नोव्हेंबर १० २०१८

समेयातां महोदधौ

शिरोटीप अर्थात तेल-ए-नमन
सुमारे १९९० साली मी लिहायला सुरुवात केली आणि १९९६ पर्यंत कमी-अधिक वेगात लिहित राहिलो. त्यावेळचे लेखन स्वच्छ कागद-लेखणी स्वरूपाचे होते. कागद बऱ्याचदा हाती लागेल तो. त्या काळच्या एकंदर आर्थिक परिस्थितीत छायाप्रती काढणे बऱ्याच (म्हणजे बहुतेक) वेळेस परवडत नसे. मग हातानेच दुसरी प्रत लिहून काढून ठेवण्याचा उद्योग काही प्रमाणात केला.
१९९६ नंतर मराठी लिखाण थांबले. बिऱ्हाड बदलणे धूमधडाक्यात सुरू होतेच. तेव्हापासून आतापर्यंत आठ वेळेला ठिकाण बदलले. सध्या नवव्या ठिकानी राहतो आहे. या भानगडीत मूळ प्रत आणि नक्कल हे दोन्ही गहाळ होऊ लागले.
२००७ साली 'मनोगत'वर आल्यावर परत लिखाण सुरू झाले. आधीच्या लिखाणातल्या काही कल्पना आठवत होत्या. त्या नव्याने लिहिल्या. काही आठवणीतून गेल्या होत्या त्या गेल्याच.
परवा जुने सामान चाळताना अकल्पितपणे काही हाती लागल्या. त्यातली ही १७ मे १९९५ रोजी लिहिलेली एक. या कल्पनेवर लिहिलेली एक कथा इथे २००७ साली लिहिली आहे. 
यथावकाश उरलेल्या उतरवीन.
इत्यलम (ઇત્યલમ્)
===========================================================
सर्व भुकेलेल्यांप्रती समान अनास्था बाळगून थाळ्या भरणाऱ्या उडप्याच्या खानावळीतील वाढप्याप्रमाणे वैशाखवणवा सर्व आसमंताला निरीच्छपणे झोडपीत होता. मिळेल ती सावली पकडून रस्त्यावरची लूतभरली कुत्री पसरली होती. जिभा बाहेर काढून धापा टाकीत होती. कुण्या आगंतुकाने त्यांच्या साम्राज्याच्या सीमेचा भंग केल्याचे आढळले तर मरगळलेल्या शरीराला उभे करून दोनचार श्वास भुंकत होती आणि परत जागच्या जागी फिरून बसकण मारीत होती.

कोपऱ्यावरच्या पानटपरीच्या नितकोर सावलीला उभे असलेले बेकार तरुणांचे टोळके आयुष्याची निरर्थकता, कुण्या एका भाग्यवंताने नोकरीसाठी लावलेला वशिला, एका पुल्लिंगी व्यक्तीच्या एका स्त्रीलिंगी व्यक्तीबरोबर असलेल्या संबंधांचे सविस्तर व सांगोपांग वर्णन या नेहमीच्या विषयांवर थकिस्तपणे चर्चा करीत होते. अचानक मध्येच त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्याच्या मातृ व भगिनीकुलाशी संबंध व्याकरणाचे सगळे ज्ञात नियम तुडवून जाहीर केला. परंतु मरगळलेल्या वातावरणात चैतन्य आणण्याचा हा प्रयत्नही अयशस्वी झाला.

पानटपरीवाल्या अण्णाने कंटाळलेपणे दोन चारमिनार व उबट पाण्याची बाटली टोळक्यापुढे सारली आणि डोळ्याभोवती झेपावणारी केंबरे हाकलीत तो दोन वेळच्या भातासाठी त्याच्या मनीऑर्डरकडे डोळे लावून बसलेल्या त्याच्या आंधळ्या आजीविषयी विचार करीत बसला.

आपल्या हयातीत एकदा मंत्रालयाची वारी घडावी आणि त्याचे लग्न झालेले अनुभवावे हे म्हातारीचे स्वप्न होते आणि ते त्याच्या हयातीत पूर्ण होण्याची शक्यता त्याला टाचा उंचावूनदेखिल दिसत नव्हती.

