किल्ली

        किल्ली ही वस्तु हरवण्यासाठीच जणु असावी !.तशी जगात निर्मिलेली कोणतीही वस्तु हरवू शकते.म्हणजे ज्या वस्तु जागेवरून हलू शकत नाहीत अश्या वस्तूसुद्धा हरवू शकतात उदा: विहीर किंवा लालूच्या राज्यात अगदी धरण अगर चार पदरी रस्तासुद्धा  हरवू किंवा चोरीला जाऊ शकतो मग बारिक सारिक म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत ज्या वस्तु देण्याचे शासकीय नियोजन असते त्यातील अनेक वस्तु हरवतात किंवा चोरीला जातात.त्यात विशेष ते काय ? कधी कधी माणसेही  हरवतात बऱ्याच वेळा किल्ली एकटी न हरवता आपल्या सर्व सोबतिणींसह गायब होते म्हणजे किल्ल्यांचा जुडगाच हरवतो मग तर काय तो हरवणाऱ्याच्या दुर्दशेला पारावारच उरत नाही.
      ना.सी.फडके एके काळचे प्रसिद्ध लेखक आजच्या पिढीला त्यांचे नावच कदाचित माहीत असेल.ते प्रसिद्ध लेखक तर होतेच पण तितकेच व्यवस्थितपणाबद्दल पण प्रसिद्ध होते. त्यांच्या हातून त्यांच्या कपाटाची किल्ली हरवावी हे आश्चर्यच कदाचित सौ.कमला फडके किंवा चि.अंजली फडके यांचाच अजागळपणा असावा तो,सुदैवाने त्या घटनेवर "हरवली म्हणून सापडली" असा एक लघुनिबंध अप्पासाहेबांनी (ना.सी. ना अप्पासाहेबच म्हणत) लिहिला आणि त्यामुळे (किल्ली शोधण्यात वाया गेलेला वेळ सत्कारणी लागला) म्हणून कदाचित अप्पासाहेबांनी त्या दोघींना माफ केले असावे. माझी प्रतिभा तितकी जागृत असती तर कालिदासाच्या पावलावर पाउल ठेवीत  अज इंदुमती विलाप सारखे किल्लिविलाप अश्या संस्कृतप्रचुर नामाभिधानाचे एकच काय पण अनेक काव्ये मला लिहिता आली असती.
            घराची एकच  किल्ली हरवण्यामुळे लगेच ज्याची किल्ली हरवते त्याला घराबाहेरच बसावे लागून किल्लीबरोबर घरातील यच्चयावत गोष्टींना मुकावे लागते. असा माणूस एकटाच असेल तर ( कारण दुकटा असेल तर त्याच्याकडे दुसरी किल्ली असण्याची शक्यता असते)त्याला लगेचच किल्लीवाल्याला शोधून आणावे लागते.सुदैवाने किल्लीमेकर बहुधा रस्त्याच्या कडॅला एकादा लोखंडाचा किंवा पितळेचा तुकडा घासत बसलेले दिसतात अर्थात आपण अडलेले असल्यामुळे त्याला घरी नेऊन त्याला किल्लीशिवाय कुलुप उघडावयास लावणे हे पहिले मोठे काम असते पण तो ते किल्लीशिवाय इतके पटकन् करतो की हे काम आपल्याला का जमत नाही असा विचार त्यावेळी मनात डोकावतो.मग आपल्या लक्षात येते की किल्ली ही वस्तु हरवण्यासाठी व नंतर ती तयार करून त्यातून होणाऱ्या कमाईवर पोट भरणाऱ्या किल्लीमेकरसाठीच केलेली असते.साधी गोष्ट ! कुलूप आणि किल्ली दोन्ही शाबूत असतात तेव्हां चोर किल्लीमेकरच्याच पद्धतीने किंवा त्याच्याहीपेक्षा चलाखीन कुलूप उघडतो  तेही आजूबाजूच्या घरातील लोकांना आवाज ऐकू जाऊ नये म्हणून नाहीतर एक घाव दोन तुकडे या पद्धतीनं तो आपल्या कुलुपाची वाट लावू शकतो.घरातील मौल्यवान वस्तु न्यावयास येणाऱ्यास त्या आपल्या दृष्टीने अमूल्य पण त्याच्या दृष्टीने अडचण असलेल्या कुलुपाची फार काळजी घ्यायचं काही कारण नसतं.किल्लीमेकरवर मात्र कुलूप शाबूत ठेवून किल्ली तयार करण्याची जबाबदारी असते
