कहाणी माझ्या ध.रो.मु. ची

      ("औषध नलगे मजला" नंतर लगेचच हा लेख लिहिण्याची पाळी मजवर यावी हा खरेच दैवदुर्विलासच)
      पूर्वी रोगांच्या साथी यायच्या. आठवा १८९८ चा प्लेग ! त्यात केचळ भारतीय जनताच नाही तर एका ब्रिटिश अधिकाऱ्यासही बळी पडावे लागले होते.(अर्थात ते प्लेगमुळे नाही ) साथी आजही येत नाहीत असे नाही पण त्यावेळी त्यात मरणाऱ्यांची संख्या लक्षणीय असायची. कारण आजच्या इतके प्रभावी उपचार तेव्हां नव्हते आणि दक्षता घेणारी शासकीय यंत्रणा तर नव्हतीच. त्याबाबतीत आजच्या शासकीय यंत्रणेवर भाष्य करणे अवघड आहे., मात्र त्यामानाने आजकाल लोकही जागृत झाले आहेत .तरीही अलीकडेही स्वाइन फ्लूसारख्या साथी येऊन त्यात मरणाऱ्यांचे आकडे त्या काळात  प्रसिद्ध होत असतातच पण आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आकड्यापेक्षा ते कमी असल्यामुळे शिवाय त्यात दररोज अपघातामुळेही मरणाऱ्यांची भर पडत असल्यामुळे  "रोज मरे त्याला कोण रडे" अशी परिस्थिती होऊन शासनाचा व मने बधीर झाल्यामुळे इतर लोकांचा त्याकडे फार गंभीरपणे पहाण्याची आवश्यकता नाही  असा दृष्टिकोण झाल्यासारखे आहे.पूर्वी भयंकर वाटणाऱ्या उदा:देवी किंवा प्लेग अश्या रोगांचे आजकाल जवळ जवळ उच्चाटणच झाले आहे तर काही त्यावेळी भयंकर वाटणारे रोग चांगल्या उपचारांमुळे फारच सौम्य वाटू लागले आहेत उदा. मलेरिया,टी.बी. उलट कर्करोगासारखे काही भयंकर रोग अगदी साथ असल्यासारखे पसरत चालले आहेत.पूर्वी रोगांची साथ असे, पण हल्ली रोगातून बचावलेल्या रोग्यांनी त्याविषयी लिहिण्याची साथ पसरत चालली आहे.मीही त्या साथीचाच एक बळी म्हणायला हरकत नाही.कारण माझ्या मोतिबिंदू,दाढदुखी अश्या क्षुल्लक रोगांच्याबाबतीत लिहून या माझ्या रोगाच्या संसर्गाला बळी पडलेल्या वाचकांच्या संख्येत भर टाकण्याचा मीही मनोगतवरच  प्रयत्न केला आहे.पूर्वी साथीमध्ये रोगीच बळी पडत असल्याने रोगवर्णन करण्याच्या साथीतून मात्र ते व त्यांचे न झालेले वाचक वाचत.(वाचाल तर वाचाल याच्या विरुद्ध परिस्थिती) अर्थात याला अपवाद म्हणजे हसरी किडनी,माझा साक्षात्कारी हृदयरोग,किंवा कॅन्सर माझा सांगाती अशी पुस्तके लिहून अनेक रोगग्रस्तांच्या हृदयात आशेचा नंदादीप उजळविणारे पद्मजा फाटक,डॉ.अभय बंग आणि डॉ.बावडेकर असे काही लेखक आहेत  हे मात्र खरे.माझ्या बाबतीत मात्र रोग होणे आणि त्याचे निवारण होणे हे फारसे गंभीर वळण घेत नसले तरी किंवा त्याचमुळे हसत हसत त्याविषयी सांगितले की मला अधिक बरे वाटते कदाचित या निवेदनामुळे वाचकातील काहीजणांचा फायदा झालाच तर उत्तम हाही दृष्टिकोण त्यामागे असतो. काहीच नाही जमले तरी ,"हात्तेच्या इतकेच तर झाले होते ना मग उगीचच त्याचा एवढा गाजावाजा कशाला " अशी काही वाचक मनातल्या मनात ( कारण तसे मनोगत फारच सभ्य असल्यामुळे )माझी फिरकी घेतही असतील तरीही कोणत्या का निमित्ताने  वाचकाच्या चेहऱ्यावरील एकादी स्मितरेषा उमटण्याइतपत परिणाम झाला तरी पुरे अशी माझी माफक अपेक्षा असते.
