डिसेंबर १६ २०१९

तांत्रिक पहारा!

१२, नोव्हेंबर २०६०. 

आज खूप दिवसांनी चश्म्याशिवाय लिहिणार आहे! 
आजकाल त्या चीप शिवाय चश्मे मिळतच नाहीत. 
स्मार्टस्पेक्टस् म्हणे! 
मला नाही सगळं रेकॉर्ड करून टाकायचं सोशल मिडियावर!
मुळात मी सहज म्हणून काहीही लिहिलेले माझा(?) स्मार्टस्पेक्ट वाचतो आणि थेट माझ्या एफबीवर पोस्ट करतो हे असले आचरट सेटिंग कोणी करून ठेवले आहे कोणास ठाऊक?

"व्यक्त व्हा! व्यक्त व्हा! म्हणत म्हणत वैयक्तिक असं हल्ली काही राहिलंच नाहीये!"

परवा सहज वैतागलो असल्याचा आशय असलेले काही लिहायला म्हणून गेलो तर सोसायटीमधला कौन्सलर दारात उभा! 
"आयुष्याचे मोल" वगैरे सांगायला लागला, तेव्हा कळलं की कमिटीने आम्हा वृद्धांच्या सोशल मीडिया अपडेट्सवर वॉचडॉग ठेवलेत!  
"Out of concern" म्हणे! 

कधी कधी वाटतं नको हे स्मार्टपण. 
सगळं सोडून जुन्या पुण्यामधल्या अगदी ११व्या मजल्यावरल्या घरी जावंस वाटतं! तिथल्या गॅलरीमधून छान रस्ता दिसतो अजून सुद्धा! आता ह्या ११०व्या मजल्यावरून हवे तशी प्रोग्रॅम केलेली चित्र (स्मार्ट-स्क्रिन्स म्हणे) कितीही खरी वाटत असली तरी ती तशी नाहीत हे देवाजींनी दिलेल्या चिपला माहिती असते त्याचे काय करायचे? 
जुन्या पुण्यात नंतर नंतर जेवण फक्त ऑनलाईन जरी मागवत असलो तरी ते घरी शेगडीवर गरम करायची सोय तरी होती, इथे आता किचनच नाही. आलं टाकून स्वतः बनवलेल्या चहाचा घमघमाट ह्या रेडी मिक्सच्या पाकिटांना विजेने गरम केलेल्या पाण्यात टाकून येऊ शकत नाही हे स्वतःला स्मार्ट म्हणवणाऱ्या ह्या पिढीला कसे कळत नाही देव जाणे. 
तरी नशीब, हिने यशकडे हट्ट करून देवघर तरी आणलं इकडे, नाहीतर शेजारच्या कुमार्सकडे तर म्हातारा म्हातारी व्हिआर गॉगल्स लावून आरत्या म्हणतात म्हणे. 

ह्या नव्या स्मार्ट शहरांत जीव नकोसा होतो!
मध्ये ते "गूगल लिसंस" चे नाटक उघडकीस आल्यापासून मी फिरायला वगैरे फोन सोबत न्यायचा बंद केला तर ते बाजूचे जोशी संगत होते की हल्ली चष्म्यातच काय तर शर्टच्या बटणांत, पँटच्या बेल्टमध्ये पण चीप असतात. 

"हाडामांसाची माणसं सोडून सगळं एकमेकांशी जोडलेले?"

ह्या नव्या पिढीला कधी कळणार की ही असा "तांत्रिक पहारा" ठेवण्यापेक्षा स्वतः चौकशीचे दोन शब्द बोलले तरी पुरेसे आहे.

Post to Feed
Typing help hide