मी नाही त्यातला/ली

        माझ्या एका मित्राने स्वत: म्हटलेल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण Whatsapp वर मला पाठवले ते मला आवडले म्हणून माझ्या दुसऱ्या एका मित्राकडे ते पाठवावे असे वाटले पण त्याच्याकडे Whatsapp नाही हे मला माहीत असल्यामुळे त्याच्या मुलाकडे (त्याचा स्वत:चा व्यवसाय असल्यामुळे) असेल म्हणून त्याविषयी चौकशी करण्यासाठी त्या मित्राला फोन केला पण तो अंघोळीत गुंतल्यामुळे त्याच्या पत्नीने घेतला अर्थात आमचे घरोब्याचे संबंध असल्यामुळे माझ्याशी बोलायला काहीच अडचण नसल्यामुळे ती बोलू लागली.तेव्हां माझा फोन करण्यामागील हेतू तिला सांगितला त्यावर "छे छे तसले काही नसते आमच्याकडे " असे तिने मला जणू बजावलेच. इतर वेळेस अगदी खेळीमेळीने संभाषण करणाऱ्या व्यक्तीने या पद्धतीने बोलणे सुरू केल्यावर मी चकितच झालो. Whatsapp म्हणजे काहीतरी अभद्र गोष्ट असावी असा तिचा सूर वाटला, आणखी तेवढ्यावरच न थांबता  "आम्हाला ते आवडत नाही आणि एकादी गोष्ट आम्हाला आवडत नसेल तर कुणी आग्रह केला म्हणून काही आम्ही बाळगत नाही."अश्या अर्थाचे उद्गारही तिने काढले व त्याचरून Whatsapp या प्रकाराविषयी तिला फारच तिटकारा  असावा असे दिसले. मी काही तसा आग्रह करण्यासाठी तिला फोन केला नव्हता. पण जणू मी त्यासाठीच फोन केला असे समजून  पुढे "आम्हाला कोणाशी बोलावे वाटले तर आम्ही फोन करतो " असेही उद्गार तिने काढले,( तसे बघायला गेल्यास  मीही तिच्याशी फोनवरच बोलत होतो). त्यावर तिच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी " बरे ठीक आहे आमच्या मित्रवर्यांचे स्नान आटोपल्यावर त्याला फोन करतो असे म्हटले त्यावर "नाही झालीच आहे त्यांची अंघोळ "म्हणून माझी सुटका होऊ न देता Whatsapp  विषयी आपल्याला काय अनुभव आले आणि त्याचमुळे अश्या निर्णयास आपण का आलो याविषयी तो बोलत राहिली आता माझ्या स्मार्ट फोनवरही अनेक वेळा ऐकून कान किटण्याची शक्यता असणारे  गाण्याचे किंवा वाद्यांचे प्रयोग किंवा पहाताना आपल्यालाच भोवळ येईल असे नृत्याच्या प्रात्यक्षिकांचे विडिओज येतातही व मनात असो वा नसो ते न ऐकता किंवा न पाहताच त्यांना "आवडले" अशी पावती द्यावी लागते तरीही काही महत्वाचे संदेशही पटकन्‍  मिळून झटपट काही कामे आटोपतात असा अनुभवही येतो. सध्या "तूच मला आधार" च्या काळात , आधारच्या झटपट निर्गमनासाठी तर त्याचा मला फारच उपयोग झाला हे मान्यच करावे लागेल..
        माझ्या मित्राला मग मी माझे फोन करण्याचे कारण सांगून दुसऱ्या कुणाचा फोन उदा: त्याच्या मुलाचा Whatsapp युक्त आहे का याची विचारणा केली.अर्थात या अगोदर त्याच्या बायकोला विचारण्याचा मूर्खपणा मी केला होता आणि" जे आम्हाला आवडत नाही तेच त्याच्याही बाबतीत लागू होत नाही का?" अशी माझी चंपी झाली होती.त्यांच्या मुलाचा स्वत:चा व्यवसाय असल्यामुळे कदाचित त्याच्या फोनवर Whatsapp असेल अशी माझी गैरसमजूत झाल्याचे तिच्या गळी उतरवण्यापेक्षा मित्राला विचारणे मला योग्य वाटले तरी त्याच्या हातात फोन आल्यावर आपली बायको नेहमीपेक्षा अधिक वेळ माझ्याशी बोलली हे ध्यानात येऊन त्याने हसत हसत,"काय रे तिचं काय बौद्धिक घेत
होतास ?"  असं विचारल्यावर "मी काय बौद्धिक घेणार तेवढी माझी बौद्धिक पातळी आहे असं तुला वाटतं का?" असं विचारल्यावर तो हसू लागला.