              ध.रो.मु. शस्त्रक्रिया हे शीर्षक वाचून काहीच अर्थबोध न होण्याची शक्यता असली तरी माझी धमनी रोध मुक्ति शस्त्रक्रिया इतके मोठे शीर्षक लिहिले असते तर त्यानंतर पुढे वाचण्याचे धाडस तरी वाचकापैकी काहीनी केले असते की नाही शंका आहे ,  शीर्षक वाचूनच हृदय क्रिया बंद पडल्यासारखे वाटणे असा परिणाम शीर्षकाच्या लांबीत व शब्दयोजनेत अभिप्रेत नाही मग वाचक बुचकळ्यात पडले तर हरकत नाही हा दृष्टिकोण ! मात्र कदाचित त्या ऐवजी सरळसरळ ऍन्जिओप्लस्टी म्हटले असते तर मात्र एकदम हात्तेच्या एवढेच होय असे वाटले असते आणि श्वास मोकळा झाला असता ना ? खरे तर धमनी (अव)रोध मुक्ती हा शब्द उच्चारायला लांबलचक असला तरी ऍन्जिओप्लास्टीपेक्षा कमी जोडाक्षरे असणारा व माझ्या मते सोपा आणि सरळ आहे. ( जसे पु. ल. देशपांडे यांच्या मते शरद तळवलकर अगदी सरळ माणूस आहे ).नुसताच सोपा नाही तर अर्थवाहीही आहे. उच्चारून पहा आणि ते त्या शत्रक्रियेचे वर्णनही आहे.या शब्दाची निर्मितीही मीच केली आहे (अशी माझी कल्पना आहे ,नाहीतर असला फालतू उद्योग करायला वेळ कुणाला आहे ?) पण एवढा सगळा उपद्व्याप कशासाठी ? कारण उघडच आहे ही मुक्ती नुकतीच मला मिळाली म्हणून ! 
       त्याचे काय झाले वयाची पंचाहत्तरी उलटली तरी आपण व्यवस्थित वागून आपली प्रकृति अगदी औषध नलगे मजला असा सल्ला देण्याइतकी व्यवस्थित ठेवली आहे अश्या भ्रमात मी वावरत होतो.तसे  यापूर्वी काही अवयवांची कापाकापी करण्याचे प्रसंग अगदीच आले नाहीत असे नाही.पण ते कोठे दाताचे  मूळ कालवा (रूट कॅनाल),तर कधी डोळ्याचा मोतिबिंदु(कॅटरॅक्ट) अगदीच कमाल म्हणजे अंतर्गळ (हर्निया) येथपर्यंत माझी मजल गेली होती. आणि या सर्व शस्त्रक्रियांमध्ये माझ्या शरीराच्या कमीतकमी भागास दुखापत करण्यात आली होती. आणि अगदी स्थानीय बधीरीकरणच केल्यामुळे माझ्या शरीरावर काय उपचार वा अत्याचार होत आहेत हे मला समजत  होते, तरी वेदना होत नसल्यामुळे दु:ख नव्हते.
