चिंता करी जो विश्वाची ... (३५)

सृष्टी ही माया आहे, आणि ब्रह्म सत्य आहे. अतिविशाल आणि प्राचीन अशा परब्रह्मासमोर ही सृष्टी आणि त्या सृष्टीत जगणारे सारे जीव अती क्षुद्र आहेत. सृष्टीला आणि त्यातील सर्व सजीवांना अंत आहे. परंतु हे जाणूनही जीवनविषयक ओढ संपत नाही. स्वतःचे अस्तित्व क्षुद्र आणि क्षणभंगुर आहे हे समजून देखिल स्वतःविषयीचे भ्रम लोप पावत नाहीत. स्वतःचे कर्तृत्व, ज्ञान किती नगण्य आहे याची जाणीव न ठेवता, या भासमान जगामध्ये जो तो पूर्णपणे मश्गुल होतो. 

समर्थ अशा लोकांना वारंवार सांगताहेत,  या भासमान सृष्टीत जे  तुमच्या चर्मचक्षूंना दिसते आहे, ते सर्व मिथ्या आहे, भ्रम आहे. जे शाश्वत सत्य आहे, त्याचे स्वरूप जाणले असता  सारा वृथा अभिमान गळून जाईल.  जे दिसते तेच सत्य आहे असे मानू नका, कारण असे करणे शहाणपणाचे लक्षण नव्हे. 
श्रोतेगण त्यांना विचारतात, तुम्ही सांगता ही सृष्टी मिथ्या आहे, भ्रम आहे. त्यातील जीवन हे भासमान आहे. मग असे असताना आम्हांस हे सर्व का दिसते? का जाणवते?  
समर्थ त्यांच्या शंकेचे निरसन करतात.. 
देखिलें ते सत्यची मानावे । हे ज्ञात्याचे देखणें नव्हे ।
जड मूढ अज्ञान जीवें । हे सत्य मानिजे ॥
येक्या देखिल्यासाठी । लटिक्या कराव्या ग्रंथकोटी ।
संतांमहंतांच्या गोष्टी । त्याहि मिथ्या मानाव्या ॥
माझें दिसते हेचि खरे । येथे चालेना दूसरे । 
ऐशिया संशयाच्या  भरे । भरोंचि नये ॥
समर्थ सांगतात 'स्व' विषयी वृथा गर्व बाळगू नये. मला जे दिसते, तेच सत्य. मला जे कळले तेच योग्य. माझे ज्ञान हेच परिपूर्ण असे समजू नये. अनेक लोक, अनेक कथा सांगतात. त्यांच्या ज्ञानाचा हवाला देत उपदेश देतात. पण ते सारे सत्य मानू नये. जे पाहिले, ऐकले त्याचा पडताळा करायला पाहिजे. कुणावरही अंधपणे विश्वसू नये. कशाचाही स्वीकार करण्यापूर्वी त्याला स्वतःच्या ज्ञानाची, अनुभवांची, बुद्धिमत्तेची कसोटी लावावी.
आपले म्हणणे अधिक स्पष्ट करण्यासाठी, समर्थ विविध उदाहरणे देतात. 
मृगे देखिले मृगजळ । तेथे धावते बरळ ।
जळ नव्हे मिथ्या सकळ । त्या पशूस कोणे म्हणावे ॥
कुशळ चितारी विचित्र । तेणे निर्माण केले चित्र ।
देखता उठे प्रीति मात्र । परंतु तेथे मृत्तिका ॥ 
मृगजळा मागे धावणारा मृग तहानलेलाच राहतो. जो निद्रे मध्ये पाहिलेली स्वप्ने सत्य समजतो आणि तसेच काही घडेल अथवा घडले असेल अशा भ्रमात राहतो, तो या व्यवहारी जगात कुचेष्टेचा धनी होतो. दशावतारी खेळ दाखवतात. त्यांच्या नाटकात सुंदर सुंदर स्त्रिया साज-शृंगार करून येतात. त्याच्यावर मोहीत होऊन त्यांच्यामागे जाणाऱ्यांचा अपेक्षाभंग होतो, जेव्हा कळते की त्या स्त्रिया नाहीतच. मूर्तिकार सुंदर पुतळ्या घडवतो. दुरून पाहणाऱ्यास ते सारे सजीव आहेत असा भास होतो. परंतु जेव्हा तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहावे, तो ते निव्वळ दगड आहेत हे समजते. असे सर्व केवळ, जे दुरून दिसते त्यावर विसंबल्यामुळे घडते. अधिक निकट, अधिक सखोल निरीक्षण/अवलोकन केले असता,  खरे काय आहे ते उमगते. 
