नोव्हेंबर २२ २०१८

समोरची गॅलरी

समोरची गॅलरी

     पावसाळ्याच्या सुरुवातीला ती राहायला आली तेव्हापासून मल्हारच्या वागण्यात बदल झाला. ज्या दिवशी ते कुटुंब आलं त्या दिवशी ती समोरची गॅलरी उघडली गेली आणि तिचं संध्याकाळी गॅलरीत येणं दिसू लागलं.   
     तिचा नवरा ऑफिसला गेल्यानंतर पाच मिनिटांनी मल्हार ऑफिसला जायला निघत असे. मल्हार दोघांचे ‘हाय बाय’ पाहात असे. स्वैपाकघराच्या खिडकीतून हॉलची गॅलरी दिसे. रीमा तिथून मल्हारला पाही. मल्हार नियमितपणे त्यांची निरोपानिरोपी पाहतो, हे रीमाला एव्हाना कळलं होतं. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर मल्हार अंमळ जास्तच वेळ गॅलरीत बसे.
     श्रावणात कॉमन हॉलमधे काहीतरी कार्यक्रम होता. साहजिक सगळ्या कॉलनीला आमंत्रण होतं. मल्हार संकेतला घेऊन आधी पोचला. रीमा सगळं आवरून मागून आली. रीमाने मल्हारला तिच्याशी कॉमन हॉलमधे बोलताना पाहिलं. रीमाने पुढं होऊन तिच्याशी ओळख करून घेतली. आपण एकदम आल्यामुळे मल्हार दचकेल असं रीमाला वाटलं पण मल्हारच्या चेहऱ्यावरचा शांत समुद्र कायम होता.  
    कॉलनीतल्या कॉमन लायब्ररीचे मल्हार व रीमा दोघेही सभासद होते. रीमाने एक दिवस मल्हारचा व तिचा अकाउंट चेक केला. दोघांच्या नावावर काही पुस्तके सारखी होती. एक दिवस कॉलनीजवळच्या मॉलबाहेर रीमाला तिची गाडी दिसली. जवळच मल्हार आहे की काय, तिला उत्सुकता लागून राहिली. रीमा बराच वेळ मॉलबाहेर थांबून राहिली. ती आणि मल्हार मॉलमधून एकत्रच बाहेर येत आहेत असं आपल्याला दिसेल, असं रीमाला वाटत होतं. ती आली पण तिच्यासोबत तिचा नवरा होता.
     दिवाळी जवळ आली. एके संध्याकाळी मल्हारने गॅलरीचा दरवाजा उघडला. गॅलरीत ती होती. मल्हार समोर पाहत राहिला. दोन्ही बिल्डिंगच्यामधे मोकळी जागा. मुलं तिथं खेळायची. तिचा मुलगा व मल्हार-रीमाचा मुलगा संकेत हे दोघेही इतर मुलांसोबत खेळत असायचे. मागून रीमा आली. तीही समोर पाहू लागली. दोघं हसले की काय, असं रीमाला वाटलं. काही वेळाने मल्हार मागे वळला. रीमाही घरात परतली. तिने गॅलरीचे दार लावून घेतले.               
     संकेतला दिवाळीची सुटी लागली. अजून तशी दिवाळी सुरु व्हायला वेळ होता.रीमा म्हणाली, 
"चार दिवस आईकडे जाऊन येते. तिला थोडी तयारी करून देते. आपल्यासाठी पणत्या आणल्यात. किल्ल्याचं काय ते तू बघ संकेतबरोबर. बाकीची तयारी नंतर करू."    
"बरं." 
"नाही, माहिती दिली." 
"जातेस की बरेचदा. त्यात काय नवीन ?"
"नीट वाग. वेळेवर खा पी." 
"हो."
"नीट वाग." 
     काही दिवसांनी रीमा परत आली. दिवाळीही झाली. संकेतने व तिच्या मुलाने किल्ला एकत्र केला होता.  रीमाने खडे टाकायला सुरुवात केली. 
    "समोरच्या बिल्डिंगमधले लाईट जातात हल्ली म्हणे."
    "जात असतील." 
"तुला नाही कळलं ?"
"नाही." 
"आश्चर्यच. त्या बिल्डिंगमधल्या कोणी नाही कळवलं ?"
 "नाही."
"सावंतांनी नाही कळवलं?"
"सावंतांनी कशाला कळवायला पाहिजे ?"
"तुझे ते फंड सल्लागार आहेत ना?" 
"ते कन्सलटंट आहेत. लाईट गेल्याची बातमी ते कशाला सांगतील? तसं तर थोरातही सांगेल की. तोही तिथेच राहतो." 
"एकदा जाऊन सांगून ये सगळ्यांना की, दोन्ही बिल्डिंग मिळून जनरेटर घ्यायचं प्रपोझल मांडू. त्या निमित्ताने तुला त्या बिल्डिंगमधे जायचा चान्स मिळेल "
"पूर्वी एकदा प्रपोझल टाकलं होतं पण नाही एकमत झालं."