      . पण सर्व काही ठीक चालले आहे असे वाटत असतानाच एके दिवशी सकाळी उठल्या उठल्या पाठीत दुखल्यासारखे वाटू लागले.पण मला वातविकार असल्यामुळे हा त्याचाच प्रकार असावा असे वाटून सकाळचे फिरणे पार पडले असूनही पुन्हा एकदा बाहेर चक्कर मारून आलो.त्याच अवस्थेत जेवण केले.बहीण आणि तिचे यजमान पाहुणे असल्यामुळे त्याना घेऊन संध्याकाळी नुकतेच जवळ रहायला आलेल्या मित्रांकडेही जाऊन आलो पण तरी  चिन्हे काही बरी नाहीत असे मला जाणवत मात्र होते कारण यापूर्वी माझ्या आत्तेभावाचा मुलगा माझ्यापेक्षा तीन चार वर्षानीच लहान पण असाच "पाठीत दुखतेय पाठीत दुखतेय "म्हणत "होईल बरं " करता करता एकदम चक्क गेलाच असं त्याच्या बायकोकडून कळालं होतं त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरील भाव वाचण्यात पटाईत बायकोला काहीतरी मोठा बिघाड झाला आहे असे वाटलेच. पूर्वी (कदाचित हल्लीदेखील ) वैद्य नाडी पाहून रोगाचे निदान करत (नाडीपरीक्षा ?)त्यानंतर फॅमिली डॉक्टर  असत तेही नाडी आणि फार तर स्टेथो लावून व नंतर फारतर जीभ बाहेर काढून दाखवायला लावत आणि तेवढ्यावरून काहीतरी निदान करत हल्ली मात्र दुखणे समजून घेण्यासाठी अनेक तपासण्या करून आणण्यास सांगितले जाते व त्या सर्व पाहून रोगाचे अचूक निदान नाही तर केवळ अंदाजच केला जातो व तोही बरोबर असेलच अशातला भाग नाही.पण माझ्या बाबतीत मात्र माझ्या केवळ चेहऱ्याकडे पाहूनच बायकोला माझ्यात काहीतरी बिघाड झाल्याची वर्दी कशी मिळते कुणास ठाऊक  !  तर सांगायचे कारण म्हणजे माझ्या चेहऱ्याचा अंदाज घेऊन सौभाग्यवतीने ताबडतोब निर्णय घेतला आणि तिच्या परिचित  डॉक्टर(णी)ला फोन लावला सुदैवाने तिचा नवराही डॉक्टरच होता आणि हृदयरोग शल्यविशारदच होता त्यामुळे तिने तडक तो ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता तेथेच मला घेऊन येण्यास सांगितले.आमचे चिरंजीव त्यांच्या कामावर गेले होते त्याना फोन लावला व त्यांच्या येण्याची वाट न पहाता आम्ही बाहेर पडलो आमच्या शेजारी याही सौच्या मैत्रीणच आणि सुदैवाने त्यांचे चिरंजीव घरात होते त्यामुळे आम्हाला पाहून व आम्ही कशासाठी बाहेर पडतोय हे ऐकून ताबडतोब आपली गाडी काढायला चिरंजीवांना त्यानी फर्मावले. सूनबाई कोथरूडलाच रहात असल्यामुळे व आम्हाला सह्याद्री रुग्णालयात जायचे असल्यामुळे तिने पुढे जाऊन माझ्या रुग्णालय प्रवेशाची पूर्वतयारी करून ठेवल्यामुळे रुग्णालयात प्रवेश करताच मला एकदम टेबलावरच घेण्यात आले व योग्य त्या तपासण्या केल्यावर व हृदयभागाचे एक क्षकिरणचित्र (अन्जिओ(ग्राम की )ग्राफी)काढून त्याची पाहणी केल्यावर रक्ताच्या धमनीत अडथळा आल्याचे निदान झाल्यावर मला काही बोलण्याचीही तसदी ( संधी म्हणत नाही )न देता अर्थात माझ्या बरोबरीच्या सौभाग्यवती आणि सूनबाई या दोघींना विचारून तो अडथळा दूर करणारी शस्रक्रिया पार पाडण्यात आली तीच ही जिला मी ध. रो.मु.हे नाव दिले. आणि हे सगळ लिहायला जितका वेळ लागला त्याहूनही कमीच वेळात पार पडले .
