द्विधा!

वा! किती दिवसांनी माझी खुर्ची मिळाली मला. शेवटी आपलं घर ते आपलं घर.
तिकडे घरी जाऊन आलं की नेहमी असंच वाटतं. खरं तर भारतातल्या घरी मी माझं
सगळं लहानपण घालवलंय. पण इथे येऊन इतकी वर्ष झाली आहेत की आता हे घर मला
माझं वाटतं आणि ते थोडं परकं. बरं झालं मानसीला लवकर झोप लागली. गेले
कित्येक दिवसांपासून, नाही, कित्येक महिन्यांपासून असंख्य विचार येत आहेत
डोक्यात. पण त्यांना वेळच देता येत नाहीये. आज मात्र अगदी डोकं गच्च झालंय.
wine पाहिजेच.
छत्तीस.. थर्टी सिक्स.. आईनं अशी
आठवण करून दिली वयाची जसं काही मला माहीतच नाही माझं वय. माझ्या रागाला
काहीही भाव न देता तिनी तिचा मुद्दा पुढे केलाच. नशीब मानसी नव्हती जवळपास.
अर्थात ते बघूनच आईनं विषय काढला असणार म्हणा. तिचं टिपीकल बोलणं, 'आठ
वर्ष झाली लग्नाला, हनीमून संपवून संसार कधी सुरू करणार तुम्ही? आम्हाला
छोटा राघव किंवा छोटी मानसी बघायला मिळणार की नाही? ' काय उत्तर देणार
ह्याला? हो ही म्हणवत नाही आणि नाही ही म्हणवत नाही. 'विचार करतोय अगं
आम्ही, विचार झाला की सांगूच ना तुला! ' ह्या व्यतिरिक्त दुसरं उत्तर सापडतच
नाही ऐन वेळी. मग वयाचा उद्धार व्हायचा तो होतोच. ती तरी आई आहे म्हणून
बोलून दाखवते. तसा सगळ्यांच्याच डोळ्यात हा छुपा प्रश्न डोकावतोच. काय काय
reactions असतात लोकांच्या! 'काही नाही का अजून? ', 'डॉक्टर चा सल्ला घ्या',
'किती वर्ष आईला वाट पाहायला लावणार रे? ', 'तुमचं आपलं बरं आहे, सडाफटिंग
आयुष्य, नुसती मजाच की'. कोणाला काय करायचंय माझ्या पर्सनल आयुष्यात
डोकावून. फालतू सल्ले देतात नुसते! काही सल्ले खरंच काळजीतून दिले जात
असतीलही. पण प्रत्येक जण त्यांना वाटणाऱ्या सुखाची लेणी माझ्या अंगावर पाहू
पाहतो. प्रत्येक जण वेगळा नाही का? दादा वेगळा, काका वेगळा, मी वेगळा.
तसंच मावशी वेगळी, पियूताई वेगळी आणि मानसी वेगळी. आणि माझ्याच डोक्यात
विचारांचं काहूर माजलेलं असताना ही असली बोलणी नकोच वाटतात.
पण
तरीही मजा आली ह्या वेळी सुट्टीत. सगळे एकत्र जमले होते बऱ्याच वर्षांनी!
पियूताईचा अर्घ्य काय गोड मुलगा आहे. त्याच्याशी मस्ती करताना जाम मजा आली.
माझा आणि मानसीचा किती लळा लागला होता त्याला. घरी आला की त्याचा ताबा
माझ्याकडे! पियूताई तर जाम खूश झाली. अर्घ्यला सांभाळायला एक माणूस मिळाला
ना तिला. अडीच वर्षांचं ते पिल्लू किती छान झोपायचं खांद्यावर. त्याचा तो
मऊ मऊ स्पर्श, छोटंसं तोंड वेडंवाकडं करून दिलेली जांभई, छोट्या छोट्या
गोष्टींवर खूश होऊन हसण्याची लकब, सगळं कसं वेड लावणारं आहे. मानसीबरोबर
लपाछपी खेळण्यात किती वेळ जायचा त्याचा. मानसी पण खूश होती त्याच्याबरोबर.
सगळ्यात जास्त वेळ तिनी अर्घ्य बरोबर काढला. अरे पण आई काहीच बोलली नाही
ह्यावर? आईनंच तर घडवून नाही ना आणलं हे पियूताईला राहायला बोलावून? जे
झालं ते छानच झालं म्हणा! खरंच, लहान मुलांमध्ये रमण्यातला आनंद दुसऱ्या
कशातच नाही. येताना flight मध्ये पण ती छोटी मुलगी काय गप्पा मारत होती.
मस्त वाटलं. आम्ही दोघंही लहान मुलांमध्ये रमतो आणि त्यांना छान सांभाळू
शकतो. मग अजूनही आम्ही दोघंच का आहोत?