         मी वसतीगृहात रहात असताना खोलीच्या सुरक्षिततेचे सुरवातीला प्रत्येक विद्यार्थ्यासच महत्व वाटे त्यामुळे नुकताच गाव सोडून शहरात आलेला मुलगा त्यातल्या त्यात भारी म्हणजे गोदरेजचे कुलुप घ्यायचा व थोड्याच काळात पस्तावायचा कारण गोदरेज त्यामानाने बरेच बळकट कुलूप होते त्याच काळात अगदी तसेच दिसणारे  दुसरे एक कुलूप बाजारात उपलब्ध होते आणि त्या  कुलुपाला त्या प्रकारच्या दुसऱ्या कुठल्याही कुलुपाची चावी चालायची त्यामुळे हळू हळू सर्व गोदरेज कुलुपांची जागा त्या कुलुपांनी घेतली कारण आमच्यासारख्या विद्यार्थ्याच्या खोलीतून फारसा काही ऐवज मिळण्याची शक्यता नसल्याने चोर कदापि आमच्या खोलीकडे मोर्चा वळवायचा नाही त्यामुळे वर्षातून हटकून एकदा किंवा दोनदा किल्ल्या हरवणारे आमच्यासारखे बहाद्दर असे झाले की एकमेकांच्या किल्ल्या वापरून काम भागवायचो.पुढे पुढे तर किल्ली आमच्या खोलीच्या दाराच्या वरच ठेवलेली असायची म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची खोली उघडणे शक्य व्हायचे.त्यात एकादा नुकताच गावाहून आला असेल तर त्याची खोली उघडून त्याने गावाहून आणलेल्या लाडू चिवड्याचा फन्ना उडवणे सोपे जायचे.बर किल्ली जरी दारावर नसली तरी सगळ्या कुलुपांना कोणत्याही किल्ल्या चालायच्या म्हणजे किल्लीवाल्याचे कसब त्यावेळी बऱ्याच अंशी सगळ्याच विद्यार्थ्यांना जणु वश झाले होते.
          पण पुढील आयुष्यात घराच्या सुरक्षिततेविषयी इतके बेपर्वा राहून चालत नाही त्यामुळे शक्यतो आपल्या किल्लीशिवाय कोणाला उघडता येऊ नये अश्या कुलुपाने घर किंवा कपाट बंदिस्त करायचा विचार आपण करतो.असे करण्यात खरे तर आपण आपलीच पंचाईत करून घेत असतो कारण चोर कधीतरी (किंवा कधीही नाही) आपल्या घराकडे फिरकणार पण आपण मात्र हरघडीला घर वंद करणार व उघडणार .बर चोर किल्लीवाल्याचे बारसे जेवलेला असल्यामुळे आपण घरात नसताना अगदी सहज आपले घर लुटून निघून जाणार फक्त जाताना दार तितक्या बंदोबस्ताने बंद करून न गेल्यामुळे आपले एक वेळा दार उघडण्याचे कष्ट वाचवणार ही चोरीच्या दु:खातूनही एक आनंदाची गोष्ट.! थोडक्यात कुलूप ही म्हणजे असून अडचण नसून खोळंबा या प्रकारातील गोष्ट आणि किल्ली ही फक्त नीट सांभाळणे व कधीतरी हरवली की सगळे उपद्व्याप करावे लागणारी गोष्ट.
           त्या दृष्टीने शनि शिंगणापूरचे नागरिक सुखी म्हणता येतील कारण त्यांच्या घराला कुलूप लावायचेच नसते नाहीतर शनिदेव कोपतो आणि तेथे चोरी करण्याचे धाडस कोणी करत नाही कारण तेच शनिदेव कोपतो. यात कितपत तथ्य आहे हे मी शनिशिंगणापूरला रहात नसल्याने मला माहीत नाही.