            माझा मुलगा रुग्णालयात आला तोपर्यंत माझी  शस्त्रक्रियोत्तर विभागात रवानगीही झाली होती.या शस्त्रक्रियेसाठी जांघेतूनच स्टेन्ट टाकावा लागल्यामुळे तेवढाच भाग बधिर करण्यात आल्यामुळे जे काय चालले होते ते मला समजतच होते. शिवाय या रुग्णालयातील शस्त्रक्रियोत्तर विभागात शांततेचा मुळीच पत्ता नव्ह्ता. (इतरत्रही तसाच  नसतो काय  ही  मला कल्पना नाही). माझ्या चार बाजूला पडदे लावून आडोसे करून माझा कक्ष निर्माण केला होता असे अनेक कक्ष एका मोट्या हॉलमध्ये होते सर्व कक्षातील डॉक्टर व परिचारिका यांची धावपळ सापशिडीच्या खेळातील कोणत्याही घरातून कुठल्याही घरात दान पडेल तसे उड्या मारणाऱ्या गोट्यांसारखी आणि एकमेकांच्या कक्षातून चालू होती .आधीच झोप यायला झोपेची गोळी घ्याव्या लागणाऱ्या मला तश्या गोंधळ साम्राज्यात झोप येणे शक्य नव्हतेच शिवाय माझा स्टेन्ट (की बलून ?) रात्री दोन किंवा तीन (अश्या मध्यरात्रीच्या मुहूर्तावर) काढायचा आहे अशी सूचना ( की ताकीद ? ) मला अगोदरच देण्यात आलेली असल्यामुळे तर मी जणु त्यांचीच वाट पहात होतो.  
           रात्री दोन किंवा तीन वाजता खरोखरच ते डॉक्टर आले आणि त्यानी "आता मी अगदी जोरात दाबणार आहे (तेव्हां तशी मानसिक तयारी ठेवा आणि उगीच ओरडू नका) अशी ताकीद मला देऊन खरोखरच जेथून स्टेंट टाकला होता  त्या भागावर अतिशय तीव्र दाब देऊन  काहीतरी (बहुधा तो बलून असावा) बाहेर काढले व नंतर मला झोपा (अथवा झोपू नका कारण आजूबाजूचा गोंधळ कमी करणे त्यांच्या किंवा कुणाच्याच हातात नव्हते) म्ह्णून ते निघून गेले.
         यापुढील माझा मुक्काम अतिदक्षता विभागात होता.शस्त्रक्रियेनंतर माझे तपमान,रक्तदाब ,हृदय क्रिया वा आणखीही काही डॉक्टरमंडळींना आवश्यक वाटणाऱ्या  गोष्टींची  नोंद करणारी व आवश्यक इतरही उपकरणे माझ्या शरीराच्या निरनिराळ्या भागास जोडून मला स्थानबद्ध करण्यात आले होते. तेथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माझे गाडे रुळावर आल्याचा निर्णय घेऊन तेथून साधारण रुग्णकक्षात नेण्याचा विचार जरी डॉक्टरांनी केला होता तरी तेथे सध्या रिकामी जागा नसल्यामुळे निम्न अतिदक्षता विभागात एक दिवस काढून माझी प्रकृती योग्य प्रमाणात सुधारत असल्याचे पाहून माझी घरी म्हणजे सौ.च्या अतिअतिदक्षता विभागात रवानगी झाली.रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अनेक डॉक्टर थोडा थोडा वेळ येऊन जात पण इथे मात्र एकच महाडॉक्टर सतत माझ्यावर नजर ठेऊन असायची.माझ्या ध.रो.चे निदान तिला करता आले असते तर तिच्या त्या दृष्टीक्षेपानेही माझी ध.रो.मुक्ती झाली असती असो.    
