्टरांची एक टीम आली होती, त्यांनी औषधाची पिशवी लगेच उघडली आणि पायावर स्प्रे मारून वेदनाशामक गोळ्या दिल्या . खोले सरांना थोडे बरे वाटल्यावर आम्ही पुढची वाट चालू लागलो. वाटेत एका दुकानात छान चहा-चिवडा घेऊन आम्ही पुढे काही पायऱ्या चढून गेल्यावर खोले सरांनी त्यांचा पाय सुजल्याचे सांगितले तर, सीमाने पुढे अंबाजी पर्यंतच येणार असल्याचे सांगितले. पुढची परिस्थिती आम्हाला काहीच माहित नसल्याने थोडा उहापोह  केल्यावर त्यांनी जैन आश्रमाजवळ थांबायचे ठरविले. पुढे गोमुख तीर्थ बंद असल्याने दर्शन घेता आले नाही.आतापर्यंत आम्ही फक्त ३५०० पायऱ्या चढल्याने आमचाही प्रवास आता हळूऱ्हळू असंग्दिग्ध अवस्थे कडे होत असल्याचे वाटू लागले होते. त्यात आम्हाला दुसऱ्या दिवशीची दुपारी दोनची ट्रेन गाठायची होती. 
विचार विनिमया करता-करता आम्ही अंबाजी मंदिरापर्यंत पोहोचलो. देऊळ बंद करून पुजारी काही वेळेपूर्वीच गेल्याचे कळले. तिथली घरे आणि दुकाने पण बंद झाली होती. तिथे एका माणसाने आम्हाला पुजार्यांना विनंती करायला सांगितले ,आम्ही न्यायाते सरांना आणि प्रसादला मोहिमेवर पाठवले. सरांनी त्यांचे काम फत्ते केले. पुजार्याने देऊळाच्या मागील दरवाज्याने आम्हाला देऊळात नेले आणि देवीचे दर्शन घडविले. देऊळ जुने पण साधेच होते. फारसे कोरीव काम नव्हते. मंडपातील घुमटाकार छतावरील नक्षी मात्र पाहण्या सारखी होती. सगळ्यांनी मनोभावे दर्शन घेतले तर काहींनी लोटांगण घातले. आम्ही लांब मुंबईहून आल्याचे कळल्याने पुजारी बोलका झाला होता. त्यांनी आम्हाला दाल-खिचडी, भाकरी , कढी आणि तर्री-भाजी प्रसाद म्हणून आग्रहाने खाऊ घातली.देवीचे दर्शन गेताल्याने आम्हाला वेगळाच हुरूप आला होता. पुढचा प्रवास थोडा कठिण असलाचे वाटत होते. काहींनी आम्हाला थांबायचं सल्ला दिला तर काहींनी चालत राहायचा . आम्ही मात्र तीन वाजेपर्यंत असेल तिथून परतायचे ठरविले होते. अर्ध्या तासात आम्ही गुजराथ मधील ३६६६ फुटावरील सर्वोच्च शिखर म्हणजे गोरखनाथ धुनी जवळ पोचलो, रात्रीचे १०:०० वाजले होते. स्वाती आणि प्रसाद तेथील एका अरुंद गुहेतून जाऊन आले. समोर मिट्ट अंधारात अस्पष्ट पणे गुरुशिखाराचे दिवे दिसले आणि मला जरा धडकी भरली . आम्हाला पूर्ण डोंगर उतरून परत चढायचा होतां. पुढे एकही दुकान किंवा दिवे दिसत नव्हते तरीही सर्वांनी पुढे जायचे ठरविले. स्वातीचा आतापर्यंतचा प्रवास अनवाणी चालला होतां. मी तिला अनेक वेळा विनंती केली पण ती मात्र हट्टाला पेटली होती. अर्ध्यातासात आम्ही ८०० पायऱ्या उतरून कमंडलू तीर्थाकडे जाणाऱ्या वाटे पर्यंत पोहोचलो, तिथे काही मराठी साधू राहत असून रात्र मुक्कामची सोय असल्याचे कळले पण, आम्ही गुरुशिखाराकडे