डिसेंबर १२ २०१८

शक्तीकांत दास, मोदींचा नवा डाव !


रिजर्व बॅंक आपलं ऐकत नाही आणि ३.६० लाख कोटींची गंगाजळी सरकारला बहाल करत नाही म्हटल्यावर, जेटली-मोदी जोडगोळीनं आर्बिआय अ‍ॅक्ट मधला सेक्शन सेवन इन्वोक करायचा बडगा दाखवला. थोडक्यात, जिएसटीमुळे सरकारला अपेक्षित महसूल मिळाला नाही आणि एकूणात या अत्यंत निर्बुद्ध पण तरीही 'अभूतपूर्व'  म्हणून प्रचंड गाजावाजा झालेल्या करसुधारणेचे बारा वाजले आहेत. अर्थात, स्वत:ची चूक कबूल करतील ते मोदी कसले, याचा प्रत्यय नोटाबंदीचा संपूर्ण फज्जा उडून सुद्धा, 'बॅंकींग व्यावहार वाढले'  अशी मखलाशी करतांना आला आहे. तर अशा या नोटबंदीच्या भंपक योजनेचं हिरहिरीनं समर्थन करणारे शक्तीकांत दास, मोदींनी आता रिजर्व बॅंकेचे नवे गवर्नर म्हणून आणले आहेत.

लेखाचं प्रयोजन असं की हे शक्तीकांत दास मोदींचे परम भक्त आहेत. त्यांच्या वैचारिक क्षमतेच्या अंदाजाची झलक वाचकांना यावी म्हणून सांगतो; नोटबंदीत "लोकांनी एकदा नोटा बदलल्या की त्यांच्या बोटाला शाई लावा" असा सल्ला यांनी सरकारला दिला होता ! सदर महान प्रपोजलचा पब्लिकनी जबरदस्त विरोध केला तेंव्हा हे ठिकाणावर आले. 

दास हे सरकारी चाकरीत होते आणि गेल्या वर्षी, म्हणजे २८ मे २०१७ ला रेवेन्यू डिपार्टमेंटच्या बजेट डिवीजनचे सचीव म्हणून निवृत्त झालेत. त्यांची शैक्षणिक आहर्ता पण नोंद घेण्यासारखी आहे; त्यांनी 'इतिहास' या विषयात, दिल्लीच्या स्टिवन कॉलेजमधून एमए केलं आहे. एकूण प्रकार बघता, अत्यंतिक निकडीच्या वेळी वापरायची रिजर्व बॅंकेची गंगाजळी सरकारला निर्धास्तपणे सोपवली जाते किंवा कसे हे १४ डिसेंबरला होणार्‍या रिजर्व बॅंकेच्या बोर्ड मिटींगमधे ठरेल. त्यासाठी मोदींनी शक्तीकांत दास या आपल्या भरवश्याच्या व्यक्तीला गवर्नर म्हणून नियुक्त केलं आहे. 

हे ३.६० लाख कोटी सरकारकडे गेले तर काय होईल याची झलक, विरल आचार्य या रिजर्व बॅंकेच्या डेप्युटी गवर्नरनी मागच्याच महिन्यात, म्हणजे १४ नोव्हेंबरला त्यांच्या एडी श्रॉफ मेमोरियल फाउंडेशनच्या मुंबईत झालेल्या भाषणात  दिली होती. रिजर्व बॅंकेची स्वायत्तता धोक्यात आल्यास, "देशातील फिनान्शियल मार्केट कोसळेल, अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडेल आणि बिकट आर्थिक अनर्थ ओढवेल" असं ते म्हणाले होते.

तर आता पुढे काय होतं आणि अनर्थ टाळण्यासाठी आर्थिक क्षेत्रातली तज्ञ मंडळी हा डाव कसा हाणून पाडतात हे येत्या ४/५ दिवसात बघणं मनोरंजक ठरेल.

Post to Feedकाय योगायोग आहे !
तरीहीही मोदी यांच्या आरत्या ओवाळत आहेतच
स्वतः मोदींनी राफेलवर पहिल्यांदाच तोंड उघडलं आणि तोंडघशी पडले !

Typing help hide