      माझी धमनी रोध मुक्ती झाल्यावर काहीही करण्याच्या शारीरिक व मानसिक स्थितीत मी यायच्या पूर्वीच एका मित्राचा मला फोन आला."काय कसा आहेस ?तुझी ध.रो.मु.शस्त्रक्रिया झाली म्हणे अर्थात त्याने ऍन्जिओप्लास्टी हा सोपाच शब्द वापरला होता  व मी काही उत्तर देण्यापूर्वीच "काही काळजी करू नकोस.माझीही दहा वर्षापूर्वीच झाली आणि आता मी त्यावेळपेक्षा ठणठणित आहे"असा दिलासा दिला. मी काहीसा बरा झाल्यावर आपल्या मित्रांना आपल्या या नव्या साहसाची कल्पना द्यावी म्हणून प्रथम ज्या मित्राला फोन केला त्यानेही "अरे माझी पण पाच वर्षापूर्वीच झाली आणि आता मला काहीच त्रास नाही" असे मला उत्तेजन देणारे उद्गार काढले.एकूण ही शस्त्रक्रिया म्हणजे आयुष्यात (सुदैवाने जर जास्त जगला तर) एकदा तरी पार पाडावी लागणारी परीक्षा असावी असा माझा समज झाला. या प्रकाराच्या शस्त्रक्रियेची परिस्थिती पुन्हा पुन्हा उद्भवण्याची शक्यता नसेल असे वाटत असतानाच माझ्या नात्यातीलच गृहस्थांना दोन वर्षानंतर पुन्हा धरो (धमनी रोध) झाला आणि पुन्हा या शस्त्रक्रियेस तोंड द्यावे लागले अशी माहितीही मिळाली इतकेच काय पण त्याच काळात रूसी लाला या पत्रकारांनी लिहिलेल्या Celebration of cells" या पुस्तकाच्या वाचनाने जे.आर.डी.टाटा यांना तीन महिन्यात चार वेळा या मुक्तीला शरण जावे लागले असा उल्लेख वाचला.( अर्थात त्यावेळी जे. आर. डी. नव्वदीत होते.) याचे कारण म्हणजे बऱ्याच रक्तवाहिन्या असल्यामुळे अवरोध होण्यासाठी अनेक जागा असू शकतात पहिल्या शस्त्रक्रियेतही एकापेक्षा अधिक अवरोध आढळू शकतात.अशी माझ्या ज्ञानात भर पडली.डॉ.बंग यांचे पुस्तक पुन्हा वाचताना त्यांचीही ध.रो.मु.च करावी लागली होती व त्यात बऱ्याच अडचणी (म्हणजे स्टॅन्ट टाकताना धमनीच फाटणे इ.) उपस्थित झाल्या होत्या असे त्यांनी लिहिलेले आढळून आले.म्हणजे कोणतीही शस्त्रक्रिया अगदी क्षुल्लक अथवा अतिशय कठीण या सदरात मोडू शकते असे अनुमान निघते. माझ्या बाबतीत परिस्थिती या दोन्हीच्या मध्यात असावी .  