हातांत तीन किलो चकल्या आणि चार किलो चिवड्याचे डबे घेऊन चाललेल्या निर्मलाताईंचे खांदे भरून आले होते. मानेवरचा घाम पाठीच्या पन्हळीतून ब्लाऊजमध्ये शिरून पाठीला गुदगुल्या करीत होता. सभोवतालच्या धगीने डोळे फोडणीला घातल्यासारखे चुरचुरत होते. वीस रुपयेवाली प्लास्टिकची पावसाळी चप्पल टाचेला रुतत होती. तरीही पायातल्या पेटक्यांकडे दुर्लक्ष करीत थलथलीत डांबरी रस्त्यावर त्या आपली पावले छापीत होत्या.

हातातले डबे खाली फरशीवर ठेवून त्यांनी पदरानेच जमेल तेवढा घाम टिपून घेतला. थकल्या शरीराला दोन श्वासांची सवलत दिली. आणि फ्लॅटच्या दारावरची बेल वाजवली. वाचाळ तोंडाच्या आणि वातुळ शरीराच्या सोमणबाईंनी दार उघडले.

"या, या, निर्मलाताई" करीत त्यांनी तोंड पसरले. त्यांच्या आवाजात भरल्यापोटी डुरकणाऱ्या डुकराची स्वप्रसन्नता होती.

"काय काय रुखवताची तयारी सजवल्ये हो मुलीकडच्यांनी, करणारच म्हणा, असं सोन्यासारखं स्थळ आयुष्यात एकदाच मिळणार हो त्यांना, बाकी आम्ही म्हणून त्यांच्या पडत्या बाजवा सावरून घेतो, अजून कुणी नसत्या घेतल्या हो" अशी चर्पटपंजरी लावीत त्यांनी डबे स्वैपाकघरात नेऊन ठेवले आणि बाहेर येऊन गादीवरचा अल्बम उचलला.

"साखरपुड्याचे फोटो पाहिले नसतील ना तुम्ही? राजू कसा दृष्ट लागण्यासारखा दिसतोय. तसा तो... "

"नाही. पैसे घेऊन लगेच निघते मी"

"निर्मलाताई, तेवढीच जरा गडबड झाली बघा. ह्यांचं किनई, सकाळपासून डोकं दुखतंय. पित्त उठलंय वाटतं या लग्नाच्या धावपळीत, दुसरं काय? तर मी असं करते, आज नाहीतर उद्या संध्याकाळी नक्की राजूबरोबर पैसे पाठवून देते. त्याला काय, स्कूटरवर... "

"नाही", निर्मलाताईंच्या आवाजात तुटक, बोचरी धार होती. "मी आधीच स्पष्ट केलं होतं. तुम्ही सांगितल्यावेळेला काम होईल, पण पैसे आणि डबे मात्र लगेच हवेत".

बद्धकोष्ठ झाल्यासारखा सोमणबाईंचा वाग्प्रवाह बंद पडला. जमेल तेवढे पाय आपटत त्या आत गेल्या. वामकुक्षी मोडलेल्या नवऱ्याची आणि बावचळलेल्या बायकोची कुरकूर बाहेर तरंगत आली. गोदरेजचे कपाट खाटकन उघडल्याचा आवाज आलास. मेल्या झुरळाला मिशी धरून आणल्याच्या आविर्भावात सोमणबाई हातात नोटा घेऊन आल्या आणि निर्मलाताईंच्या हातात त्या कोंबल्या. अद्याप उभ्या असलेल्या निर्मलाताईंनी त्या मोजून घेतल्या, ब्लाउजमधून पैशाचे पाकीट काढून त्यात त्या ठेवल्या, आणि दोन रुपयांची एक नि एक रुपयाची एक अशा नोटा परत सोमणबाईंच्या हातातत ठेवून त्या निचळपणे उभ्या राहिल्या.

सोमणबाईंनी आपले गलबत आता स्वैपाकघराच्या दिशेला हाकारले. फळ्यांवरून भांडी काढल्याचे आवाज आले. सोमणबाई बाहेर आल्यावर त्यांच्या हातातले रिकामे डबे घेऊन निर्मलाताई वळल्या आणि निर्विकारपणे चालू लागल्या.

