आत्महत्या : कारणमीमांसा आणि सोडवणूक

या विषयावर एका सदस्यानं इथे चर्चाप्रस्ताव ठेवला आहे. विषय गंभीर आणि सर्वस्पर्शी असल्यानं  सगळ्यांना उपयोगी होईल म्हणून  हा लेख लिहितोय.

आत्महत्येचं मूळ कारण स्वतःला व्यक्ती समजणं आहे. ही धारणा सर्वदूर आणि खोलवर पोहोचली असल्यानं कुणालाही आणि केव्हाही आत्महत्या करावीशी वाटू शकते आणि ही शक्यता नाकारता येत नाही, हेच या विषयाचं गांभीर्य आहे.  मृत्यू व्यक्तिमत्त्वाचा अंत आहे. ही प्रक्रिया नैसर्गिकरीत्या न  घडता, स्वतःला त्यातून सोडवण्याचे दोनच मार्ग आहेत. एकतर आपण व्यक्ती नाही हा उलगडा  होणं किंवा  मग आत्महत्या.  पहिली सोडवणूक आध्यात्मिक प्रक्रिया आहे आणि दुसरा प्रकार हा  माणसानं शोधलेला शॉर्ट कट आहे. 
व्यक्तिमत्त्वाचे दोन पैलू आहेत; एक म्हणजे  स्वतःला देह समजणं आणि दुसरा म्हणजे स्वतःला मनोनिर्मित व्यक्ती समजणं. अर्थात, हे दोन्ही गैरसमज इतके खोलवर  रुजलेले आहेत की याविरुद्ध बोलणारी व्यक्ती समाजाला विक्षिप्त वाटते.  पण आत्महत्येची फक्त दोनच कारणं  आहेत. एक म्हणजे शारीरिक यातना असह्य होणं ( नुकतीच  घडलेली हिमांशू राय यांची आत्महत्या), किंवा मग स्वप्रतिमेचा बोजवारा उडायची प्रचंड दहशत वाटणं.  यासाठी स्वप्रतिमा राष्ट्रीय किंवा जागतिक दर्जाची हवी असं नाही;  ज्याची प्रतिमा सामान्य आहे असा शेतकरी सुद्धा त्याच कारणानं आत्महत्येला प्रवृत्त होतो.  
थोडक्यात,  असहाय्य शारीरिक व्याधी किंवा प्रतिमा हननाचा धोका कुणाच्याही जीवनात आणि कधीही उद्भवू शकतो.  त्यामुळे कोणतीही शारीरिक व्याधी झाली आणि यातना कितीही असहाय्य झाल्या तरी  आपण देहाचा अंत करण्यापेक्षा, मृत्यू देहाला वेदनेपासून कसा मुक्त करतो हे पाहण्याचं कुतूहल, सर्व यातनाच नव्हे तर आत्महत्येच्या विचारावर सुद्धा मात करून जाईल.  एवढंच नाही तर ती  पराकोटीची आध्यात्मिक साधना होईल आणि शेवटच्या क्षणी तरी आपण देह नव्हतो हा उलगडा  होईल.  ही झाली  आत्महत्येच्या प्रवृतीपासून पहिली सोडवणूक. 
प्रतिमा हननाच्या दहशतीपासून मुक्त होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे  परिणामांची क्षिती न बाळगता, स्वतःच्या चुकीची सर्वांसमक्ष प्रांजळ कबुली देणं. थोडक्यात,  स्वतःच्या हातानं स्वतःचं प्रतिमा हनन करून घेणं आणि आत्महत्येला दुहेरी प्रतिमा हननाच्या संधीपासून वंचित करणं . किंवा प्राप्त परिस्थिती ही दैववशात ओढवली असेल आणि त्यात स्वतःची काहीही चूक नसेल (उदा. कर्जबाजारी झालेला शेतकरी) तर  अत्यंत प्रामाणिकपणे कर्ज देणारा आणि स्वतःचे कुटुंब व आप्त यांच्यासमोर आपला आत्महत्येचा विचार मांडणं.  ही सर्वात सोपी सोडवणूक आहे कारण आपण जिवंत असू तर परिस्थितीतून मार्ग निघू शकेल, आत्महत्या केली तर अडचण तशीच राहील आणि सोडवणाराच उरणार नाही. पण इतकाही विचार करायची गरज उरत नाही, कर्ज देणारा, आपले कुटुंबीय आणि आप्तच प्रसंगातून मार्ग काढायला आपल्याबरोबर उभे राहतात आणि आत्महत्येचा विचार संपून जातो.   ही प्रतिमा हननाच्या दहशतीमुळे आत्महत्येला प्रवृत्त  होण्यापासून मुक्त करणारी, दुसरी सोडवणूक आहे.