डिसेंबर ३० २०१८

चिंता करी जो विश्वाची ... (३८)

जे द्वैताची जननी । किं ते अद्वैताची खाणी ।
मूळमाया गवसणी । अनंत ब्रह्मांडाची ॥

असे मायेचे वर्णन केले आहे. मायेमुळे द्वैत निर्माण होते. 'मी' पणाची मिथ्या जाणीव निर्माण होते.  परंतु आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर द्वैत नाहीसे होते.  अद्वैताची अनुभूती येते. 

स्वस्वरूपाची जाणीव ज्यांस झाली, त्याला जागृतावस्था प्राप्तं झाली. मी म्हणजे केवळ चर्मचक्षूंना जाणवणारे भौतिक रूप नाही. सर्व सृष्टीमध्ये जसे पूर्णब्रह्माचे अस्तित्व आहे, तद्वतच या देहामध्ये आत्म्याचे अस्तित्व आहे. त्याला दृश्यरूपात कुणी पाहिले नसले, तरी त्याचे अस्तित्व सदासर्वकाळ दृगोचर होत असते.  

समर्थ त्यांच्या श्रोत्यांना सांगतात, 'मी', 'माझे' या सर्व व्यर्थ कल्पना आहेत. कारण ही सृष्टी  म्हणजे माया आहे आणि त्यावरील जीवनाचे अस्तित्व म्हणजे निव्वळ भ्रम आहे.  केवळ अज्ञानी जन या कल्पनांच्या आहारी जाऊन सुख आणि समाधानास दुरावतात. ते सांगतात तुम्ही ज्याच्या लोभाने दुःख आणि दैन्यास आमंत्रित करता, ते सारे मात्रं  भासमान आहे.

संसार हाचि दीर्घ स्वप्न । लोभे वोसाणती (बरळतात) जन ।
माझी कांता माझे धन । कन्या पुत्र माझे ॥
ज्ञानसूर्य मावळला । तेणे प्रकाश लोपला ।
अंधकारे  पूर्ण जाला । ब्रम्हगोळा अवघा ॥

अशा घोर अज्ञानाने, सर्वकाही काजळून गेले. जे सत्य आहे त्याचे रूप दुर्लक्षित केल्याने जीवनातील सारे सत्त्व नाहीसे झाले. केवळ दुःख, दैन्य आणि कष्ट याचेच अस्तित्व पसरले. मनुष्य जन्ममृत्यूच्या  फेऱ्यामध्ये गुंतून गेला. 

निजेले असताच मेले ।  पुन्हा उपजताच निजेले । 
ऐसे आले आणि गेले । बहुत लोक ॥ 
निदसुरेपणेचि (निद्राभार) सैरा । बहुती केल्या येरझारा ।
नेणोनिया परमेश्वरा । भोगिले कष्ट ॥ 

असे अज्ञानाच्या भाराने कष्ट सोसायला लागू नयेत म्हणून तुम्ही वेळीच सावध व्हा. ज्ञानसाधनेचा मार्ग अनुसरा , असे समर्थ त्यांच्या श्रोत्यांना सांगतात. ज्यांची बुद्धी चंचल आहे, त्यांनी अध्यात्माची साधना सतत करीत राहावे. सातत्याने केलेल्या ग्रंथवाचनाचा आणि अभ्यासाचा परिणाम म्हणजे त्यांची बुद्धी स्थिर राहील. प्राप्तं झालेले ज्ञान विस्मृतीत जाण्याचे भय राहणार नाही. परंतु ज्यांस परमार्थाचे महत्त्व माहीत नाही, जो वृत्तीने आणि बुद्धीने चंचल आहे, ज्यास 'स्व'विषयी अहंकार आहे, अशा व्यक्तीने  ग्रंथ वाचला तरी काहीच उपयोग होणार नाही कारण त्याच्या दृष्टीवर  मोह, माया आणि अहंकाराचे आच्छादन पसरले आहे. नेत्रविहीन व्यक्तीसमोर द्रव्य राशी ओतल्या तरी त्याला काहीच फरक पडत नाही, कारण त्याच्या दृष्टीसमोर केवळ अंधारच असतो. ज्या लोकांच्या बुद्धीवर आणि दृष्टीवर अज्ञानाचे पटल आहे, त्यांना अशा ग्रंथाच्या वाचनाने काहीच फरक पडत नाही. कारण त्यातील ज्ञान आत्मसात करण्यासाठी ते असमर्थ असतात. 

