तुझे पुस्तक ढापायचे राहूनच गेले

खूप पुस्तके घ्यायचो पूर्वी

दुकानातून, फुटपाथवरून

चार-आण्यापासून चार रुप्यापर्यंत

मला हवी ती  हवी तशी

पण पुस्तक आणले की वाचू वाचू म्हणता राहूनच जाते वाचणे

वस्तू काय पुस्तक  काय आपले झाले की

किंमत कमीच होऊन जाते ?

नि कधी कुणाच्या हातात दिसले एखादे पुस्तक

तर शप्पत तेच आपल्याला जाणवून जाते?

ते पुस्तक शोधता शोधता मिळतच नाही कोठेही

दुकानात, फूटपाथवर

नि पुस्तकाची ओढ आपल्याला ओढीत राहाते अस्वस्थ करीत

तू दिलेस मला पुस्तक भेट त्या व्याकुळ संध्याकाळी

तुझा निरोप घेता घेता

पण मला तुझे पुस्तक ढापायचे होते

तुझ्या ठेवणीच्या कपाटातून

शप्पत

तुझे  पुस्तक ढापायचे राहूनच गेले……

Prakash Redgaonkar