ऑगस्ट २०१९

अष्टावक्र संहिता : २ : घटना !

संपन्न आणि बुद्धिमान व्यक्तीला एक प्रश्न कायम पडू शकतो आणि त्याचं अध्यात्मात कुठेही निर्विवाद उत्तर सापडत नाही. तो  म्हणजे  " आयुष्यात घटना कशा घडतात ? "  थोडक्यात, घटना ही व्यक्तीची नियती आहे की तिचं कर्तृत्व ? आणि मग  त्या योगानं सगळ्यात महत्त्वाचा पुढचा प्रश्न  येतो "  पैशाचा घटना घडवण्यात हात किती ?

सर्व आध्यात्मिक ग्रंथात  " दैव, नियती, परमेश्वर... " असे निराधार शब्द वापरले गेलेत त्यामुळे " घटना घडते कशी ? " हा संभ्रम कायमचा होऊन बसला आहे. 

अष्टावक्र संहितेतला हा श्लोक घटना घडते कशी या संभ्रमापासून मोकळा करत नसला तरी मार्गदर्शक नक्कीच ठरू शकतो :
                                                           धर्मोअधर्मो, सुखं-दु:खं मानसानि, न ते विभो ।
                                                       न कर्ताअसि, न भोक्ताअसि, मुक्त एवसि सर्वदा ॥६॥ १

अष्टावक्र म्हणतात, धर्म-अधर्म सुख-दुःख सर्व मानसिक आहे,  त्याचा तुला  स्पर्श होत नाही  आणि त्याचं कारण असं सांगतात की तू कर्ता किंवा भोक्ता नाहीस तर तू कायम एक मुक्त अवस्था आहेस !

आता ही गोष्ट समजायला सोपी आहे, आपण फक्त एक मोकळीक आहोत; देहात बंदी झालेली व्यक्ती नाही. त्यामुळे जे काही क्लेश किंवा भोग आहेत ते शारीरिक आणि मानसिक स्तरापुरतेच मर्यादित आहेत;  ज्या रंगमंचावर घटना घडते आहे त्याला काहीही होत नाही. तो सदैव एकसंध आणि अबाधित राहतो. आपण तो रंगमंच आहोत, जीवनाच्या चित्रपटातली व्यक्तिरेखा नाही. 

थोडक्यात, अष्टावक्र सरळ घटनेच्या परिणामातून मुक्त व्हायचा उपाय सांगतात, घटना भले कशीही घडू दे !  ज्यात घटना घडते आहे  ते अवकाश तुम्ही आहात, ज्या व्यक्तीच्या संदर्भात ती घडते आहे  ती व्यक्ती नाही.  आपण स्वतःला व्यक्ती मानतो  पण वास्तविकात आपण अवकाश आहोत, हा फक्त उलगडा झाला की घटनेच्या परिणामापासून मुक्ती आहे !

आपण कर्ता किंवा भोक्ता आहोत असं भासण्याचं कारण म्हणजे देहाशी संलग्नता !  आणि तो भास निस्तरण करायची एकमेव  क्ऱ्लुप्ती अष्टावक्रानं पहिल्याच लेखात सांगितली आहे : यदी देहं पृथकृत्य चित्ती विश्राम्य तिष्ठसी ।

आता मुख्य प्रश्नाकडे  वळू, जो अष्टावक्रानं  नेमका अनुत्तरित ठेवला आहे !  घटना  दोन्ही प्रकारे घडू शकते.  उदा.  श्वास चालणं हे  व्यक्तीगत कर्तृत्व नाही, ती नियती आहे.  श्वास बंद पडला तर तो चालू करता येत नाही किंवा सायासानं तो  कायमचा चालू ठेवता येत नाही.  त्यामुळे अगदी निर्विवादपणे बोलायचं झालं तर जिथे श्वासच आपल्या काह्यात नाही तिथे सर्वच नियत आहे.  कारण  कोणतंही कृत्य करायचं झालं तर श्वास चालू असायला हवा आणि तेच अस्तित्वाच्या हातात आहे तर आपल्या इच्छेला किंवा अनिच्छेला काहीही अर्थ उरत नाही. 