        शनिशिंगणापुरास रहात नसल्यामुळे घराला कुलूप लावणे व त्याची चावी संभाळणे हे काम माझ्यावर कधीतरी पडायचेच.विद्यार्थी जीवनात खोलीच्या कुलुपाची चावी हरवण्याचे विक्रमी प्रयोग मी केले.किल्ली शर्ट किंवा पॅन्टच्या खिश्यातूनच गायब होत असे नाही कधी कधी चहा पिऊन येताना चाव्यांचा जुडगा उंच फेकून झेलायची लहर मला यायची आणि कधी कधी त्या जुडग्याला माझ्या हातात परत न येता रस्त्यावरच्या विजेच्या तारेवरच मुक्काम ठोकायची लहर यायची अर्थात या प्रकारच्या अडचणीवर मात करणे मला शक्य नसायचे पण त्या काळातल्या कुलुपांचा दर्जा फारसा उच्च नसल्यामुळे माझे काम भागून जायचे पण पुढे गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यावरही किल्ल्या हरवण्याचे माझे कौशल्य मात्र फारसे कमी झाले नाही. कधी कधी धुवायला टाकलेल्या कपड्यात राहिलेल्या किल्लीमुळे वॉशिंग मशीनचेही बारा वाजवण्याचा पराक्रम मी केला आहे. आणि त्या काळात पूर्वीसारखी तकलादू कुलुपे वापरण्याचे दिवस गेले होते. 
          माझ्या लहानपणीच्या काळात  जेव्हां कुटुंब मोठे असल्यामुळे कोणी ना कोणीतरी घरात असायचेच आणि त्यामुळे घराला कुलुप लावण्याचे प्रसंग अगदी सगळे लग्नाकार्यासाठी गावी गेले तरच यायचे आणि त्या वेळी किल्ली शेजारच्या घरी ठेवून जाण्याचा प्रघात असायचा त्यामुळे किल्ली हरवण्याची जबाबदारी घरातील माणसावर नसायची आणि शेजारचा माणूस आम्ही परत येईपर्यंत आमची किल्ली कोठे ठेवली हेही विसरत असल्यानुळे ती हरवण्याच्या भानगडीत तरी पडायचा नाही.
         पण पुढे आमचा हम दो हमारे दो असा संसार सुरू झाल्यावर मात्र किल्ल्या सांभाळणे हा जाच सुरू झाला.पण त्यातही सौ.नोकरी करत नसल्यामुळे घराला कुलूप लावून कामावर जाण्याचे प्रसंग क्वचितच माझ्यावर आले आणि किल्ल्या हरवण्याची जबाबदारी सौ.वतीवरच पडली.अर्थात त्याबाबतीत ती फार दक्ष असल्याने एकदाच तिच्यावर किल्ल्या हरवण्याचा प्रसंग आला आणि त्यालाही ती कारणीभूत नव्हती.ती बसमधून जाताना तिची पर्सच चोरीला गेली व त्याचबरोबर त्यातील किल्ल्यांचा जुडगाही.अर्थात त्यावेळी आम्हाला सगळी कुलुपेच तोडून फेकून देऊन नवी कुलुपे बसवावी लागली.  मी किल्ली हरवल्यावर माझ्यावर धांदरटपणाचा आरोप व्ह्यायचा पण  तिच्यावर कसलाही दोष न येता उलट तिची कीव केली लोकांनी ! 
            मी अनेकवेळेला किल्ल्या हरवल्या आणि माझे नशीब इतके थोर की प्रत्येक वेळी किल्ल्या सापडल्या तरी किल्ली हरवणारा असा शिक्का मात्र माझ्यावर बसलाच..एकदा आम्ही सर्वजण म्हणजे हम दो हमारे दो फिरायला गेलो आणि घरातल्या गोदरेजच्या कपाटाच्या किल्ल्या कशा काय माझ्या खिशात होत्या.घराची चावी खिशात व्यवस्थित आणि ही गोदरेजचीच चावी कुठे पडली कोण जाणे.आता वेळ रात्रीची त्यामुळे बाहेर पडून शोधणेही शक्य नाही.गोदरेजचे कपाट लगेच फोडणेही जिवावर आले आणि ते फोडण्यापेक्षा त्याची चावी करून मिळते का हे पहाणे शहाणपणाचे म्हणून रात्र तशीच तळमळत काढली.त्यावेळी जरा गावाबाहेरच्या रस्त्यावरील घरात रहात होतो .दुसऱ्या दिवशी सकाळी जरा अंधुक दिसू लागले की घराबाहेर पडलो व आदल्या दिवशी ज्या रस्त्यावरून घरी आलो होतो तो रस्ता पकडला.अजून त्या रस्त्याला उर्जितावस्था यायची होती त्यामुळे तो धुळीने भरलेला होता आणि तेच माझे भाग्य ठरले कारण त्या धुळीत गोदरेजच्या कपाटाची चावी जणु माझी वाट पहात पडली होती.घरी आनंदाने आल्यावर माझी खरडपट्टी व्हायची होती ती झालीच पण कपाट फोडणे किंवा गोदरेज डीलरकडे जाऊन किल्ली मिळते का हे पहाण्याचा उपद्व्याप वाचला म्हणून मी खूष !
