जुलै २४ २०१९

अष्टावक्र संहिता : १ : परिचय

अष्टावक्र संहिता आध्यात्मिक जगतात फारशी परिचित नाही कारण ती मार्गदर्शक नाही,  उदघोषक  आहे. अष्टावक्र सत्याचा सरळ  उदघोष करतो.   धर्म तयार होण्याचं कारण सत्याप्रत पोहोचण्याचा मार्ग सांगणं आहे. इस्लाम हा मार्ग आहे, भक्ती हा मार्ग आहे, पातंजली सत्याप्रत पोहोचण्यासाठी आठ पायऱ्या सांगतात आणि एकदा मार्ग आला की मार्गक्रमण आलं ! मार्ग  नेहमी संभ्रमासमेत येतो कारण तो निवडीचा पर्याय  निर्माण करतो आणि निवड आली की द्वंद्व ओघानं येतंच . शिवाय मार्ग  आणि काल या एकोत्पन्न घटना आहेत, त्यामुळे सत्योपलब्धी  कालसापेक्ष होते आणि सत्य  कायम कालरहित आहे; त्यामुळे मार्ग निरुपयोगी ठरतो.   अष्टावक्र संहिता त्यामुळे अनमोल ठरते आणि त्या अद्वितीय बुद्धिमत्तेला दाद देण्यासाठी हे लेखन!  

अष्टावक्र आणि राजा  जनक यांच्यातला संवाद असं या संहितेचं स्वरूप आहे.   प्रत्येक श्लोक आणि त्यावर लेखन अशी या लेखमालेची मांडणी नाही, तर नेमके श्लोक आणि त्यांची सद्यकालीन संदर्भात  उकल केली आहे.   

                                                                    यदी देहं पृथकृत्य चित्ती विश्राम्य तिष्ठसी ।
                                                                  अधुनैव सुखी, शांतो, बंधमुक्तो, भविष्यसी ॥ ४ ॥ १ 

हरक्षणी होणारी प्रत्येक जाणीव आपल्याला देहातूनच होते. देहाशिवाय जगाला अर्थच नाही. कुणी हाक मारली तर त्या आवाजाची जाणीव कानामुळे होते, मग त्या रोखानं बघून ती व्यक्ती ओळखणं डोळ्यांमुळे होतं. हा दृक-श्राव्य संदेश मेंदूतल्या स्मृतीशी  संलग्न होऊन कळतं की कुणी हाक मारली.   देहाशी आपण इतके संलग्न झालोत की देह चाललाय म्हणजे आपणच चालतोय  असं वाटतं! वास्तविकात आपण चालत नाही, कायम देहच चालतो. आपण एक स्थिर आणि निर्वैयक्तिक बोधावस्था आहोत पण ही उकल मृत्युसमयी सुद्धा होत नाही. आपल्याला वाटतं आपलाच मृत्यू होतोय!   इतरांचा त्याला असा काही दुजोरा असतो आणि  असा काही हलकल्लोळ माजलेला असतो, की  " देह मरतोय आणि आपल्याला कळतंय " ही जाणीव असंभव होऊन बसते.  

पहिल्या अध्यायातला हा चवथा श्लोक केवळ एका वाक्यात सगळं  अध्यात्म सांगतो.   त्याचा अर्थ असा :

" जर आपण देहापेक्षा वेगळे आहोत हे जाणून तू स्वरूपात स्थिर झालास तर या क्षणी सुखी, शांत आणि बंधमुक्त होशील "

आपण देहापेक्षा वेगळे आहोतच, ती वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती जाणून घेणं ही क्रिया नाही, तो उलगडा आहे.   तुम्ही आता जिथे असाल तिथे, आपल्या दोन्ही हातांची तर्जनी त्या हाताच्या अंगठ्याला लावा,   ते गोल एकमेकात गुंफा आणि डोळे मिटा.   तत्क्षणी मन थांबेल आणि तुम्हाला जाणीव होईल की देह बसलाय आणि आपल्याला कळतंय!

एकदा  हा  " देहं पृथकृत्य " तुमचा अनुभव झाला की पुढची घटना आपोआप घडते,   " चित्ती विश्राम्य तिष्ठसी! "  जिथे असाल तिथे तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता; स्वरूपात स्थिर होता. कारण तुम्ही नाही अशी कोणतीही जागा नाही किंवा अशी कुठलीही वेळ नाही.   समय आणि स्थान यात देह बद्ध आहे, आपण नाही. आपण सदैव देहातीत आहोत. देहाच्या आत आणि बाहेर आहोत,  पण देह झालेलो नाही.

अष्टावक्र म्हणतात, ही  देहापासून विलग असलेली स्थितीच सुख आहे, शांतता आहे आणि बंधनातून मुक्तता आहे.   तुम्हाला तत्क्षणी उलगडा होईल की आपण सदैव एक मुक्त अवस्थाच होतो, देहबद्ध व्यक्ती कधीही नव्हतो.   व्यक्तिमत्त्व ही आपली मान्यता होती. सर्व जाणीव दैहिक असल्यानं आपल्याला आपण देहबद्ध असल्याचा भास होत होता.   आपण कायम शांत, स्थिर आणि सुखीच होतो!

क्रमशः

Post to Feedवाचतोय
अष्टावक्र संहिता अध्यात्म एका वेगळ्याच उंचीवर नेते
वाचत आहे
लेखात जी ध्यानप्रक्रिया सांगितली आहे ती करुन पाहा
वस्तुस्थिती जाणून घेणं ही क्रिया नाही, तो उलगडा आहे.
शाब्बास !
फोटो

Typing help hide