ऑगस्ट २७ २०१९

अष्टावक्र संहिता : ५ : अष्टावक्राचे प्रतिप्रश्न !

                                                               अविनाशिनमात्मानमेकं विज्ञाय तत्त्वतः: ।
                                                             तवात्मज्ञस्य धीरस्य कथमर्थार्जने रति: ॥ ३ - १॥

आत्म्याला तत्त्वतः: एक आणि अविनाशी जाणूनही तुझ्यासारख्या आत्मज्ञानी आणि धैर्यवंताला अजूनही धन कमावण्यात रुची आहे का ? 

हा अष्टावक्राचा जनकाला त्याच्या उदघोषानंतरचा पहिलाच प्रश्न आहे ! याचा उहापोह दुसऱ्या लेखात झाला आहे. जरी जनक म्हणत असला की " आश्चर्य आहे की अनंत समुद्ररुप माझ्यात जीवरुपी तरंग, आपल्या स्वभावानुसार उठतात, परस्परांशी लढतात, खेळतात आणि लयाला जातात. "  तरी रोजच्या जगण्यात व्यक्ती नुसता प्रकृतीचा खेळ पाहत बसू शकते का ? हा फार अर्वाचीन प्रश्न आहे . कारण जरी आपण मुळात निराकार असलो तरी रोजचं जगणं हे व्यक्तिमत्त्वातूनच आहे. अस्तित्वात वेळ नसली आणि पैसा ही निव्वळ मानवी कल्पना असली तरी आत्मज्ञानी सर्वस्वी प्रकृतीवर अवलंबून राहू शकत नाही. उदाहरणार्थ सिद्धाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर तो प्रकृती नेईल तेव्हा बघू, मी अचल, अविनाशी आणि निश्चल आहे या भरवशावर राहू शकत नाही.  तथापि सर्व सोयी सुसज्ज असल्या तरी अस्तित्वाच्या मर्जीविरुद्ध घटना घडणं असंभव आहे कारण वरकरणी साधी दिसणारी घटना अस्तित्वाच्या अगणित आणि अगम्य घटकांच्या पारस्परिक सहकार्यावर अवलंबून आहे हे दुसऱ्या लेखात आपण पाहिलं आहे. त्यामुळे घटना घडू द्यायची की घडवायची या जगण्यातल्या  हरघडी पडणाऱ्या वास्तविक प्रश्नाला कोणत्याही आध्यात्मिक ग्रंथात आजवर कुणीही समर्पक उत्तर  देऊ शकलेलं नाही. जनक देखिल या प्रश्नाला उत्तर देत नाही आणि अष्टावक्रही तो प्रश्न पुढे नेत नाही !

जे कृष्णमूर्तींची एकमेव शिकवण निर्विकल्प सजगता (चॉइसलेस अवेअरनेस) आहे, त्यांच्या दृष्टीनं निवड करणं म्हणजे मनाच्या द्वंद्वात सापडणं आहे. पण या शिकवणीचा साधकांना उपयोग झालेला नाही कारण जीवन हरघडी विकल्प निर्माण करतं आणि व्यक्ती निवड करायला बाध्य होते. ओशोंनी म्हटलंय की जनसामान्यांचं सगळं आयुष्य केवळ वेळेचं रूपांतर पैशात  करण्यात व्यतीत होतं. आणि इथे  अष्टावक्रानं जनकासारख्या राजाला विचारलंय कथमर्थार्जने रति: ! म्हणजे गेली पाच हजार वर्ष आध्यात्मिक जगतात सुद्धा एकच प्रश्न आहे की क्षणोक्षणी निर्माण होणाऱ्या विकल्पातून निवड कशी करायची ?

मुळात हा पेच काय आहे ते बघू. पैशाला अर्थ म्हटलंय, त्यामुळे ज्यातून आर्थिक लाभ आहे तो पर्याय आपसूक निवडला जातो. अर्थाविना अनर्थ ओढवेल ही  भीती मानवी मनात खोलवर रुजली आहे. या भीतीनं चित्ताचा मोठा भाग व्यापल्यामुळे व्यक्ती स्वच्छंद होऊ शकत नाही.  कितीही संपन्नता असली तरी व्यक्ती ती विसरून पैशाच्या मोहात किंवा दहशतीत सापडतेच ! आणि व्यक्ती-व्यक्तीतल्या घटनांचा तर पैसा हा अत्यंत महत्त्वाचा कारक ठरतो. जर पगार मिळणार नाही असं कळलं तर लोक बिछान्यातून उठण्याचे सुद्धा कष्ट घेणार नाहीत. मनुष्याला पैशाविना जीवनाची कल्पनाच अशक्य आहे आणि विपर्यास असा आहे की अस्तित्वाला पैशाशी काहीही देणंघेणं नाही. 

तस्मात, विकल्प कसा निवडायचा याचं एकमेव उत्तर आहे की  हवा तो विकल्प निवडायचा फक्त स्वतःशी संपर्क तुटू  द्यायचा नाही. म्हणजे नक्की काय करायचं ? तर कायम समोर पाहत राहायचं आणि काहीही करताना आजूबाजूला चाललेलं स्पष्ट ऐकत राहायचं. कारण काय ? तर मन  सतत प्रतिमा आणि संवाद प्रक्षेपित करतं . हे प्रक्षेपण स्वतःपासून विलग झाल्याचा आभास निर्माण करतं त्यामुळे अस्वस्थता येते आणि मग कृत्याची मजा हरवते. मनाचं प्रक्षेपण तंद्रा निर्माण करतं, ही तंद्रा विक्षेप करून हवी ती निवड करू देत नाही.  तंद्रेमुळे संभ्रम निर्माण होतो आणि त्याचं रूपांतरण अस्वास्थ्यात होतं त्यामुळे ज्या क्षणी मनाचं प्रक्षेपण सुरू होईल त्या क्षणी सजग होऊन चालू असलेलं कृत्य पूर्ण करता येतं किंवा हवं तर बदलता येतं. थोडक्यात काय तर तंद्रारहित निवड हा स्वातंत्र्याचा एकमेव राजमार्ग आहे. आणि त्यामुळे कथमर्थार्जने रति: ! हा प्रश्न वरकरणी अत्यंत भेदक वाटला तरी सजगते पुढे  तो निष्प्रभ ठरतो.  

सत्य उमगल्यावर एकच भ्रम दूर होतो तो म्हणजे पैशाकडे सुरक्षाकवच म्हणून पाहण्याची वृत्ती संपून जगण्याची सुविधा म्हणून पाहिलं जातं. कारण सत्य कशावरही अवलंबून नाही, ते निरालंब आहे. तस्मात, सत्योपलब्ध व्यक्तीच्या जीवनाची दिशा पैशाऐवजी आनंद होते. तिची पैशातली रुची संपत नाही तर पैशावरचं अवलंबित्व संपतं. अशाप्रकारे गेल्या हजारो वर्षापासून पडलेल्या  कथमर्थार्जने रति: !  या प्रश्नाची साधी आणि सोपी  उकल आहे. 

Post to Feedघटना
स्वातंत्र्य मिळवायची प्रत्येकाची मनीषा असते

Typing help hide