       रीमाच्या हाती काही लागलं नाही.
       मल्हारने गॅलरीत नवी फुलझाडं लावली. एके संध्याकाळी रीमा चहाचे कप घेऊऩ गॅलरीत आली. मल्हारलाही तिने तिथे बोलवले. आज ती तिथे नव्हती. 
          "काय म्हणतेय तुझी शेजारीण?"
        "कोण शेजारीण? शेजारचे पंधरा दिवस फिरायला गेलेत माहीत नाही का तुला ?"
        "ती समोरची. काही डेव्हलमेंट? " 
         "मग, समोरची म्हण ना. शेजारीण नाही ती. ती काय म्हणणार ? ती काहीतरी म्हणत जाते आणि मी तळव्यावर हनुवटी ठेवून ऐकत जातो, असं वाटतंय का तुला ? डेव्हलपमेंट म्हणजे बॉब कट केलाय आणि तिने दाखवला मला गॅलरीतून. मी पण ‘झकास’ असं खुणेनेच सांगितलं. "
           मल्हारने शांत सुरात खोचकपणे सांगितले. रीमा गप्प झाली.

         दोन दिवसांनी जेवण झाल्यावर विषय काढायचाच असं रीमाने ठरवलंच होतं. ती बेडरूममधे आली. मल्हार ‘इंडियन मिडल क्लास इन ग्लोबलायझेशन’ हे पुस्तक वाचत होता. रीमाने मोबाईल घेतला व दुसरीकडे तोंड करून मेसेजेस वाचायचं नाटक करू लागली. एकीकडे प्रश्न सुरु केले.    
      "नक्की काय आहे? लपवू नकोस काही." 
      "काही नाही लपवलेले."
      "तुम्ही हसता एकमेकांकडे पाहून हे तर नक्कीच."
      "बरं मग?"
      "का हसता ? चार महिने झाले, पाहतेय. आज सांगूनच टाक प्रकरण. " 
      "नाही. प्रकरण नाही. प्रकरणात अजून पुढे जायचं असतं."
      "हसता म्हणजे झालंच. हसण्याची पुढची स्टेप भेटणं."
   "भेटून झालंय."
    "वाटलंच मला. कशाला खोटं बोलायचं की फक्त हसतो."
    "भेटणं झालंय, बोलणंही झालंय."
    "अच्छा. काय काय बोललात?"
    "बरंच काही."
    "मला तरी कळू दे. मला लफड्यांचा अनुभव नाही. लफड्यात काय बोलतात, मलाही जाणून घ्यायचंय."
    "छे, लफडं बिफडं काही नाही." 
    "मग, काय प्रेम ?"
    "हो. प्रेम."
     "इथवर मजल ? बरं झालं मीच विचारलं म्हणून. नाही तर तू ताकास तूर लागू दिला नसतास. मला तू सोडणार नाहीस मला माहीत आहे. मीही तुला सोडून निघून जाणार नाही, तुलाही ठाऊक आहे. फक्त मला माहीत असलेलं बरं. कर, प्रकरण कर. मलाही सीसी मधे ठेव म्हणजे झालं."
"सीसी ?"
"ईमेल करताना सीसी करतात ना? तिसऱ्या व्यक्तीला काय चाललंय ते कळावं म्हणून."
"अच्छा. चालेल. आमचे प्लॅन झाले की, तुला कळवत जाईऩ. त्यापेक्षा आपल्या तिघांचाच एक ग्रुप करू का ?     मी बोलत जाईन तिच्याशी. तू वाचत जा." 
"नंबर घेतलाय वाटतं?"
"नाही घेतला. ये तो मजाक था."
"कर,प्रकरण कर."
"एकाच माणसाशी दुसऱ्यांदा प्रकरण करायची माझी इच्छा नाही. "
"दुसऱ्यांदा?"
 रीमाने तोंड इकडे केले. मोबाईल खाली ठेवला.
    "तुला आपल्या लग्नाआधी सांगितलं होतं ना, तीच ही. माझी आधीची प्रेयसी. आम्ही काही महिन्यांपूर्वी एकमेकांना पाहिलं. गँलरी समोरच होती. हसलो. संध्याकाळी जेव्हा ती गॅलरीत येते तेव्हा माझी घरी येण्याची वेळ तीच असते. गॅलरीतून मुलांना खेळताना आम्ही पाहतो. आम्ही हसतो पण फक्त हसतो. पुढं काही नाही. आम्ही अजूनही एकमेकांचे नंबर घेतलेले नाहीत. गेले सहा महिने आम्ही हसण्यापलीकडे गेलेलो नाही. परवा मार्केटमधे थोडं बोलणं झालं. आमचं प्रकरण का संपलं, वगैरे आठवणी मला नको आहेत. तूही विचारू नकोस. प्रकरण संपल्यावर ती म्हटली होती मला की, मी जिच्य़ाशी लग्न करेन तिला भेटायला तिला आवडेल. उद्या तिनं बोलावलंय आपल्याला चहाकरिता. मार्केटमधे दिलं आमंत्रण. मी ऑफिसमधून आल्यावर जाऊ. तू तयार रहा."
    रीमा मल्हारकडे पाहात राहिली. भानावर आली तोवर मल्हार झोपूनही गेला होता

Post to Feedएखादा साबण , आता फेस होईल, मग फेस होईल
छान
तो मोती साबणे,

Typing help hide