             बऱ्याच लोकांना अश्या नव्या सुधारणांचं का वावडं असतं मला समजत नाही आणि त्यातही आपण या गोष्टी बाळगत नाही याचा त्यांना अभिमान असतो हे विशेष.म्हणजे बाजारात आलेली प्रत्येक नवी गोष्ट आपल्याकडे असलीच पाहिजे असा अट्टाहास असणाऱ्यांचा एक वर्ग असतो.अश्या लोकांनी पूर्वी, म्हणजे मोबाइल पूर्वीच्या काळात  फोनचे विविध प्रकार  तर  ठेवलेलेच होते पण पाठोपाठ पेजर नंतर अगदी सुरवातीस अगदी एक कॉल करायला वीस पंचवीस रु. व बाहेरून आलेला स्वीकारण्यासाठीही भरभक्कम दर चालू असलेल्या काळातील मोबाइल फोन ,त्यानंतर स्मार्ट फोन व त्यानंतर येणारी त्याची प्रत्येक नवीन आवृत्ती स्वत:कडे असायलाच हवी असा त्यांचा अट्टाहास असतो तर त्याच्या अगदी विरुद्ध टोकाची भूमिका असलेला हा दुसरा वर्ग ! या वर्गाकडे संगणक कित्येक दिवस नव्हता.मी अभियांत्रिकि महाविद्यालयात असल्यामुळे त्याकाळात अगदी प्रारंभिक स्वरुपाचे संगणक हाताळले होते तरी प्रोग्रॅमिंग मध्ये फारसा रस मी घेतला नाही पण निवृत्तिनंतर मात्र संगणक वापरणे इतके सुलभ होत गेल्याने सढळपणे त्याचा वापर करू लागलो व आंतरजालाचा जास्तीत जास्त उपयोग करू लागलो व आताही स्मार्ट फोनचा वापर तितक्याच उत्साहाने करू लागलो  उलट पूर्वी माझ्याचप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत असताना मोठा रस घेऊन संगणकावर  प्रोग्रॅमिंग करणारे माझे मित्र मात्र आता संगणकावर साधा ईमेल करायचा विचार करत नसत व "आम्ही नाही बुवा त्या संगणकाच्या वाटेस जात असं काहीसं तुच्छतेने म्हणत अजूनही Whatsapp न वापरणारे माझे मित्र या प्रकारात मोडतात. आमच्यासारखे आता जुन्या काळात मोडणारे असा विचार करतात हे जरी अयोग्यच असले तरी काही तरुण पिढीतले लोकही यात समाविष्ट होतात ही आणखी नवलाची गोष्ट.म्हणजे एकीकडे सेल्फी काढून अपघातग्रस्त होणारे अतिरेकी या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात तर त्यांच्यातलेच काही "मी नाही त्यातली/ला" असे म्हणतात याचे आश्चर्य वाटते.
      त्यातील काही  "इतका वेळ आम्हाला नाही " असे  म्हणतात तेव्हां त्यासाठी वेळ घालवलाच पाहिजे असे नाही पण त्या सोयीचा योग्य तेवढा वापर करायला काय हरकत आहे असे मी सुचवले तरी त्याना ते मान्य नसते.माझा अमेरिकेच्या वारीत मित्र बनलेला समवयस्क मित्र अजूनपर्यंत तरी मोबाइल वापरत नव्हता अगदी अमेरिकेत असतानासुद्धा, याचे मला आश्चर्यच वाटते आता तर त्याने ग्रीन कार्डही केले आहे . (त्याच्या मुलांनी त्याच्यावर मोबाइल फोन बाळगण्याचे बंधन आता घातले असेल असे वाटते कारण तेथे तर त्यावाचून संपर्क साधणे अवघडच होते.कदाचित कोणत्याही यांत्रिक शक्तीवर चालणाऱ्या साधनांवर बहिष्कार टाकणाऱ्या अमेरिकेतील "आमिश" या जमातीचा आदर्श त्याच्यासमोर असेल.अमेरिकेच्या आमच्या एका भेटीत पेनसिल्वानियातील आमिश  वसाहतीस मुद्दाम भेट दिली तेव्हां आम्हाला अनेक वर्षानंतर घोडागाडीने फिरण्याचा योग आला.एक दिवसापुरते ते बरे वाटले तरी  संपूर्ण जीवन कोणत्याही यांत्रिक अवजारांचा वापर न करता काढण्याची शिवाय एक तत्त्व म्हणून तरी अशी जीवनपद्धतीच स्वीकारणे ही कल्पनाही करणे अवघड वाटते पण तशी जीवनपद्धती स्वीकारणारी निदान एक पूर्ण वसाहतच तेथे आहे आणि त्यामधील सर्वच लोकांची ती जीवनशैलीच आहे पण आमच्या मित्रासारखे  स्मार्ट फोन्सचा सुळसुळाट असलेल्या जगात राहूनही अश्या काही गोष्टी न वापरण्याचा  हट्टाग्रह करणाऱ्यांना काय म्हणावे समजत नाही. .