चकचकणाऱ्या पत्र्यावर रंगीबेरंगी अक्षरांत चितारलेल्या फॅंटाच्या जाहिरातीकडे त्यांचे लक्ष गेले तशी त्या क्षणभर थबकल्या. गोड थंडाव्याचे आश्वासन देणारी ती अक्षरे त्यांच्या मनाभोवती जाळे विणू लागली. काही एक विचार करून त्यांनी निश्चयाने 'नाही' अशी मान हलवली आणि त्या परत पावले ओढू लागल्या.

वडाच्या उंचावलेल्या मुळ्यांच्या खळग्यात स्वतःला कोंबून सुमी पसरली होती. पिवळट रंगाची सलवार जेमतेम तिच्या पोटऱ्या झाकीत होती. आणि अंगातला शर्ट अजून तीन सुमी मावण्याएवढी जागा बाळगून होता. तिचाही नाइलाज होता.

त्या बंगल्याच्या कुंपणाजवळ एवढे दोनच कपडे वाळत घातले होते. वडाला आणखी एक मूळ फुटल्यासारखा तिचा करपलेला पाय पदपथावर आला होता. अख्खे करवंद लपवण्याची क्षमता असलेल्या भेगा मिरवत तिची टाच आभाळाकडे तोंड करून पडली होती.

चालताना वाटेत मध्येच काय आले म्हणून निर्मलाताई थबकल्या. काळेभोर डोळे क्षितिजावर रोखून बसलेल्या सुमीच्या चेहऱ्यावर त्यांची नजर खिळली.

"अगं ए" सुमी एकदम दचकली. सर्व काही संपल्याच्या हताश भावनेने तिने नजर फिरवली आणि अनोळखी चेहरा पाहून ती बावरली. "चल", मांजराच्या पिलाला गोंजारावे तशा आवाजात निर्मलाताईंनी तिला संबोधले. "अं अं" असे अस्फुट आवाज काढीत सुमी उभी राहिली. जटा झालेल्या तिच्या केसांवरून हात फिरवत निर्मलाताईंनी तिला थोपटले. वाऱ्याच्या झोताने पातेरा सरावा तशा त्या दोघी चालू  लागल्या.

कुलूप उघडून निर्मलाताईंनी खळखळत दारावरची कडी काढली. बाहेरच्या भट्टीतून आत आल्यावर अचानक डोहाच्या काठी बसावे तसे दोघींना गार गार झाले. घडीच्या पलंगाखाली चपला सरकवून निर्मलाताई कोपऱ्यातल्या अंधाऱ्या न्हाणीत गेल्या आणि साडी जरा वर उचलून त्यांनी दोन तांब्ये पायावर ओतले. सुखद वेदनेची एक लहर शिरशिरत त्यांच्या मेंदूपर्यंत पोचली. तोंडावर पाण्याचा हबका मारून त्या बाहेर आल्या आणि जुन्या साडीचा भिजका तुकडा गुंडाळलेल्या तांब्याच्या तपेल्यातून त्यांनी गडवा भरून सुमीपुढे ठेवला.

"आधी पाणी पी, मग जरा वेळाने घोटभर कोकम सरबत देते".

पेजाळलेल्या भाताखेरीज आणखी काही पोटात जाण्याच्या शक्यतेने सुमीचे डोळे लकलकले.

स्नेहार्द्र नजरेने तिच्याकडे पाहत निर्मलाताई म्हणाल्या,  "थांब हो, त्याआधी तोंडात टाकायला चिमटीभर चिवडा नि दोन बेसनवड्या देते".

फडताळातले दोन डबे एका ताटलीत रिकामे करून त्यांनी ती सुमीच्यापुढे सरकवली आणि अमृतकोकमाला लावण्यासाठी इवले जिरे पाट्यावर खरडत त्यांनी बोलायला सुरुवात केली.