जाणारी  वाट धरली आणि पायऱ्याचढू लागलो. आता थंडी पडू लागली होती. वाटेत काही ठिकाणी भन्नाट वारा अंगाला झोंबत होता. आम्ही मात्र गप्पा मारत, रात्रीच्या निरव शांततेचा आनंद घेत, पायऱ्या चढत होतो. शुभदानी आकाशातील काही तार्यांची नावे सांगीतली. डोंगरावर जाणार्या पायऱ्या काही ठिकाणी २०फ़ुट उंच भिंत बांधून त्यावरून खुबीने बांधल्या होत्या. साधारण ८०० पायऱ्या चढल्यावर आम्ही गुरु-शिखरावर पोहोचलो आणि आमच्या आनंदास पारावर उरला नव्हता. सगळ्यांचे चेहेरे अंधारातही आनंदाने फुलले होते. तिथे पत्र्याचा आडोसा करून 10X10 फुट जागेत दत्तात्रयाचे देऊळ बांधले होते. आम्ही जाळीच्या दरवाज्यातून दत्तात्रयाचे टार्चच्या उजेडात दर्शन घेतले. छान सुबक संगमरवर च्या दत्तात्रया मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही तिथे थोडा वेळ विश्रांती घेतली. तेव्हढ़यात तिथे दोघे गुजराथी बांधव पण आले. देऊळाच्या पायऱ्या वर आम्ही खूप फोटो काढले आणि परतीच्या वाटेला लागलो. वाटेत अंधारात गुरु शिखराकडे जाणारे तुरळक भाविक भेटत होते. आम्ही परत प्रवास करीत जैन मंदिरापाशी पोहोचलो. तिथे समजले कि खोले सर फोरेस्ट स्टेशन मध्ये आणि सीमा जैन मंदिरात झोपल्या होत्या. जैन मंदिरातला शिपाई सकाळी ५:०० वाजल्या शिवाय दार उघडायला तयार नव्हता. सीमा ला हाका मारल्या पण काही उपयोग झाला नाही. अखेर खोले सरांना सकाळी ५:०० वाजता खाली येण्याचे सांगितले आणि आम्ही सहा जण रात्री डोंगर उतरू लागलो. 
डोंगर उतरताना मात्र पाया दुखू लागले होते डोळ्यांवर थोडी झोप येऊ लागली होती. थांबत-थांबत आम्ही पहाटे ४:०० वाजता खाली पायथ्याला पोहोचलो. खाली स्पर्धेची तयारी सुरु झाली होती. पोलीस बंदोबस्त वाढला होता. कशी तरी रिक्षा करून आम्ही प्रेरणा आश्रमात पोहोचलो आणि गादया उघडून आडवे झालो. सकाळी ९:०० वाजता जाग आली तर सीमा आणि खोले सरना फोन लागत नव्हता. प्रसाद दार उघडून बाहेर आला तर दोघे बाहेर उभे होते. आम्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला. ती दोघं सकाळी ५ वाजता निघून स्पर्धेतील स्पर्धक, आयोजक आणि पोलिसांना चुकवत खाली पोचले होते. आम्ही सर्वांनी गरम पाण्याने यथेच्छ स्नान करून आश्रमातील भोजनालयात चहा-डाळ-ढोकळी चा नष्टा करून रिक्षाने जुनागड कडे प्रयाण केले. जुनागड मध्ये महाबत खान चा प्रसिद्ध मकबरा पहिला तिथेही भरपूर फोटो काढले मग मिठाईच्या दुकानातून घरी नेण्यासाठी जुनागड चा प्रसिद्ध थापली पेंढा घेतला. रेल्वे स्टेशन जवळचे गीता हॉटेल मध्ये छान गुजराती जेवणावर तव मारून रेल्वे स्टेशनावर २:०० वाजता पोहोचलो. ट्रेन आल्यावर मात्र जास्त वेळ न दवडता सगळ्याने ठरलेले बर्थ पकडून ताणून दिली.