         आता अलीकडे आमचे आम्ही दोघेच राहू लागलो तेव्हां प्रत्येकजण आपली आपली स्वतंत्र चावी घेऊन घराबाहेर पडतो.शिवाय आता फ्लॅटचे दार आपोआप बंद होणारे म्हणजे जर चुकून चावी घरात राहिली व वाऱ्याने दार बंद झाले तर काही खरे नाही.आमच्याच माहितीच्या आमच्यासारख्याच ज्येष्ठ नागरिकांचे घर असेच बंद झाले तर बिचाऱ्यांना किल्लीवाला शोधून त्याच्याकडून ते उघडून घ्यावे लागले अर्थात भरभक्कम दक्षिणा मोजूनच.
          मी मात्र नेहमीच्या प्रथेला अनुसरून सकाळी फिरायला गेल्यावर दार उघडायला म्हणून किल्ली काढण्यासाठी खिशात हात घातला तर किल्लीचा पत्ता नाही.मी बाहेर गेल्यावर सौ.वती अंघोळीस वगैरे गेली तर उगीच बाहेर थांबावे लागू नये म्हणून मी किल्ली घेऊन जातो.पण आता खिशात किल्ली नव्हती म्हणजे मी नेली नसावी असे वाटून मी बेल वाजवली च सौ.ने आश्चर्याने दार उघडले कारण मी किल्ली नेली असणार याची तिला खात्री.घरात नेहमीच्या जागा शोधल्या पण किल्लीचा पत्ता नाही.गोदरेजची किल्ली हरवली तसा कच्चा रस्ता नव्हता तरी पण एक चक्कर मारून आलो अर्थात प्रत्येक वेळी किल्ली अशी वाट पहात थोडीच बसणार पण मग सौ.ने माझी उलटतपासणी केली मी फिरून येताना वाटेतल्या किराणा मालाच्या दुकानातून दूध आणले होते त्यावरून इने तर्क केला होता की तेथे पैसे काढताना किल्ली माझ्या खिश्यातून पडली असणार
पण नी तिला झटकून म्हणालो,"छे छे तशी पडली असती तर आवाज आला नसता का,कुठेतरी रस्त्यातच पडली."म्हणून उदास अंत:करणाने अंघोळ वगैरे करून कपडे चढवले तेव्हां"अहो,किल्ली सापडली " असे शब्द कानावर पडले आणि माझा जीव भांड्यात पडला."बघ मी म्हटले नव्हते का घरातच राहिली होती ना?" अगदी विजयोन्मादाने मी म्हणालो ,"नाही मी म्हटले नव्ह्ते का किराणा मालाच्या दुकानातच पडली असेल,मी त्याला फोन करून विचारले आणि तेथेच पडली होती त्याला नीट ठेवायला सांगितले" असो माझा पराभव मी हसतमुखाने स्वीकारला ,हो किल्लीवाल्याला शोधण्यापेक्षा ते सोपे शिवाय लॅचची किल्ली कुणाला सापदली तर घराच्या सुरक्षिततेची सारखी काळजी
            यानंतर तरी माझी किल्ल्या हरवण्याची संवय सुटेल असे वाटत होते.पण कसचे काय एक दिवशी सकाळी फिरायला जाताना बरोबर नेण्यासाठी किल्ली शोधत होतो तर नेहमीच्या जागी सापडली नाही.सगळ्या जागा पॅन्टचे खिसे तपासून झाले शेवटी या वेळी मात्र किल्ली खरच हरवली याविषयी मी नि:शंक झालो.मग काय तसाच फिरायला गेलो.फिरून आल्यावर मागच्या वेळसारखा चमत्कार होईल व "किल्ली सापडली हो" असे सौ.च्या तोंडून ऐकायला मिळेल अशी पुसट शंका वाटत होती पण तसे काही झाले नाही.यावेळी मात्र किल्ली बनवणे वगैरे उपद्व्यापास तोंड द्यावे लागणार अशी खात्री पटली.आणि अचानक समोरच्या काकूनी बेल वाजवली,"पार्टी पाहिजे " असे म्हणतच ! "का काय झाले ?" आम्ही आस्चर्याने विचारले,"तुमची चावी कुठे आहे ?""हरवली बहुतेक" मी उदासवाणे होत म्हणालो."अहो काल रात्री तुम्ही दार उघडून आत शिरला आणि चावी दारालाच" काकूनी असे म्हटल्यावर "वा वा मग पार्टी निश्चित " आम्ही दोघेही म्हणालो. 