तरीही श्वास चालू असताना आपण हरघडी नियतीचा कौल घेत नाही. प्रत्येक जण स्वकर्तृत्वावर काही ना काही करायला बघतोच आणि तेव्हा घटना घडण्यात किंवा न घडण्यात पैशाचा फार मोठा हात असतो. म्हणजे पैसा ही माणसानं स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केलेली कल्पना आहे आणि (वस्तुस्थिती तशी नसली तरी)  पैसा आहे म्हणूनच श्वास चालू आहे ही माणसाची ठाम समजूत आहे ! त्यामुळे पैशामुळेच घटना घडते असा माणसाचा पराकोटीचा गैरसमज आहे. 

थोडक्यात, अस्तित्वाला पैशाशी काहीही देणं-घेणं नाही,  ती माणसाची कल्पना आहे आणि अस्तित्वात कालही नाही, ती सुद्धा माणसाची कल्पनाच आहे. त्यामुळे अस्तित्वातले अनंत घटक ज्यांची माणूस कल्पनाही करू शकत नाही,  प्रत्येक घटना घडायला एकसमायवच्छेद करत कारणीभूत असतात.  उदा. एखाद्या लक्षावधी कामगार नोकरीला ठेवलेल्या उद्योजकानं  सकाळी उठून कामाला जायचं म्हटलं तर प्रथम त्याचा श्वास चालू पाहिजे, त्यासाठी सूर्य प्रकाशमान असायला हवा, पृथ्वी सूर्याभोवती नेमकं अंतर ठेवून  परिभ्रमण करत राहायला हवी (ज्याची त्रिज्या १५ कोटी किलोमीटर आहे),   प्राणवायू निर्मितीसाठी सर्व वृक्षवल्लरी कार्यरत असायला हव्यात, त्यासाठी  पाऊस पडायला हवा, तो पडायला सारे समुद्र बाष्पीभूत व्हायला राजी हवेत, ते समुद्र जागेवर राहायला चंद्र पृथ्वीभोवती ३.८४ लाख किलोमीटरच्या त्रिज्येत फिरत राहायला हवा ............!  या अगदी उघड गोष्टी झाल्या ! यापलीकडे किती तरी घटक आहेत जे माणसाच्या बुद्धीच्या हद्दीतही येत नाहीत. 

त्यामुळे प्रत्येक घटना अस्तित्वागत आहे. पैसा घटना घडवत नाही,  घटना घडणारच असते आणि  तिला कालाचं बंधन नाही. त्यामुळे घटना कशी घडते ? यापेक्षा घटना घडवायची की घडू द्यायची हा खरा मानवी जीवनातला मूलभूत प्रश्न आहे !  

याला एकमेव आणि सर्वकाल उपयोगी असं एकच उत्तर आहे, ते म्हणजे (१) घटना काहीही घडो, तिचा आपल्यावर परिणाम न होणं; हा प्रथम चरण आहे. आणि (२)  घटना घडवताना आपण कायम देहापासून वेगळं असायला हवं, तरच घटनेच्या परिणामाची तमा राहत नाही.  उदा. अपघात घडत असेल तर आपण इतके स्थिर हवोत की अपघात फक्त आकारात घडेल, निराकार अबाधित राहील. आणि चालताना आपण देहापासून इतके वेगळे हवोत की शरीर चालतंय आणि आपण कधीही आणि कुठेही जात नाही हे भान कायम असायला हवं.  

अशा प्रकारे घटना घडूही देता येते किंवा घडवताही येते; तो तुमचा प्राप्त परिस्थितीतला विकल्प आहे. थोडक्यात, कर्मयोग ही पापभीरू कल्पना आहे, तिला न शास्त्रीय आधार न व्यक्तीगत विकल्पाची मोकळीक. पण प्रत्येक घटनेची  मजा घ्यायची असेल तर  ती घडू देणं  किंवा घडवणं हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत आणि निवड तुमच्या हातात आहे. 


Post to Feedविसंगती
अस्तित्वागत घटना आणि व्यक्तिगत जीवनातली घटना
उगीच वाद नको !
प्रतिसादांना

Typing help hide