सृष्टी बहुरंगी असत्य । बहुरूपाचे हे कृत्य ।
तुज वाटे दृश्य सत्य । परी हे जाण अविद्या ॥
मिथ्या साचासारिखे देखिलें । परि ते पाहिजे विचारिले । 
दृष्टी तरळता (चंचल झाली असता) भासले । तें साच कैसे मानावे ॥ 
काही वेळा मनावर, बुद्धीवर विविध भावभावनांचा प्रभाव असतो. त्याचा परिणाम जे दिसते, त्याचा अर्थ अथवा संगती लावण्यावर होऊ शकतो.  त्यामुळे आपल्या दृष्टीला जे भासते तेच सत्य, असे समजणारा अज्ञ समजला जातो. कारण जे सामोरे  दिसते ते एकांगी आहे. आपले स्थान बदलले, तर दृश्याचे स्वरूप देखिल वेगळे भासते. संथ पाण्यात प्रतिबिंबित झालेले आकाश बघण्यासाठी आपल्याला थोडे खाली पाहावे लागते. परंतु मान वर केली असता तेच आकाश काहीसे वेगळे दिसते. तेच आकाश, तेच तारे परंतु तरीही त्याचे स्वरूप पालटते. वेगवेगळ्या आकारांचे आरसे पहिले असता त्यात स्वतःची अनेक प्रतिबिंबे दिसतात. परंतु ती सर्व खोटी असतात, कारण रूप एकच एक खरे असते. पाण्याच्या बुडबुड्यांमध्ये अनेक प्रतिबिंबे तरंगताना दिसतात. परंतु ते बुडबुडे फुटताच सर्व नाहीशी होतात. यात कसलाच चमत्कार नसतो. तर जे सत्य आहे तेच एकमेव टिकते, आणि त्याची मायावी प्रतिबिंबे नष्ट होतात.  ध्वनींचे प्रतिध्वनी येतात. पण ते सुद्धा विरून जातात. एखाद्या सभागृहात पूर्ण भिंत व्यापेल असे दर्पण असेल, तर त्यात त्या समोरील सभेचे प्रतिबिंब दिसते.  तेथे एक नाही तर दोन  सभा आहेत असे भासते.  परंतु समंजस लोक जाणतात की हा केवळ दृष्टिभ्रम आहे. प्रतिबिंब दृष्टीआड केले की मूळ रूप सामोरे येते.  दिव्यांच्या प्रकाशात अनेक छाया दिसतात, पण त्या सर्व खऱ्या नसतात.  त्या छायांच्या खेळात जो गुंततो, तो सत्यस्वरूपास पारखा होतो. म्हणून जे दिसते,ऐकू येते  त्याची मायावी प्रतिबिंबे, प्रतिध्वनी बाजूला करून निव्वळ सत्याचे दर्शन करणे जरूरीचे असते. 
म्हणून समर्थ सांगतात --
ऐसे हे बहुविध असे । साचासारिखेचि दिसे ।
परि हे सत्य म्हणौनि कैसे । विश्वासावे ॥
माया मिथ्या बाजीगरी (गारूडीविद्या) । दिसे साचाचिये परी ।
परी हे जाणत्याने खरी । मानूचि नये की ॥
कपटविद्येत निष्णात लोक, सामान्यजनास सहज फसवितात. अनेक रुपाने ते लोकांसमोर येतात, अनेक सोंगे वठवितात. परंतु त्यांचे असत्य कधी ना कधी सामोरे येतेच.  सुवर्णमृगाच्या रुपातील राक्षसाला सीतामाई भुलली, आणि श्रीरामांना सुद्धा त्याची ओळख पटण्यासाठी दूरवर जाऊन त्याचा वध कारणे भाग पडले. श्रीकृष्णाचा वध करण्यास अनेक दानव वेगवेगळी रुपे धारण करून आले. कोणी वृक्ष बनले, कुणी उखळ, कुणी साप.  आणि  एक तर पुतना मावशीच्या रुपाने आला. परंतु श्री कृष्णाने त्या सर्वांचा वध केला. रावणाने देखिल अनेक मायावी मस्तके बनविली.  कधी एका राक्षसाच्या रक्तातून अनेक उपजतील असे मायाजाल पसरविले. समस्तास त्राही त्राही केले. परंतु अखेर त्या सर्वांचा वध झाला आणि त्याचे सत्य स्वरूप सामोरे आले. म्हणून जे दिसते आहे, तेव्हढेच खरे मानू नये. असे करणे सहजसाध्य नसते. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. कारण देव सुद्धा ज्या कपटाला फसतात, तिथे मनुष्याची काय कथा?