ज्ञानसाधनेपासून दूर राहण्यासाठी लोकं अनेक कारणे देतात. आजवर ज्ञान हे धर्मग्रंथात बंदिस्त राहिले. भाषा संस्कृत असल्याने सर्वसामान्यास अप्राप्य राहिले. समर्थांनी तेच ज्ञान प्राकृत भाषेत लिहायला, सांगायला सुरुवात केली. यावर काहींनी आक्षेप घेतला. त्यांचे म्हणणे खरे ज्ञान आहे ते संस्कृत भाषेतूनच शिकावयास हवे. मराठीतील ग्रंथातून कसली ज्ञानप्राप्ती होणार? 
यावर समर्थ म्हणतात  ज्ञान हे ज्ञानच आहे. मग ते कुठल्या का भाषेत असेना. भाषा ही फक्त ज्ञानाची वाहक आहे. एखाद्या विशिष्ट भाषेतलेच ज्ञान उत्तम, आणि इतर भाषांतील ते ज्ञान नव्हेच, असे म्हणणे हे अज्ञानमूलक आहे.

लोहाची मांदुस (पेटी) केली । नाना रत्ने साठविली ।
ते अभाग्याने त्यागिली । लोखंड म्हणौनी ॥
तैसी भाषा प्राकृत । अर्थ वेदांत आणि सिद्धांत ।
नेणोनि त्यागी भ्रांत । मंदबुद्धीस्तव ॥ 

म्हणून महत्त्व भाषेचे नाही, तर ज्ञानसंपादन करण्याला आहे. हिरा कोळशाच्या खाणीत सापडला म्हणून त्याचे मूल्य घटत नाही. मातीत पडले म्हणून  सुवर्णाचे रूपांतर लोखंडात होत नाही. ज्याला हिरा आणि सोन्याचे महत्त्व समजत नाही, कोळसा अथवा मातीत सापडले म्हणून त्यांस अव्हेरतो, तो केवळ दुर्दैवी.

परीस देखिला अंगणी । मार्गी पडिला चिंतामणी ।
आव्हावेल माहांगुणी । कूपामध्ये ॥
ऐसे प्राकृती आद्वत । सुगम आणि सप्रचित ।
आध्यात्म लाभे अकस्मात । तरी आवश्य घ्यावे ॥ 

पुढे समर्थ सत्संगाचे महत्त्व सांगतात. धर्मग्रंथांच्या वाचनाने जर अर्थ हाती लागत नसेल, तर ज्ञानी, संत आणि सज्जनांच्या सहवासात असावे. त्यांच्या  चर्चा, भाषणातून विनासायास शास्त्रार्थ उमजेल.  अनेक शंकांचे निरसन होईल. आणि त्यांकरिता विशेष प्रयास अथवा परिश्रम करण्याची जरूर लागणार नाही. ज्ञानी जनांच्या विद्वत्तेचे आणि अनुभवांचे फलित तुम्हांस सहजच प्राप्तं होईल. याकरिता  ग्रंथपठण आणि अध्ययना बरोबरच विद्वानांचे मार्गदर्शनही लाभदायक ठरते. 