"तुला वाटेल या बाईला काय वेडबीड लागले की काय"

अख्खी बेसनवडी तोंडात कोंबून जिभेने ती हिरडीपासून सोडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुमीच्या डोळ्यांवरून भयाची छाया सरसरून गेली. मग क्षणभराने ती तोंड मिटून खुदखुदून हसली. त्याकडे दुर्लक्ष करून निर्मलाताईंनी जिऱ्याची चिमूट सरबताच्या पेल्यात सोडून पेला तिच्यापुढे सरकवला नि बोलणे चालू केले.

"काहीही कर बाई, पण काळाशी वैर घेऊ नकोस. माणसे शेळपट असतात. त्यांच्याशी वैर घेतल्यावर भयानेच ती निम्मी मरतात. पण काळ वैरी कसा सूड काढेल सांगता येत नाही. करवतीने चराचरा कापून त्यात मीठतिखट भरण्याइतका तो निष्ठुर आहे.

"आज जगाला फाटक्या तोंडाची, म्हणजे खरे ते स्पष्ट बोलणारी, निर्मलाताई दिसते. दिसते ती ढोरासारखे राबणारे एक यंत्र म्हणून. तिच्या उरात काय जळते आहे, कुठल्या स्वप्नांची राख फासून ती जगते आहे, आहे कुणास तमा?

"त्यांचीही चूक नाही. स्वच्छ बोलणारी, ठरलेले काम ठरल्यावेळी पार पाडणारी निर्मलाताई त्यांना माहीत. मीही माणूस आहे, दोन वेळेस अन्न खाऊन जगते, माझ्या मनावरही मळभ दाटून येते, निर्जन प्रदेशात ओसाड विहिरीत पडल्यासारखे एकूटपण मलाही भेवडावते याची त्यांनी काय म्हणून पत्रास बाळगावी?

"पण मी अशी नव्हते गं, खरंच अशी नव्हते. कधी मीही वेणी माळत होते, 'नाथ हा माझा' गुणगुणत होते, एक छोटेसे, ऊबदार घरकुल विणण्याची स्वप्ने रंगवीत होते.

"शाळेत शिकवत होते मी तेव्हा. निर्मलाबाईंखेरीज शाळेचे पानही हलत नसे. मग सहल काढायची असो वा स्नेहसंमेलनात नाटक बसवायचे असो.

"तोही अगदे रुबाबदार नि देखणा होता. करवतकाठी दुटांगी धोतर नेसून तो कचेरीत जाण्यासाठी निघे तेव्हा रस्ताभर नजरेच्या पायघड्या घालाव्यात अशी ऊर्मी उचंबळून येई. तळ्यातल्या गणपतीला प्रदक्षिणा घालताना एकदा मूर्तीच्या मागे आम्हांला क्षणभर एकांत मिळाला आणि त्याने माझ्या हाताला स्पर्श केला तेव्हा मी नखशिखांत मोहरून गेले होते. 'आपला लालिमा फिका आहे म्हणून उगवते सूर्यबिंबही लाजेल' एवढेच बोलून तो झटदिशी पुढे गेला.

"सगळे काही ठरले. त्याला त्याच्या वरिष्ठांबरोबर काही दिवस बाहेरगांवी जाणे भाग होते. तेथून तो थेट देवळात येणार होता. सोयरेधायरे त्यालाही नव्हते आणि मलाही. आमच्या स्वप्नांच्या पूर्ततेला देवळातल्या भटजींची साक्ष आम्हांला पुरे होती. मग मी आमच्या उशांवर कशिद्याचे अभ्रे चढवणार होते, त्याच्या रुमालांवर गुलाबपाणी शिंपडणार होते, त्याला चांगलंचुंगलं करून घालणार होते नि तो ते नावाजून खाणार होता, कचेरीला जाताना त्याच्या हातावर मी खारवून भाजलेली बडिशेप ठेवणार होते.

"त्याच दिवशी, त्याच घातवेळी, शाळेत नातूबाई चक्कर येऊन जिन्यावरून पडल्या. डोके फुटले. भळभळा रक्त वाहू लागले. चटकन पुढे होऊन मी त्यांचे डोके मांडीवर घेतले. पदराची चिंधी फाडून बांधली. डॉक्टरांना बोलावणे धाडले.