            या शस्त्रक्रियेनंतर रक्त जलद साकळू नये म्हणून देण्यात येणाऱ्या गोळ्यांमुळे रक्त अधिक प्रवाही बनते  त्यामुळे जर चुकून शरीरास जखम झाली तर रक्तप्रवाह थांबण्यासाठी ताबडतोब खबरदारी घ्यावी लागते.नाही तर ध.रो.ऐवजी रक्त अधिक वाह्यल्यामुळे मुक्ति मिळायची. असेही शल्यतज्ञांनी सांगितले होते त्यामुळे अगोदरच दाढी करताना मी निष्काळजीपणा दाखवणे अपेक्षित नव्हते पण त्याउपरही रक्तप्रवाह थांबण्यासाठी पण मी नेहमीच्या पद्धतीने ते थोडा वेळच दाबून नंतर त्यावर कागदाचा कपटा लावून भागेल अश्या समजुतीत असताना रक्तप्रवाह तसाच चालू आहे हे अगदी नको त्या व्यक्तीच्या नको तेव्हां निदर्शनास आलेच.तिच्या निदर्शनास आल्यावर मात्र तिच्या कडक शब्दात त्या सूचनेचा तिने असा काही पुनरुच्चार केला की ती समोर असेपर्यंत त्या जागेवर जोरात दाबून तर धरलेच आणि बराच वेळ मी माझा हात त्या जागेवरून हलू दिला नाही.थोड्या वेळानंतर रक्त थांबले तरी मी हात काढला नाही हे पाहून पुन्हा "अहो असा जन्मभर धरून ठेवायचा नाही " असा इशाराही मला देण्यात आला. भाग्यच माझे की माझा हात झटक्यात ओढून तिने जागेवर आणण्याचा प्रयत्न केला नाही नाहीतर संधि रोपण शस्त्रक्रियेसही तोंड द्यायची पाळी माझ्यावर आली असती. 
          अशा प्रसंगी भेटायला येणाऱ्यांचा उपद्रव होण्याची शक्यता टाळता येत नाही पण त्यावेळी  फारसे न बोलण्याचा मी निश्चय केला . अर्थात  भेटायला येणारे बहुधा त्यांचाच अनुभव सांगण्याच्या तयारीत आल्यामुळे  मला ऐकण्याचेच काम करावे लागले ही एक त्यातल्यात्यात जमेची बाजू. असेच एक नातेवाईक बऱ्याच दिवसांनी भेटायला आले .त्यानीही अश्या स्वरुपाच्या दुखण्यास तॉंड दिले होते असे ऐकिवात होते त्यामुळे माझ्या इतर मित्रांप्रमाणे "काही काळजी नको माझीही झालीय आणि मी आता ठणठणीत आहे असा दिलासा त्यांच्याकडून मिळेल असे वाटत असताना त्याऐवजी त्यांनी माझी उलटतपासणीच सुरू केली म्हणजे त्यांनी मला एकदम विचारले,"काय हो ऑपरेशनपूर्वी त्यांनी तुम्हाला विचारले होते का?" या प्रश्नाचा रोख मला कळला नाही. त्यांनी म्हणजे मला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्यांनी की डॉक्टरांनी असा पहिला प्रश्न मला पडला व डॉक्टरांनी असे त्यांना अभिप्रेत असल्याचे त्यानी "काय बावळट आहात हो " असा चेहरा करून  मला सांगितल्यावर शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णालाच शस्त्रक्रिया कशी करू असे शल्यतज्ञ विचारतात  आणि नंतर त्याच्याच सल्ल्याने शस्त्रक्रिया पार पाडतात अशी प्रश्न कर्त्याची भूमिका आहे की काय असा माझा समज झाला.आणि त्यांच्यासारखे रुग्ण असतील तर ते खरोखर तसाच आग्रह धरतात हे पुढे त्यानी आपला अनुभव सांगून त्यांच्या प्रश्नामागचा उद्देश माझ्या निदर्शनास आणला तेव्हां माझ्या लक्षात आले..