ऐसी राक्षसांची माव । जाणो न सकती देव ।
कपटविद्येचे लाघव । अघटित ज्यांचे ॥
मनुष्याची बाजीगरी (खोटे नाटक) । राक्षसांची वोडंबरी (कपटविद्या) ।
भगवंताची नाना परी । विचित्र माया ॥ 
जे खऱ्यासारखे दिसते, परंतु पाहू जाता नसते त्यास सत्य कसे मानावे?  हे आभासी आहे असे समजावे, परंतु दृष्टीस मात्र अखंड दिसते म्हणून ते सत्य समजावे का?  जे आभासी आहे तेच सत्य मानणे हीच मोठी चूक. असे घडते कारण जे दृश्य आहे त्यातच मनुष्य स्वतःला पाहतो. त्यालाच स्वतःचे स्वरूप समजतो. आपल्या चर्मचक्षूने भासमान दृश्याचे अवलोकन करतो, आणि तेच सत्य आहे अशी समजूत करून घेतो. परब्रह्माच्या दर्शनाची आस ठेवतो, पण त्याच्याआड  न त्यागिलेली देहबुद्धी येते. 
इकडे सत्य मानिला देहो । तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो ।
दोहोंमध्ये माहा संदेहो । पैसावला बळे ॥
देहबुद्धि केली बळकट । आणि ब्रह्म पाहो गेला धीट ।
तो दृश्याने रुधिली वाट । परब्रह्माची ॥ 
मला जे दिसते ते आणि तेच सत्य असा मनाशी निश्चय केला आणि तिथेच मोठी चूक झाली. कारण सत्यब्रम्ह हे दृश्यातीत आहे. ते जाणण्या करिता भासमान सृष्टी दृष्टीआड करायला हवी. जे दृश्य आहे त्या पलीकडचे सत्य जाणून घ्यायला पाहिजे. त्याचे ज्ञान झाले म्हणजेच आत्मज्ञान झाले. असे आत्मज्ञान झाले असता मी पण संपते आणि शाश्वत सत्याची प्राप्ती होते. अशांती मागे पडते.
म्हणून समर्थ शिष्यांना उपदेश करतात.. आधी स्वतः स  जाणा. नंतर मी पणाचा त्याग करा. असे केल्याने स्वाभाविकपणे  शांती आणि समाधानाचा लाभ होईल. 
अस्तिचा देही मांषाचा डोळा । पाहेन म्हणे ब्रम्हाचा गोळा ।
तो ज्ञाता नव्हे, आंधळा -। केवळ मूर्ख ॥
दृष्टीसि  दिसे मनासि भासे । तितुके काळांतरी नासे । 
म्हणोनि दृश्यातीत असे । परब्रम्ह ते ॥ 
समर्थ सांगतात, अनेक जण अनेक प्रकाराने साधना करतात. पण त्या सर्वांनाच फलप्राप्ती होतेच असे नाही. त्यांची  इच्छा प्रामाणिक असते, कर्तव्यात कसली कसर नसते,  परंतु सत्यदर्शन काही घडत नाही. असे का व्हावे?  तर त्यासाठी निश्चयाबरोबरच निष्ठा हवी. मनात कसलाही संदेह नसावा, परंतु अंधविश्वास देखिल नसावा. ज्ञानार्जन करताना पारख आणि पडताळा करण्यात अनमान करू नये. असे जो करीत नाही आणि केवळ दुसऱ्यावर विसंबून राहतो, त्याला सत्यदर्शन कदापिही घडत नाही. जो अहंकारी आहे, या सृष्टीच्या माया, मोहाने पूर्णपणे जखडलेला आहे, ज्याच्या बुद्धीवर आभासांचे  अभ्रक साचलेले आहे, तो शाश्वत सत्याच्या जवळपास देखिल पोहोचू शकत नाही.  मी पणा सोडून जो  अनन्यभावाने साधना करील, त्यास सत्यप्राप्ती निश्चितच होईल. 
म्हणून समर्थ त्यांच्या श्रोत्यांना वारंवार सांगतात की मी पणा सोडून द्या, अन्यथा तुम्हांस ज्ञानप्राप्ती होणे नाही. 
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना ।
तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना ॥
परब्रह्म ते मीपणे आकळेना ।
मनीं शून्य अज्ञान हे मावळेना ॥ 
(क्रमशः)
संदर्भ :  (१)  श्री मनाचे श्लोक
            (२)  श्री ग्रंथराज दासबोध