समाजाचे निर्बुद्धीकरण

व्हॉटसऍप व फेसबुक यांचे जे दुष्परिणाम आहेत त्यातील सगळ्यात वाईट परिणाम "समाजाचे निर्बुद्धीकरण" हा आहे. सुशिक्षित लोक तद्दन मूर्खा सारखे वागत आहेत. काल मला एका व्यक्तीने त्याच्या कडे आलेला व सध्या व्हायरल असलेला एक संदेश पाठविला. (आधी सॉरी म्हणून, कारण सहसा मला असे फॉरवर्ड करायचे नाहीत ही शिस्त त्याला माहीत आहे).  नासा ने दिल्ली येथे एप्रिल तारीख ७ त १५च्या दरम्यान रिष्टर ९.१ ते ९.२ तीव्रतेचा भूकंप होणार असल्याचे भाकीत केले आहे. व त्याने मला विचारले की तू इंजिनियर वगैरे आहेस, तर यात काही तथ्य आहे का हे विचारण्या करता फॉरवर्ड केला.

मी त्याला थेट उत्तर देण्याचे टाळले व उलट विचारले, की या आधी नासा किंवा इतर कोणी असे भूकंपाचे भाकीत केले आहे का? या वर तो असे म्हणू शकतो की कधी तरी पहिले भाकीत असणार. ठीक आहे. पण हे एकदम अति सूक्ष्म दर्ज्याचे भाकीत आहे - रिष्टर ९.१ ते ९.२. व फक्त ८ दिवसाच्या "टाईम विंडो" मध्ये. विज्ञानात शोध असे अचानक लागत नसतात. गेल्या  दोन तीन वर्षात जगात अनेक भूकंप झाले. पण त्यांचे केवळ मोठा भूकंप, पुढच्या काही महिन्यात, असे ढोबळ भाकीत पण नाही, व आता एकदम अतिसूक्ष्म भाकीत. हे तुला पटते का?  तसेच, त्या मेसेज मध्ये सर्वच ठिकाणी रिष्टर चे स्पेलिंग चुकीचे आहे,  रेक्टर असे आहे, हे तरी तुझ्या लक्षात यावयास हवे होते. असे अनेक प्रती प्रश्न केल्या वर त्यालाच आपली चूक पटली.

अनेक फॉरवर्ड असे असतात की थोडीशी अक्कल वापरली तर ते चुकीची आहेत हे सहज समजते. असाच काही महिन्यांपूर्वी एकाने एक व्हिडियो पाठविला. दोन विमानांची टक्कर होता होता वाचली, असा. जरा विचार केला तर लक्षात आले असते की त्याच्या चित्रणात किमान चार कॅमेरे होते. एक कॅमेरा विमानाच्या आत. एक विमानाच्या बाहेर पण जरा वर व उजवी कडे, एक डावी कडे व जरा खाली, (रनवे वर धावत्या विमानाचे  चाकांचे चित्रण), व चौथा कॅमेरा दुसऱ्या विमाना करता. उजवी कडच्या कॅमेऱ्यात खिडकीतून एका महिला प्रवाशाचा चिंता ग्रस्त चेहरा दिसत असे. म्हणजे या चित्रणा करता कॅमेरा विमानाला समांतर, त्याच वेगाने धावत असला पाहिजे. कोणत्या वाहनात ? विमान उड्डाण घेत असताना धावपट्टी वर असे वाहन असणे, विमानाला समांतर धावणे, ते सुद्धा ताशी २०० किमी गतीने, केवळ अशक्य आहे. पण त्याही पलीकडे, या सर्व चित्रीकरण करणाऱ्यांना आदल्या रात्री स्वप्न पडले होते का, की उद्या अशी घटना घडणार आहे, जेणे करून त्यांनी आपले  कॅमेरे घेऊन तयार असावे? हा शेवटचा प्रश्न मी विचारल्या वर मात्र माझा मित्र पार वरमला.

बहुतेक व्हीडिओ फेक असतात, व ते फेक आहेत हे ओळखणे अगदी सोपे असते. पण जर आपणच आपले निर्बुद्धीकरण करून घेतलेले असेल, तर त्यावर मात्र उपाय नाही.