"अख्ख्या शाळेत फक्त नातूबाईंना माझ्या गुपिताची माहिती होती. त्या आमचे मेहूण जेवायला बोलावणार होत्या. त्याच्या आवडीचा कोंकणस्थी पद्धतीचा स्वैपाक मला शिकवणार होत्या.

"पण डॉक्टर येईपर्यंत त्या थांबल्या नाहीत. माझ्या मांडीवरच त्यांनी आचका दिला.

"सुन्न अवस्थेत मी कशीबशी घरी पोचले. मला अपेक्षा होती की तो धावत येईल, मला थोपटेल, माझे अश्रू बोटांवर घेऊन पिऊन टाकेल, त्याच्या भक्कम आधाराने मला परत उभी करेल. पण दारावर चिठी होती, 'मी जातो आहे. कृपया चौकशी करण्याचे कष्ट घेऊ नयेत'. त्यापेक्षा आसुडाने फाडफाड मारून माझी कातडी का गं सोलली नाही त्याने?

"क्षणार्धात हिरवळीचे वाळवंट झाले. आणि मग सुरू झाला स्वतःला क्लेश देण्याचा हा अघोरी खेळ. जी गोष्ट मी त्याच्याकरता, केवळ त्याच्याकरता राखून ठेवली होती, त्या स्वैपाकाचा पोटासाठी मांडलेला बाजार. कशासाठी? तर जिवंत राहण्यासाठी. हळव्या ओलसर भावनांच्या पानामध्ये त्याच्या स्मृतींचे मोरपीस जपून ठेवण्यासाठी. कधी ना कधी तो परत येईल. अश्रूंनी मी त्याची पावले धुऊन काढीन. मग तो मला जवळ घेईल. माझ्या गालांवरून हळुवार हात फिरवील. यासाठी.

"आणि कालच मी त्याला बघितला. चिखलात लोळणाऱ्या म्हशीसारखा रेकणारा तो सोमणवकील माहित्ये? त्याचा व्याही होणाराय तो. जे माझे आणि फक्त माझे होते ते आणखी कोणा स्त्रीला देऊन त्याने तिच्या पोटी स्वतःच्या अस्तित्वाचा अंश जन्माला घातला. उरापोटी जपून ठेवलेल्या मोरपिसाला वाळवी लागली.

"आता काय जगणे नि मरणे सारखेच. क्षणाला आशा चिकटवत बसून काय साध्य होणाराय? काय साध्य झाले?"

तगमगून निर्मलाताई उठल्या. फळीवरचे गाठोडे उघडून त्यांनी त्यातून जीर्ण झालेला एक पिवळट कागद बाहेर काढला आणि त्याचे तुकडे करून उधळून दिला. व्यवस्थित टापटिपीच्या त्या दोनखणी खोलीला गालबोट लावत ते तुकडे चहुस्ततः पसरले.

"मुली, मी आता जाते. कुठे, कशासाठी, नाही माहीत मला. पण जाण्याआधी मला कुणालातरी हे सगळं सांगायचं होतं गं. "

निर्मलाताईंनी सुमीकडे बघितले.

हाडाडलेल्या अवस्थेत पोटात एवढे टापटिपीचे गेल्यावर सुमी भिंतीला डोके टेकवून बसल्याजागीच झोपी गेली होती. तिच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव होते.

खिन्न हसून निर्मलाताईंनी सुमीच्या गालावरून फिरवण्यासाठी हात पुढे केला, पण झटकन तो मागे घेऊन त्या दार उघडून बाहेर पडल्या.

दारातून आत आलेली मावळत्या सूर्याची तिरीप शर्ट बाजूला सरून उघड्या पडलेल्या सुमीच्या पोटावर रेंगाळत राहिली.

कार्यालयातल्या सगळ्यांच्यावर यथेच्छ करवादून मनोरुग्णालयाच्या मेट्रन देशपांडेबाई पोलिस स्टेशनवर सुमी नावाची हिंसक मनोरुग्ण पळून गेल्याची तक्रार नोंदवायला बाहेर पडल्या.

Post to Feedसुंदर
खुप छान...
उत्तम शैली पण

Typing help hide