त्यांच्या मते अश्या (च काय पण एकूण सगळ्याच )शस्त्रक्रिया जरुरी नसताना पार पाडल्या जातात आणि रोग्याकडून पैसे उकळले जातात त्यामुळे त्यांना असाच  प्रसंग जेव्हां त्यांच्यावर आला तेव्हां शस्त्रक्रिया करायची असे सांगण्यात आल्यावर त्यानी त्यास साफ नकार देऊन प्रथम माधवबाग योग शिबिरास भेट देऊन मगच ध.रो.मु.शस्त्रक्रिया करायची की नाही हे ठरवणार असे शल्यतज्ञास सांगितले होते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यानी त्या योगोपचारावर भर देऊन शस्त्रक्रिया टाळलीही असे त्यानी विजयी मुद्रेने सांगितले. मीही तसेच करायला, निदान प्रथम त्या योगोपचारकेंद्रास भेट देऊन मगच हा निर्णय घ्यायला हवा होता असे त्यांचे मत पडले.आता आमच्याकडे कोणतेच निर्णयस्वातंत्र्य मला नाही हे मी त्यांना कसे सांगणार ? त्यामुळे याबाबतीत मला विचारण्यात आले होते काय हा त्यांचा प्रश्न मला लागू पडणाराच नव्ह्ता. शिवाय माझा डॉक्टर या संस्थेवर अंधविश्वास नसला तरी घरातच अनेक डॉक्टर्स असल्यांने त्यांचाही सल्ला घेऊनच पुढचा निर्णय घेण्याची माझी प्रथा आहे व  माझ्या डॉ.बंधूचाच मी सल्ला प्रथम घेतॉ आणि हा शल्यतज्ञ त्याचा विद्यार्थीच असल्यामुळे तो उगीचच मला कापणार ( दोन्ही अर्थाने)नाही असे मला वाटत असल्याचे त्यांच्या कानावर घातले.तरीही माधवबागेचा त्यांचा हट्ट त्यानी सोडला नाही.शेवटी पुन्हा तशी पाळी आली तर मात्र अगोदर माधवबागेतच जाईन असे आश्वासन त्यांना देऊन मी त्यांच्या तावडीतून माझी मुक्ति करून घेतली. 
        पण त्यानंतर जालावर ध.रो.मु.विषयी पहाण्याची दुर्बुद्धि मला झाली व खरोखरच बऱ्याच ठिकाणी या शस्त्रक्रियेची जरुरी नसते कारण आपल्या शरीरातच अशी एक यंत्रणा कार्यरत असते की एक रक्तवाहिनी रुद्ध झाली तरी त्याला समांतर इतर वाहिन्या निर्माण होतात असे मत व्यक्त केलेले आढळले.त्याच काळात Whatsapp वर आलेल्या एका संदेशात (आणि त्या काळात असे संदेश पहायला वेळच वेळ असल्यामुळे तो पाहीलाही) एका तज्ञ डॉक्टरने तर हदयावरील कोणतीच ( म्हणजे ध. रो. मु. आणि बायपास सुद्धा ) शस्त्रक्रिया आवश्यक नसते असे ठामपणे बजावून रोग्याला त्या शस्त्रक्रियेनंतर बरे वाटणे हा केवळ प्लासिबो परिणाम म्हणजे आता आपण दीड दोन लाख खर्च केलेत ना मग आता आपल्याला बरे वाटायला(च?) पाहिजे ही भावना आपल्याला बरे वाटायला लावते असे ठाम प्रतिपादन केले होते.तो गुजराती शस्त्रवैद्य असूनही त्याने असे विधान केले हे  मला पटले नाही  कारण गुजराती भाईंना उलट पैसे जाण्याच्या कल्पनेनेच धमनी अवरोध होण्याची शक्यता आहे अशी माझी समजूत ! माझ्या बाबतीत पैसे माझ्या किंवा मुलाच्या खिश्यातून न जाता त्याच्या आरोग्य विमा योजनेतून गेले असल्याने त्या शक्यतेवर विचार करण्याचे कारण नव्हते.तरीही  आता उगीचच आंतर्जालावर जाऊन "मी नाही त्यातला" सिद्ध करण्याची आवश्यकता नाही असे मी मनाला बजावले हो नाहीतर उगीचच आणखी काहीतरी वाचायला मिळायचं.
--------- .पण तरीही  डॉ.अभय बंग स्वत: डॉक्टर असतानाही त्यानी शस्त्रक्रिया केली होती व ती ध.रो.मु.चीच होती ही माझ्यासाठी त्यातल्या त्यात समाधान देणारी गोष्ट होती.