सप्टेंबर १३ २०१९

अष्टावक्र संहिता : ६ : अष्टावक्राचे अतीप्रश्न !

                                                                     उद्भूतं ज्ञानदुर्मित्रमवधार्यातिदुर्बल: ।
                                                                     आश्चर्यं काममाङ्क्षेत कलमन्तमनुश्रित: ॥ ३ - ७ ॥

अष्टावक्राचा प्रश्न आहे की काम हा ज्ञानाचा शत्रू आहे हे जाणूनही एखादा अतिदुर्बल आणि मरणासन्न सुद्धा कामाकांक्षा करतो हे आश्चर्य आहे !

आता हा दुसरा अर्वाचीन प्रश्न आहे.  अध्यात्मात याचं उत्तर अजून कुणीही दिलेलं नाही आणि खुद्द जनकही देत नाही. ओशोंनी संभोगसे समाधीतक हा साहसी प्रस्ताव मांडला पण तो कुणालाही समाधीप्रत नेऊ शकला नाही.  त्याची कारणं भिन्न आहेत आणि  खुद्द ओशोंनाही ती माहिती असण्याची शक्यता शून्य होती.  त्याचीही कारणमीमांसा लेखात शेवटी केली आहे. 

षड्रिपूत काम सर्वप्रथम आहे आणि सत्योपलब्धी कामाकांक्षा सुटल्याशिवाय अशक्य आहे असा  भ्रम अगदी अध्यात्म सुरू झाल्यापासून आहे. जनसामान्य अध्यात्माकडे न फिरकण्याचं एकमेव कारण म्हणजे उरलेल्या पाच शत्रूंचा  दैनंदिन मुकाबला करणं त्यांना शक्य वाटतं पण कामाकांक्षेला शत्रू मानायला मन तयार होत नाही. 

हा पेच काय आहे ते पाहू. शरीराची निर्मितीच कामेच्छेतून आहे त्यामुळे प्रत्येक पेशी कामेच्छेचंच फलित आहे. काम ही निसर्गाची स्वनिर्मितीसाठी केलेली अंगभूत योजना आहे. सर्व प्रकटीकरणाचा स्रोतच काम आहे.  त्यामुळे कामेच्छा संपली की जीवनातला उत्साह संपतो. शरीराच्या अंतस्त्रावी ग्रंथींचं कार्य कामप्रेरणेवर अवलंबून आहे त्यामुळे कामविन्मुखता शारीरिक (आणि पर्यायानं मानसिक) व्याधी निर्माण करते. उदाहरणार्थ एखादी समाजसेवेच व्रत घेतलेली व्यक्ती निव्वळ त्याच ध्येयानं कितीही पछाडली तरी तो केवळ त्या व्यक्तीचा मानसिक ध्यासच राहतो.  अशा व्यक्तीला  एकीकडे त्या ध्यासाची स्वतःला वारंवार बजावणी करायला लागते आणि दुसरीकडे कामपराङ्गमुखतेमुळे शारीरिक  स्वास्थ्य बिघडायला लागतं.  थोडक्यात,  ध्येय कोणतंही असलं तरी त्यासाठी लागणारी ऊर्जा ही कामेच्छा जागृत असल्यामुळेच निर्माण होते.  मग ती शारीरिक ऊर्जा व्यक्ती कोणत्याही सृजनात्मक कार्यासाठी वापरू शकते; पण मुळात ऊर्जा निर्माण होणं गरजेचं आहे. 

तर आता मुख्य मुद्दा बघू,  काम हा ज्ञानाचा शत्रू आहे असं अष्टावक्र म्हणतात आणि ही धारणा पूर्वापार आहे.  ज्ञान दोन प्रकारचं आहे, एक व्यक्त जगातलं ज्ञान आणि दुसरं आत्मज्ञान; म्हणजे स्वतःला जाणण्याची प्रक्रिया.  व्यक्त जगातल्या ज्ञानप्राप्तीत काम हा शत्रू आहे कारण कामेच्छा विक्षेप निर्माण करते हा अनुभव सार्वत्रिक आहे. पण तोच नियम आत्मज्ञानाला लागतो ही धारणा मात्र अज्ञानमूलक आहे. 

काम दोन व्यक्तींना एकाच वेळी वर्तमानात आणतो.  संपूर्ण वर्तमानात येणं आणि त्या स्थितीशी एकरूप होऊन राहणं हीच सिद्धावस्था आहे. कृष्णानं स्वतःला सनातन वर्तमान म्हटलंय. ओशोंनी जरी हा साहसी प्रस्ताव मांडला होता तरी त्या अवस्थेप्रत येण्यासाठी लागणारे इतर निकष ओशो सांगू शकले नाहीत.  पहिला निकष, व्यक्तींमधला  पारस्परिक अनुबंध हा आहे. तो एकमेकांप्रती असलेल्या बांधिलकीमुळे येतो.  ओशो विवाहविरोधी होते आणि स्वैर संबंधात अनुबंध निर्माण होत नाही.  अनुबंध नसेल तर प्रणयात देण्याची वृत्ती राहत नाही.  तस्मात, प्रणयकाल दीर्घ होऊ शकत नाही. दुसरा निकष समयशून्यता आहे कारण सनातन वर्तमान म्हणजेच कालरहितता. प्रणयात समयशून्यता येण्यासाठी युगुलाची (किंवा किमान पुरुषाची तरी) चित्तदशा निरभ्रांत हवी.  हा जीवनाच्या समायोजनाचा भाग आहे;  जीवनात कमालीची फुरसत निर्माण करणं हे कौशल्याचं काम आहे. ओशो याविषयी अवाक्षर बोललेले नाहीत. शेवटचा निकष अपराधरहित चित्तदशा  हा आहे आणि ती केवळ वैवाहिक नात्यातच असू शकते; कारण अपराधभाव मनात असेल तर मनःस्वास्थ्य असंभव आहे. परिणामी एकमेकात पूर्णपणे विलीन होणं अशक्य आहे. अशा प्रकारे, उपरोल्लेखित तीन निकष जर प्रणयात आणता आले तर कामेच्छा दोघांनाही संपूर्णपणे वर्तमानात आणू शकते आणि वर्तमान होऊन राहणं हीच सिद्धावस्था आहे.

 तस्मात, आश्चर्यं काममाङ्क्षेत कलमन्तमनुश्रित: हा अष्टावक्राचा जनकाला अतीप्रश्न झाला आहे. 

 

Post to Feedहम्म
ओशोंना वैवाहिक जीवनाचा अनुभव शून्य होता !
कामातूरपणा - विकार
कामातुरता आणि प्रणयाचा साधना म्हणून उपयोग या भिन्न गोष्टी आहेत

Typing help hide