समर्थ म्हणतात, संस्कृतातले ज्ञान मराठीत आणले तर काही अर्थपालट होत नाही. म्हणून वृथा भाषाभिमान ठेवू नये.  शब्द ऐकताना अर्थ तेव्हढा ध्यानी घ्यावा. ज्ञानार्जन करीत असताना कायम सतर्क असायला हवे. मन आणि बुद्धी चंचल असेल तर निरूपणाचा अर्थ कळणारच नाही. बुद्धीची कवाडे सदैव खुली असावीत, अन्यथा तन्मयतेने केलेले भाषण फोल ठरते. जसे उपड्या घड्यावर कितीही पाणी ओतले, तरी घडा काही भरत नाही. तो रिकामाच राहतो. तसेच केवळ शरीराने उपस्थित, परंतु चित्त भरकटलेले असे श्रोते असल्यास वक्त्याच्या विद्वत्तेचा, वक्तृत्वाचा उपयोग शून्य होतो. ज्या प्रमाणे निष्णात जव्हेरी रत्ने, माणकांचे परीक्षण करतो,   तद्वतच जाणता श्रोता वक्त्याची योग्यता आणि गुण हे जोखत असतो. असे न केल्यास फसगत होण्याची शक्यता असते. 

वेवसाई जो माळिण । त्यासि न कळे निरूपण ।
येथे पाहिजे सावधपण । अतिशयेंसी ॥
नाना रत्ने नाना नाणी । दुश्चितपणे घेता हानि ।
परीक्षा नेणता प्राणी । ठकला तेथे ॥ 

आशा तऱ्हेने श्रोत्यांना सावध करीत एकाग्र चित्ताने ज्ञान ग्रहण करण्याची विनंती समर्थ करतात. ते सांगतात मराठीत आहे म्हणून ज्ञान हे सहजसाध्य होत नाही.  सारे अवधान वक्त्याच्या निरूपणाकडे असू द्यावे. वक्ता तुम्हांस केवळ शब्दार्थ सांगत नाही, तर त्याच्या आकलनातून,  अनुभवातून संपादन केलेल्या ज्ञानाचे भांडार तुमच्यासाठी खुले करीत असतो. विद्वान वक्त्यांस, सावध श्रोता लाभला की ज्ञानाचे आदानप्रदान सुलभ होते. 

असे सारे सांगून समर्थ माया आणि ब्रम्हाच्या स्वरूपाचे  विवरण करतात. 
मायेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे तिचे सगुण साकार स्वरूप. भवतालची सारी सृष्टी, पंचमहाभूते आणि समस्त जीवसृष्टी म्हणजे माया. माया ही सदैव दृग्गोचर असते. दृष्टीसमोर साकार असते. तिचा विस्तार चर्मचक्षूने पाहता येतो. परंतु जे दिसते ते सारे क्षणभंगुर असते, नाशिवंत असते. विवेक बुद्धीने पाहिले असता त्यातील फोलपण ध्यानी येते. माया अनेक रूपात दिसते. आपण पाहू तितक्या  रंगात आणि आकारात असते. त्यामुळे तिचे रूप असीम, अमर्याद असते.  कल्पनेची भरारी जितकी जाईल तेथवर मायेचा विस्तार असतो.  माया पाशात जो गुंतला तो पूर्णज्ञानास पारखा झाला. म्हणून मायेच्या मोहक रूपाला भुलून सत्याकडे  दुर्लक्ष करणे लाभदायक नाही. 

माया बहुरूपी बहुरंग । माया ईश्वराचा संग ।
माया पाहाता अभंग । अखिळ वाटे ।
माया सृष्टीची रचना । माया आपुली कल्पना ।
माया तोडिता तुटेना । ज्ञानेविण ॥ 