लग्न करून
इकडे आलो आणि वेगवेगळी स्वप्नं खुणावायला लागली. आधी खूप पैसे साठवून घरी
परत जायचं स्वप्न. मग मोठ्या, अजून मोठ्या नोकरीचं स्वप्न. चारही दिशांनी
विस्तारलेल्या जगाला डोळे भरून पाहायचं स्वप्न. आपल्या लोकांना इकडे आणून
फिरवण्याचं स्वप्न. इकडच्या आपल्या लोकांत मिसळून जाऊन वेगवेगळी
सेलेब्रेशन्स एंजॉय करण्याचं स्वप्न. घराचं स्वप्न. ग्रीन कार्डचं स्वप्न.
सगळं किती भरभरून जगलो आम्ही. बघता बघता सहा सात वर्षं संपली आणि पस्तिशी
आली. ह्या वर्षांत इतरांच्या मुलांमध्ये मनसोक्त रमलो आम्ही. पण स्वतःसाठी
मात्र 'अजून काही दिवस थांबू' म्हणत राहिलो. हळू हळू काही काही मित्र
दोघांचे तिघे झाले. काही तिघांचे चौघे झाले. पण त्यांची होणारी फरपट बघून
खरं तर मानसी गांगरूनच गेली होती... त्या सगळ्यांना तेव्हा आमचं आयुष्य
जास्त सुखी वाटत होतं. आणि आम्हीही आमच्या 'सुट्या' आयुष्यात सुख मानायला
लागलो होतो. कारण ते सगळे बंधनात असताना आम्ही मात्र मुक्तपणे जगत होतो ना.
ना वेळेचं गणित ना पैशांचा हिशेब. आशिष आणि मणी ला मुलंच नको होतं.
त्यांचं लॉजिक जास्त पटायला लागलं. 'एवढं पॉप्युलेशन वाढलं आहे, त्यात आपण
कशाला भर घाला! ', वगैरे विचार मनापासून पटायला लागले. आईच्या प्रश्नांना
उडवून लावता लावता पस्तिशी आली आणि एक दिवस अचानक जागा झालो मी. माझ्याच
वाढदिवसाच्या दिवशी निखिलला मुलगी झाली. तो 'मूल हवं असणाऱ्या' ग्रुप मधला
शेवटचा उरलेला मित्र होता. एकदम हेवा वाटला त्याचा आणि असं वाटून गेलं की
'now it's too late! '
वय खूप वाढलंय आता. आता
ठरवलं तरी अजून एक दोन वर्षांनी बाळ येणार ह्या जगात. मग सुरू होणार सगळ्या
जबाबदाऱ्या. रात्रीची जागरणं, न पुरणारा वेळ, बाळाला भारतीय संस्कार
देताना होणारी दमछाक, त्याची शाळा, त्याचा सर्वांगीण विकास घडवून
आणण्यासाठी करावी लागणारी धावपळ. बापरे! एवढी मानसिक शक्ती शिल्लक आहे का
आमच्यात आता? विचार करता करता अजून एक वर्ष निघून गेलं. कधी वाटतं की फारसा
विचार न करता ज्यांच्या घरी बाळ आलं ते किती नशीबवान आहेत. किंवा ज्यांनी
'मुक्त' आयुष्याची मजा कधी चाखलीच नाही ते. किंवा असे लोक ज्यांना ठामपणे
घरात पाहुणा हवा होता. किंवा असे ज्यांनी मोठ्यांच्या मागणीपुढे वेळीच मान
तुकवली. कधी कधी वाटतं की हे सगळे लोक आता किती सुखी आहेत. आधी स्वैर
आयुष्याची किंमत माझ्या नजरेत मोठी होती आणि आता ह्या गोंडस बंधनाची किंमत
मोठी आहे. चूक, बरोबर ह्या मापात सगळ्या गोष्टींना ना तोलता मला नक्की काय
हवंय हेच समजेनासं झालंय. मानसीची अवस्था काही फार वेगळी नाही. दोघांपैकी
कोणीच ठाम नसल्यामुळे निर्णयच होत नाही काही!
पण
आता अगदी मनापासून वाटतंय की एक छोटंसं पिल्लू पाहिजे घरात. आमचं
दोघांचं... आताही काही फार उशीर झालेला नाहीये. सगळ्या सबबींना मागे टाकून
पुढे जावं का? मानसीशी उद्याच बोलून टाकतो. तिचा ठाम नकार असेल तर प्रश्नच
मिटला. पण जर ती द्विधा मनःस्थितीत असेल तर मी ठाम राहीन. तर्क
वितर्कांच्या पलीकडे जाऊन भावनिक ओढीला जास्त किंमत द्यायची वेळ आली आहे
आता! ठरलं तर! उद्याच्या दिवसाकडून नक्की काहीतरी घ्यायचंच! नवा निर्णय
किंवा नवं स्वप्न!