           अमेरिकेत पहिल्यांदा गेलो तेव्हां तर आमच्या मुलाच्या फ्लॅटला जे कुलूप होते त्याला दोन किल्ल्या होत्या व त्या दोन्ही विशिष्ट पद्धतीने एकामागून एक फिरवल्यावरच कुलुप उघडायचे.त्यावेळी तो कामावर गेल्यावर घरात आम्ही दोघेच असायचे अर्थात बाहेर जायचे झाले तर सुरवातीस एकानेच कुणीतरी जायचे असे ठरवले कारण दार बंद करून बाहेर पडलो आणि परत आल्यावर उघडता आले नाही तर काय करायचे.पण नंतर प्रत्येकाने स्वतंत्रपणे कुलूप उघडण्याची तालीम केली व दोघानाही उघडता येते याची खात्री पटल्यावरच दोघांनी बाहेर पडायला सुरवात केली.पण आमच्यासारखे काही ज्येष्ठ नागरिक खरोखरच मुले घरात असतानाच बाहेर पडायचे हो उगीच किल्ली बरोबर बाळगण्याची कटकट नको.
          आता नव्या घराला तर मुलाने स्वयंचलित कुलुप बसवले त्यात ठराविक क्रमांक दाबले की घर उघडते.फक्त तो क्रमांक लक्षात ठेवणे हे आपला ए.टी.एम. क्रमांक लक्षात ठेवण्यासारखाच उपद्व्याप आहे पण त्याला काही इलाज नाही.पण आताचे कुलूप इतके स्वयंचलित आहे की ऑफिसमधूनही तो ते उघडू शकतो व काम करणारी बाई काम करून परत तिने फोन केला की बंद करून घेऊ शकतो.
     पण या स्वयंचलित कुलुपानेही एकदा इंगा दाखवला .आमचा नातू शाळेतून घरी आला.त्याला स्वयंचलित क्रमांक माहीत असल्याने त्याने तो क्रमांक दाबला पण त्याच्या आईला (म्ह.आमच्या सुनेला) काचेच्या दारातून दिसले व आपला पोरगा दमूनभागून  आला म्हणून त्याला तेवढेही श्रम नकोत म्हणून तिने आतील खटक्याने दार उघडण्याचा प्रयत्न केला.त्या दोघांच्या प्रयत्नात त्याचा स्वयंचलित बाणा बिघडला आणि त्यानंतर ते बंद व्ह्यायला नकार देऊ लागले. सुदैवाने त्यातील यांत्रिक करामत आमच्या मुलाला समजली व बऱ्याच खटपटीने ते उघडू मिटू लागले. थोडक्यात कुलुप किल्लीची जोडी सुरक्षिततेपेक्षा त्रासदायकच जास्त असते येवढे मात्र खरे.
           आता मात्र सौने मला गळ्यात अडकवण्याची पिशवी दिली आहे व किल्ल्या त्यातच ठेवायच्या आणि पिशवी गळ्यातून काढायची नाही अशी ताकीदही!आता पाहू या पिशवीसह किल्ली किती दिवस टिकते ते ! कारण बरेच वेळा पिशवी गळ्यात असली तरी चुकून किल्ली मात्र खिश्यातच ठेवली जाते. शिवाय किल्लीसकट पिशवी चुकून गळ्यातून काढून ती तेथेच विसरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.