मायाब्रम्हाचे स्वरूप वर्णन करून समर्थ, जे एकमेव आणि निराकार आहे, अनादी आणि अनंत आहे, अविनाशी आहे अशा पूर्णब्रह्माचे स्वरूप कसे जाणावे? यासंबंधी मार्गदर्शन करतात. ब्रह्म निर्गुण, निराकार आहे. सर्व व्यापी आहे. शाश्वत आणि अक्षत आहे.  ब्रह्म दृश्यातीत आहे. त्यामुळेच कल्पने पलीकडे आहे. त्याला जाणण्यासाठी विवेक बुद्धीची आवश्यकता आहे. मन आणि बुद्धीवर साचलेले मायेचे पटल दूर केल्यास असे आगळे, वेगळे ब्रह्म जाणवते. ज्याच्यापाशी सावध बुद्धी नाही. जो कल्पनेच्याच मायाजालात अडकलेला आहे, त्यास ब्रम्हदर्शन कदपिही होत नाही. ब्रह्म साऱ्या चर आणि अचर सृष्टीत व्यापलेले आहे. त्याच्याशी असलेले हे अद्वैत मूढ, अज्ञानी जनांना समजत नाही.

ब्रह्म या दृश्यावेगळे । ब्रह्म सुन्यत्वास निराळे ।
ब्रह्म इंद्रियाच्या मेळे । चोजवेना (जाणवत नाही) ॥
ब्रह्म दृष्टीस दिसेना । ब्रह्म मूर्खासी असेना ।
ब्रह्म साधूविण येना । अनुभवासी ॥

ब्रह्माचे स्वरूप शब्दातीत आहे. त्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. त्यासाठी स्वतः अनुभव घेणे जरूरीचे आहे. ब्रह्म सार्वत्रिक आहे. परंतु अज्ञानापायी ते अदृश्य आणि आप्राप्य होते. रत्ने माणकांनी भांडार भरलेले आहे, परंतु भांडारगृहाची किल्ली हाती नाही अशी अवस्था अज्ञानी जनांची असते.  अमाप आणि अनमोल खजिना असूनही जनलोक दुःख, दैन्यामध्ये जगत राहतात. त्यांना मृत्यूही असाच दारिद्र्यातच येतो. अक्षय खजिना तसाच अस्पर्शी राहतो. परंतु जे शहाणे आहेत, विवेकी विचारांचे आहेत ते या दुष्टचक्राची गती थांबवतात. साधना मार्गाने ज्ञानप्राप्ती करतात. 

ते परेहूनी पर । मनबुद्धिअगोचर । 
संग ('मी' पणाचा संग) सोडिता, सत्त्वर-। पाविजेतें ॥
संग सोडावा आपुला । मग पाहावे तयाला ।
अनुभवी तो या बोला । सुखावेल गा ॥ 

अहंकाराचा त्याग केला, चंचल बुद्धीला स्थिर केले आणि एकाग्रतेने साधना केली असता परब्रह्माचे स्वरूप आकळते. ब्रह्माच्या समोर सारे एकसमान आहे. तेथे कोणी उच्च  अथवा नीच नाही. गरीब अथवा श्रीमंत नाही. स्वामी किंवा सेवक नाही. सारेच एका योग्यतेचे. विभाजनाचे तेथे प्रयोजनच नसते. स्त्री-पुरूष, राजा-प्रजा अशीही प्रतवारी नसते. ब्राम्हणांचे ब्रह्म सोवळे, शूद्रांचे ओवळे असेही नसते. कारण ब्रह्म एकमेव आहे. आणि त्याचे आकलन करू शकणारे जन एकाच योग्यतेचे गणले जातात. भेदाभेद हे मानवनिर्मित आहेत.  ब्रह्मासमोर त्या साऱ्याचा विलय होतो.

सकळांस मिळोन ब्रह्म येक । तेथे नाही हे अनेक ।
रंक अथवा ब्रह्मादिक । तेथेचि जाती ॥
स्वर्ग, मृत्य आणि पाताळ । तिहीं लोकीचे ज्ञाते सकळ ।
सकळांसि मिळोन  येकचि स्थळ । विश्रांतीचे ॥ 
देहबुद्धीचा अंती । सकळांसि येकचि प्राप्ती ।
येक ब्रह्म द्वितीयं नास्ति । हे श्रुतिवचन ॥ 

क्रमशः
संदर्भ ग्रंथ :  श्री ग्रंथराज दासबोध 


 

Post to Feed
Typing help hide